सुश्री मंजुषा सुनीत मुळे
जीवनरंग
☆ भिकारी (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
त्याचं निधन झालंय. आत्ताच मी त्याच्या अंत्ययात्रेहून परत येतोय. त्यासाठी आलेले इतर लोक सांगत होते की, तो बऱ्याच दिवसांपासून आजारी होता. पण त्याने कुठलेच औषधोपचार केले नव्हते. कोणीतरी सांगत होतं की तो अतिशय घाणेरड्या घरात राहत होता. एकजण म्हणत होता की कुपोषणामुळे त्याचा मृत्यू झाला. त्यावर दुसरा एकजण म्हणाला की, तो रोज दोन वेळा पोटभर जेवला असता तर आणखी काही दिवस नक्की जगू शकला असता.
काही दिवसांपूर्वी जेव्हा तो मला भेटला होता, तेव्हा माझ्याशी अगदी मनमोकळेपणाने बोलला होता. कदाचित मी असा एकटाच माणूस असेन ज्याच्याशी तो इतक्या आपलेपणाने बोलला असेल. त्याच्याकडे काही लाख रुपयांची रोख रक्कम असल्याचे त्याने मला सांगितले होते. या एका शहरात त्याचे सहा फ्लॅट आहेत. त्यादिवशी आम्ही बोलत असतांना आतून कुणीतरी त्याला हाक मारली, म्हणून तो आत गेला. मी मग उगीचच त्याच्या घरात इकडेतिकडे पहात बसलो होतो. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मी ज्या खुर्चीवर बसलो होतो, ती खुर्ची अगदी मोडकळीला आलेली होती. कितीतरी वर्षांपूर्वी त्याच्या ऑफिसमधल्या जुन्या सामानाचा लिलाव झाला होता, त्यात त्याने ती विकत घेतली होती. त्याच्या घरात फर्निचर म्हणावं असं फारसं काही नव्हतंच. इतर जे सामान दिसत होतं– म्हणजे सायकल, शिलाई-मशीन, टेबलफॅन वगैरे, तेही त्याने कुठून कुठून सेकंडहॅंडच विकत घेतलेलं होतं. घरही भाड्याचंच होतं, आणि गेली तीस वर्षं तो तिथेच रहात होता. बऱ्याच वर्षांपासून त्याने त्या घराचं भाडं देणंही बंद केलं होतं. आणि त्या घराची अवस्था खरोखरच इतकी वाईट झालेली होती की कधीही ते कोसळून पडू शकलं असतं. घराचा मालक कधी या जगाचा निरोप घेतोय, याचीच ते घर– आणि बहुतेक तोही– वाट बघत होते.
थोड्या वेळाने एका मळकट-कळकट आणि तडा गेलेल्या कपात चहा घेऊन तो बाहेर आला. तो चहा नुसता पाहूनच इतकं कसंतरी वाटलं मला, की तो जर तिथे माझ्यासमोर उभा नसता ना, तर त्याच्या घराच्या दरवाज्यासमोरून वाहणाऱ्या उघड्या गटारात मी तो फेकूनच दिला असता. असो.– त्याने पुन्हा बोलायला सुरुवात केली होती. — त्याला जेव्हा नोकरी लागली, तेव्हा त्याची आर्थिक परिस्थिती फारच हलाखीची होती. त्यामुळे नोकरी लागल्या लागल्या तो कसंही करून पैसे वाचवण्याच्या मागे लागला. त्या नोकरीबरोबरच काहीतरी पार्ट-टाइम कामही करायला लागला होता. बघता बघता त्याचं उत्पन्न वाढलं–आणि वाढतच राहिलं. पण तरीही आधीपासूनच त्याने खर्चाला जो लगाम लावलेला होता, तो मात्र त्याने कधीच सैल सोडला नाही. मग काय — त्याची बचत चहूबाजूने जणू फुलायला लागली. एका बँकेनंतर दुसरी–दुसऱ्या बँकेनंतर तिसरी– असं करता करता अनेक बॅंकांमध्ये खाती उघडली गेली. आता पैसे दुप्पट नाही, तर चौपटीने वाढायला लागले.
मी त्याला एकदा विचारलं होतं की, “ इतक्या पैशांचं काय करणार आहेस तू ? “
यावर त्याने काय उत्तर द्यावं ? तो म्हणाला होता की, “ मी असा विचार करतोय की सगळी खाती बंद करायची आणि सगळे पैसे एकाच चांगल्या बँकेत टाकायचे. “
“मग पुढे ? “ मी विचारलं.
“मग सगळी रक्कम सहा वर्षांसाठी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकीन. म्हणजे एकूण सगळीच रक्कम दुप्पट होईल. “
“ याचा तुला काय फायदा मिळेल ? “
“ फायदा हा होईल की मला हिशोब ठेवणं सोप्पं जाईल. “
“ बरं, पण मग अशा रीतीने रक्कम दुप्पट झाल्यानंतर पुढे काय करशील ? “
“ मग पुन्हा ती सगळी रक्कम पुढच्या सहा वर्षांसाठी फिक्स्ड डिपॉझिटमध्ये टाकीन. “
“ म्हणजे कधी कुठला खर्च करणारच नाहीस का ? “
“ एवढी रक्कम खर्च कशी केली जाते ? “ त्याने भाबडेपणाने मलाच उलटा प्रश्न विचारला होता.
——- मी अगदी सहजच समोरच्या टीपॉयवर पडलेलं वर्तमानपत्र हातात घेतलंय. पहिल्याच पानावर एक बातमी छापून आलेली आहे —-” रस्त्यावर भीक मागणारा एक भिकारी, कडाक्याच्या थंडीमुळे गारठून गेल्यामुळे त्याच्या मोडक्या झोपडीत मृतावस्थेत सापडला. त्याला त्या झोपडीतून बाहेर काढण्यासाठी लोक जेव्हा आत गेले, तेव्हा त्यांना त्याच्या मृतदेहाखाली, चिल्लरने भरलेली दोन मोठी मडकी, आणि नोटांनी गच्च भरलेले पत्र्याचे दोन मोठे डबे, जमिनीत पुरून ठेवलेले सापडले.”
——- ज्याची अंत्ययात्रा संपवून मी थोड्या वेळापूर्वीच परत आलो होतो, तो मित्र क्षणात माझ्या डोळ्यासमोर उभा राहिला.– आणि आता मी विचारात पडलोय, की त्याच्यात आणि या भिकाऱ्यात काय फरक आहे ? ——–
मूळ हिंदी कथा – ‘भिखारी’, कथाकार – भगवान वैद्य `प्रखर’
अनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈