मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक (अ) विस्मरणीय प्रकाशन समारंभ – भाग-2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ एक (अ) विस्मरणीय प्रकाशन समारंभ – भाग-2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिलं, – पुस्तक छापून झालं. सुबोध म्हणाला, ‘‘प्रकाशन समारंभ अगदी शानदार झाला पाहिजे!” आता इथून पुढे )

‘‘करेक्ट! त्याशिवाय लेखकाचं नाव होणार कसं? आणि त्याचा वणवा जगभर पेटणार कसा?” हे तारे नकुलने तोडले.

‘‘नाही तरी पुस्तक छापण्यासाठी इतका खर्च केलाहेस, त्यात आणखी थोडी भर… म्हणजे भरल्या गाड्यावर फक्त आणखी एक सूप…” इति सुबोध.

‘‘खर्च मी कुठे केलाय. शऱ्यानं केलाय. मी त्याला फक्त पैसे उधार दिले.”

‘‘उधार… वाट बघ… पैसे परत मिळतील! नाही… ते परत मिळतील… नक्की मिळतील… पण मग तुला फक्त सुपाचाच खर्च… म्हणजे प्रकाशन समारंभाचा. पण तो झाला की तुझं नाव सुपाएवढं… सॉरी… आभाळाएवढं होईल की नाही? म्हणजे नाव आभाळाएवढं आणि काळीज सुपाएवढं…”

आता नाव आभाळाएवढं होईल, की सुपाएवढं, जेवढं केवढं व्हायचं असेल, तेवढं होऊ दे… पण विचार केला, तीस तिथे चाळीस आणि मित्रांच्या सूचनेला मान्यता देऊन टाकली.

प्रकाशन समारंभ करायचे नक्की ठरले, तेव्हा आमचे सारे दोस्त… सख्खे चुलत, मावस, मामे, आत्ये इ. इ. समारंभाचं स्वरुप नक्की करण्यासाठी पुढे सरसावले. खूपशी चर्चा, वाद, खडाजंगी, बरेचसे कप चहा, भजी, वडे आणि अन्य उपहार रिचवून झाल्यावर कार्यक्रमाचं स्वरुप निश्चित करण्यात आलं. समारंभाचे अध्यक्ष, स्वागताध्यक्ष, पुस्तक ज्यांच्या हस्ते प्रकाशित करायचं ते पाहुणे यांच्या नावांबद्दल दोस्त मंडळींच्यामध्ये खूप मतभेद झाले. अखेर खडकमाळ साखर कारखान्याचे चेअरमन हे कार्यक्रमाचे अध्यक्ष ठरले. या संदर्भात, सरस्वती ही लक्ष्मीची बटीक असून, लक्ष्मी ज्याच्या घरात पाणी भरते, त्याच्या घरात सरस्वती ही आपोआपच पाणी भरते, हा संबंध एका दोस्ताने स्पष्ट करून सांगितला आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष ख.सा.का. चे चेअरमन नक्की करण्यात आले. पुढे-मागे परिसरातील एक होतकरू लेखक म्हणून गणपती बिणपती उत्सवात छोटा-मोठा सत्कार निदान ख.सा.का. च्या वतीने होईल, हा विचार अगदी मनात आला नाही, असं नाही. विद्यापीठाच्या क्रमिक पुस्तकाच्या बॉडीवर असलेल्यांपैकी एका मेंबरला प्रकाशनासाठी बोलवावं, ही वश्याची सूचना. त्यामुळे कादंबरीचा निदान पक्षी त्यातील एखाद्या उताऱ्याचा क्रमिक पुस्तकात अंतर्भाव होण्यास मदत होईल, असे त्याचे मत. स्वागताध्यक्ष म्हणून एखाद्या खासदाराला बोलवावं, म्हणजे त्यांच्याबरोबर येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या लव्याजम्यामुळे थोडासा का होईना मॉब वाढेल, असं आपलं मलाच वाटलं. अखेर त्या बैठकीत कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ख.सा.का. चे चेअरमन आबासाहेब पाटील, स्वागताध्यक्ष खासदार नरदेव व प्रमुख पाहुणे म्हणून निर्मीती मंडळाचे सभासद प्रा.डॉ. कळंबे यांची अत्यल्प बहुमताने निवड करण्यात आली.

सकाळच्या सत्रात पुस्तक प्रकाशन, दुपारच्या सत्रात ‘‘आजची कादंबरी दशा नि दिशा” या विषयावर परिसंवाद हे नक्की झालं. निमंत्रण पत्रिकेत मात्र ‘‘दशा न् दशा” असे छापले गेले. रात्रीच्या सत्रात कविसंमेलन घ्यावे. कवी अनेक असतात. त्यामुळे अनेक जण समारंभास उपस्थित राहतील, अशी सूचना कवी म्हणून थोडंफार नाव मिळवू लागलेल्या नकुलने मांडली, पण अन्य मित्रांनी ती कल्पना फेटाळून लावली. कादंबरीचे प्रकाशन आहे, तर रात्रीच्या सत्रात कादंबरीचे अभिवाचन करावे, असे ठरले. कादंबरीवाचन परिणामकारक व्हावे, म्हणून आमच्या गावातील सुप्रसिद्ध आकाशवाणी निवेदक मनवापासून ते सुधीर गाडगीळ, तुषार दळवी, भरत जाधव, मकरंद अनासपुरे, श्रीराम लागू यांच्यापर्यंत नावे पुढे आली. आता ही माझी जानी मानी याने की जान घेऊन मान मोडू घातलेली दोस्त मंडळी मला केवढ्या खड्ड्यात पाडणार, की पाताळात गाडणार याचा अंदाजच मला बांधता येईना. कादंबरी वाचन मीच करेन, अगदी परिणामकारक… अगदी सुचवण्यात आलेल्या नावांपेक्षाही परिणामकारक, असं म्हणून मी चर्चेला पूर्णविराम दिला. अखेर कादंबरीचा जन्मदाता मी होतो ना… माझ्याइतका न्याय तिला दुसरं कोण देऊ शकेल?

प्रकाशन समारंभ पाच-सहा दिवसांवर येऊन ठेपला. मी एका संध्याकाळी सुबोधला म्हटलं, ‘‘समारंभाची रुपरेषा तशी ठीक आहे… पण?”

‘‘आता कसला पण?”

‘‘सगळ्या सत्रात श्रोत्यांची चांगली उपस्थिती असेल, तर समारंभ शानदार होणार ना? आज-काल असल्या सांस्कृतिक उपक्रमासाठी वेळ कुणाला आहे? जवळचे नातेवाईक, दोस्तमंडळी सगळ्यांच्या अडचणी त्याच वेळेत निघतात. कुणाच्याकडे अचानक पाहुणा टपकतो. कुणाकडे अगदी त्याच वेळी जवळचा कुणी तरी आजारी पडतो. श्रोतेच नसले, तर समारंभ शानदार होणार कसा?”

‘‘मी आहे ना! तू कशाला काळजी करतोस?”

‘‘तू एकटा काय करणार? त्या एखाद्या जादुई सिरिअलप्रमाणे एका सुबोधचे शंभर खुर्च्यांवर शंभर सुबोध बसवशील का?”

‘‘नाही! तसं नाही मी करू शकणार! पण शंभर खुर्च्यांवर शंभर श्रोते बसवण्याची व्यवस्था मी करू शकतो.”

‘‘असं? ते कसं?” आणि सुबोधने त्याची योजना विस्ताराने मला समजावून दिली. सुबोधचा एक दोस्त होता. त्याने म्हणे अलीकडेच एक एजन्सी उघडली होती. या एजन्सीद्वारे भाड्याने श्रोते पुरवले जायचे. ‘‘आपण आपल्या समारंभापुरते भाड्याने श्रोते आणूयात.” सुबोध म्हणाला.

‘‘झक्कास!” मी म्हटलं.

मी आणि सुबोध दुसऱ्या दिवशी एजन्सीत पोहोचलो. एजन्सीचं नाव होतं, ‘‘हेल्पलाईन फर्म.” सुबोधच्या मित्राची काही तिथे भेट झाली नाही. पण त्या फर्मच्या पी.आर.ओ. ने मोठ्या आदराने आणि विनम्रतेने आमचे स्वागत केले. सुबोध आमच्या समस्येबद्दल त्यांच्याशी बोलला. त्याने एक निवेदनपत्रवजा जाहिरात आमच्या हातात ठेवली आणि आम्हाला आत जाऊन सुशीलाजींना भेटायला सांगितलं. इंटरकॉमवरून आमच्या येण्याची सूचनाही दिली.

क्रमश:…

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ एक (अ) विस्मरणीय प्रकाशन समारंभ – भाग-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ एक (अ) विस्मरणीय प्रकाशन समारंभ – भाग-1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

अखेर माझे पैसे आणि सुबोध व नकुल या सख्ख्या नि वश्या व शऱ्या या चुलत दोस्तांची प्रेरणा, यामुळे माझी ‘‘मातीच्या चुली आणि वणवा” ही कादंबरी छापून झाली. अजून मुखपृष्ठ राहिलंय, पण चार दिवसांत मुखपृष्ठ घालून पुस्तक हातात ठेवीन, याची खात्री शऱ्यानं दिलीय. कादंबरी तळा-गाळातल्या लोकांवर म्हणजे त्यांच्या जीवन संघर्षावर आधारलेली आहे. साहित्य अकादमी, ज्ञानपीठ इ. पुरस्कार मिळवण्यासाठी तशी पूर्वअटच असते, अशी खात्रीशीर माहिती वश्याने पुरवली. तो पुस्तकाचा वितरक आहे, तेव्हा त्याची माहिती खात्रीशीर असणारच, असं मानायला प्रत्यवाय नाही. वाचकांना वाचायला कितीही कंटाळा आला, तरी जीवनविषयक सखोल जाण प्रकट करणारं चिंतन त्यात असलंच पाहिजे, असा वश्याचा आग्रह. कविता, कथा या क्षेत्रात लुडबुड करता करता आता तो समीक्षक बनू घातला होता. आपल्या शब्दांना जाणकार लोकांच्यात वजन आहे, याबद्दल त्याची स्वत:ची खात्री होती व संधी मिळेल तेव्हा आमच्यासारख्या मित्रांना ही गोष्ट पटवण्याचा तो प्रयत्न करत असे. त्याचं ‘‘शब्दहरण” हे पुस्तक पुरस्कारांच्या रांगेत नंबर लावून आहे, असं तो म्हणतो.

तर असा आमचा शऱ्या. समीक्षा ही आपली जीविका आहे. पुस्तक प्रकाशन ही उपजीविका आणि ज्या सरकारी कचेरीत तो फायलींशी आणि संगणकाशी झटापट करत, दरमहा पाच आकडी पगाराचा चेक खिशात घालतो, ती आपली उप उपजीविका आहे, असं त्याचं म्हणणं. आजच्या प्रकाशन मंडळींच्या प्रथेप्रमाणे, तो नवोदितांची पुस्तके त्यांच्या पैशाने छापून देतो. वश्या वितरण व्यवसायात स्थिरावलाय. शऱ्याने छापलेली पुस्तके वितरणासाठी तो नवोदितांकडून घेतो. खपल्यावर पैसे देण्याच्या बोलीवर. अद्याप काही त्याने कुणाला पैसे दिल्याचे ऐकिवात नाही. पण त्याबद्दल कुणी फारशी तक्रार केलेलीही दिसली नाही. बहुदा पुस्तकांचे डोंगर आपल्या घरात पडून जागा अडण्यापेक्षा दुकानात बरे, असा विचार लेखक मंडळी करत असणार आणि अडलेल्या जागेचं भाडं मागत नाहीयेत, हेच आपलं नशीब असाही विचार करत असणार ही मंडळी… काही का असेना, पुस्तक विक्रीच्या रुपाने का होईना, पण केवळ साहित्यावर जगणारा आमच्या दोस्त मंडळीतला हा एकटाच.

तर शरदने म्हणजे शऱ्याने स्वखर्चाने माझी कादंबरी छापायची आणि वश्याने म्हणजे वसंताने ती विकायची जबाबदारी पत्कारली. प्रुफं तपासण्याची जबाबदारी सुबोधने उचलली आणि मुखपृष्ठ, मांडणी इ. इ. गोष्टीत स्वत: जातीने लक्ष घालायचे नकुलने मान्य केले. माझ्याकडे फक्त कादंबरी लिहिण्याचं किरकोळ काम आलं.

त्या दिवशी असं झालं, ‘‘टाईमपास” मध्ये अरबट चरबट खात आम्ही टाईमपास करत होतो. आम्ही म्हणजे, मी, नकुल, सुभ्या, वश्या, शऱ्या ही पंचकडी. वड्याचा एक मोठासा तुकडा तोंडात कोंबत शऱ्या एकदम म्हणाला,

‘‘पक्या, काही तरी झकास पकव ना!”

‘‘काय?” मी आणि वश्या किंचाळलोच एकदम.

‘‘तू एका साहित्य सम्राटाला स्वयंपाकी बनवायला निघाला आहेस?” इति नकुल.

‘‘तसं नाही रे बाबा! तुझ्या मेंदूत काही तरी नवीन पकव असं…”

‘‘पिकव म्हणायचंय का तुला सुबोध?”

‘‘तेच ते… पिकव काय? आणि पकव काय?…”

‘‘तेच ते कसं असेल? आधी पिकतं आणि मग पकतं… आणि म्हणे जाणकार समीक्षक…”

‘‘हे बघ, जे काय असेल ना, धान्य किंवा अन्न… व्यवस्थित पॅकमध्ये लोकांसमोर येऊ दे… फुटकळ नको…” ही सूचना अर्थात वसंत महाराजांची.

‘‘म्हणजे नक्की काय म्हणायचंय तुला?”

‘‘म्हणजे फुटकळ लंगोटी पत्रातून किंवा साप्ताहिक मासिकातून नको. पुस्तकच काढलं पाहिजे… झकास… तू एक काम कर. एक कादंबरीच लिहून टाक ना!”

‘‘आणि?”

‘‘आणि काय विचारतोस भोटसारखं? ती एकदम छापून बाजारात आली पाहिजे!”

‘‘येऊ दे! येऊ दे!… मी असा फर्स्टक्लास डिसप्ले करतो ना! येणाऱ्याने थांबून बघितली पाहिजे… नुसती बघितली पाहिजे, असं नाही, तर विकतच घेऊन टाकली पाहिजे!”

‘‘ते सारं झालं! कादंबरीही लिहिली… फर्स्ट क्लास… छापणार कोण?”

‘‘काय आहे, पुस्तक छापलंच नाही, तर साहित्य ॲकॅडमी, ज्ञानपीठ, निदान येता बाजार, राज्य पुरस्कारापर्यंत पोचणार तरी कसा तू?” ही कळवळ नकुलरावांची.

मलाही ते पटलं आणि त्याच बैठकीत मी कादंबरी लिहायची, ज्ञानपीठाच्या, किमान साहित्य ॲकॅदमीच्या निदान पक्षी राज्य पुरस्काराच्या योग्यतेची, असं निश्चित करण्यात आलं. आता या साऱ्या पुरस्कारांचा विचार करू जाता, कादंबरीत शोषित वर्गाचे दु:ख, यातना, वेदना आणि काय काय ते उघडून दाखवणारी असावी, अनुभवाधिष्ठित असावी, जीवनाचा शोध घेणारी असावी… वगैरे… वगैरे… हे सगळं चौकडीनं ठरवून टाकलं आणि माझ्यासाठी अगदी सोप्पं काम (त्यांच्या मते) ठेवलं, ते म्हणजे तशा प्रकारची कादंबरी लिहिणे. थोड्याच दिवसात मी माझ्या कल्पनेने अनुभवाधिष्ठित कादंबरी लिहून टाकली, ‘‘मातीच्या चुली आणि वणवा.”

पुस्तक छापून झालं. सुबोध म्हणाला, ‘‘प्रकाशन समारंभ अगदी शानदार झाला पाहिजे!”

क्रमश:…

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ अलक (अति लघुकथा) ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

सौ. स्वाती रामचंद्र कोरे

? जीवनरंग ❤️

☆ अलक (अति लघुकथा) ☆ सौ. स्वाती रामचंद्र कोरे ☆

१.. गणेश विसर्जन

राम काकांच्या घरच्या गणपती चे  विसर्जन रहीम चाचांचे टॅक्सीतून हे फिक्सच होते. गेल्या कित्येक वर्षापासूनचा हा रिवाज होता. मात्र गतवर्षीच्या कोरोनाच्या लाटेत रहीम चाचा बळी पडले.

आज विसर्जनाच्या दिवशी दुसऱ्या टॅक्सीवाल्यास काका फोन लावणार, इतक्यात जोरात हॉर्न ऐकू आला. पाहतात तो काय, रहीम चाचांचा मुलगा दारात टॅक्सी घेऊन उभा होता.

२.. नवे घर

एका गळक्या पत्र्याच्या खोलीत राहताना अभ्यासावर  मेहनत घेत तिने आई बाबांचे  स्वप्न पूर्ण केले. पहिला पगार होताच तिने तो वडिलांच्या हाती  दिला. वडील म्हणाले, “ठेव तुझ्याकडेच उद्या तुझ्या प्रपंचास, नवीन घरास होईल” ..डोईवरच्या त्या गळक्या छताकडे पाहिले आणि दुसऱ्या च दिवशी तिने  होम लोन साठी अर्ज केला… बाबांच्या नव्या घरासाठी.

अलककारा – सौ. स्वाती रामचंद्र कोरे

भिवघाट.तालुका, खानापूर,जिल्हा सांगली

मो.9096818972

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ खरा आधार… ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

? जीवनरंग ❤️

☆ खरा आधार… ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

गेल्या आठवड्यात एका आजींच्या सहस्त्रचंद्रदर्शन सोहोळ्याला गेले होते. या आजींना दोन मुलगे, पैकी एक डाॅक्टर (अस्थीरोगतज्ञ) आणि दुसरा चार्टर्ड अॅकाउंटंट. दोन्ही मुलगे सुना व उच्चशिक्षित नातवंडे या सर्वांनी मिळून एका पंचतारांकित हाॅटेल मधे थाटात सोहळा आयोजित केला होता. आजींच्या दोन्ही मुलांनी अगदी थोडक्यात जी आजींची जीवनकहाणी आम्हा उपस्थितीतां समोर मांडली, आणि त्यातून ऋणानुबंध कसे असतात, ते ऐकून आमच्या अनेकांच्या डोळ्यांमधून पाणी वाहिले.

आजींचे हे दोन्ही मुलगे जुळे. हे मुलगे दोन वर्षांचे असताना आजींवर वैधव्याची कु-हाड कोसळली. एकत्र कुटुंबात या आजींना केवळ आश्रीत हा दर्जा मिळाला. “आम्ही तीन खाणारी तोंडे पोसतो” असे उद्गार ऐकवले जाऊ लागले.

सांगली जवळच्या छोट्या खेड्यात पंचवीस माणसांच्या कुटुंबा साठी राब-राब राबून पहाटे पाच ते रात्री आकरा वाजे पर्यंत कामे करून पण शिव्या खाणेच आजींच्या नशीबात आले.

एक दिवस मुले पाच वर्षांची झाल्यावर पहाटे अगदी चुपचापपणे आजी दोन्ही मुलांना घेऊन बाहेर पडल्या आणि पुण्याला आल्या. दोन दिवस चुलतबहिणी कडे राहून लगेच त्यांनी सदाशिव पेठेत भाड्याची खोली एका वाड्यात घेतली. आजींनी पोळपाट लाटणे हाती घेऊन स्वैंपाकाची कामे मिळवली. हाताला अत्यंत चव होती त्यामुळे कामे भरपूर मिळू लागली. मुलांना नू. म. वि. शाळेत घातले.

मुले अत्यंत गुणी. परिस्थिती समजून कधीही आईजवळ कोणताच हट्ट केला नाही.

आजी डेक्कन वर डाॅ. बापट यांच्या घरी स्वैपाकाचे काम करायच्या. अत्यंत विश्वासू व सुगरण बाई बापट कुटुंबियांना भलतीच आवडली. त्यांची मुले पण आजींच्या मुलांच्या बरोबरीची होती व हे डाॅक्टर पतीपत्नी दिवसभर कामात असल्यामुळे त्यांना घर व मुलांकडे बघायला विश्वासू माणसाची गरज होती. म्हणून त्यांनी आजी व त्यांच्या मुलांना बंगल्यात आऊटहाऊस मधे रहायला जागा दिली. आजींच्या रहाण्याची सोय झाली सज्जन माणसांचा पाठिंबा मिळाला.

दोन्ही मुले अतिशय हुशार. चौथी व सातवीची पण शिष्यवृत्ती मिळवून पुढे गेली. आजींच्या कष्टाळू वृत्ती मुळे बापट कुटुंबियांना पण सोयीचे झाले. “माझी मुले उच्चशिक्षित झालीच पाहिजेत” हा आजींनी ध्यास घेतला होता. दहावीला मुलांनी मेरिटलिस्ट मधे नाव मिळवले आणि पेपर टाकणे, दुधाच्या पिशव्या टाकणे करत करत पुढील शिक्षण चालू केले. बापट कुटुंबियांनी पण दोन्ही मुलांच्या शिक्षणाला आर्थिक हातभार लावला.

मग आजींनी केलेल्या बचतीतून तसेच बापट मंडळी यांच्या मदतीने कोथरूडला अगदी छोटासा फ्लॅट घेतला, पण बापट यांचे काम मात्र त्या करतच होत्या. दोन्ही मुले उच्चशिक्षित होऊन गुणी सुना घरात आल्या. बापटांची मुले अमेरिकेत स्थायिक होऊन Greencard Holder झाली, आणि अमेरिकन पत्नी दोघांनी शोधली. बापट पती-पत्नी पण वृद्ध झाली आणि Problem म्हणजे त्यांच्या मुलांना भारतात येऊन आईवडील यांची काळजी घ्यायला पण वेळ नाही.

Knee-Replacement Operation, Spinal cord Operation सारखी मोठी Operations होऊनही मुलांनी साधी चौकशी पण केली नाही. मात्र आजींच्या डाॅक्टर मुलाने तर स्वतः ऑपरेशन होताना त्याच्या सहकार्यां बरोबर लक्ष घालून खूप काळजी घेतली आणि दुस-या मुलाने पण दर वेळी खूप मदत केली.

आजींच्या सोहळ्याला बापट पतीपत्नी आले होते पण स्वतः श्री. बापट तर Wheel Chair वरून आले होते.

आता शेवटी असे समजले की, आजींच्या दोन्ही मुलांनी मिळून जो कोथरूडला मोठ्ठा बंगला बांधला आहे, त्या मधे वरच्या दोन खोल्यां मधे त्या दोन्ही मुलांनी बापट पतीपत्नी यांना आणले. आणि आजींची दोन्ही मुले त्यांची उतकृष्ट काळजी घेतात. बंगल्यातील तळमजल्यावर आजींचे कुटुंब जणू गोकुळ नांदते आहे. आजींची नातवंडे बापट पतीपत्नी यांना पण “आजीआजोबा” असेच म्हणतात.

सकाळसंध्याकाळ वरती ताजा स्वैपाक जातो. बापट काकाकाकू पण आयुष्याच्या संध्याकाळी समाधानी जीवन जगत आहेत.

“ऋणानुबंध

म्हणतात ते हेच असावेत ना ?

सत्य घटना… आपल्या पुण्यातली. डोळे भरून वाचावी अशी.

व ह्या आजी चे नाव  आहे शोभना अभ्यंकर 🌹🙏

संग्राहिका – मृदुला अभंग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गा बेटी गा… भाग – 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ गा बेटी गा… भाग – 4 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहिलं –‘आई, बाबा आले? सकाळीच येणार होते ना?’ साधनाच्या चेहऱ्याकडे बघता बघताच तिच्या लक्षात आलं. बाबा आले नाहीत. आता इथून पुढे)

‘शी:! नाहीच ना आले बाबा! कधी येणारेत?’ मधू निरंजनची अतिशय लाडकी. ‘माझं गाणं हीच पुढे नेणार…’ असं सारखा म्हणायचा. आईपेक्षा बाबांशीच तीचं गूळपीठ जास्त जमायचं.

साधनाने पत्र पुढे केलं. मधू दहावीत आहे. लहान नाही आता! आणि लपवणार तरी काय? आणि किती दिवस? नाहीतरी बाहेरच्या लोकांकडून काहीतरी कळण्यापेक्षा आपणच आपल्या मुलांच्या मनाची तयारी केलेली बरी.

पत्र वाचता वाचता मधूचे दात ओठात रूतले.

‘आम्ही इंदौरला रहायचं ठरवलंय. माझ्या प्रकृतीला मुख्य म्हणजे गळ्याला मुंबईपेक्षा इंदौरची हवा जास्त मानवेल. मी तिथे नाही. मधूच्या गाण्याकडे लक्ष दे. तू देशीलच. मी येईन तेव्हा तिला तालीम देईन. तू येऊ दिलंस तर… सुट्टीत मधू माझ्याकडे येईल. परीक्षा झाली की तिला गाणं शिकायला तुळजापूरकरांकडे जाऊ दे…’

पत्र वाचून मधू सैरभैर झाली.

‘शी:! आपले लाडके बाबा आपल्याला सोडून गेले… गाण्यासाठी… नकोच ते गाणं…’

हातातल्या पत्राचे तिने अगदी बारीक तुकडे करून टाकले. ‘हं! पत्राचे तुकडे केल्याने का वस्तुस्थिती बदलणार आहे.’ साधनाच्या मनात आलं. त्यानंतर मधूची मन:स्थिती खूपच बिघडली. एकीकडे तिला बाबांचा राग येत होता. तिरस्कार वाटत होता आणि त्याचवेळी तिला नको असताना बाबांच्या आठवणी भरभरून येत होत्या. त्यांचं हसणं… त्यांची थट्टा मस्करी… गाताना त्यांची लागणारी समाधी… त्यांनी लावलेला षडज्… त्यांच्या ताना… फिरक्या… आणि मग त्यांचं गाणंच फक्त तिच्या मनात गुंजत राह्यचं. या साऱ्याचा तिच्या मनावर खूप ताण पडला. तिला डिप्रेशन आलं. तिच्या बिघडलेल्या मन:स्थितीतून तिला सावरायल साधनाला खूप प्रयास पडले. पण, हळूहळू ती नॉर्मलला आली. यानंतर मात्र तिने गाणं सोडलं ते कायमचं. कुणाच्याही समजावणी, धमकावणीला तिने भीक घातली नाही.

साधनाने किती वेळा सांगितलं.

‘तू गाणाऱ्याचा राग गाण्यावर काढतीयस बेटा… तसं करू नको. गाणं आनंददायी आहे. हट्टाने या आनंदास पारखी होऊ नको.’

पण मधूने जणू आपले ओठ शिवून टाकले. गाणं म्हणणं सोडाच. ऐकणंही तिने सोडून दिलं. घरात रेडिओ, टी.व्ही.वर गाणं लागलं तरी खटकन् ती बटण बंद करायची.

अशी ही मधू… आज चक्क गात होती. कितीतरी वर्षांनी… मधूलाही आईची चाहूल लागली. आईच्या विस्फारलेल्या डोळ्यांकडे बघता बघता तिच्या लक्षात आलं, आज अघटित घडलं. आपण गातोय. आपल्याला गावसं वाटतंय. सकाळपासूनच. गाण्याची इतकी अनावर इच्छा आतून उफाळून आली की ती दाबून ठेवताच आली नाही. इतकी अनावर… आपल्या पोटात वाढणाऱ्या गर्भाच्या पेशी थेट आजोबांच्या पेशीशी नातं सांगणार आहेत की काय? त्याच्या धमन्यातून रक्ताबरोबरच स्वरांचा प्रवाह वाहणार आहे की काय? आपण नाही, आपल्या गर्भातील प्रत्येक पेशी जणू गात आहे आणि तिचा स्वर आपण मुखरित करतोय. आता कुणाचा तिरस्कार करणार आपण? कुणाला टाळणार?

साधनाकडे लक्ष जाताच, मधू धावत तिच्याकडे गेली. तिच्या पायाशेजारी फरशीवर बसली आणि तिच्या मांडीत आपलं तोंड लपवलं. जणू तिनं काही गुन्हा केला होता आणि त्यासाठी ती लज्जित झाली होती.

साधनाने तिच्या डोक्यावरून ममतेने हात फिरवत म्हटलं,

‘गा बेटी गा! अगं, तुझ्या पोटात अंकुरणारं बाळ जसं ईश्वराचं देणं, तसं तुझ्या गळ्यातून उमटणारं गाणंही ईश्वराचं देणं, उतू नको, मातु नको, ईश्वरचं देणं अव्हेरू नको.’

मधूने मान वर उचलली. किती तरी दिवस तिच्या मनात तळात घोंघावणारं वादळ शमलं होतं. आपल्या पोटात अंकुरणाऱ्या त्या इवल्या गर्भानं काहीतरी नवीन जाणीव आपल्याला दिलीय असं तिला वाटत राह्यलं.  

समाप्त

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गा बेटी गा… भाग – 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ गा बेटी गा… भाग – 3 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

गा बेटी गा     क्रमश:३

(मागील भागात आपण पाहिलं –  मधूलाही दहावीचं वर्ष कधी पार पडतंय असं झालं होतं… आणि आज अचानक निरंजन घर सोडून गेला होता प्रज्ञाबरोबर… आता इथून पुढे)

प्रज्ञा तिशीच्या आसपासची. गेली पाच-सहा वर्ष त्याच्याकडे येतेय. ती पी.एच.डी. करत होती. ‘लोकसंगीताचा शास्त्रीय संगीताशी असलेला अनुबंध’ या विषयावर भारतभर फिरून अनेक मोठमोठ्या गायकांबरोबर चर्चा केली होती. या संदर्भात निरंजनशी चर्चा करायला ती एकदा घरी आली आणि नंतर येतच राहिली. प्रबंध पूर्ण झाला. तिला पीएच.डी. मिळाली. पण निरंजनच्या गाण्याने प्रभावित होऊन ती त्याच्याकडे गाणं शिकायला येऊ लागली. आता तर बहुतेक मैफलींच्यावेळी त्याच्यामागे तंबोऱ्याच्या साथीला ती असते.

निरंजनने लिहिलं होतं, ‘प्रज्ञा माझी प्रेरणा आहे. चेतना आहे. माझी प्रतिभा आहे. स्वरदा आहे. माझे संगीतीय प्रयोग हे खरे तर आमचे संयुक्त प्रयोग आहेत. तिचा अभ्यास आणि चिंतनच मी माझ्या गाण्यातून लोकांपुढे मांडतो. नाही. ती नसली तर माझं गाणं संपून जाईल. ती असताना माझं गाणं रंगतं. फुलतं. मला नवीन नवीन काही तरी सुचत रहातं. तिच्याशिवाय, गायक म्हणून मला अस्तित्व उरणार नाही. मी चुकत असेन. तरी, अनिवार्य आहे हे सारं…’

साधना सुन्न बधीरशी झाली. प्रज्ञा गेली पाच-सहा वर्षं घरी येतेय. गोड गळ्याची, सुरेल आवाजाची, काहीशी अबोल, शांत, प्रतिभावंत तरूणी साधनाला आवडायची. कळत नकळत आपलं तारूण्यरूप साधना तिच्यात शोधायची. धाकट्या बहिणीसारखं तिचं कौतुक करायची. निरंजनाबद्दल तिच्या मनात भक्ती होती. साधना जाणून होती ते! तिची भक्ती प्रितीत कधी रूपांतरीत झाली? बहिणीची सवत होण्यापर्यंतची वाटचाल कधी झाली? आपल्याला काहीच कसं कळलं नाही?

एक काळ असा होता, साधना निरंजनची प्रेरणा होती. त्याची प्रतिभा जागृत करणारी चेतना होती. त्यावेळी त्याचं नाव झालेलं नवतं. एक उदयोन्मुख कलाकाल म्हणून त्याच्याकडे खूप अपेक्षेने पाहिलं जात होतं. तेव्हा त्याचा रियाझ साधना समोर असल्याशिवाय होत नसे. कोणत्याही मैफलीच्या वेळी साधनाच तंबोऱ्याची साथ करत असे. संसार वाढला तसतशी ही साथ सुटत गेली.

निरंजनला गाण्यासाठी पूर्णवेळ मिळावा म्हणून साधनाने नोकरी पत्करली. मुलं झाली. घराचा व्याप वाढला. कामात, मुलांत, त्यांच्या आणि निरंजनच्या वेळी सांभाळण्यात साधना इतकी गुंतत गेली की गाण्याचा पदर तिच्या हातून कधी सुटला, ते तिचे तिलाच कळले नाही. गाण्यामुळे त्यांची ओळख झाली होती. ते परस्परांच्या जवळ आले होते. एकरूप झाले होते. परस्परांपासून दूर न जाण्याच्या शपथेने बांधले होते.

‘कामाच्या रेट्यात प्रथम गाण्यापासून दुरावलो आणि आता निरंजनपासून…’ साधनाला वाटत राहिलं.

पुढे पुढे निरंजनच्या रियाझाच्यावेळी आपल्याला तिथे थांबायला वेळ होईना. सुरुवातीला आपण तिथे थांबत होतो. त्याच्या नेमक्या जागा. सुरेख मींड, दमदार तान यांना दाद देत होतो. मन किती उत्सुक आणि टवटवीत होतं तेव्हा… काही काही वेळा तर आपण त्याला सूचनाही देत होतो. पुढं मुलं झाली. त्यांचं रडणं. आई हवी, हा हट्ट. त्याच्या रियाझात व्यत्यय नको म्हणून मुलांनाच दूर नेणं, मुलं मोठी झाल्यावर त्यांचे गृहपाठ, त्यांचे कार्यक्रम, शिवाय नोकरी, घरकाम या साऱ्याचा आपल्यावर उतरलेला शीण… पहिल्यासारखं आता निरंजनच्या आगेमागे करता येत नव्हतं. त्याचा आणि आपला ही संसार सावरता सावरता त्याच्या गाण्यापासून आपण दुरावत चाललो. आपलं स्वत:चं गाणं तर त्याहीपूर्वी केव्हाच सरलं होतं.

सुरवातीला वाटायचं, आपण हळूहळू बधीर, बोथट होत चाललोय. नंतर नंतर हे वाटणंही बोथटून गेलं. रियाझाचं राहू द्या. प्रत्येक मैफलीला जाणंही अशक्य झालं. निरंजन नावलौकिक मिळवत गेला. पण, त्याची प्रेरणा, प्रतिभा म्हणून असलेलं आपलं स्थान हरवत गेलं आणि आता तर धक्काच… आपल्यापेक्षा १७-१८ वर्षांनी लहान असलेल्या आपल्या शिष्येबरोबर तो रहाणार. खरंय. त्याच्या नावाला वलय आहे. त्याहीपेक्षा जीव ओवाळून टाकावं असं त्याचं गाण आहे. खरं आहे. प्रज्ञाही अति संवेदनाक्षम, तरल मनाची आहे. अभ्यासू आहे. त्याच्या सांगितीय प्रयोगात तिचा मोठा वाटा आहे. हे सारं पटतंय आपल्याला.

पण, त्यासाठी खरंच दोघांनी एकत्र रहाणं अपरिहार्य आहे का? शिष्या मुलीसारखी असते ना?

सरत्या संध्याकाळी शिकवणीहून मधू परत आली. कोप-यात चपला आणि सोफ्यावर दप्तर भिरकावत तिने विचारलं,

‘आई, बाबा आले? सकाळीच येणार होते ना?’ साधनाच्या चेहऱ्याकडे बघता बघताच तिच्या लक्षात आलं. बाबा आले नाहीत.

क्रमश:…  

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गा बेटी गा… भाग – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ गा बेटी गा… भाग – 2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

(मागील भागात आपण पाहीलं – तिच्या डोळ्यापुढे आपल्या वडिलांची गाणारी मूर्ती… त्यांनी कुठे कोणते आलाप घेतले, ताना घेतल्या, मींड घेतली… हेच सारं तिला दिसू लागलं. आता इथून पुढे -)

दुस-या दिवशी साधना बॅंकेतून घरी आली तर निरंजनने पाठवलेलं पत्र मिळालं.

‘छान! म्हणजे हा काही कोणार्कहून सरळ घरी येत नाही. कुठे कुठे हिंडूण, मैफली गाजवून येणार स्वारी… त्याला कितीदा सांगितलं, अशी परस्पर आलेली आमंत्रणं स्विकारू नकोस…’ असं पुटपुटत साधनानं पत्र फोडलं.

‘साधना गेले वर्षभर मी एका प्रचंड वादळात सापडलोय. संसार की संगीत… मला वाट दिसत नव्हती. भोवतीनं दाट धुकं आहे आणि मला श्वासही घेता येत नाही असं वाटत होतं.

मनाशी खूप झगडून मी संगीताच्या वाटेवर पावलं ठेवलीत. प्रज्ञा माझी साथसंगत करणार आहे.

माझ्यासाठी केव्हापासून तिने आपलं घर सोडून यायची तयारी दाखवलीय. माझाच निर्णय होत नव्हता.

वाटत होतं, मी तुझ्यावर खूप अन्याय करतोय. अजूनही वाटतंच. मी तुझा ऋणाईत आहेच. शेवटपर्यंत तसाच राहीन. तुझ्यामुळेच माझा कलंदराचा संसार मार्गी लागला. त्यासाठी तुला तुझं आवडतं संगीतही सोडावं लागलं, हे कसं विसरू? त्यासाठी तुला तुझी आवडती संदीताची करिअर सोडावी लागली, हे तरी कसं विसरू? पण, या कलंदराला साथ द्यायला, सावरायला, सांभाळायला तुझे हातच आता रिकामे नाहीत…

वाचता वाचता साधनाच्या मनापुढे तिचा भूतकाळ उभा राहिला. गाण्यानेच त्यांना जवळ आणलं होतं. दोघेही साधुरामांचे पट्ट शिष्य. या दोघांबद्दलही खूप आशा बाळगून होते ते! आपल्या घराण्याचा नावलौकिक दोघेही वाढवतील याबद्दल साधुरामांची पक्की खात्री. गाता गाता दोघेही एकमेकांत गुंतत गेले. पुढे लग्न करून अगदी एकमेकांचे झाले. संगीताच्या क्षेत्रात दोघेही अजून धडपडत होते. अजून नाव व्हायचं होतं. दोघांनाही मैफलीसाठी स्वतंत्रपणे निमंत्रणे यायची. पुढे वर्षभरात मधू झाली आणि त्यांच्या लक्षात आलं, दोघांनाही विंचवाचं बिऱ्हाड पाठीवर घेऊन हिंडणं शक्य नाही. कुठे तरी स्थिर झालं पाहिजे. वाढल्या संसाराला स्थैर्य येण्यासाठी निश्चितपणे आणि नियमितपणे अर्थप्राप्ती होणारा व्यवसाय पत्करणं जरूर होतं. मग साधनाने नोकरी करण्याचा निर्णय घेतला. निरंजनने मात्र गाणं आणि गाणचं करायचं. साधनाला बॅंकेत नोकरी मिळाली. घराला स्थैर्य आलं. मधूच्या पाठीवर तीन वर्षांनी अनूप जाला. वर्षे सरत गेली. नावलौकिकाच्या पायऱ्या चढत निरंजन नामांकित गायक झाला. घराणेशाहीत बंदिस्त झालेल्या शास्त्रीय संगीताला त्याने अभ्यास, प्रयोगशीलता याच्या साहाय्याने नवी झळाळी, नवा चेहरा देण्याचा प्रयत्न केला. लोकसंगीताला शास्त्रीय बैठक देण्याचा त्याने प्रयत्न केला. हे सारं खूप लोकप्रिय झालं. रसिकांमध्ये, जाणकारांमध्ये त्याने स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले.

अलीकडे अलीकडे साधनाला जाणवत होतं. स्वरांचा धागा पकडून निरंजन उंच उंच जातोय. त्याच्या दृष्टीच्या कवेत केवढा तरी विशाल विस्तार आहे. आपण मात्र जमिनीवरच उभे आहोत आणि तो सप्तसुरांचा धागा आपल्या हातून निसटत चाललाय. छे! केव्हाच निसटून गेलाय. आता आपलं गाणं हौशानवशा गायिकेइपतपच! बॅंकेमधली नोकरी करता करता इतके रूक्ष होऊन गेलो का आपण? कधी झालं असं? निरंजनच्या रियाजाच्यावेळी त्याने एखादी सुंदर जागा घेतली, एखादी अवघड तान घेतली तर पूर्वीसारखी आपली झटकन् दाद जात नाही. कामाच्या घाईत आपल्या लक्षातच येत नाही. कान जणू बधीर झालेले… त्या गाण्यातल्या, स्वरातल्या लावण्यकळा आपल्या मनाला उमगायच्याच नाहीत. निरंजनमधला कलावंत मग नाराज व्हायचा. पत्रातून त्याने हीच वस्तुस्थिती मांडली होती. पण, व्यवहाराच्या साऱ्या जबाबराऱ्या पेलता पेलता ती इतकी थकून जायची की त्याला अपेक्षित असलेलं ताजं, टवटवीत, तरल मन तिच्याकडे उरलेलंच नसायचं.

पुढे मधू गाणं शिकायला लागली. तिचा आवाज, तिची गाण्यातली जाण पाहून साधनाने आपल्या आशा-आकांक्षा तिच्यावर केंद्रित केल्या. आपली स्वप्नपूर्ती ती तिच्यात शोधणार होती. मधूला चांगली गायिका बनवायचं. दहावीची परीक्षा झाली की तिच्या गाण्यावर भर द्यायचा. कॉलेजचं शिक्षण दुय्यम, असं त्यांनी केव्हाच ठरवून टाकलं होतं. मधूलाही दहावीचं वर्ष कधी पार पडतंय असं झालं होतं… आणि आज अचानक निरंजन घर सोडून गेला होता प्रज्ञाबरोबर…

क्रमश:…  

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ गा बेटी गा… भाग – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ गा बेटी गा… भाग – 1 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

मधू बागेला पाणी देत होती. गुलबक्षीच्या ताटव्याजवळ आज मे फ्लॉवरचा दांडोरा उमडून आलेला होता. दांडोऱ्यावर हजारभर कळ्यांचं कणीस. काल तर तिथे काहीच नव्हतं. आज पापण्या मिटलेल्या गप्पगप्पशा कळ्या कणसात एकमेकांना बिलगून बसल्याहेत. उद्या बाहेरच्या परिघातल्या कळ्या डोळे उघडतील. लालसर गुलाबी केशरकाड्या दूर होतील. आतल्या वर्तुळातले गुलाबी केसर मुकुटासारखे पिवळे परागकोश माथ्यावर मिरवतील. परवाला त्याच्या आतल्या वर्तुळातल्या कळ्या उमलतील. तेरवाला त्याच्या आतल्या. चार-पाच दिवसात त्या दांडोऱ्यावर गुलाबी रंगाचा फुटबॉल झोकात झुलू लागेल.

आज बाळ पोटात ढुशा देतंय. नंतर लाथा झाडेल, वळेल, फिरेल आणि एक दिवस पोटातलं बाळ कुशीत येईल. गळामिठी घालील. पापे घेईल. ती विलक्षण उत्तेजित झाली.

झाडांना पाणि देऊन झालं. नंतर तिने पाईपमधून पाण्याचा फवारा अंगणावर उडवला. तापलेल्या मातीचा कण न् कण उमलत गेला. त्याच्या गंधाच्या लाटा उसळत उसळत तिच्यापर्यंत पोचल्या. आवेगाने, तिने त्या श्वासातून आपल्या शरीरात सामावून घेतल्या. त्या गंधाने तिची उत्तेजना अधिकच वाढली आणि तिच्या गळ्यातून स्वर पाझरू लागले. स्वर… ताना… स्वरांच्या आवर्तनात तीदेखील झाडाझाडातून फुलपाखरासारखी भिरभिरू लागली. आता त्या स्वरांना शब्द भेटत गेले.

‘केतकी गुलाब जुई चंपक बन फुले’

गात गातच ती आत आली. मागच्या व्हरांड्यात उभी राहून बागेकडे बघत ती गाऊ लागली. आलाप-तानांचे झुले हिंदोळू लागली.

साधना घरी आली. पण, मधूचं लक्षच नव्हतं. ती आपली गातच होती. स्वरांचा झरा अविरतपणे झुळझुळत होता. साधना चकितच झाली. कितीतरी दिवसांनी वर्षांनी तिची लाडकी लेक गात होती. मनमोकळी होऊन गात होती. पण, आज असं काय घडलं? कितीतरी वर्षांपूर्वी तिने गाणारे आपले ओठ मिटून घेतले होते. गोड गळ्यावर अत्याचार केला होता. शपथ घ्यावी तसं गाणं सोडून दिलं होतं.

मधुवंतीचा आवाज अति मधुर सुरेल. ताला-सुरांची पक्की जाण. शाळेत असताना शाळेतली, शाळेबाहेरची गाण्याबद्दलची कितीतरी बक्षिसे तिने मिळवली होती. तिला खूप मोठी गायिका बनवण्याचं स्वप्नं तिच्या जन्मापासूनच निरंजन आणि साधना बघत होते. ‘पहिली बेटी-सूरकी पेटी…’ तिच्या जन्मानंतर निरंजन म्हणाला होता. मधुवंती त्याची भारी लाडकी. निरंजन रियाजासाठी तिला घेऊन बसली की साऱ्या जगाचं भान विसरायचे. गातच राहायचे. धाकट्या अनूपला मात्र एका जागी मांडा ठोकून आलाप-ताना घोटायचा भारी कंटाळा. दहा मिनिटं एका जागी बसणं त्याला कठीण जायचं. गोड बोलून, चुचकारून, रागावून सगळं करून झालं. पण, तो भारी चंचल. मन एकाग्र करून एका जागी स्थिर बसणे त्याला मुळीच जमत नसे. शेवटी, निरंजनने त्याचा नाद सोडला. आपल्या मुलीवर मधुवंतीवरच त्या दोघांनी आपल्या आशा केंद्रित केल्या. तिला ख्यातनाम गायिका बनवायचं. आपल्या घराण्याचा वारसा अधिक संपन्न करून तिच्या हाती सोपवायचा.

पण एक दिवस… निरंजनच घरातून निघून गेला.

जाता जाता मधूचं गाणंही घेऊन गेला.

कोणार्कच्या सूर्यमंदिरात संगीत महोत्सव होता. त्यासाठी निरंजन घरातून बाहेर पडला. मुलांच्या शाळा, साधनाची बॅंक… कुणालाच जाणं शक्य नव्हतं. मधूचं तर १० वीचं महत्त्वाचं वर्ष. निरंजनचं गाणं खूप चांगलं झालं असणार. दुस-या दिवशीच्या वृत्तपत्रातून त्याचा विस्तृत रिव्ह्यू आलेला. जाणकार संगीत समीक्षकांनी त्याचं खूप कौतुक केलेलं. मुरकती, मींड, लोच आणि मुख्य म्हणजे त्याच्या गाण्यातलं भावसौंदर्य, त्याची प्रयोगशीलता, नावीन्य, वाचताना साधना-मधूच्या अंगावर रोमांच उभे राहिले. मधू तर दिवसभर आपल्या मन:चक्षूंपुढे निरंजनचं गाणं आठवत राहिली. त्याचा दमदार पुरिया… रंग कर रसिया आओ अब… तिच्या डोळ्यांपुढे शाळा नव्हतीच जणू. तिच्या डोळ्यापुढे आपल्या वडिलांची गाणारी मूर्ती… त्यांनी कुठे कोणते आलाप घेतले, ताना घेतल्या, मींड घेतली… हेच सारं तिला दिसू लागलं.

क्रमश:…  

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ उपाय… (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

?जीवनरंग ?

☆ उपाय… (भावानुवाद) – भगवान वैद्य `प्रखर’ ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

‘शुक्रा… खरच  तू भेटशील अशी आशा नव्हती. पण पायर्याह उतरताना चान्स घेतला. दोन्ही लिफ्टस बंद आहेत., माहीत आहे नं? असं म्हणत म्हणत हीनाने आत प्रवेश केला.

हो ना ग! काय करणार, आजच नेमकं पूर्वीलाही उशिरा यायचं होतं.’

पूर्वी…?

‘माझ्याकडची कामवाली ग! आतमध्ये झाडू-फारशी करतेय. बोल! तुझी लीव्ह इन रिलेशनशीप काय म्हणतेय?

‘ठीक चालू आहे पण शेवटी गडबड झालीच! यार, त्याचसाठीच आलेय. ते म्हणतात नं, आगीजवळ तूप ठेवलं की कधी ना कधी वितळतच! तू म्हणाली होतीस नं, तुझ्या आजीला अनेक रोगांवरचे अनेक घरगुती उपाय माहीत आहेत.’

‘हो. माहीत आहेत. क्रॉनिक सर्दीसाठी सांगितलेला तो ओव्याचा उपाय… तूही तो करून बघितला आहेस.’

हो. म्हणूनच तर इथे आले. या संकटातून सुटका करून घेण्यासाठी. जरा विचार नं तिला काही घरगुती उपाय….’ हीनाने आपल्या पोटाकडे इशारा करत म्हंटलं .

‘मला मारून टाकणार की काय? आजीला माझीच शंका येईल. इथे येऊन कातडं सोलेल माझं.’

‘मग मलाच फोन नं. दे. मीच बोलेन तिच्याशी.’

‘नाही नाही. तसंही नाही चालणार! आजीला माहीत आहे, तू माझी मैत्रीण आहेस. ती विचार करेल, माझाच काही तरी गोंधळ आहे आणि मला ओरडा खावा लागू नये म्हणून मी तुला पुढे केलय. कधी तरी संधी बघून मीच तिला विचारेन.’

‘जरा लवकर बघ यार…. बस, एकदा सुटका मिळावी. आच्छा मी चालते. अजून तीन जीने उतरायचे आहेत. ‘ असं म्हणत म्हणत हीना बाहेर पडली.

‘पूर्वी, जरा लवकर लवकर हात चालव. मला उशीर होतोय. आज आणि जीने उतरून खाली जायचय.’ शुक्रा म्हणाली.

‘झालं दीदी निघतेच आहे. आपण ही चिठ्ठी तेवढी बघा. ‘

‘अग, कसली चिठ्ठी आहे?

‘हा उपाय आहे. माफ करा. हीना दीदीचं बोलणं मी ऐकलं.’

‘तुला कसा माहीत हा उपाय?’ चकित होत शुक्राने विचारले. तिने चिठ्ठी बघितली होती.

‘दोन वेळा त्याचा वापर मी करून बघितलाय. गॅरेंटेड आहे.’

‘पूर्वी… तू?….’

‘दीदी एकदा रस्त्यावर भीक मागताना पकडले होते. तेव्हा पोलिसांनी मला ‘शेल्टर होम’ मध्ये टाकून दिले. तिथे रोजच कुणा ना कुणाबरोबर तरी जावं लागायचं. हा उपाय सुभाषिताप्रमाणे तिथल्या भिंतीवर लिहिलेला आहे.’ असं बोलता बोलता पूर्वीनं फ्लॅटचा दरवाजा खेचला आणि ती जिन्याकडे गेली.

मूळ हिंदी  कथा – ‘नुसखा’  मूळ लेखक – भगवान वैद्य `प्रखर’

अनुवाद –  श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ ‘हार्ट’फिल – सुरेश नावडकर ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

? जीवनरंग ❤️

☆ ‘हार्ट’फिल – श्री सुरेश नावडकर ☆ संग्राहिका: सुश्री प्रतिमा जोशी ☆

यमराज आजच्या ‘डिस्पॅच’ यादीवर नजर टाकत होते.. त्यांनी नाव वाचलं ‘शुभांगी’, वय पन्नास, घरात सासू-सासरे, नवरा व मुलगा. मृत्यूचं निमित्त.. हार्ट अटॅक. वेळ.. मध्यरात्र…

शुभांगी दिवसभर घरकाम करुन थकलेली होती. तिचे पती शेखर, नुकतेच सरकारी नोकरीतून निवृत्त झाले होते. वयोवृद्ध सासू सासरे, हे तिचे आधारस्तंभ होते. मुलाचं काॅलेज शिक्षण पूर्ण होऊन तो चांगल्या कंपनीत नोकरीला लागला होता..

संध्याकाळी शुभांगी, थोडा दम खायला खुर्चीत बसली, तेव्हा तिच्या छातीत अचानक दुखू लागलं.. चमक आली असेल, असं समजून तिने त्या दुखण्याकडे दुर्लक्ष केलं. तेवढ्यात शेखर आले. चौघांसाठी तिने चहा केला. चहा झाल्यावर ती रात्रीच्या स्वयंपाकाला लागली..

तिच्या मुलाच्या, साकेतच्या आवडीची ग्रेव्हीची मटर पनीरची भाजी तिनं करायला घेतली. रात्री साकेत आल्यावर, आठ वाजता सर्वांनी एकत्र जेवण केले. सगळं आटपेपर्यंत, रात्रीचे दहा वाजले. सासूबाईंना औषध व सासरेबुवांना गोळ्या देऊन झाल्या. साकेत त्याच्या रुममध्ये लॅपटाॅप घेऊन बसला. शेखरही झोपी गेले. शुभांगी स्वयंपाकघर आवरुन बेडवर पहुडली..

तासाभराने शुभांगीच्या छातीत, डाव्या बाजूला पुन्हा दुखू लागलं.. तिनं शेखरला उठवलं. शेखरने तिला पेनकिलरची गोळी काढून दिली व ती घेऊन झोपायला सांगितले. गोळी घेऊन तिने कसाबसा एक तास काढला. पुन्हा छातीतून तीव्र कळ आल्यावर मात्र शुभांगी घाबरुन गेली. तिला श्र्वास घेतानाही त्रास होऊ लागला. घामाने अंगावरचे कपडे ओलेचिंब झाले. तिला समजून चुकले की, आपल्याला हार्ट अॅटॅक आलेला आहे.. आता काही खरं नाही..

दरवाजात यमराज उभे होते.. त्यांना शुभांगीची मनस्थिती दिसत होती व तिच्या मनातील विचारही कळत होते..

शुभांगीला आपण अचानकपणे या जगातून निघून जाणार ही कल्पनाच सहन होत नव्हती.. तिची बरीचशी कामे व्हायची राहिली होती.. ती विचार करु लागली.. अजून साकेतचं लग्न व्हायचंय.. नवीन सूनबाई येणार.. तिला घरच्या रूढी, परंपरा समजून द्यायच्या आहेत.. कुलदैवताचं दर्शन व नवस फेडायचा आहे.. सासू-सासऱ्यांना घेऊन काशी यात्रा करायची आहे.. शेखरला एकदा गावी पाठवून, शेतीची कामं पूर्ण करायची आहेत..

शुभांगीला घरातलीही राहून गेलेली कामं आठवायला लागली.. सकाळी आणलेली पालक, मेथी निवडायची राहिलेली आहे.. मटारच्या शेंगा सोलायच्या राहिलेल्या आहेत.. शिवाय फ्रिजमधलं विरजणाचं पातेले भरुन गेलंय.. खरंतर आजच ताक करुन लोणी काढून ठेवायला हवं होतं.. मी आत्ता गेले तर लोक काय म्हणतील.. सगळी कामं अर्धवटच सोडून गेली… शिवाय किराणा आणायचा राहून गेलाय.. तांदूळ संपत आलेत…लाईटचं बिल भरायचं राहिलंय.. सोसायटीचा मेंटेनन्स द्यायचा राहिलाय…

शुभांगी विचार करीत होती.. मी जर अशीच गेले तर माझे दिवस करताना, नातेवाईक मंडळी माझ्या अशा वेंधळेपणाच्या वागण्याला हसतील.. मला तर ते कधीच सहन होणार नाही..

यमराजला, त्याच्या वडिलांच्या काळात त्यांनी सांगितलेल्या गृहिणींच्या गोष्टींशी, शुभांगीच्या मनातील गोष्टी जुळत होत्या.. अलीकडच्या काळातील शुभांगी ही संस्कारी व गृहकृत्यदक्ष पत्नी, आई व सून होती.. तिला असे मधेच घेऊन जाणे, त्याच्या मनाला पटेनासे झाले..

त्याने त्याच्याकडील राखीव कोट्यातील तीस वर्ष, शुभांगीला अनुकंपा तत्त्वावर दिली व तिला शुभेच्छा देऊन, तो आल्या वाटेने निघून गेला..

शुभांगीला, मनातील अनेक विचारांच्या गर्दीत छातीतील दुखणं कमी होऊन, कधी झोप लागली ते कळलं देखील नाही..

सकाळी ती नेहमीप्रमाणे सर्वांच्या आधी उठली. सगळं आवरुन पुजेला बसली.. प्रसन्न मनाने तिने पुजा केली व चहाचा कप घेऊन शेखरच्या हातात दिला.. शेखरने तिला विचारलं, ‘काल तुला अचानक काय झालं होतं गं?’

शुभांगी उत्तरली, ‘कुठं काय? जरा जादाचं काम केलं की, असं होतं कधी कधी.. तुम्हाला काय वाटलं, मी तुम्हाला सोडून वरती जाईन? अहो, अजून खूप कामं व्हायची राहिली आहेत माझी!! ती अर्धवट सोडून, मी बरी जाईन..’

आपल्या कुटुंबाला आत्मियतेने सांभाळणाऱ्या, तमाम गृहिणींना ही ‘फॅन्टसी कथा’ समर्पित…

©  सुरेश नावडकर

१३-३-२२

मोबाईल ९७३००३४२८४

या रचनेचे सर्वाधिकार रचयिता  © सुरेश नावडकर यांच्याकडेच आहेत.

संग्राहिका :सुश्री प्रतिमा जोशी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print