मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्थळ…. भाग – 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ स्थळ…. भाग – 2 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

(अनुभव निघून जायचा आणि विषय तिथेच थांबायचा…आता पुढे)

गाडीत दीपा खूप बोलत होती. तिने मला मोबाईल वर, मुलीचा फोटो ही दाखवला. हसरा चेहरा.  सरळ नाक. चमकदार डोळे.

” चांगली वाटते ना काकू? शिवाय इंजिनियर आहे. अनुभव सारखीच आयटीमध्ये आहे.  तसं कुटुंब साधारणच आहे..वडील बँकेत आहेत. निवृत्तीला दोनेक वर्षे असतील. आई गृहिणी आहे. एक लहान भाऊ आहे. तो शिकतोय. फायनान्स मध्ये असावा घरची परिस्थिती सर्वसाधारण आहे पण त्यामुळे आम्हाला काहीच फरक पडत नाही. मुलगी  लग्नानंतर आपल्या सगळ्यांशी जुळवून घेणारी, घर आणि करिअर दोन्ही सांभाळणारी असली पाहिजे. मग झालं. मला जाणवत होतं, अनुभवचं ओलांडत चाललेलं वय, त्याचं अविवाहित असणं, मित्रांमध्ये त्याचेच फक्त हे स्टेटस. 

आणि आता त्यांने लवकरच चतुर्भुज व्हावं हा एकच विषय दीपाच्या मनावर स्वार करून होता. 

मी तिचा हात धरला. म्हटलं,” नको घेऊस इतका ताण. योग यावा लागतो. वेळ यावी लागते.”

” ते तर आहेच हो काकू!”

मग लोकेशन जुनी गाणी लावली. जरा विषय बदलण्याचा प्रयत्न केला. थोडं वातावरण हलकं झालं.

मला काहीतरी आठवलं मी थोडं बिचकतच पण सहज वाटेल अशा शब्दात दीपाला विचारलं,

” काय ग ? त्या गायत्रीचं काय झालं?”

” तिचं गेल्याच वर्षी लग्न झालं. आता ती कॅनडाला असते.”

मध्ये काही क्षण निशब्द, स्तब्ध रेंगाळले.

“मला आवडायची गायत्री. आमच्या घरीनेहमी यायची, फोनवर खूप गप्पा करायची. बारीक-सारीक गोष्टींसाठी ती अनुभवावर अवलंबून असायची. तिच्या सगळ्या समस्यांत अनुभव तिला मदत करायचा.  एक दिवस मी अनुभवला विचारलही, तुझ्यात आणि गायत्रीत काही आहे का? म्हणजे असेल तर चालेल आम्हाला. तेव्हा केवड्या मोठ्याने हसला होता तो! माझे खांदे धरून म्हणाला होता,

” तू कठीण आहेस मम्मी! प्रत्येक मुलीत तू तिला माझी जोडीदार बघतेस की काय? आणि गायत्री?… माय गॉड… आम्ही नुसते चांगले मित्र आहोत…”

” काकू या मुलांचं काही कळतच नाही. त्यांना आपल्या चिंता ही समजत नाहीत.”

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ स्थळ…. भाग – 1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? जीवनरंग ❤️

☆ स्थळ…. भाग – 1 ☆ सौ राधिका भांडारकर ☆

रात्री झोपायचीच तयारी करत होते. 

गोळ्या घेतल्या. नाईट क्रीम लावली. डोळ्यात ड्रॉप्स टाकले. पांघरुणाची घडी उलगडली. पुस्तक हातात घेतलं. तेवढ्यात फोन वाजला.

पलीकडून आवाज.

” काकू झोपला नाही ना अजून?”

” नाही. तुझा फोन उचलला म्हणजे नक्कीच ना. हं बोल. “उद्या सकाळी सात वाजता आम्ही तुम्हाला घ्यायला येतो. तयार रहा. आपल्याला कोल्हापूरला जायचे आहे.”

” अग पण”

” नाही तुम्ही काही कारण सांगू नका. तुम्ही येणार आहात. “अग पण”

” हे बघा अनुभव साठी एक चांगलं स्थळ आलंय. फेसबुक वर मुलीचे फोटो पाहिलेत. चांगली  वाटते. बाकी सगळं सविस्तर मी तुम्हाला सांगेनच. मुख्य म्हणजे अनुभव ही मुलगी बघायला तयार झालाय.

” तो येणार असेलच ना?”

” नाही ना. पण तो म्हणाला, तुम्ही भेटून घ्या. तुम्हाला पटलं तर आपण पुढे जाऊ.

म्हणताना मी म्हणाले,” बरं येते. सकाळी तयार राहते.”

पण मनात दुसरंच होतं. एक तर मला अशा प्रकारच्या मुलाखतींना उपस्थित राहणे आवडत नाही. अनुभव का येणार नव्हता? लग्न तर त्याला करायचं ना? आणि लोकेश, दीपा तरी हे असं कसं चालवून घेतात?

गेली दोन-तीन वर्ष अनुभवचं वधु संशोधन चालू आहे. खरं म्हणजे भक्कम वैवाहिक पार्श्वभूमी असतानाही, कुठे मनासारखं जुळत नव्हतं. उत्तम शिक्षण. उत्तम नोकरी. भरभक्कम बँक बॅलन्स. पुण्यात प्रशस्त फ्लॅट. दाराशी महागड्या गाड्या. म्हणायला, अनुभवला थोडसं टक्कल होतं. पण तो काही मोठा अडथळा नव्हता. म्हणजे नसावा. म्हणजे काही मुलींनी, त्याला त्या कारणास्तव नाकारलं होतं. पण बऱ्याच ठिकाणी अनुभवच… “काहीतरीच काय मला मुळीच क्लिक होत नाही” असे म्हणून मोकळा व्हायचा.

आज-काल तर त्यांनी अशा  बैठकींना येण्याचही बंद केलं होतं.

दीपाची आणि त्याची खूप भांडणं व्हायची. वाद व्हायचे.तुझं लग्न तूच का नाही जमवलंस इथपर्यंत विषय ताणला जायचा. शेवटी अनुभव उठून बाहेर जायचा. आणि मग तो विषय संपायचा. नव्हे तिथेच अर्धवट राहायचा.

क्रमश:…

© सौ. राधिका भांडारकर

पुणे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रारंभ – भाग-5 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ प्रारंभ – भाग-5 ☆ श्री आनंदहरी

रंजना आपल्याच विचारात मग्न होती. स्वप्नांच्या झुल्यावर झुलत सासरच्या घरात पाऊल ठेवले होते.. आनंदांत स्वप्नांच्या झुल्यावर झुलत असताना ध्यानीमनी नसताना झुला तुटावा आणि सारी स्वप्नेच तुकड्या तुकड्यात विखरून पडावीत अशी तिची अवस्था झाली होती.. दुःख आणि रिक्ततेने मन व्यापून गेले होते. कुणाशी बोलावे, काही करावे असे वाटत नव्हते. डोळ्यांतले अश्रूही आटून गेले होते. जीवनात जे घडले होते ते धक्कादायक होते. त्या धक्क्यातून अजूनही तीच नव्हे तर सारे घरच पूर्णपणे सावरले नव्हते. ती स्वतःच्याच विचारात असताना आत्याबाई मागे येऊन कधी उभ्या राहिल्या होत्या हे तिच्याही लक्षात आले नाही. आत्याबाईंनी हळूच तिच्या खांद्यावर हात ठेवला तशी ती दचकली.

स्वतःला सावरण्याचा, आवरण्याचा प्रयत्न करीत तिने मागे वळून पाहिले. आत्याबाईना पाहताच ती म्हणाली,

“आत्याबाई तुम्ही? “

“व्हय मीच…”

तिच्याजवळ बसत तिच्या पाठीवरून मायेने हात फिरवत आत्याबाई म्हणाल्या,

“पोरी, लै इचार करून नगं तरास करून घेऊस. आगं, जाळणाऱ्या, पोळणाऱ्या उन्हाचा इचार करीत बसण्यापरीस म्होरं येणाऱ्या मिरगाचा इचार करावा माणसानं.. रातीच्या अंधाराचा इचार करण्यापरीस उजाडणाऱ्या दिसाचा इचार करावा..”

पुढं हसत हसत म्हणल्या,

“मी तरी किती येडी बाय हाय बग, अडाणी असून बी तुज्यासारख्या कालीज शिकलेल्या पोरीला शिकवाय लागलीया..ही म्हंजी रेड्याने द्यानेस्वराला द्यान शिकीवल्यावानी झालं बग..”

“तसे काही नाही हो आत्याबाई ..”

स्वतःला सावरत काहीतरी बोलायचे म्हणून रंजना म्हणाली.

“तसं न्हायतर मग कसं ? आगं, परपंच काय येकल्या बाईचा आस्तुय व्हय ? तिनं म्हायेर सोडायचं, नवऱ्याच्या घरला इवून ऱ्हायाचं.. नमतं घिऊन माजं.. माजं म्हणीत परपंचा करायचा.. समदं खरं पर नवऱ्यालाच नगं वाटत आसंल तर ? त्येलाच बायकुची काय किंमत वाटत नसंल तर.? ..तरीबी बाईनं लोकं काय म्हंतीली ह्येचा इचार करून गप ऱ्हायाचं ? आगं गोठ्यात बांदल्यालं मुकं जनावरबी कवा कवा शिंगं उगारतं ..”

“पण आत्याबाई…”

“आजूनबी तुजा पण हायच म्हण की.. आगं शिकल्याली हाईस, पायावं हुभी ऱ्हा… काळ बदलल्याला हाय ही ध्येनात ठयेव…”

रंजनाला समजवताना आत्याबाईंना त्यांचं पुर्वायुष्य आठवले. लग्न होऊन सासरी आल्यावर त्यांना पहिला धक्का बसला तो नवरा दारुडा असल्याचे समजल्यावर.. सासू सासरे चांगले होते. आपल्या नशिबात हेच होते असे म्हणून त्यांनी ‘ पदरी पडलं पवित्र झालं ‘ म्हणत दिवस ढकलायला सुरवात केली.. पण  त्याचा उलटाच परिणाम झाला.. नवऱ्याने त्यांचं अवसानच घेतलं. आल्या दिवसाला दारू पिऊन त्यांना, त्यांच्या आईबापाला लाखोली वाहत मारझोड होऊ लागली.. एके दिवशी त्याला थांबवायला मध्ये पडलेल्या सासूलाही एक दोन तडाखे बसलेले पाहिल्यावर मात्र ते सहन न होऊन त्यांनी नवऱ्याच्या हातातील टिकारणे हिसकावून घेऊन त्याची दारू उतरेपर्यंत झोडपले आणि पूर्ण शुद्धीवर आल्यावर त्याला सांगून माहेर गाठले. नंतर स्वतःच्या चरितार्थासाठी नवऱ्याच्या नावावरची थोडी जमीन लिहून घेतली आणि काडीमोड देऊन माहेरातच राहू लागल्या होत्या. तेंव्हापासून मात्र  ‘ जे आपल्या वाट्याला आलं ते दुसऱ्या कुणाच्या वाट्याला येऊ नये म्हणून त्या झटत राहिल्या होत्या..

स्वतःच्या साऱ्या आयुष्याचा पट क्षणार्धात आत्याबाईंच्या नजरेसमोरून तरळून गेला तसे त्या म्हणाल्या,

“उगं डोळं गाळत बसू नगं .. उठ.. मानसानं रडत न्हाय तर लढत जगायचं आस्तं..  आगं, आमी अडाणी.. तरीबी कवा रडलो न्हाय आन तू येवडी शिकल्याली रडत बसलीयास व्हय ?”

आत्याबाई बराचवेळ तिला समजावत होत्या, तिच्याशी बोलत होत्या. थोडया वेळाने त्या तिला घेऊन खाली आल्या. रंजनाच्या आईने चहा ठेवला. चहा पिता पिता आत्याबाई दादांना आणि रंजनाच्या आईला म्हणाल्या,

“ह्ये बगा, पोरगी येवडी शिकल्याली हाय, उगा पंखाखाली घिऊन तिच्या पंखांस्नी दुबळं करू नगा. माजी भाची हाय नाशकात, येका कंपनीत म्यानेजर हाय. तिज्यासंगं मी बोलल्ये. रंजना तिच्या पायाव हुबी  ऱ्हाऊदेल ..तिला लावून देऊया भाचीकडं.. दोन दिसात जाऊंदेल. “

“अहो पण..”

“उगा मोडता घालू नगासा.. जगण्याची लडाई ज्येची त्येनं लडायची असती… अडीनडीला आपुन हावोतच की.. पर तिला जाऊंदेल.  ह्यो भाचीचा नंबर हाय . तिच्यासंगं तुमीबी बोला आन रंजीलाबी बोलू देत. रंजे, परवा येरवाळी निघायचं बग.. येकली जातीस का संगं याला पायजेल?”

रंजनाच्या पाठीवर हात ठेवत आणि दादांकडे भाचीचा फोन नंबर लिहिलेला कागद देत आत्याबाई म्हणाल्या.

दोन दिवसांनी सकाळच्या बसने रंजना निघाली तेंव्हा बसला बसवून द्यायला आत्याबाईही आल्या होत्या. रंजनाच्या चेहऱ्यावर मिश्र भाव होते पण त्यातूनही आत्मविश्वास दिसत होता. बसमध्ये बसण्याआधी ती आई-दादांच्या पाया पडली. आत्याबाईंच्या पाया पडायला वाकली तशी आत्याबाईंनी उचलून जवळ कुशीत घेतले आणि पाठीवर हात ठेवला. त्या काहीच बोलल्या नाहीत.

पण बसमध्ये बसल्यावर खिडकीतून रंजनाने हात हलवत बाहेर आत्याबाईकडे पाहिले. त्यांचे डोळे म्हणत होते..

“येणाऱ्या कोणत्याही प्रसंगात न डगमगता लढत रहा, सुखात रहा.आनंदात रहा.!”..

बस निघाली तरी रंजनाला निशब्द आत्याबाईच्या बोलक्या डोळ्यांची निशब्द सोबत जाणवत होती. बस पुढे पुढे जात होती.. खिडकीतून बाहेर बघताना तिच्या मनात आले, ‘ आपले जीवन म्हणजे एखाद्या अनघड दगडासारखंच असतं.. शिल्पकार जसा एखाद्या अवघड दगडातून नकोसा भाग काढून बाजूला टाकून एखादे सुंदर शिल्प घडवतो  तसेच हे जीवन घडवायचं असते. ‘…

तिने तिच्या अनघड जीवनातून नकोसा भाग काढून टाकायला प्रारंभ केला होता.

समाप्त

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रारंभ – भाग-4 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ प्रारंभ – भाग-4 ☆ श्री आनंदहरी

आत्याबाई रंजनाला घेऊन बायका शेवया वळत होत्या तिथं गेल्या.  तिथं प्रवेश करताच सगळ्या बायका कधी न पाहिल्यासारखे रंजनाकडे पाहतच राहिल्या.

‘एवढे सारे घडूनसुद्धा, नवऱ्याने टाकूनसुद्धा रंजी काहीच न घडल्यासारखी कशी काय? ‘ असा प्रश्न प्रत्येकीच्या मनात आला होता पण आत्याबाई असल्याने कुणाच्याच ओठावर मात्र आला नाही.

प्रत्येकीच्या डोळ्यातील प्रश्न रंजनाला जाणवला तसा तिचा चेहरा पडला. आत्याबाईंना ते जाणवले.

“कवा बगीतलं नसल्यावानी काय बगतायसा रंजीकडं ?   ए तू उठ गं.. आन च्या ठ्येव जा समद्यास्नी. आन रंजे, तू बस शेवया चाळाय.. “

आत्याबाईंनी शेवयाच्या मालकिणीला चहा करायला सांगून स्वयंपाकघरात पिटाळले आणि तिथं रंजनाला बसवले. कुणी रंजनाचा विषय काढू नये म्हणून दुसराच विषय काढून बोलत बसल्या.

संध्याकाळी रंजनाला सोडायला म्हणून आत्याबाई घरी गेल्या. आत्याबाईंमुळेच इतक्या दिवसानंतर रंजना घराबाहेर पडली होती. तिथंसुद्धा कुणीही तिला काहीच विचारले नव्हते. प्रत्येकजण जणू काही घडलेच नाही असेच वागत होती आणि हे सारे घडले होते ते फक्त आत्याबाईंमुळे. रंजनाच्या मनातला आत्याबाईंविषयीचा आदर जास्तच वाढलेला होता. या साऱ्यांमुळे आणि  वेगळ्या वातावरणामुळे ती काहीशी सावरली होती. तेवढ्या वेळात मनात काहीच विचार आले नव्हते. शेवया करण्याचे काम हसत-खेळत चालल्यामुळे कितीतरी दिवसांनी ती हसली होती. तिला खूप बरे वाटत होते.

” दादा, उद्याच्याला येळ काडा.. येरवाळीच पावण्याकडं जाऊन येऊया..”

घरात शिरताच आत्याबाई रंजनाच्या वडिलांना म्हणाल्या.

” काय म्हंत्यात त्ये बगू.. त्या पोरासंगतीबी बोलायचं हाय मला.. “

” अहो, आत्त्याबाई, पण…”

“दादा, आता पन-बिन काय नगो. अवो,  इनाकारण जर कुणी तरास देत आसंल.. आन सवंनं सांगूनबी त्येला समजत नसंल तर वाकड्यात शिराय लागतंच..  अवो, तुकोबानं सांगून ठ्येवल्यालं हाईच की, ‘ नाठाळाचे माथी हाणू काठी ।’ उद्या येरवाळीच येत्ये मी.”

आत्याबाईसमोर कुणाचंच काही चालत नव्हते. दादांचेही चालले नाही आणि रंजनाच्या सासरच्या मंडळींचेही चालले नाही. आत्याबाई अन् दादा रंजनाच्या सासरी जाऊन आले. तिथं गेल्यावर तितक्याच चारपाच मातब्बर लोकांना पंच म्हणून बोलावून त्यांच्यासमोर रंजनाच्या नवऱ्याची, सासरच्या लोकांची चूक त्यांच्या पदरात घालून आणि लग्नात दिलेले सारे काही घेऊन परत आले. येताना पंचांच्या साक्षीने सासरच्या मंडळींकडून ‘रंजनाचा काही दोष नसल्याचे, चूक नसल्याचे आणि तिचा नवराच चुकीचा असून तोच लग्नानंतर रंजनाशी संसार करायला तयार नसल्याचे लिहून घ्यायला आत्याबाई विसरल्या नव्हत्या.

दादा परतले तरी मनात अस्वस्थ होते. काहीही असले तरी आज ना उद्या सारे काही सुरळीत होईल, रंजना परत सासरी जाईल. तिचा संसार सुरळीत सुरू होईल अशी क्षीण का होईना पण एक आशा त्यांच्या मनात होती.. आत्याबाईंबरोबर जाऊन आल्यावर ती पूर्णतः संपली होती. आत्याबाईंनी केले ते योग्य की अयोग्य हे त्यांना स्वतःला ठरवता येत नव्हते. पण तरीही त्यांच्या मनात आत्याबाईबद्दल राग नव्हता.

घरी आल्यावर दादांनी सारे सांगितले तेंव्हा रंजनाच्या आईच्या डोळ्यांत अश्रू तरळले. एकीकडे रंजनाबद्दल वाईट वाटत होते त्याचवेळी आत्याबाई मदतीला धावून आल्या आणि रंजनाच्या आयुष्यातील  त्रासदायक प्रकरणाचा शेवट झाला. आता पुन्हा नव्याने आयुष्याचा विचार करता येईल, नव्याने आयुष्य जगता येईल असा विचार त्यांच्या मनात येऊन त्यांनी सुटकेचा सुस्काराही सोडला होता.  झाले ते चांगले झाले की वाईट ? कुणाला काहीच ठरवता येत नव्हते.. अगदी रंजनालाही.

‘उगा घोगडं भिजत ठेवायचं कशापाय? जलम एकडावच आस्तुय दादा.. त्यो बी असाच जाऊ द्याचा ?  अवो, पोरीच्या मनाचा, तिच्या जलमाचा तरी इचार करा.. आपली पोरगी सुकानं नांदावी आसं वाटतं… पर योक बैल दुसरीकडं वड खात आसंल तर गाडी सळ्ळी कशी चालायची ? दुसऱ्या बैलाला त्येचा किस्ता तरास हुतो ती दुसऱ्याला न्हाय उमगत. नुसती जीवाची वडाताण हुती.. सुख म्हणून कायच ऱ्हात न्हाय… उगा गाडीला जुंपलंय म्हणून जलमभर वडीत ऱ्हायाचं … दुसरा बैल वडील तिकडे जाऊन उगा कुठंतरी खड्यात जाण्यापरिस जू सोडून बाजूला झाल्यालं लय ब्येस… लोकं काय म्हंतीली ह्येचा इचार करत बसून पोरीला जलमभर आगीत ढकलायची का पोरीला चटकं बसायला लागल्यात ही बगून तिला भायेर काडायचं ह्येचा इचार करायचा ?’

रंजनाच्या सासरी सारं काही ऐकल्यावर बाजूला घेऊन आत्याबाई दादांना म्हणाल्या होत्या. त्ये दादांना आठवत होते. आत्याबाई अडाणी, शाळा न शिकलेल्या.. पण जीवनाच्या शाळेतील अगाध ज्ञान मिळवलेल्या. त्या बोलत होत्या त्यावेळी दादांना सगळे म्हणणे पटत होते.. तरीही.. तरीही ‘ रंजनाचे पुढे कसे व्हायचे ? सारे आयुष्य जायचं आहे तिचं.. आपण चार दिवसाचे सोबती.. सारे आयुष्य एकटेपणाने काढणे सोपे का असतं ? ‘हा विचार त्यांना अस्वस्थ करीत होता.

क्रमशः …

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रारंभ – भाग-3 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ प्रारंभ – भाग-3 ☆ श्री आनंदहरी

आत्याबाईना दारात पाहून रंजनाचे बाबा चमकलेच. त्यांनी दार उघडताच आत्याबाईंनी विचारले,

” रंजना ?”

” वरच्या खोलीत आहे. “

” येकलीच कशापायी वर बसलीय ? खाली बोलवा.”

” यायलाच तयार नाही.”

” थांबा वाईच, मीच आणत्ये “

आत्याबाई वर गेल्या. रंजना एकटीच खोलीत रडत बसली होती.

” कशापाय रडतीस गं ? “

” आत्याबाई ss!”

रंजनाला जास्तच रडू फुटलं.

” समदं ठावं हाय मला.. तू काय चुकी केली हायेस काय ? “

रंजनाने नकारार्थी मान हलवली.

” मग अशी त्वांड दडवून घरात कशापाय बसायचं ? अगं, गुन्हेगार करून सवरूनबी काय न केल्यागत माना वर करून फिरत्यात आन आपुन काय बी न करता असे कशापाय लपायचं गं? चल. उठ. भायेर चल. “

” अहो पण..”

” का ? लोकं काय म्हंतीली याचं भ्या वाटतंय वी ?  आगं, येवडी शिकल्याली हाईस.. आन तुला मी अडान्यानं सांगायचं व्हय ? चल.”

” पण..? “

” आता उठतीस का ? “

आत्याबाईच्या आवाजाला धार आली तशी रंजना उठली. आत्याबाई तिला घेऊन खाली आल्या.

” वैनी, वाईच च्या ठेवा.. समदयास्नीच. आन तू गं.. तू वाईच त्वांड धून ये जा. “

रंजना तोंड धुवायला गेली, रंजनाची आई चहा ठेवायला गेली तसा आत्याबाईंनी मुद्यालाच हात घातला.

” दादा, पावनं काय म्हंत्यात ? “

अचानक आलेल्या या प्रश्नाने रंजनाचे बाबा काहीसे गडबडलेच. ते पाहून आत्याबाईंनी विचारले,

” तुमी गेलावता न्हवं पोरीला घेऊन ? “

” होय. “

” मग ? “

” ते म्हणाले, पोरगा म्हणतोय की त्याला पोरगी पसंतच नाही . खूप समजावले त्याला पण ऐकतच नाही. “

” आत्ता पसंत न्हाय म्हंतुय.. आगुदर त्याच्या डोळ्याला कावीळ झालीवती का डोळं फुटलंवतं त्येंचं.., मुडदा बशिवला त्येचा.. लगीन झाल्याव पोरगी पसंत न्हाय म्हंतुय ती..”

” आत्याबाई, अहो, आपली पोरीची बाजू.. जास्त काही बोलता येत नाही. “

” पोरीची बाजू ? पोरगं काय आबाळात्नं पडत न्हाय ? त्ये बी आईच्या पोटात्नंच येतंय न्हवका ? दादा , तुमी शिकल्याली मान्संबी आसं बोलाय लागल्याव कसं हुयाचं ? “

” काय करता आत्याबाई, समाजातील पद्धतच आहे तशी..”

” अवो, चुकीचं हाय ती बदलायचं का त्येंच्या परमानं आपुनबी चालायचं  ? “

” आत्याबाई, आपली पोरीची पडती बाजू.. “

” दादा, पोरीची बाजू पडतीबी नसती आन नडतीबी नसती.. ही ध्येनात ठेवा..”

” तुमचं सगळे खरे आहे आत्याबाई.. पण नवऱ्याने टाकलेल्या बाईला सरळ जगता येते का समाजात ? पुढचे आयुष्य कुणाच्या आधारावर काढायचे तिने ? “

रंजनाची आई म्हणाली तशा आत्याबाई काहीशा चिडल्याच पण स्वतःला सावरत म्हणाल्या,

” नवऱ्याने टाकलेली ? वैनीसाब, काय बोलतायसा काय ? बाई म्हंजी काय एकांदी वस्तू हाय व्हय, नगं वाटल्याव टाकाय आन पायजे आसंल तवा सांभाळाय ?  आपुन बायकांनीच आसं म्हणल्याव कसं हुयाचं ? वैनी जमाना बदल्याला हाय.. आता पोरी शिकत्यात, पायाव हुभ्याबी राहत्यात.. नवऱ्याच्या खांद्याला खांदा लावून कामे करत्यात , पैकं मिळीवत्यात.. तरीबी तसंच ? त्ये काय न्हाय वैनी.. आपुन बायकांनीच ह्ये समदं बदलाय पायजेल. “

तेवढ्यात रंजना आवरून येत असल्याचे दिसले तसे दादा गप्प झाले..

” दादा, चार रोज जाऊदेत.. पुन्यानदा जाऊ.. मी येते संगं… आपली चुकी न्हाय न्हवं…? आज्याबात नमायचंबी न्हाय आन रडायचंबी न्हाय. पार कंडकाच पाडून याचा…”

” अहो पण आत्याबाई..?”

” न्हाय दादा,  दिस बी बदलल्यात आन कायदाबी

.. आपली पोर काय वाटंव पडल्याली न्हाय.. मुडदा काल लगीन करतुय आन आज पोरगी पास न्हाय म्हंतुय…”

” बरं जाऊया, तुम्ही म्हणाल तेंव्हा…”

‘आत्याबाईंच्या समोर भल्याभल्यांचं काही चालत नाही तिथं आपलं काय चालणार ?’ असा विचार मनात येऊन दादांनी होकार दिला. 

आत्याबाई स्वतःशीच हसल्या आणि ‘ चल गं रंजना ..’ म्हणत रंजनाला घेऊन बाहेर पडल्या.

” तू येवडी शिकल्याली असूनबी घरात रडत बसलीस व्हय गं ? “

रंजना काहीच बोलली नाही.

” आगं, आसं गप ऱ्हावून न्हाय भागायचं.. ‘आरं’ ला ‘ का रं ‘ कराय पायजेल. “

” आत्याबाई, आता लग्न झालंय.. आता काय करणार ?”

” आगं, बाईच्या डोईवर चार अक्षदा पडल्या म्हंजी समदं झालं आसं असतं व्हय गं ?  लगीच गोठयातल्या जनावरावानी ती दावणीला न्हाय बांधली जात.. आगं, ती माणूस हाय जनावर न्हवं..  आन परपंचा ह्यो दोगांचा असतो, येकल्या बाईचा न्हवं. “

” अहो पण आत्याबाई, नवरा नांदवत नाही म्हणल्यावर बाईला समाज काय किंमत देतो ? समाजाचे जाऊ दे, तिच्या घरात तिला काय किंमत असते ? “

रंजनाच्या मनातली स्वतःच्या भविष्याची काळजी तिच्या शब्दात आणि चेहऱ्यावर दिसत होती.

” रंजे, कंच्या युगात हायस तू..? तुमच्यासारख्या पोरी आसं बोलाय लागल्याव रागच येतो बग.. आगं, शिकल्या-सवरलेल्या पोरी तुमी.. पर शिकून तुमचा काय बी उपेग न्हाय बघ. “

” अहो पण आत्याबाई.. “

” आमी आडाणी पर तू शिकल्याली हायस न्हवं ? आगं, म्होरं जायचं आसतंय पर  चपलीत खडा आला, नायतर काटा घुसून टोचाय लागला तर कुठंवर सोसत चालायचं गं  ? लगीच टोचत्याला खडा-काटा काढून टाकून पुढं जाण्यातच शानपना असतो. “

” आत्याबाई , लोक काय म्हणतील ? “

” लोक? आगं, ती बोलणारच.. बोलणाऱ्याचं काय त्वांड धरता येतंय वी ? आन तसंबी ती दुतोंडी सापावानी असत्यात.. कसंबी वागलं तरी बोलत्यातच.. दोनी बाजून वाजणाऱ्या डमरुवानी.. बाईच्या जातीला तर लईच सोसायला लागतंय बोलणं.. आगं, सीतामाई सुटली न्हाय त्यातनं ततं आपलं काय गं ? ..  आगं, ही लोकं तर नांदणारनीला पळ म्हंत्यात आन पळणारनीला नांद म्हणीत अस्त्यात.. पर कुणाचं कंचं बोलणं कुठंवर मनाव घ्याचं, आयकायचं ही तर आपल्याच हातात आस्तंय न्हवं ? रंजे, टोचती येसन नाकात ठेवण्यात कसला आलाय गं शानपना ?”

आत्याबाई बोलत होत्या.. त्यांचा शब्द न् शब्द रंजनाला पटत होता..  पण जे मनाला पटते तसे थोडेच वागता येते, जगता येते ?

क्रमशः …

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रारंभ – भाग-2 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ प्रारंभ – भाग-2 ☆ श्री आनंदहरी

रंजना परत सासरी गेली नाही म्हणल्यावर गल्लीतल्या बायकांत दबक्या आवाजात कुजबुज सुरू झाली होती. रंजना घरातून बाहेर पडली नसली तरी शेजार-पाजारच्या बायकांना ती नांदायला सासरी न जाता माहेरीच असल्याचे ठाऊक झाले होते. नेमके काय झालंय ? नेमकं काय बिनसलंय ? हे कुणालाही ठाऊक नव्हते. ‘ बरे विषय असा नाजूक की, कसे विचारायचे ? कुणी विचारायचे ?  विचारपूस करायला गेले तरी पंचाईत आणि  न जावं तरी पंचाईत.. अशी अवघड परिस्थिती.. आपलेपणाने विचारायला जावं आणि  काहीतरी गैरसमज होऊन, काहीतरी वाटून शेजार दुरावायचा… त्यापेक्षा नकोच  विचारायला. कधीतरी  ते स्वतः होऊन सांगतीलच त्यावेळी पाहू…’ असा विचार मनात येऊन शेजारीपाजारी गप्प होते.. त्यामुळे नेमके ठाऊक नसले तरी अंदाज करणे, आखाडे बांधणे चालू झाले होते.

उन्हाळ्यातील दुपारची वेळ तशी काहीशी निवांतच असते. रानात पेरणीपर्यंत म्हणावी अशी कामे नव्हती.. दुपारच्या वेळात साल-बेजमीच्या पापड, कुरडया, शेवया केल्या जात होत्या. त्यानिमित्ताने एकमेकीकडे जाणे-येणे असायचे. आज एकीच्या झाल्या की दुसऱ्या दिवशी दुसरीच्या घरी साऱ्या शेजारणी गोळा होत होत्या. गप्पा मारता मारता पाटावरच्या शेवया केल्या जायच्या. यावेळी मात्र शेवया वळता-चाळता विषय निघायचा तो रंजनाचाच.. कुणी काळजीने बोलायचे.. कुणी रंजनाचीच चूक असल्यासारखे कुचेष्टेने. अशा गप्पात पराचा कावळा होत असतो. कुणी काहीतरी बोलायचे, दुसरी एखादी त्यात पदरचे घालून आणखी काहीतरी सांगायची. गप्पांचा विषय कुठेही, कसाही भरकटत गेला तरी शेवटी रंजनापाशीच येऊन थांबायचा आणि दोष मात्र रंजनाच्या माथी थोपला जायचा…

‘काय जरी झाले तरी तिने सासरी जाऊन राहावे.. चार महिने पड खाऊन, पदरात येईल ते सोसून नांदल्याशिवाय नवरा मुठीत येत नाही आणि संसाराची घडीही बसत नाही.’

‘आमचं ह्येनी कायबी झालं का आगुदर दोन तडाखं द्येत हुते… पर प्वार झालं अन गाडं लागलं सुराला.. आता उठा म्हणलं का उठत्याय आन बसा म्हणलं का बसत्यात ..’

कुणी कुणी अनुभवाचे बोल सांगत होते.. आपापसातील गप्पात रंजनाला नवऱ्यानं टाकल्याचा विषय चघळला जात असला तरी कुणीही तिच्याशी बोलायला गेले नव्हते. नेमके काय घडलंय हे ही कुणालाच ठाऊक नव्हते. प्रत्येकजण आपापल्या मनानुसार कयास बांधत होती. माहेरी आलेली रंजना परत सासरी गेली नव्हती.. तिकडचे कुणी तिला न्यायलाही आले नव्हते एवढंच काय ते प्रत्येकीला ठाऊक होते. नाही म्हणलं तरी तसा विषय नाजूक होता आणि त्यामुळे कुणी समक्ष बोलत नव्हतं. रंजनाचे असे काही झाले नसते तर त्यांच्यात दुसऱ्या कुणाचातरी दुसरा कुठला तरी विषय असता. रंजनाबद्दल त्यांना आपलेपणा नव्हता, आपुलकी नव्हती असे नाही पण आपण शेजारी असून, एवढे जवळचे असून आपल्याला त्यांनी काहीच सांगितले नाही हा सल प्रत्येकीच्या मनात होता.

घरातली सकाळची सारी कामे आटपून साऱ्याजणी गोळा झाल्या होत्या. शेवया वळायचे काम चालू झाले होते. ओळीने चार पाट मांडले होते. पाटावरती शेवया करायचे काम चालू होते. चार जणी पाटावर शेवया वळत होत्या तर समोर चारजणी थाटीत, ताटात शेवया चाळण्याचे काम करत होत्या. शेवयाची मालकीण थाट्यातील-ताटातील शेवया वाळवण्यासाठी पसरून, रिकाम्या थाट्या व ताटं  आणून देत होती. हात चालू होते तसेच तोंडाची टकळी पण चालू होती. कामाचा कोणताही ताण न घेता, गप्पा मारत, एकमेकींची चेष्टा-मस्करी करत काम चालू होते. मधूनच शेवया वळून वळून हात दुखू लागले की एकमेकींच्या कामात बदलही केला जात होता. शेवया, कुरडया, पापड, सांडगे असे सारे साल-बेजमीचे करून ठेवले की पुन्हा सालभर काही बघायलाच लागायचे नाही.

” व्हय वो आक्कासाब, आत्याबाई कवा याच्या हायती. “

शेवया वळता वळता अचानक एकीला आत्याबाईंची आठवण झाली. आत्याबाईंचे नाव अचानक निघाल्याने एक-दोघीजणी दचकल्या.

” काय की ? भाचीकडं गेल्यात. आत्तापातूर याला पायजे हुत्या. “

” व्हय.. आत्याबाईशिवार शेवया कराय काय मज्जा न्हाय बगा. “

” अवो, त्येंच्यावानी एकसुरी शेवया मशनित्नंबी येत न्हाईत. “

” म्हैना झाला की वो जाऊन त्यास्नी ? “

” म्हैना का दोन म्हैनं झालं, कवा कुटं जात न्हायती.. पर ह्या पावटी गेल्या.”

” पर काय बी म्हणा.. लई खमकी बाई.. त्येंचा लै आधार वाटतो बगा.”

” व्हय. त्येबी खरंच हाय.. पर याला पायजे हुत्या..  त्या असत्या म्हंजी रंजनालाबी बरं पडलं असतं. “

” याला पायजे हुत्या न्हवं. आलीया.. पर त्या रंजनाचे काय म्हणीत हुतीस गं ? “

अचानक दारातून आत येत आत्याबाई म्हणाल्या तशा नाही म्हणलं तरी साऱ्याच गडबडल्या.

” लै दिस ऱ्हायलासा वो ?. “

” व्हय, माजं जाऊंदेल.. त्या रंजीचं काय म्हणीत हुतीस त्ये सांग आगुदर..”

सगळ्या एकदम गप्प झाल्या आणि तिथं असणाऱ्यापैकी वयाने मोठया असणाऱ्या आक्कांनी रंजनाच्या लग्नापासून सारे सांगायला सुरुवात केली.

आत्याबाई शांतपणे ऐकून घेत होत्या. रंजना परत सासरी गेलेली नाही हे वाक्य ऐकून आत्याबाई उठल्या आणि रंजनाच्या घराकडे निघाल्या.

क्रमशः …

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ प्रारंभ – भाग-1 ☆ श्री आनंदहरी ☆

श्री आनंदहरी

? जीवनरंग ❤️

☆ प्रारंभ – भाग-1 ☆ श्री आनंदहरी

लग्नानंतर सासरी गेलेली रंजना पाच दिवसांनी माहेरी आली तेव्हा तिचे कोण कोडकौतुक होत होते. शेजारणी-पाजारणी आवर्जून चौकशी करायला यायच्या, कुणी चहाला बोलवत होते, कुणी नाश्त्याला तर कुणी काही खास केलंय म्हणून जेवायलाच. तिची विचारपूस करताना, गप्पांमध्ये तिच्या सासरचा विषय हमखास निघायचा. सासरची माणसे स्वभावाने कशी आहेत याची चौकशी व्हायची. समवयस्क मैत्रिणी ‘दाजीं ‘बद्दल खोदून खोदून विचारायच्या, चेष्टा करायच्या. पोरगी सुखात आहे असे जाणवून गल्लीतल्या म्हाताऱ्या-कोताऱ्या मनोमन सुखावायच्या. एखादी म्हातारी कानाजवळ बोटं मोडून दृष्टही काढायची. आठ-दहा दिवस म्हणजे मायेचा नुसता महापूर आलेला होता. रंजना, तिच्या घरचे मनोमन सुखावत होते.

रंजनाला सासरी  घेऊन जायला रीवाजानुसार तिचा नवरा- दीर असे कुणीतरी सासरचे येणार होते पण ती येऊन पंधरवडा उलटून गेला तरीही तिला न्यायला कुणीही आले नाही की त्यांचा काही निरोपही आला नाही. मग मात्र घरातील वातावरण हळूहळू गंभीर होत गेले. आई- वडील काहीसे काळजीत पडले. आई लेकीला खोदून खोदून  ‘ सासरी काही झाले होते काय ? तुझ्याकडून काही चूक झालीय काय ? तू कुणाला काही बोलली तर नाहीस ना ? ‘ असे विचारायला लागली. लेकीच्या काळजीने आई-बाबांचे मन थाऱ्यावर राहिले नव्हते. मनात नाना शंका-कुशंकांनी नुसते थैमान घातले होते. मनात काही आले की लगेच रंजनाला विचारले जात होते पण ती तरी काय सांगणार होती?  जेमतेम काही दिवसच ती सासरी राहिलेली. ते सगळे दिवसही पाहुण्या-रावळ्यांच्यात, भेटायला, नव्या सुनेला पाहायला घरी येणाऱ्या शेजारी-पाजाऱ्यांच्या येण्या-जाण्यात, गडबडीत आणि नवखेपणातच सरलेले. अजून घरादाराची, घरातल्या माणसांची म्हणावी अशी ओळखही रंजनाला झाली नव्हती. एखादे स्वप्न असावे तसे ते दिवस. विचारांनी, काळजीने आणि अशाश्वताने काळोखून गेलेल्या उत्साहाच्या, उल्हासाच्या त्या दिवसांच्या मोजक्याच आठवणींपलीकडे सांगण्यासारखे असे रंजनाकडे काही नव्हतेच.

रंजनाच्या वडीलांनी तिच्या सासरी सांगावा धाडूनही तिकडून काहीच उत्तर आले नाही तसे सगळेच अस्वस्थ झाले. रंजना उदास राहू लागली, दुःखी,कष्टी राहू लागली.  तीच नव्हे तर सारे घरच माणसांपासून,  गल्लीपासून काहीसे तुटून राहू लागले होते. नेमकं काय झालंय ते कुणालाच समजेना. रंजनाला वारंवार विचारूनही तिच्याकडून काही कळेना. ती तर काय सांगणार होती ? ‘ दहाबारा दिवसांनी न्यायला येतो ‘ असे तिचा नवरा अगदी आनंदात तिला म्हणाला होता. तिच्या सासरच्या सगळ्यांनी आपलेपणाने ‘लवकर ये ‘म्हणून निरोप दिलेला. ‘तिकडे करमेल ना ग वहिनी ? की….’  असं म्हणत  नणंद आणि नणंदेच्या मैत्रिणींनी येताना चेष्टा केलेली होती.

सासरी सांगावा पाठवूनही काहीही उत्तर आले नाही तसे वडील आणि सारे घरच काळजीत पडले. चिंतामग्न आई-वडिलांच्यात चर्चा झाली. सासरच्यांसाठी सारे रितीप्रमाणे भेट वस्तू घेऊन, दुरड्या घेऊन एकेदिवशी तिला सासरी पोहोचवायला म्हणून तिचे वडील स्वतः  तिला घेऊन तिच्या सासरी गेले आणि त्याच रात्री तिला घेऊन परतही आले होते.  तेंव्हापासून रंजना आणि तिचे वडीलही अबोल होऊन गेले होते. ती आपल्याच विचारात माडीवर रडत बसलेली असायची. ‘आपले काय चुकले ? ‘ हे विचार करकरूनही तिला समजत नव्हते, स्वतःची चूक तिच्या ध्यानी येत नव्हती. सारे घरच दुःखी-कष्टी झालेले होते.  

दिवस पुढे सरकत होते तसं घरातले वातावरण वरवर निवळत गेले पण तरीही घरात काहीशी अस्वस्थता, अशांतता होतीच. वडील काहीसे अबोल होत गेले होते. आई मात्र तिच्यावर चिडलेलीच होती. खरे तर जे घडले त्यात रंजनाची काहीही चूक नाही हे आईलाही कळलं होते पण तरीही आईच्या स्वतःच्या मनातील असहायतेचे परिवर्तन रंजनावरील रागात झाले होते आणि ते कधी आईच्या बोलण्यातून तर कधी तिच्या अबोल वागण्यातून क्षणाक्षणाला व्यक्त होत होते.  काही दिवसांपूर्वी लेकीला कुठं ठेऊ आणि कुठं नको  ? असे झालेली आई.. पण आता मात्र तिला लेक तिच्या डोळ्यांसमोरही नकोशी झाल्यासारखी वागत होती.

” जे घडले त्यात आपल्या  रंजनाची काहीही चूक नाही. तिच्याशी अशी वागू नकोस. “

रंजनाच्या आईचे वागणे बाबांच्या लक्षात आले तेंव्हा त्यानी समजावले होते.

” चूक कुणाचीही असली तरी जग बाईलाच चुकीचं ठरवते. तिची काहीही चूक नसली तरी लोक तिलाच चुकीचं ठरवणार आहेत.. “

” दुसऱ्यांचे काही सांगू नकोस मला.. लोक काय दोन्ही बाजूने बोलतात..”

” अहो, सांगू नकोस म्हणून कसे चालेल.. आपण समाजात राहतो, रहावंच लागते.  आणि आपल्या पदरात आणखी एक लेक आहे हे विसरलात काय ? तिचे कसे व्हायचे ?”

“म्हणून संन्याशाला सुळावर चढवणार आहेस का काय ?  आणि अंजुच्या लग्नाचा विचार नको करुस.  त्याला खूप वेळ आहे अजून. आत्ता रंजूचा, तिच्या मनाचा विचार कर. तिला किती धक्का बसला असेल. तिला कसं सावरायचे याचा विचार कर… “

वडील आतून अस्वस्थ असले तरी तसे दाखवत नव्हते. ते रंजनाशी आवर्जून बोलत होते. तिला सावरायला मदत करत होते. ‘ मी आहे ना.. तू नको काळजी करुस.. फार विचार नको करू .. सारे नीट होईल. ‘ असे बोलून रंजनाला धीर देत होते.. सावरत होते. जास्तीतजास्त वेळ रंजनासोबत थांब स्वतःही थांबत असंत आणि अंजुलाही तिला एकटं न सोडता सोबत थांबायला आणि तिच्याशी इतर विषयावर गप्पा मारायला त्यांनी सांगितले होते.

क्रमशः …

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अवघा रंग एक झाला – भाग २ – अज्ञात ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

? जीवनरंग ❤️

☆ अवघा रंग एक झाला – भाग २ – अज्ञात ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

 (मागील भागात आपण पाह्यलं-  झालं… सगळे कामाला लागले आणि चित्र खाली लागलं… बाजूला करुणाची माहिती… आणि बाजूला एक वही ठेवली… त्यात अभिप्राय लिहायचे होते…आता इथून पुढे )

“माई तुम्ही नेहमी म्हणत असता ना की आम्ही अश्रद्ध आहोत… तसं नाहीये माई… आमची श्रद्धा आहे… देवावर… पण देवाच्या मूर्तीवर नाही… माई तुम्ही आणि ऋत्विकाने वाती केल्या होत्या ना, त्या मी देवळाजवळच्या दुकानात विकायला दिल्या. त्याचे पैसे मिळाले त्यात थोडी भर घालून, देवळाजवळच एक मुलगी रस्त्यावर फडकं टाकून हार, फुलं विकायला बसायची, तिला एक स्टूल, टोपली, हार अडकवायला स्टँड असं समान घेऊन दिलं. इतकी खुश झाली, पुन्हा पुन्हा आभार मानत होती. आज तुमच्या रुपात तिला पांडुरंग भेटला. त्या मुलीसाठी तुम्ही ऋत्विका, करुणासाठी मी …आणि माझ्या साठी माझे बाबा ‘पांडुरंग’ होते…. ज्यांनी मला माणसामधला पांडुरंग ओळखण्याची ‘नजर’ दिली.

माई हसल्या. “अगं भल्या माणसाची ओळख आम्हाला पण पटते…. देवमाणसा पुढे आम्ही कायमच लीन असायचो… आणि गरजू माणसाला मदत करायची बुद्धी देवाने आम्हालाही दिलीय… पदराला खार लावून सुध्दा  मदत केली आहे आम्ही… पण तरीही मला परंपराही पाळावीशी वाटते गं…. परंपरा देवासाठी नाही तर स्वतःसाठी, कुटुंबासाठी, समाजासाठी पाळायची… आता इथे शहरात सगळीकडे उजेडच उजेड असतो, पण खेडेगावात संध्याकाळ झाली की, धड अंधार नाही, धड उजेड नाही अशा वेळी खूप उदास वाटतं, मन कातर होतं… अशा वेळीच देवाशी निरांजन लावायची पद्धत होती, तुळशी जवळ दिवा लावून शुभंकरोती म्हणायला लागलं की मन शांत, आश्वस्त होतं… अशा परंपरांमुळे आपलं मानसिक स्वास्थ्य टिकतं. सणा उत्सवाच्या निमित्ताने कुटुंबातली माणसं एकत्र येतात, नाती टिकतात, किरकोळ रुसवे-फुगवे विसरले जातात… अनुजा, श्रद्धा ही बावनकशी सोन्यासारखी असते… पण सोन्याची लगड दोऱ्याला बांधून गळ्यात घातली तर कशी दिसेल? परंपरा त्या लगडीचा सुंदर हार करते… विस्तारते… सर्वांना सामावून घेते… श्रद्धेला एक लोभस रूप देते…” अनुजा चकित होऊन ऐकतच राहिली… आपण माईंना देवभोळ्या, फारसा विचार न करता प्रथा पाळणाऱ्या समजत होतो… जरा विचार करून अनुजा म्हणाली,

“माई तुम्ही दमला असाल, जरा आराम करा, जेवायच्या वेळी हाक मारते तुम्हाला.”

माई त्यांच्या खोलीत जाऊन आडव्या झाल्या, त्यांचा डोळा लागला…

त्यांना जाग आली ती अनुजा त्यांना उठवायला  आली तेंव्हा… त्या उठल्या… त्यांनी ठरवलं की आपल्या उपासाचे काही बोलायचे नाही… नाही केला उपास तर काय बिघडतं ? नाहीतरी ह्या प्रथा स्वतःसाठीच असतात, असं आपणच नाही का सांगितलं?  अनुजावर घरात निरांजन लागत नाही म्हणून आपण नाराज होतो… पण आज एका मुलीच्या आयुष्यात एक दिवा लागला…. मग नाराजी कशाची ?

त्या बाहेर आल्या… ऋत्विकाने त्यांना हात धरून किचन मध्ये देव्हाऱ्याजवळ नेलं… माई बघतच राहिल्या…. विठोबाची तसबीर ठेवली होती… हार घातला होता… आणि निरांजन लावलं होतं… माईंनी हात जोडले नि त्या डायनिंग टेबलाजवळ आल्या…

ताटात वरी तांदूळ, दाण्याची आमटी, बटाट्याची भाजी…  सगळा उपासाचा मेनू…

आज धक्क्यावर धक्के बसायचा दिवस होता… त्यांनी अनुजाकडे पाहिलं…..

“माई, तुमचं पटलं मला, प्रथा आपल्यासाठी पाळायची… खरं सांगू मला पण बरं वाटलं हे सगळं करून… कारण जे काही मी केलं त्या मागचा हेतू मला आज कळला…”

माई हसून म्हणाल्या “आणि आज मी परंपरा सोडायचं ठरवलं होतं… तुझ्यासारखा माणसातला पांडुरंग शोधायचा असं ठरवलं होतं.

“चला… म्हणजे आज आपल्या श्रद्धेचे वेगवेगळे रंग एकत्र आले… आणि

‘अवघा रंग एक झाला.”

दोघी एकदम म्हणाल्या…..

 – समाप्त –

लेखक – अज्ञात   

संग्राहिका – सुश्री प्रतिमा जोशी– संवादिनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुम्ही सध्या काय करता ? – भाग -2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ तुम्ही सध्या काय करता ? – भाग -2 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

[आपल्या वार्डातला हिंदूंचा एरिया कुठला, मुस्लिम एरिया कुठला ह्याचा पूर्ण अभ्यास करून त्यानुसार मतदारांना काही ना काही वाटप करायला लागते. ]आता पुढे—-

त्यामध्ये पण मी मास्टर आहे म्हणून तर भाऊ मला मानतात ना. काय काय वेळेला तर भाऊ माझी त्यांचा डावा हात म्हणूनच ओळख करून देतात. अहो डावा हात म्हणजे आमचे भाऊ डावखुरे आहेत म्हणून हो. तुम्ही पण आहे ना… काय पण गैरसमज करून घेता.

 संध्याकाळी सात, आठला भाऊ परत ऑफिसात येतात.  मग तिकडून माघारी घरी जायचा काही टाईम फिक्स नसतो. भाऊ जिथपर्यंत ऑफिसमध्ये असतात तिथपर्यंत एक पंधरा वीस पोरांना ऑफिसमध्ये थांबावेच लागते. सध्या कामाचा लय पसारा वाढलाय पक्ष बांधणी, म्युनिसिपलटीची कामे, नवीन बिल्डिंगचे नकाशे पास करून आणणे, जागेचे व्यवहार, फार्म हाऊसची कामे ….. आणि वेळात वेळ काढून मतदारांच्या काही अडचणी असतील तर त्या सोडवणे किंवा तसे त्यांना आश्वासन तरी देणे. खायचं काम नाही एवढा मोठा पसारा सांभाळायचा म्हणजे…  हो….तुम्हाला म्हणून सांगतो, भाऊंनी  माझ्या नावावर पण लोणावळ्याला एक फार्म हाऊस घेतला आहे. 

चावी त्यांच्याकडेच असते पण आपल्याला सांगितले आहे कधी पण तुझ्या घरच्यांना घेऊन जा.

 ह्या अशा अनेक कामातून रात्री जरा उशिराच मोकळा होतो. मग  काय जरा माझ्याखातर येणाऱ्या माझ्या मित्रांबरोबर एक बैठक मारून विचारांची देवाण घेवाण करून त्यांच्याबरोबरच  भुर्जीपाव किंवा भाजीपाव खाऊनच रात्री उशिरा घरी जायला लागते. पहिले पहिले अशा अवस्थेत घरी गेल्यावर पिताश्री आणि मातोश्रींची बडबड ऐकायला लागून डोक्याचे दही व्हायचे. पण आता परिस्थिती बदलली आहे. आता मी मातोश्रीना दर महिन्याला घरखर्चाला दहा हजार देतो ना– आणि ते फ्लेक्सवर माझे फोटो पण येतात. त्यामुळे कितीही उशीर झाला तरी मला आता काय पण बोलत नाय. हो आणि ते गणपती उत्सव, नवरात्री उत्सवला माझ्या आई आणि अण्णांना एखादा दिवस मी पूजेचा मान पण मिळवून देतो. आता आमच्या एरियातले लोक त्यांना माझे आई वडील म्हणून ओळखायला लागले असल्याने  ते पण माझ्यावर खूष असतात, म्हणून तर आता माझ्या लग्नाचा बँड बाजा वाजवायचा आहे असं म्हणतात. 

 आता तुम्हीच सांगा, एवढे सगळे मी करून वर त्यो मुलीचा बाप मलाच विचारतो, ” तुम्ही सध्या काय करता? ” आंधळा मेला तो— ‘ अरे डोळे उघडे ठेऊन आला असतास तर चौकाचौकात जे भाऊंचे बॅनर आणि होर्डिंग लागले आहेत त्यात खाली माझ्या नावासकट फोटो दिसले असते. अरे थांब जरा आता तीन महिन्यातच मुनिसिपाल्टीचे इलेक्शन आहे. भाऊ मला तीन वर्षांपूर्वीच बोलले आहेत मला ते नगरसेवक बनवणार आहेत. एकदा का नगरसेवक बनलो की बघ कसा चमकतो ते. मग टप्याटप्याने नाही तर टक्याटक्याने इज्जत कमवणार आणि मोठा होणार.’ सगळे सेटिंग झाले आहे पण एकच प्रॉब्लेम झाला आहे …….

 कालच डिक्लेअर झाले… आमचा वॉर्ड हा लेडीज वॉर्ड डिक्लेर झाला आणि भाऊंची बायको म्हणजेच आमच्या वैनीसाहेबांना भाऊंनी  तिकीट मिळवून दिले. हां, पण भाऊंनी मला शब्द दिलाय पुढच्या वेळेला मलाच तिकीट द्यायचे.

चला आता इलेक्शनचे लय काम असणार आहे. तुमच्याशी बोलायला पण वेळ मिळणार नाही. वैनीसाहेबांना निवडून आणायचे आहे, त्यासाठी मरेस्तोवर काम करायचे आहे. तुम्हाला म्हणून सांगतो, वैनीसाहेबांना निवडून आणले की भाऊंनी मला एक इनोव्हा कार द्यायचा शब्द दिला आहे. एक मात्र नक्की, फ्युचर आपले लय ब्राइट आहे.

एवढा मी बिझी माणूस आणि त्यो मेला मुलीचा बाप मलाच विचारतो, “तुम्ही सध्या काय करता ? “

— समाप्त — 

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ तुम्ही सध्या काय करता ? – भाग -1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

श्री उदय गोपीनाथ पोवळे

? जीवनरंग ❤️

☆ तुम्ही सध्या काय करता ? – भाग -1 ☆ श्री उदय गोपीनाथ पोवळे ☆

नमस्कार राव ….. ओळखलेत ना मला. अहो तुम्ही मला खूप वेळा बघितले आहे. हां बरोबर- तोच तो. बाईकला आमच्या पक्षाचा झेंडा लावून फिरणारा. आमच्या म्हणजे भाऊ ज्या  पक्षात असतात त्या पक्षाचा झेंडा. ते आपल्या नाक्यावर भाऊंच्या वाढदिवसाच्या दिवशी भाऊंच्या फोटोचा फ्लेक्स लागतो ना त्याच्या खाली बघा माझा फोटो असतो…. हां तोच तो..मी…. भाऊंच्या  अनेक विश्वासातल्या कार्यकर्त्यातला एक. गेली दहा वर्षे भाऊंसाठी काम करतो. भाऊंसाठी काय पण काम करतो. आता थोडा सिनिअर झालोय. आपले भाऊ मला लय इज्जत देतात. बरोबर…. ही  बाईक पण भाऊंनीच दिली आहे. मानतात आपल्याला. भाऊंसाठी लॉकपमध्ये पण जाऊन आलोय तेव्हापासून आपली इज्जत लय वाढली. नशीब लागते भाऊंच्या एवढ्या जवळ जायला.

हां  …. तर विषय असा आहे… तिशीतल्या माझे लग्न करायला माझ्या घरचे मागे लागले आणि त्यांच्या आग्रहाखातर मी मुलगी बघायला गेलो तर तिचा बाप मला विचारतो, “तुम्ही सध्या काय करता “– अरे हा काय प्रश्न आहे काय, अरे तुम्ही किती कमवता असे विचारा ना…. तुमच्या मुलीला सुखी ठेवणार का… ते विचारा ना. काय तरी भलताच प्रश्न विचारला.  माझे डोके फिरले. मी तिकडेच मुलीला रिजेक्ट केला. आता त्याला काय सांगायचे, माझ्या सुखी जीवनाची कथा. तुम्ही आपले म्हणून तुम्हाला सांगतो.

माझा रोजचा दिवस फुल्ल बिझी असतो. रोज रात्री उशिरा झोपतो म्हणून सकाळी १० ला उठतो आणि कडक गरम पाण्याने आंघोळ करून सफेद इस्त्रीचे शर्ट आणि मळकी असली तरी मळकी दिसत नसलेली जीन्सची पॅंट घालून, घरातल्या देवांना नमस्कार करून, कपाळावर दोन भुवयांच्या मध्ये उभे कुंकू लावतो आणि घराबाहेर पडतो. दहा वर्ष्यापुर्वी बाहेर पडतांना आईकडून नाही तर बहिणीकडून १०० रुपये घेऊन पडायला लागत होते. बाईकमध्ये ५० चे पेट्रोल भरूनच– पुढे ५० रुपये मामलेदारची मिसळीसाठी लागायचे. पण आता आपण घरी पैसे नाय मागत. आता आपण आपल्या पायावर उभा आहे. म्हणजे भाऊंचा वरदहस्त असल्याने कसली कमी नाही.

हां तर ….. तर्रीवाली मिसळ हाणली कि पुढे स्ट्रेट, सरळ स्वामींच्या मठात जाऊन त्यांच्या पादुकांवर डोके ठेवायचे. लय भारी वाटते. भाऊंनी एक सांगितले आहे देवाकडे तोंड करून आपण काय बी मागायचं, देव आपल्या पाठीशी कायम असतो, म्हणूनच देवाकडे एकदा का पाठ झाली की आपण काय पण करायला मोकळे. तेथून कुठेही टाइमपास न करता भाऊंच्या पक्षाच्या ऑफिसमध्ये हजेरी लावायची. तिकडे पक्या, मध्या, सुन्या आलेले असतात. बरोबर १२ च्या आसपास भाऊ आले की, पहिले त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घ्यायचा. हां…. आपण जगात दोन जणांच्या पायाला हात लावतो. एक स्वामी समर्थ आणि आमचे भाऊ. भाऊंनी काही काम सांगितले तर ते हाती घ्यायचा. आपल्यामागे तसे १०० पोरं उभी करायची ताकद आहे हे भाऊंना माहित आहे म्हणून एखादी सभा किंवा शक्ती प्रदर्शन करायचे असेल तर भाऊ माणसं जमवायची जबाबदारी माझ्यावरच देतात. दोन तीन तास ऑफिसमध्ये काढले की ऑफिसमध्येच भाऊंच्या कृपेने दोन लंच बॉक्सचे डबे येतात. तेथेच जेवण करून जर काही काम नसेल तर टेबलावर डोके ठेऊन एक डुलकी मारायची. इलेक्शन आले की ते डुलकी, झपकी वगैरे विसरायला लागते. तेव्हा लय खूप काम असते. आपल्या वार्डातला हिंदूंचा एरिया कुठला, मुस्लिम एरिया कुठला ह्याचा पूर्ण अभ्यास करून त्यानुसार मतदारांना काही ना काही वाटप करायला लागते.

क्रमशः…

© श्री उदय गोपीनाथ पोवळे

ठाणे

मोबा. ९८९२९५७००५ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print