मराठी साहित्य – जीवनरंग ☆ करारनामा… ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

? जीवनरंग ❤️

☆ करारनामा… ☆ प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग ☆

विक्रमने मला रजिस्ट्रेशन ऑफिसमध्ये बोलावले, तेव्हा मला आश्चर्य वाटले. आता हा कसले रजिस्ट्रेशन करतोय …??? त्याला विटनेस म्हणून नेहमी मीच हवा असतो. मनाशी अंदाज बांधतच मी तिथे पोचलो.

मला बघताच नेहमीप्रमाणे त्याने चिडून किती उशीर ..? असा चेहरा केला आणि हात धरूनच त्या साहेबांच्या पुढ्यात घेऊन गेला. मुख्य म्हणजे त्याची दोन्ही मुलेही तिथे हजर होती.

त्याला एक मुलगा आणि एक मुलगी असे छान चौकोनी कुटुंब आहे. दोन्ही मुले उच्च शिक्षण घेत होती. त्यांनी सांगितलेल्या पेपरवर मी काही न बोलता सह्या केल्या. मुलांनीही सह्या केल्या. सगळे सोपस्कार पूर्ण होताच मुले मला बाय करून निघून गेली, आणि आम्ही नेहमीप्रमाणे हॉटेल मध्ये घुसलो.

मनपसंद पदार्थांची ऑर्डर करून झाली, आणि मी विक्रमला विचारले “कसल्या सह्या घेतल्यास बाबा ….?”

“तूला का काळजी …..? तुझ्याकडचे काही घेत नाही मी …… नाहीतरी आहे काय तुझ्याकडे …?”असे बोलून मोठ्याने हसला.

“तरीही मला विचारायचा हक्क आहे …” मी मोठ्याने ओरडलो, तसा तोही हसला आणि हात पुढे करून म्हणाला “दे टाळी ….!! ह्या हक्कासाठीच वीटनेस म्हणून तुझ्या सह्या घेतल्या. माझ्या दोन्ही अपत्यांनी शिक्षण पूर्ण करून नोकरीला लागल्यानंतर आम्हाला दरमहा ठराविक रक्कम द्यावी अशी कागदपत्रे बनवली मी” विक्रम शांतपणे म्हणाला.

“काय ….!! मी भान न राहवून ओरडलो. आजूबाजूची माणसे आमच्याकडे पाहू लागली “अरे वेड लागले का तुला….? असे कोण पेपर्स बनवते का…. ? मुले आहेत ती….. आयला संभाळणारच आणि त्याना मनासारखे शिक्षण देणे आपले कर्तव्य आहे….” मी त्याला समजावले.

“मान्य…. पण आपली ऐपत नसताना त्यांना शिकवणे, आणि नंतर त्याचा परतावा मागणे यात गैर काय …?” तो शांत होता.

“ते कसे….? मीही चिडूनच विचारले.

“हे बघ भाऊ …. मी आणि वनिता दोघेही जॉब करतो. वर्षाला दोघांची मिळून पंधरा लाखाची कमाई आहे. महिन्याला साधारण लाख रुपये घरात येतात. त्यात नवीन घराचे कर्ज, लाईट बिल, टेलिफोन बिल, इंटरनेट बिल, केबलचा खर्च वेगळा. घरात किराणा माल, गाडीचे मेंटेनन्स, पेट्रोल…. हाही खर्च. उरलेल्या पैशात दोन्ही मुलांचे शिक्षण, विविध गुंतवणुकीचे हप्ते आणि मेडिकल या सर्व गोष्टीत पैसे संपून जातात. हातात काहीच शिल्लक राहत नाही. येईल तितका पैसा कमीच पडतो. शिवाय दर चार महिन्यांनी काहीतरी खरेदी असतेच. त्यात कपडे, शूज असतातच. अरे इथून पैसा येतो आणि तिथून जातो. आमच्यासाठी काहीच शिल्लक नाही.

वयात आलो, शिक्षण पूर्ण केले आणि नोकरीला लागून घरची जबाबदारी घेतली. त्यानंतर लग्न केले आणि ताबडतोब वर्षात मुलगी झाली दोन वर्षांनी मुलगा झाला. मग त्यांच्या जबाबदारीत गुरफटलो. ते आता पर्यंत…..

मुलांना जास्तीत जास्त उत्तम शिक्षण मिळावे हा अट्टाहास. मग चाळीतून या मोठ्या घरात आलो. गावी घर दुरुस्त केले. साला… आता लक्षात येतेय, आपण आपल्यासाठी काहीच केले नाही…… दुसऱ्यांचा आनंद आपला मानत राहिलो. आई बाबा नेहमी कौतुक करतात. चार लोकांत अभिमानाने सांगतात माझ्याबद्दल. पण वनिताचे काय ? तीही माझ्याबरोबर वाहवत गेली. तिची स्वप्ने काय ते विचारलेच नाही मी. ते कोणत्यातरी चित्रपटातील वाक्य आहे ना…. अरे आयुष्याच्या उत्तरार्धात कळले की, आमचे एकमेकांवर प्रेम करणे राहून गेले”. असे बोलून तो हसू लागला.

मी गंभीर झालो “नाही विकी… हे कारण नाही आहे. तू तसा विचार करणारा नाहीस….. खरे बोल ..” मी थोडे हळुवारपणे विचारले.

तसा तो केविलवाणा हसला ”साला …खरा मित्र आहेस. बरोबर ओळखलेस तू. ऐक… मोठी मुलगी उच्च शिक्षणासाठी तीन वर्षे परदेशी जाण्याचे ठरविते आहे. तीन वर्षांचा साधारण पंचवीस लाख खर्च आहे. त्यानंतर छोटे चिरंजीव आहेतच तयार. त्याच्यासाठीही पंचवीस लाख धर. पुढील आठ वर्षात 50 लाख अधिक शिक्षणावर खर्च होणार. तोवर मी निवृत्तीजवळ येणार… मग त्यानंतर आमचे काय ? आमच्याकडे म्हातारपणासाठी काय राहील?

“अरे …. मुले काय तुम्हाला वाऱ्यावर सोडून देणार का …? उलट चांगले सुखात ठेवतील तुम्हाला ….? मी सहज म्हटले.

“गॅरंटी देतोस का भाऊ… ? त्याने तीक्ष्णपणे विचारले. मी काही न सुचून शांत बसलो. “सरळ हिशोब आहे भाऊ. निवृत्तीनंतर हातात इतकी रक्कम येणार नाही की, त्याच्या व्याजावर आम्ही दोघे जगू. मुलगी काय उद्या लग्न होऊन सासरी जाईल. मुलगा परदेशात गेला, तर परत येईल की नाही ही शंका आणि कितीही झाले, तरी त्या दोघांच्या जीवावर उर्वरित आयुष्य काढणे आम्हाला पसंत नाही. म्हणून त्यावर उपाय एकच. उच्च शिक्षणासाठी आम्ही तुमच्यावर केलेला खर्च आम्हाला परत करा. नोकरी लागताच दर महिन्याला ठराविक रक्कम आमच्या खात्यात जमा व्हायला हवी. तसेच दरवर्षी त्यात किमान दहा टक्के वाढ हवी. आम्ही त्यातून आमचा खर्च करू. आमचे आयुष्य जगू..”

मग त्यासाठी हे पेपर्स बनवायची काय गरज ? दोन्ही मुले समजूतदार आहेत. न बोलता तुला पैसे देतील.. “मी आत्मविश्वासाने सांगितले..

“भाऊ इथे भावनिक होऊ नकोस. आपण खूप अनुभव घेतले आहेत. पुढे कोण कसे वागेल, हे आता सांगू शकत नाही. त्यामुळे हे पेपर्स केलेले बरे. उद्या मुलाकडे भीक मागण्यापेक्षा हक्काचे पैसे मागणे केव्हाही चांगले. माझा सिंघनिया होऊ नये हीच माझी इच्छा. मी माझ्यापुरता विचार केलाय तू तुझा विचार कर “. असे बोलून समोरचा थंड झालेला चहा एका घोटात संपवून उठला.

द्वारा  – किरण कृष्णा बोरकर

जून 18, 2018 

– प्रस्तुती : सुश्री मृदुला अभंग

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ पैठणी ☆ सुश्री अपर्णा देशपांडे ☆

? जीवनरंग ❤️

☆ पैठणी ☆ सुश्री अपर्णा देशपांडे ☆

काशीनाथ  ला आज कशाचच भान नव्हतं.  संतोष ने दोनदा हाक मारली, पण काशीनाथ भान हरपुन  कामात गढला होता. हे त्याचं नेहमीचंच होतं. एकदा का कटला चालवायला सुरुवात केली की धाग्याशी नाते  विठ्ठल साधी झालो एकरूप  घेतली समाधी ।।

असं होई.  संतोष ला किमान जेवणाचं भान असे, पण काशिनाथ म्हणजे…

 “ए काशी s, फोन आहे तुझा.” कुणीतरी ओरडलं, तसा काशी सगळं टाकून पळाला.  क्वचित कधी नर्मदा  फोन करत असे. 

“हॅलो, बोल”

“तुम्हाला  कसं कळलं की मीच हाय म्हणून ?”

“येडा बाई, मला दुसरं कोण फोन करणार ?  जेवण झालं माझं. काळजी करू नको “

” इतकं खोटं ?  जातांना डबा ओसरीवर विसरून गेलात, आन जेवलो म्हणे. घ्या माझी आन…घ्या न !……म्हाईतेय मला उपाशी हाय म्हणून. डबा पाठवलाय  सदाभाऊ संग. खा आता !  ठेवू फोन?”

इकडं तिकडं बघत काशी म्हणाला,

“कशी माझी गुणी बायको ती, येतांना गजरा आणतो काय..”

“नको बाई, उगा चार रुपये डोक्यात माळायचे ते! तुम्ही या वेळेत बस!

ठेवा आता फोन. पोरगी ऐकल. मनल, बा येडा झाला का काय. “

गालातल्या गालात हसत फोन ठेवून काशी वापस फिरला.

काटकसरीने कसा बसा एक मोबाईल घेतला होता, तो काशी ने नर्मदा कडेच ठेवला होता. तिला जमेल तेव्हा तीच  फोन करत असे.

उत्तमोत्तम रेशमाच्या  एक्सलुझिव्ह साड्या विणायचे  अत्यंत कुशलतेचं काम काशी आणि संतोष कडेच येत असे.  मोठ्या शहरातील शाही मंडळींसाठी, नेत्यांसाठी, सिनेमातील लोकांसाठी काशीच्या शेठ कडे पैठण्याची  मागणी होत असे.

इतर काम कारागीर करत, पण काठ आणि पदराचे खास काम मात्र ह्या जोडीकडेच यायचे.

कलश, कमळ, मोर, पोपट ह्या नेहमीच्या नक्षीकामा पेक्षा काहीतरी वेगळं आणि मनमोहक  डिझाईन  तयार करण्याचं एक अजब कसब होतं काशिकडे. ह्या त्याच्या कौशल्यावर नमू फिदा असे. तिला आपल्या नवऱ्याचा फार अभिमान होता. ज्याला त्याला नवऱ्याचं कौतूक सांगत फिरायची ती.

काशीचं  मन मात्र आतल्या आत फार जळत राही.  लाख लाख रुपयांच्या पैठण्या विणतो आपण, पण घरच्या लक्ष्मीला शंभर रुपयाची नायलॉनची साडी नसावी लागते…ती कधी म्हणत नाही, पण….

फार वाईट वाटे त्याला.

आज काशी घरी आला तोच अतिशय  हरवल्या सारखा.

हात पाय धुवून आत आल्या बरोबर नमूने ओळखलं. तो मान खाली घालून जाजमावर जेवायला बसला.

“तू पण जेव न.”

“तुमच्या मनातील खळबळ भाईर काढा आधी. मग मी जेवते.”

तिने खूप हट्ट केल्यावर काशीने आपल्या मनातील सल  उघड केली.

नमू  हसायला लागली.

” आता हसायला काय झालं तुला ?”

” हसू नको तर काय करू ? काल शारदा सांगत होती, ती जयश्री नटी हाय न ? ती हो, कायम हातभर जरीच्या काठाची साडी नेसुन फिरते ती, नवऱ्यानं विष घालून मारला म्हणे तिला. सांगा आता. ती दोन लाखाची साडी जीव वाचवती का तिचा ?

मला काय कमी हाय ? जीव ओवाळणारा नवरा दिलाय देवानं, उगी त्या जीवाला जाळू नका,सांगून ठेवते!..जेवा आता मुकाट.”

“आय लव्ह यु नमु.” तो म्हणाला,अन

कसली लाजली नमू .  म्हणाली,

“आत्ता !!  इंग्रजीत प्रेम ?  जेवा गुमान”

मुंबई च्या कुणा धनाढ्य आसामी च्या मुलाचं लग्न होतं. त्यांची साठ पैठण्याची मागणी होती. त्यासाठी शेठ ने बरेच नवीन कामगार आणले होते. प्रत्येक पैठणी दुसरी पेक्षा वेगळी दिसावी आणि त्यातही दोन तर अप्रतिम

कारागिरीचा नमुना असाव्यात हे शेठ ने

नमूद केलं होतं. सगळे नवीन नवीन डिझाइन्स काशी ने तयार करवून दिले.

 साहेबांच्या पत्नी आणि सूनबाईंची पैठणी विणायचं काम खास काशी संतोष ने आपल्याकडे घेतलं होतं. 

आता रात्रंदिवस  एक करून

युद्धपातळीवर कामं सुरू होती. नमू पण  केंद्रावर यायला लागली. काशी च्या जेवणाची काळजी घेणे, शटल लावून देणे, बॉबीन भरून देणे, सगळ्यांच्या पाण्याची व्यवस्था बघणे हे काम तिने स्वतः कडे घेतलं.

तिच्या समर्पणा कडे बघून काशी ला गलबलून येई.

म्हणायचा, 

“तू काहीही  म्हण नमे, एक दिवस तुला भारी पैठणी नेसवेलच मी.बघ तू. “

“येड लागलं का वो तुम्हाला ? कसं सांगू आता  या खुळ्या नवऱ्याला ?”  ती हसून म्हणे.

तीन चार महिन्या नंतर एक दिवस काशी रात्री उशिरा घरी आला.

नमू वाटच बघत होती. त्याने हळूच मागे लपवलेला गजरा पुढ्यात ठेवला.

“आता ग माय ! मोगरा ? कशाला वो पैसा घालता ह्याच्यात?”

काशी च्या डोळ्यात पाणी आलं.

“ह्या डोळ्यातल्या पाण्या परिस तो घालून द्या तुमच्याच हातानं डोक्यात.”

तिने  पाठ फिरवली.  त्याने  गजरा माळला, आणि हातातील पुडकं समोर केलं.

तिने उघडून बघितलं. ती एक हिरव्या रागाची अप्रतिम पैठणी होती.

या आधी तिने नेसणं  तर दूर, कधी हात पण लावला नव्हता पैठणीला. डोळ्यातील पाणी त्यावर पडू नये म्हणून चटकन तिने आपल्या साडीचा पदर त्यावर पसरवला.

“डाग पडला, तर शेठ रागावतील हो तुम्हाला. उद्या वापस द्यायची असंल न ?”

“काय करू तुझं, येडा बाई, तुला आणलीये ही !”

तिच्या चेहऱ्यावर चे भाव बघून म्हणाला,

” मुंबई च्या मॅडम आल्या होत्या.  त्यांनी निवांत सगळ्या साठ पैठण्या  बघितल्या. इतक्या म्हणजे इतक्या खूष झाल्या, की एक मला अन एक संतोष ला आपल्या हातानं  भेट दिली…..आहेस कुठं?”

भरल्या डोळ्यानं  नमु नं दृष्ट काढली त्याची.

पैठणी नेसून समोर उभी ठाकलेली नमू त्याला रखुमाई चं रूपच वाटली.

त्याने आत्यंतिक प्रेमाने तिला जवळ घेतले. कसली लाजत होती ती ! मग अचानक म्हणाली,

“एक बोलू ? रागावनार न्हाई न ?”

“बोल की ! “

“आज नेसून मग ठेऊन देऊ का पेटीत ? “

त्याच्या चेहऱ्याकडे बघून म्हणाली,

“पाच सात वर्षात लगीन करू पोरीचं, मग लग्नात नेसवू की तिला, तुम्ही बनवलेली पैठणी!”

तो फक्त डोळे भरून तिच्या ह्या लोभस रुपाकडे बघत राहला.

© अपर्णा देशपांडे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कोसी- सतलज एक्सप्रेस -भाग-5 – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी ☆ अनुवाद – सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ कोसी- सतलज एक्सप्रेस -भाग-5 (भावानुवाद) – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(कथासूत्र : तो माणूस जबरदस्तीने बिरोजाचा हात पकडून त्यात पैसे कोंबतो…….)

बिरोजाच्या मुठीत साडेचार हजाराच्या करकरीत नोटा आहेत. प्रत्येक नोटेवर अशोकाच्या स्तंभाखाली, राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या हसऱ्या चेहऱ्याशेजारी छापलंय -‘सत्यमेव जयते.’

‘बोलव तिला पटकन. गाडी सुटतेय.’ तो  माणूस बिरोजाला ढकलतो.

पण माधोला तो माणूस अजिबात आवडलेला नाही. तो सगळं काही बघतोय. त्याच्या नजरेत संशय आहे. तो बहिणीला म्हणतो, ‘तायडे, हा माणूस बाला रोज काय सांगत असतो?’ त्याच्या आवाजात चीड आहे.

मुरलीच्या भुवयाही वर चढल्या आहेत. ‘माय त्या दिवशी या माणसाला शिव्या घालत होती. ऐकलंस ना तू?’त्याचीही मती कुंठित झाली आहे. काय चाललं आहे, हे त्याला समजतच नाही.

कोसी सतलज एक्सप्रेसची शिट्टी वाजते. अचानक तो माणूस धावत त्यांच्याकडे येतो. जनकदुलारीचं मनगट घट्ट धरतो आणि तो तिला फरफटत फलाटावरून नेतो.

जनकदुलारी आक्रोश करू लागते,’बा, बा!बघा. हा मला फरफटत नेतोय.कुठे नेतोय तो मला? आणि का? तुम्ही काहीच काय करत नाही बा?’

‘बेबी, माझ्याबरोबर चल. तू तिथे राणीसारखं राज्य करशील. सगळं तुझ्या ताब्यात असेल. रोज तुला चारीठाव जेवण मिळेल. अगदी पोटभर. आणि मी तुझ्या बापाला आधीच पैसे दिले आहेत.’

देव जाणे कुठून, त्याचे दोन साथीदार उगवतात आणि तिच्याभोवती कोंडाळं करतात. कोणालाही ती दिसत नाही. तसंही काय चाललंय, याची कोणालाच पर्वा नसते.

जनकदुलारी आक्रोश करते आहे.

ती सुटकेचा प्रयत्न करते आहे. ती वडिलांना बिलगायला जाते;  पण ते व्यर्थ जातं. तिला धावत वडिलांकडे जायचं आहे; पण ती जाऊ शकत नाही.

फलाटावर दोन पोलीस उभे होते. अगदी थोड्या वेळापूर्वीपर्यंत ते लाठ्या उगारत होते आणि सगळ्यांच्या अंगावर वसावसा ओरडत होते,’चला. चालायला लागा. गोंगाट करू नका.’ पण आता तेही हवेत विरून गेले आहेत, असं वाटतं.

जनकदुलारीचं कर्कश रडणं-ओरडणं फलाटावरच्या भयानक कोलाहलात बुडून गेलं आहे.

गाडी सुरू होते. तो माणूस तिला फरफटवतोच आहे. उडी मारून तो गाडीत चढतो. तिलाही वर ओढतो.

तिचे दोन्ही भाऊ आपल्या छोट्याश्या हातांनी निकराने वडिलांना हलवत आहेत,’बा, तो बदमाश तिला घेऊन जातोय.’

गाडी सुरू झाली आहे….. हळूहळू वेग घेते आहे……

बिरोजा त्या डब्याकडे धावतो…. आत शिरायला बघतो, पण…..

तो माणूस दारातच उभा आहे. तो बिरोजाच्या तोंडावर ठोसा मारतो,’उतर खाली. मी पैसे टिकवलेत तुझ्या हातावर. चालायला लाग, भिकारड्या!’

‘जनकू, बबडे!ये गं. खाली उतर, बाळा.’ बिरोजा धावत्या गाडीतून फलाटावर पडतो.

‘बा! तायडे, जाऊ नकोस तू.’मुरली आणि माधो गाडीच्या मागून धावत आहेत. त्यांचा आक्रोश चालू आहे. ते गाडीत चढू पाहत आहेत.

पण त्यांच्या मानाने कोसी सतलज एक्सप्रेस खूपच वेगात धावत आहे.

आणि ते दोघे भाऊ गाडी पकडू शकत नाहीत.

समाप्त

 मूळ इंग्रजी कथा – ‘कोसी- सतलज एक्सप्रेस’ मूळ लेखक – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी 

अनुवाद : सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नजमा – भाग -3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ? मनमंजुषेतून ?

☆ न ज मा – भाग – 3 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

मैने राखी नही बांधी। हमारे मे ऐसा कुछ रहता नही ना. मी एकदा नजमाला म्हटलं, “नजमा, अगं रोज अंघोळ करून यावं. म्हणजे बरं वाटतं. ती काही बोलली नाही. नंतर सांगायला लागली. “भाभी तुम्हे  नळ छोडे  बराबर पाणी मिलता है। हमे बाहर से, कतार मे  ठहरनेके बगैर  पाणी नही मिलता। पकाना, भांडे, कपडे धोना, साफसफाई, सब के लिए बाहर से पानी  लाना पडता है। बरोबर है ना ?” मलाच डोळे उघडल्यासारखं झालं .घरात जागोजागी नळ असल्याने तिची परिस्थिती कधी लक्षातच आली नाही. फुकट उपदेश करायला काय जातंय, असंच मला वाटायला लागलं.

आता तिची अभ्यासाची गोडी वाढायला लागली होती .शाळेतून आली की, पुन्हा ” शिकवा ” म्हणून दप्तर उघडायची. परीक्षा आणि रिझल्ट ही झाला .नजमाचा  पहिला नंबर आला. शाळेत खूप कौतुक झालं. नाचत नाचत बातमी सांगायला प्रथम माझ्याकडे  आली.आणि    “भाभी, मुझे पहिला नंबर मिला। तुम्हारी वजहसे मिला। मलाही तिच्या इतकाच आनंद झाला. रोज ती जाताना मी तिला सांगायची,” नजमा “म्हणजे “चमकता तारा “तशीच मोठी हो, आणि चमकता तारा होऊन दाखव.

एकदा गणपती उत्सव होता. नजमाचा  धाकटा भाऊ सलीम मित्रांबरोबर, घरात न सांगता, पुण्याला मजा करायला गेला. घरच्यांनी दोन दिवस सगळीकडे शोध घेतला. पण सापडले नाहीत. शेवटी चैन करून पैसे संपले.आणि घरी परत आले. गणपतीचा दिवस होता तो. गणपती बरोबर तो घरी आला, अशा एका भावनेने एक नारळ, उदबत्ती, फुल, आणि केळी अशी सामुग्री घेऊन, नजमा घरी आली. तिच्या  भक्तीभावाचं मला आश्चर्य वाटलं.

दिवाळी जवळ आली. तिचा दिवाळीचा उत्साह दांडगा होता.  “दिवालीमे क्या क्या करेंगे भाभी? मै भी मदद करुंगी। अस तिच पालुपद सुरू होतं. दिवाळी म्हणून तिच्यासाठी, एका नवीन सुंदरशा साडीचा, फ्रील  फ्रॉक मी स्वतः तिला शिवला. मी शिवण  शिवत  असताना, तिचं निरीक्षण असायचं. ‘मला पण शिकवा’ म्हणायची. तिला केसाच्या  पिना,  रिबिनी, बांगड्या, मेहंदी बरच काही आणलं. मला मुलगी नसल्याने मीही मुलीची हौस भागवून घेत होते. दिवाळीत खुष होती ती. आवडेल ते मागून घेऊन फराळ केलान. “हमारे में दिवाली नही रहती, ऐसा सब कुछ नही बनाते।” नजमा आवडीने खात असताना पाहून मलाही समाधान झालं. ज्याला मिळत नाही त्यालाच द्यावं, असं माझं एक तत्त्व होतं. भाऊबीजेच्या दिवशीही तिने दोघा भैयांना ओवाळलन. तिला ओवाळणीत रस नव्हता. भाऊ-बहिणीच्या नातेसंबंधात रस होता. एक दिवस अचानक काय झालं कोणास ठाऊक! नजमा  कामाला यायची बंद झाली. आणि तिची आई रूकसाना यायला लागली. पुन्हा पुन्हा विचारलं, नजमाला कुणी काही बोललं का? कुणी रागावलं का? खोदून खोदून विचारलं, तेव्हा रुकसाना ने सांगायला सुरुवात केली .”मुझे गलत समजू नको भाभी। नजमा बडी हो गई है। मै तो दिन भर काम को जाती हूँ। घर मे उसको अकेली रखना कठिन है । एक  सग्गेमेका लडका है । दारू नही पीता। सेंट्रींग का काम करता है। कमाई भी अच्छी है ।आज नही तो कल, शादी करनी है ।मेरे सर का बोज कम हो गया। नजमा 18 साल की नई है, तो शादी करना कानून के खिलाफ है।  बाहर जा के उसकी शादी की। मला मात्र मनोमन वाटत होतं, नजमा– चमकता तारा, ढग आले तरी तेवढ्यापुरता पुसट झाला तरी तो तारा पुन्हा चमकणारच.

नाजमा आज जबाबदार स्त्री झाली होती. माझं शिवण बघत असताना तिला शिवणाची आवड निर्माण झालेलीच होती. तिने शिवणाचा कोर्स केला. बाहेरच शिवण घेता घेता वाढायला लागलं. महिला उद्योजक, मधून कर्ज घेऊन, दोन  शिलाई मशीन घेतलींन. हाताखाली दोन मुली घेतल्यान. आणि उत्तम चाललं होतं .आणि हे सगळं करत असताना तिने मुलांच्या अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिलं नाही. भरपूर कष्ट घेत होती बिचारी.

नजमाचे कष्ट आज फळाला आले. मुलगी सायरा  पहिली आली. मुली बरोबर तिचा आनंद गगनात मावत नव्हता. ते ऐकून मलाही खूप खूप आनंद झाला. आम्हा तिघिंच्याही आनंदाचं, समाधानाच मूल्य वेगवेगळं होतं. आज तेच पेढे घेऊन ती आली होती .डोळ्यात आनंदाश्रू चमकत होते .आता ती जबाबदारी स्त्री झाली होती. ती मला पुन्हा पुन्हा सांगत होती, “तुम्हारे कारण मैने यहअच्छा दिन देखा है। मै सदा के लिये तुम्हारी तरक्की मे एहसानमंद हूँ।  सायरा की यश का हिस्सा तुम्हारा भी है।”  तिच्या यशाचे श्रेय ती मलाही देत होती. नजमाला अभ्यासाची गोडी आणि शिक्षणाचे महत्त्व मी पटवलं, आणि तिनं ते मनावर घेऊन सायनाला शिकवलंन. असं तिचं म्हणणं ऐकून, मला कृतकृत्य झाल्यासारखं वाटायला लागलं.

आज नजमाची  मुलगी सायरा चमकली. उद्या मुलगाहि चमकेल. मुलांना प्रकाश देणारा तारा –नजमा!! नाव सार्थ करणारी ठरली. जो स्वयंप्रकाशी असतो, तोच दुसर्याला प्रकाश देऊ शकतो. नजमाने तेच केल.      

समाप्त.

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कोसी- सतलज एक्सप्रेस -भाग-4 – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी ☆ अनुवाद – सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ कोसी- सतलज एक्सप्रेस -भाग-4 (भावानुवाद) – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(कथासूत्र :सौदा पक्का झाला, असं मी समजतो, असं म्हणून तो माणूस गर्दीत हरवून गेला…….)

कटिहारहून हॅरिसनगंजला रोज दोन गाड्या येतात. दिल्लीला जाणारी गाडी फलाटाला लागताक्षणी लोकांनी एकच गर्दी केली. काही जणांच्या डोक्यावर संसाराच्या चीजवस्तूंची गाठोडी आहेत. काही जण,आपल्याकडे होतं -नव्हतं ते सगळं पत्र्याच्या  ट्रंकेत घालून,त्या ट्रंका डोक्यावर घेऊन  चालले आहेत.आपली वडिलोपार्जित घरं सोडून ते जीवनाच्या नव्या क्षेत्राच्या शोधात चालले आहेत. त्यात बरेचसे तरुण आणि मध्यमवयीन लोक आहेत. त्या गर्दीत काही म्हातारेही आहेत.फक्त थोडेच लोक सहपरिवार चालले आहेत. या मोहमयी आयुष्यात त्यांना एकत्रच पोहायचं आहे. बोटी उलटल्याच, तर सगळ्यांनी बरोबरच बुडून मरूया, असं त्यांना वाटतं. जीवन वा मरण – याला एकत्र राहूनच तोंड द्यायचं आहे.

वाल्मिकी ऋषींनी रामवनवासाविषयी लिहिलं. महाभारतासारख्या महाकाव्याचे कवी वेदव्यास यांनी पांडवांच्या वनवासाची गाथा लिहिली. पण या हजारो दुःखी माणसांच्या हद्दपारीविषयी कोण लिहिणार? एवढी आग, एवढे अश्रू पेलायची ताकद कोणाच्या लेखणीत आहे?

‘बा, आपण जाऊन तायडीला घेऊन येऊ या.’ बापाच्या घामेजलेल्या पाठीला मुरली चेहरा पुसतो.

‘ही गाडीपण सुटेल. ते जेवणाची पाकिटं घेऊन कधी येणार कोणास ठाऊक!’ माधोच्या पोटात कावळे कोकलताहेत. तो उतावीळपणे बापाच्या सदऱ्याच्या बाहीला हिसका देतो.

‘ते जीप नायतर ट्रकमधून येणार. गाडीतून नाही.’ मोठा मुरली धाकट्या भावाला दिलासा द्यायचा प्रयत्न करतो.

बिरोजा उठतो. तिघेही कालव्याकडे जायला निघतात. इकडे असणाऱ्या दहांपैकी नऊ लोक सद्या तिथेच राहत आहेत.

जनकदुलारी सगळ्यात धाकट्या भावाच्या -छोटूच्या -डोळ्यांच्या खालच्या कडेला काजळ लावत आहे. या तिघांना येताना बघताक्षणीच ती त्यांच्याकडे धावते. भावांच्या कानात कुजबुजत ती विचारते,’मला वाटतं, आज ते तिकडे वाटणार आहेत. हो ना?’

‘म्हणूनच आम्ही आलो आहोत. चल. लवकर चल.’

मुरली आणि माधो लहान असले, तरी त्यांना चांगलंच ठाऊक आहे – फलाटावर खिचडी वाटणार आहेत, याचा सुगावा इतर कोणालाही लागता कामा नये. ही बातमी फुटली, तर यांचंच नुकसान होणार. त्यामुळे इकडे येतानाच बिरोजा त्यांना पुन्हापुन्हा   आठवण करून देत होता, ‘कोणालाही काहीही सांगू नका.’ त्यामुळे जरी त्यांची तोंडं बंद असली, तरी ही सुखद अपेक्षा त्यांच्या डोळ्यांत काठोकाठ भरली आहे. आणि त्यांची बहीण ती पटकन ओळखते.

‘माय , छोटूला घे.’ जनकदुलारी भावाला आईच्या मांडीवर ठेवते आणि ‘आम्ही लगेचच परत येतो’ असं सांगून त्यांच्याबरोबर निघते.

ती चौघं स्टेशनवर येतात, त्यापूर्वीच  मदतीच्या सामानाचा ट्रक येऊन पोहोचलेला असतो. इतरांपूर्वी, थोडासा का होईना, पण आपला वाटा मिळावा, म्हणून स्त्री-पुरुष रेटारेटी करत असतात. झोंबाझोंबी, शिवीगाळ, मारामारी चालूच आहे. असाहाय्यता आणि भूक यापुढे  माणुसकी थिटी पडते आहे.

कोणालाच धीर धरवत नाही. ते थाळीतून खायला सुरुवात करतात. मुरली म्हणतो,’माय , आजा , आजीसाठी काहीतरी नेऊया.’

‘हो.’ बिरोजा म्हणतो. पण तो उठायच्या आतच त्याला पुन्हा त्याच्या खांद्यावर पकड जाणवते. तो माणूस त्याच्या मागेच उभा असतो. तो डोळे मिचकावून बिरोजाला इशारा देतो. बिरोजा थाळी माधोकडे सरकवतो आणि त्या माणसाच्या पाठोपाठ जातो. तो माणूस फलाटाच्या टोकापर्यंत जातो. बिरोजा भारलेल्या सापासारखा त्याच्या मागून जातो.

‘यार, बघ. ही कोसी सतलज एक्सप्रेस कोणत्याही क्षणी सुटेल.हे ठेव. साडेचार हजार आहेत. काळजी करू नकोस.नंतर तू तुझ्या मुलीला कधीही भेटू शकतोस.’ तो माणूस बिरोजाच्या हातात एक गठ्ठा द्यायला जातो. बिरोजा हात मागे घेतो.

‘नको नको. भलतंच काहीतरी काय बोलतोयस? मी -मी नाही घेणार हे.’ बिरोजा गोंधळला आहे. त्याच्या आवाजात दम नाही. एवढे पैसे!एकगठ्ठा!देवानेच धाडल्यासारखे. भगवंता !वाचव मला.

‘चल.ठेव हे. बघ, विचार कर. एवढ्या पैशात तुझ्या कुटुंबाला किती दिवस रोजचं चारीठाव जेवण देऊ शकशील!अरे बाबा, भरल्या पोटावर ढेकर कसा येतो, ते तरी आठवतंय का तुला?’ तो माणूस बिरोजाचा हात पकडतो आणि त्यात जबरदस्तीने पैसे कोंबतो.

क्रमश: ….

 मूळ इंग्रजी कथा – ‘कोसी- सतलज एक्सप्रेस’ मूळ लेखक – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी 

अनुवाद : सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नजमा – भाग -2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ? मनमंजुषेतून ?

☆ नजमा – भाग – 2 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सकाळी कामाला आली की आदल्या दिवशी शाळेत घडलेल्या सगळ्या गोष्टींचा पाढा माझ्यासमोर वाचला जायचा.

नजमाच्या  वडिलांनी, दोन मुलं लहान असताना, बायको वारली म्हणून रुकसानाशी दुसर लग्न केलं. तिलाही दोन मुले झाली. त्यापैकी नजमा ही एक. रुकसाना स्वतःच्या कमाईवर आणि नातेवाइकांच्या मदतीवर संसाराचा गाडा ओढत होती. नजमाचे आंब्बा अध्यात्माच्या मार्गाला लागले होते .दर्ग्यामध्ये सेवेसाठी तिथेच मुक्काम करायचे. तेथे पोटापाण्याचा प्रश्न नव्हता .नजमाची शाळा दर्ग्यापासून जवळच होती. शाळेत गेली की ,तिला आपल्या  आब्बांची आठवण यायची. फार फार लाडकी होती ती  आब्बांची! कधीतरी तिला अब्बाला भेटायची तीव्र इच्छा व्हायची .पण आईला कळलं तर, काय काय शिक्षा मिळतील या विचाराने ती भेटीचा विचार सोडून द्यायची .तिला आपले अब्बा घरी यावेत, असं प्रकर्षानं वाटायचं. पण नाईलाज व्हायचा.

एके दिवशी तिन विचार केला, माझ्याच अब्बाना मी भेटले तर, तो काही अपराध आहे का? का नाही भेटू शकत मी माझ्या अब्बांना?आब्बांच्या आठवणींनी एके दिवशी  ती बेचैन  झाली. शाळेच्या मधल्या सुट्टीत एकटीच गेली आब्बांना भेटायला. दोघांनाही भरभरून आनंद झाला. दुसरे दिवशी सकाळी ही बातमी माझ्यासमोर खुल्लमखुल्ला झाली. मला पुन्हां  पुन्हा म्हणाली, “भाभी, मेरी आम्मीको बताउ नको हं।”एका लहान मुलीला तिच्या लाडक्या वडिलांना भेटायला  सुद्धा गुपचूप जाव लागत,हे पाहून मलाच कसतरी झाल.माझ्या डोळ्यात पाणी आल.हळूहळू दर चार पाच दिवसांनी तिच आब्बांना भेटण सुरु झाल.सकाळी आली की खूष असायची.आणि मग तिचा पाढा सुरू व्हायचा.” भाभी कल ना मै आब्बाको मिलके आई।आब्बाने मुझे एक रुपया दिया। “कधी आब्बा तिच्या आवडीचा पेढा द्यायचे.कधी गुलाबजाम,  कधी बर्फी कधी रुपया दोन रुपये हातावर ठेवायचे. दुसरे दिवशी आली की पैसे जमवायला माझ्याकडे द्यायची. कधीमधी मी त्यात भर घालायची .तिच्या आईला पटवून, तिच्या (नजमाच्या ) नावाने पोस्टात  रिकरिंग सुरू केले .त्याचं कार्डही माझ्याकडेच. इतका आई मुलगी दोघींचाही माझ्यावर पूर्ण विश्वास होता.

कधी घरात आब्बांच  नाव काढलेलं आईला आवडायचं नाही. ती आईशी वादावादी करायची. कधी मारही खायची. पण गप्प बसायची नाही. बंडखोर आणि तडफदार होती ती! सकाळी आली की, पाढा सुरु व्हायचा.  “आज मै आम्मीके साथ झगडा करके आयी।  मी—क्यूं? “हां फिर सलीम (धाकटा भाऊ) काम तो नही, पढाईभी नही, सिर्फ दोस्त मिलाके गुल्लीडंडा खेलता रहता है। मै तो काम करती हूँ। आम्मीको  मदद करती हूँ। फिरभी मेरे बारेमे ऐसा बर्ताव क्यूं।उसके लाड प्यार जादा क्यूं? मुझे गुस्सा आता है।” मी दिला समजवायची ” नजमा, अगं आईला उलट बोलू नये . मोठी झाल्यानंतर सासरी अशी बोललीस ,तर आईचा उद्धार होईल.” ती मलाच उलट म्हणायची,” भाभी, चूप बैठने का नही । उनको भी समझना चाहिये।” ती बरोबर होती. अन्यायाविरोधात उभ राहणं हे तिचं तत्त्व होतं. कष्टाळूपणा आणि बुद्धिमत्ता हे दोन्ही गुण त्यात पुरेपूर भरले होते.

ती आता आमच्या घरी छान  रुळली होती. सण वार सगळं तिला माहीत झालं होतं. कधी सणावारी आमचा स्वयंपाक उशिरा व्हायचा. मग काम करून जाताना ,ती मला हक्कानं सांगून जायची .”आज बनाया हुआ श्रीखंड, एक वाटी मेरे लिये फ्रिज मे रखो  हाँ भाभी” दुसरे दिवशी तिला ते खाताना बघून मला समाधान वाटायचं. कधी तिला एखादं पक्वान्नं आवडायचं. आणि मग पुरणपोळी, गव्हाची खीर, बासुंदी, खूप दिवसात केली नसल्याचीही मला आठवण करून द्यायची. तिला आता सगळे सणवारही माहीत झाले होते. तिच्या आई पेक्षा माझ्याशी बोलण्यात तिला मोकळेपणा वाटायचा. मला सारखं वाटायचं, तिचे आणि माझे कुठलेतरी ऋणानुबंध असतील नक्की.

राखी पौर्णिमेचा दिवस आला. तिने सकाळी येताना  गुपचुप दोन राख्या आणल्यान. मला हळूच दाखवल्यान. मला म्हणाली,” राजू भैया और विजय भैया ,(आपके दोनो बेटे) को मै बांधने वाली हूँ। मै  उनको भय्या पुकारती हूँ ना। मुझे आरती लगाके देते है क्या? क्या क्या करना मुझे सिखाओ। माझ्या मुलांना बहीण नव्हती. त्या दिवशी नजमाने दोघांना तिलक लावून ओवाळले .ओवाळून राख्या बांधल्यान. मुलं ओवाळणी द्यायला लागली तर, घ्यायला तयार नाही. आणि म्हणते कशी, “ओवाळणीके लिये मैने  राखी नही  बांधी ।हमारे मे ऐसा कुछ रहता नही ना।

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कोसी- सतलज एक्सप्रेस -भाग-3 – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी ☆ अनुवाद – सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ कोसी- सतलज एक्सप्रेस -भाग-3 (भावानुवाद) – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(कथासूत्र : बिरोजा आणि मुलांनी धावपळ केल्यामुळे, फलाटावरच्या, जिल्हा प्रशासनाच्या पूरग्रस्त मदत रजिस्टरमध्ये त्यांच्या नावांची नोंद झाली……)

‘देवा!म्हादेवा!’ बिरोजा स्वतःशीच पुटपुटतो,’मला ह्या घड्याळाचे काटे मागे फिरवता आले असते, काळाचं हे चाक  थांबवता आलं असतं, तर किती बरं झालं असतं!’  पण त्याला चांगलंच ठाऊक आहे, की हे करणं त्याच्या हातात नाही. त्याच्या नशिबाशी टक्कर द्यायला तो असमर्थ आहे. फलाटाच्या खालीच हातपंपाजवळ तो बसला आहे. क्षितिजावरील शून्यात टक लावून बघतो आहे. एकच जळता प्रश्न त्याच्या मनाला व्यापून राहिला आहे,’उद्या, त्यानंतर काय होणार? पुराचं पाणी ओसरायला काही दिवस तरी लागतील. तोपर्यंत कसं चालवू शकणार मी? बायको -मुलांच्या पोटाला काय घालू?’

‘कसली डोंबलाची काळजी करतोयस, बिरोजा?’मागून कोणीतरी त्याच्या खांद्याला हात लावतो .’मी सांगितलं तसं कर.’

बिरोजा वीज पडल्यासारखा दचकतो. विडीचं उरलेलं थोटूक ओढायचंही भान त्याला राहत नाही. ते जळतं टोक त्याच्या बोटापर्यंत येतं, तेव्हा तो हादरतो.’हाssय’. तो हवेतच हात झटकतो. बोटाची आग शमवण्यासाठी बोटावर फुंकर मारतो आणि बोट तोंडात धरतो.

‘मक्याचा चालू भाव काय आहे, ते बघ. गेल्या वर्षी सातशे होता. आणि या वर्षी?तूच बघ. म्हणून तो सगळा शेतातच कुजत पडलाय. पोत्यात घालून इकडे आणलेला मकाही कुजतोय. फलाटावरून मका उचलणारं कोणीच नाही. मला तुझी काळजी वाटते. तू काय खाणार आणि तुझ्या पोराबाळांच्या पोटाला काय घालणार, काहीच कळत नाही. जरा विचार कर. आम्ही तुला चार हजार देऊ शकतो. ती काय मामुली रक्कम नाही.’

बिरोजा दगड झाल्यासारखा त्या माणसाकडे बघत राहतो.तोंडातून ब्र काढायचंही त्याला सुचत नाही.

‘बरं, बाबा. एवढ्याने तुझं समाधान होत नसेल, तर आणखी पाचशे रुपयांची व्यवस्था होऊ शकेल. पण त्याहून एक पैसाही जास्त नाही. माझ्यासाठी मग काहीच राहणार नाही. तू माझ्याच गावचा आहेस, त्यामुळे तुझ्यासाठी म्हणून मी हे करतोय. खरं तर, यात मला खूप नुकसान सोसावं लागणार. काय म्हणतोस मग?’त्याने कमरेवरची घडी दाखवत विचारलं. धोतराच्या त्या घडीत पैसे असणार, हे उघडच होतं. त्याने बिरोजाच्या उजव्या हाताचं बोट धरून शर्टाखालच्या त्या उंचवट्यावर दाबलं.

‘हाssssय!’बिरोजा किंचाळला. त्याचं हेच बोट नुकतंच भाजलं होतं.

तो माणूस हनुवटीवरची दाढी खाजवतो आहे. हा ऑगस्टमधला दमट, उष्ण दिवस आहे. त्याला घाम आला आहे. त्याचा शर्ट पुढून, मागून चिंब भिजला आहे. त्याच्या शर्टाची डागाळलेली कॉलर तो वर करतो आणि आजूबाजूला बघतो. नंतर खिशातून एक छोटी डबी काढतो. डाव्या तळहातावर थोडा तंबाखू टाकतो. बोटाच्या टोकाने एवढासा चुना काढतो आणि दोन्ही चोळायला सुरुवात करतो. काही मिनिटं चोळल्यावर मिश्रण तयार होतं. त्यावरची खर उडवण्यासाठी तो त्यावर फुंकर मारतो आणि बिरोजाला देऊ करतो ,’हे घे. उपाशी माणसांना प्रसादाची भीक कधी मिळणार, ते स्वर्गातल्या त्या देवांनाच ठाऊक. तुझ्या लक्षात कसं येत नाही? ही जून महिन्यातली लूट आहे. बऱ्याच  लोकांना घबाड मिळणार. बंधारा पडला नाही, तर त्याची डागडुजी कशी होणार? आणि डागडुजी झाली नाही, तर पाटबंधारे मंत्र्याच्या मेव्हण्याला डागडुजीच्या कामाचं कंत्राट कसं मिळणार? यात फक्त आपण, गरीब लोक मरणार. खरं आहे ना? तुझ्या पोरांच्या पोटाला काय घालणार, याचा विचार तू केला पाहिजेस. त्यांची लग्नं कशी करणार? म्हणूनच दोस्ता,मी तुला आग्रह करतोय, माझा सौदा कबूल कर. तुझ्या खांद्यावरचं जोखड थोडं हलकं होईल.’

बिरोजा काहीच बोलूच शकत नाही. जणू त्याला साप डसला आहे. त्याच्या डोळ्यांत तीच अस्वस्थता आहे. आता त्याची नजर, दुथडी भरून वाहणाऱ्या कोसीच्या पाण्यात तरंगणाऱ्या मेलेल्या गुराच्या डोळ्यांवर खिळली आहे.

‘हे बघ. आज संध्याकाळी गाडी सुटणार आहे. एकदा का ती गेली, की तुला दुसरी संधी मिळणार नाही. चल, तयार हो. सौदा पक्का झाला, असं मी समजू ना?’ एखाद्या पाण्याच्या थेंबाप्रमाणे, तो माणूस गर्दीच्या समुद्रात हरवून गेला.

क्रमश: ….

 मूळ इंग्रजी कथा – ‘कोसी- सतलज एक्सप्रेस’ मूळ लेखक – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी 

अनुवाद : सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ नजमा – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

 ? मनमंजुषेतून ?

☆ नजमा – भाग -1 ☆ सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई ☆

दुपारची वेळ. हंसत हंसत बुरखा घातलेली कोणीतरी जिना चढून वर आली.प्रथम मी तिला ओळखलेच नाही. तिने चेहर्यावरचा बुरखा काढलान. मग मी तिला ओळखल. अत्यानंदाने तिने माझा हात हातात घेतलान .पण मी  तिला थोड्या लटक्या रागाने म्हटल,”कितने दिन बाद आयी है नजमा। कितने दिनसे तेरी याद करती हूँ।क्या हमारी याद कभी आती नही? नजमा हसत हसत म्हणाली  “ऐसा कैसा  हो सकता भाभी।हर दिनमुझे  तुम्हारी याद आती है।आज मै बहोत खुष हूँ।तुम्हारे लिये पेढे और मिठाई लेके आयी हूँ।यह मेरी बेटी सायरा। स्काँलर्शिप हसिल की है उसने।और उसमे अव्वल आ गयी।और मेरे लिये खुषीकी बात ।मैने सबकुछ खुद उसे सिखाया पढाया। नजमाला आज माझ्याशी किती बोलू आणि किती नको अस झाल होत.नजमाच्या सासरच खटल बरच मोठ होत. त्यातूनही तिने स्वतः अभ्यास करुन सायराचा अभ्यास घेतला होता.तिचा छोटा मुलगा नासिर हाही हुषार होता.दोनच मुलांवर घरातल्यांच्या संमतीने कुटुंब नियोजन केल होत.स्वतःला शिकता आल नाही . पण दोन्ही मुलांना खूप शिकविण्याच तिच स्वप्न होत.तिचा भूतकाळ माझ्या डोळ्यासमोरुन सरकायला लागला.माझ्या डोळ्यासमोर ती लहान आठ नऊ वर्षाची मध्यम गोरी गिड्डी थोडस नकट नाक दोन वेण्या घालणारी  आणि फ्राँकमधली अशी छोटी नजमा दिसायला लागली. गाव सोडून कामासाठी ,पोटापाण्यासाठी आलेल  कुटुंब काम शोधत होत. नेमक त्याच वेळी मला कोणीतरी कामासाठी हवच होत. योग जुळून आला. आमच्याकडे नजमाची  आई रुकसाना कामाला  यायला लागली. चार दिवसांनी  आईबरोबर नजमाही यायला लागली.आठ दहा दिवसांत रुकसानाला आणखी चार पाच काम मिळाली. आणि मग आमच्या घरी नजमा एकटीच यायला लागली. आईपेक्षा तिचं काम चकाचक नीटस  आणि व्यवस्थित होत. लवकरच तिची आणि माझी छान गट्टी जमली. रोज सकाळी आली की प्रथम केर काढायची. केर काढताना कधीतरी कुठतरी एखाद पैशाच नाण पडलेल दिसल की ती मला हाताला धरून त्या नाण्यापर्यंत घेऊन जायची. दुरुन तर्जनीने  ते नाण पडलेल दाखवायची.तिच्या प्रामाणिकपणाबद्दल माझा तिच्यावरील विश्वास आणखी द्रुढ झाला. केर झाला की भांडी घासायची. नंतर मी तिचा अभ्यास घ्यायची. तिची हुशारी, आकलनशक्ती,आणि शिकण्याची जिद्द बघून मलाही तिला शिकविण्यात हुरूप वाटायला लागला. अभ्यास झाला की मगइथेच तिची पोटपूजा व्हायची. पाच मिनिटाच्या अंतरावर समोरच्या झोपडपट्टीत तिच घर होत. घरी जाऊन दप्तर घेऊन लगेच शाळेत जायची.  नजमा–चमकता तारा! नावाप्रमाणे  लवकरच शाळेत  हुशार विद्यार्थिनी म्हणून चमकायला लागली. कधी निबंध कधी वक्त्त्रुत्व स्पर्धांमध्ये भाग घ्यायला लागली. मी ‘तिला शिकविण्यात आपण कुठे कमी पडायच नाही अस ठरवल.बरीच बक्षीस मिळवायला लागली. तिची  आई रुकसानापण खुश झाली होती. शाळेत नजमाला तिच्या मैत्रीणी शिक्षक तिला विचारायचे”नजमा यह सब तुझे कौन सिखाते है? ती उत्तर द्यायची,   ” मै कामको जाती हूँ,ना वो गीता भाभी मुझे सब सिखाती है।”रोज सकाळी कामाला आली कीआदल या दिवशी शाळेत घडलेल्या सगळ्या गोष्टींचा पाढा माझ्यासमोर वाचला जायचा.

क्रमशः….

©  सौ. पुष्पा नंदकुमार प्रभुदेसाई

बुधगावकर मळा रस्ता, मिरज.

मो. ९४०३५७०९८७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ कोसी- सतलज एक्सप्रेस -भाग-2 – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी ☆ अनुवाद – सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

? जीवनरंग ❤️

☆ कोसी- सतलज एक्सप्रेस -भाग-2 (भावानुवाद) – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

(कथासूत्र : बिरोजा आणि त्याचे दोन मुलगे फलाटावर आहेत. बायको आणि मुलगी जनकदुलारी धाकट्या छोटूला घेऊन कालव्याच्या बांधाजवळ त्याची वाट पाहत आहेत……..)

कालवा, सुपौलच्या बलुआबाजार पासून ते थेट खगडियाच्या बेलदौरपर्यंत म्हणजे जवळजवळ शंभर किलोमीटर लांबीचा आहे.त्याच्या बांधाजवळ वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या लोकांनी आपली पालं बांधली आहेत.

खूप वर्षांपूर्वी कोसी नदी सुरसर नदीच्या बाजूने वाहत होती. हळूहळू कोसीने तो मार्ग सोडला आणि ती पश्चिमेला वळली.

18 ऑगस्टला रात्री कुसहाचा बंधारा तुटला, तेव्हा बलुआबाजार ते  सहरसामधली शेकडो गावं पाण्याखाली गेली. लोक घरं -गावं सोडून पळून गेले. आणि त्यांच्याजवळ होतं, नव्हतं ते सामान आणि मुलाबाळांना घेऊन भरल्या डोळ्यांनी इकडे आले. त्यांनी तात्पुरता का होईना, इथे आसरा घेतला.

दुर्दैवाने बांधाच्या ठिकाणाचा जिल्हा प्रशासनाच्या पूरग्रस्त मदत रजिस्टरमध्ये समावेश झालेला नाही. त्यामुळे सरकारी अधिकारी खाद्यपदार्थ वाटायला येतात, ते रेल्वेच्या फलाटापर्यंतच येतात. त्यांना नेमून दिलेलं कर्तव्य बजावून, कोणाला मिळालं नसेल, याची पर्वा न करताच परत जातात.

शेतकरी संस्था, वेगवेगळ्या आश्रमातील संन्यासी किंवा काही एनजीओंचे लोक असे काही, मूठभर गट, दारुण भुकेचा सामना करणाऱ्या या दुर्दैवी स्त्रीपुरुषांच्या मदतीला आले आहेत.

बरेचदा फलाटावरच्या लोकांना सत्तू नाहीतर पोहे वाटले जातात , तेव्हा इकडच्या लोकांना उपाशीच राहावं लागतं. आणि जेव्हा काही उदार लोकांचा गट इकडे अन्नपदार्थ वाटायला येतो, तेव्हा फलाटावरचे लोक सिग्नलकडे बघत राहतात -‘हा लाल दिवा हिरवा कधी होईल? फलाटावरच्या लोकांना अन्न मिळण्याचा मार्ग कधी मोकळा होईल?’

या दोन आश्रयस्थानांमध्ये एक प्रकारची चमत्कारिक, आळीपाळीची म्हणावी तशी परिस्थिती आढळून येते. एकीकडच्या लोकांना खायला काही मिळालं, तर दुसरीकडचे लोक उपाशी राहतात.

त्यामुळे बिरोजा नशीबवानच आहे, असं म्हणावं लागेल. त्याचं अर्धं कुटुंब फलाटावर राहतं आणि उरलेलं अर्धं बांधावर. त्यामुळे इकडे किंवा तिकडे कुठेही अन्नवाटप झालं, तरी त्याच्या कुटुंबातल्या सगळ्यांनाच थोडातरी वाटा मिळतो आणि त्यांची थोडीतरी भूक भागते.

बिरोजाच्या डोळ्यासमोर अजूनही त्या भयानक रात्रीचं दृश्य येतं. सगळंच एवढं अचानक झालं, की त्या संकटाच्या क्षणी विचार करायला, निर्णय घ्यायला वेळच नव्हता.

‘चला, चला. घरातून बाहेर पडा. पुराचं पाणी दाराशी आलंय.’ त्याच्या आजूबाजूला, शेजारीपाजारी एकच ओरडा चालला होता.

धो धो!त्या रात्री नदीचं पाणी त्यांच्या गावात  शिरलं, तेव्हा सुरुवातीला सगळ्यांनाच धक्का बसला. काय करावं, ते कोणालाच सुचेना. शेजाऱ्यापाजाऱ्यांचं बघून त्यानेही आपल्या कुटुंबाला बांधाकडे न्यायचं ठरवलं.’जानकीची माय, लवकर आटप. वेळ घालवू नकोस. बांधाकडे जाऊया.’

त्या रात्रीनंतर आकाशच त्यांच्या डोक्यावरचं छप्पर बनलं. दुसऱ्या दिवशी सकाळी फलाटावर पाकिटं वाटत आहेत, हे कळलं, तेव्हा तो मुरली, माधो आणि जनकदुलारीला घेऊन तिकडे धावत सुटला,’चला पोरांनो. ते लोक निघून जायच्या आत तिकडे पोचूया.’ तशी धावपळ झाली; पण त्यामुळेच त्यांच्या नावांची नोंद फलाटावरच्या रजिस्टरमध्ये झाली.

क्रमश: ….

 मूळ इंग्रजी कथा – ‘कोसी- सतलज एक्सप्रेस’ मूळ लेखक – डॉ. अमिताभ शंकर राय चौधुरी 

अनुवाद : सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – जीवनरंग ☆ रिकामा देव्हारा… भाग – 3 ☆ श्री अरविंद लिमये ☆

श्री अरविंद लिमये

? जीवनरंग ❤️

☆ रिकामा देव्हारा… भाग – १ ☆ श्री अरविंद लिमये

(पूर्वसूत्र- बेल वाजवली तेव्हा बरीच वाट पाहिल्यानंतर दार उघडलं गेलं. दारात आजोबा नव्हते. आजी होत्या. त्या हसून ‘या’ म्हणाल्या. पण ते नेहमीचे आनंदी,प्रसन्न हसू आज मात्र थोडे थकल्यासारखे वाटत होते.)

“हे काय?आजोबा नाहीयेत?”

“आहेत ना. हे काय. अहोs, बघितलं का हो कोण आलंय?”

आजोबा नवीन दिवाणावर मांडी घालून एकाग्रतेने जप करीत बसले होते. चेहरा शांत. हसतमुख. नवीन फर्निचरमुळे त्या हाॅलचं सगळं रुपच  आकर्षक अशी नवी झळाळी आल्यासारखं बदलून गेलं होतं. आजोबांनी अलगद डोळे उघडले. माझ्याकडे पाहून समाधानाने हसले.

“अरे. . तुम्ही? कसे आहात?”

“मजेत. आजोबा, फर्निचर खरंच खूप छान झालंय”  

आजोबांनी हसर्‍या चेहर्‍याने मान डोलावली.

“बसा. चहा करते.” म्हणत आजी उठू लागल्या. उठताना त्यांना होणारा त्रास आणि वेदना मला पहावेनात.

“आजी,मी चहाला पुन्हा येईन. नक्की येईन पण आता नको. तुम्हाला आधीच बरं नाहीये असं दिसतंय. थकलहात तुम्ही.” मी अतिशय आपुलकीने म्हणालो.

आजी अगतिकपणे आजोबांकडे पहात राहिल्या. आजींचे डोळे भरून आले.

“आजी, काय झालंय? तब्येत बरी आहे ना तुमची?”

” माझ्या तब्येतीचं काय हो? पण यांची काय दशा झालीय पाहिलंत का?”

“असं का म्हणताय? काय झालंय आजोबांना?”

आजोबा एवढंसं हसले. आजी मात्र मनात साठून राहिलेलं सगळं आवेगाने सांगू लागल्या. ऐकून मी हादरलोच. सगळं ऐकताना अंगावर शहाराच आला एकदम. आजोबांनी चटके देणारं हे दुःख कसं सहन केलं असेल या कल्पनेनेच मी कासावीस झालो. ‘इतकं होऊनही स्थितप्रज्ञासारखे इतके शांत राहूच कसे शकतात हे?’ मला  प्रश्न पडला.

ती सकाळ उजाडली होती तीच मुळी एखाद्या काळरात्रीसारखी. सकाळची आठ-साडेआठ वेळ असेल. आजोबा पूजा करीत बसले होते. जेमतेम दहा बाय दहाच्या त्या किचनमधल्या नव्या फर्निचरबरोबरच आवर्जून करून घेतलेल्या त्या छोट्याशा सुबक देवघरातल्या देवांची ती पहिलीच पूजा होती ! कारण आदल्या संध्याकाळीच फर्निचरचं काम पूर्ण झालेलं होतं. दिवाणाच्या मापाच्या ऑर्डर दिलेल्या नव्या गाद्या,उशा,बेड-कव्हर्स सगळं घेऊन त्याच वेळी नेमकी डिलिव्हरीला माणसं आली म्हणून आजी त्यांच्या उस्तवारीत. तोवर पूजा आवरत आली होती. ती माणसं गाद्या उशा वगैरे ठेवून निघून जाताच आजी आत आल्या. तेव्हाच नेमके लाईट गेले. किचन मधली कामं करायला स्पष्ट कांही दिसेना तसं प्रकाश यावा म्हणून किचनमधली छोटी खिडकी आजीनी उघडली. पण बाहेर आभाळ भरून आल्यामुळे प्रकाश जेमतेमच आत आला. त्याबरोबर घोंगावणार्‍या वाऱ्याचे झोत मात्र आक्रमण केल्यासारखे आत घुसले. आजोबांनी चाचपडत काडेपेटी उचलली. निरांजन लावायला काडी ओढल्याचं निमित्त झालं आणि स्वयंपाकघरात आगीचे लोळ उठले. वाऱ्याच्या झोताबरोबर ते देवघराच्या दिशेने झेपावले. आजोबा पाठमोरे बसलेले. सकाळच्या गडबडीत बदललेला गॅस सिलेंडर लिक होता. भडकलेल्या ज्वाळांनी  आजोबांची उघडी पाठ भरताच्या वांग्यासारखी भाजून काढली. आजोबा आक्रोश करु लागले. आजी भांबावून रडू लागल्या. आजोबांचा आक्रोश,आजींचं रडणं आणि दार ठोठावणाऱ्या शेजाऱ्यांचा आवाज या गदारोळात एखादंच मिनिट गेलं असेल. आजी भानावर आल्या न् रडत रडत दार उघडायला बाहेर धावल्या. दार उघडताच शेजारी आत घुसले. गॅसचा वास जाणवताच परिस्थितीचं गांभीर्य त्यांच्या लक्षात आलं. एकाने गॅसशेगडीची बटणं बंद आहेत ना याची खात्री करुन घेतली. आणि रेग्युलेटर काढून बाजूला ठेवला. दुसऱ्याने तत्परतेने हाताला लागेल ते रग,कांबळं,सतरंज्या घेऊन आजोबांना पांघरेस्तोवर आजोबा अर्धमेल्या अवस्थेला पोचले होते. मग तातडीने मुला-सूनांना फोन, हॉस्पिटलायझेशन, तेथून कालच मिळालेला डिस्चार्ज आणि आजपासून हळूहळू पूर्वपदावर येऊ लागलेलं सर्वांचं रुटीन !

ऐकता ऐकता तो प्रसंग स्वतःच अनुभवत असल्यासारखा मी शहारलो होतो. अपार करुणेने मी आजोबांकडे पाहिले. ते नेहमीसारखेच शांत आणि हसतमुख ! या माणसाच्या स्थितप्रज्ञतेपर्यंत आगीच्या त्या झळा पोचल्याच नव्हत्या जशा काही. . . !!

“खूप भाजलंय ना?” आजोबांजवळ बसून त्यांचा हात हातात घेत मी कळवळून विचारलं.  आजोबांनी होकारार्थी मान हलवली.

“पहायचंय?”

मी मानेनेच नको म्हटल्याचं त्यांच्या लक्षातच आलं नसावं बहुतेक. कारण त्यांनी दोन्ही खांद्यांवर घेतलेल्या धोतराच्या एकेरी तलम वस्त्राची टोकं अलगद दूर करीत दुसऱ्या हातानं पाठीवरचे ते मऊसूत वस्त्राचे आवरण अलगद बाजूला केले. पाठभर पसरलेल्या त्या तांबूस ओल्या जखमा मला पहावेचनात. नजरेला चटका बसावा तशी मी नजर फिरवली.

“कसं सहन केलंत हो सगळं?” आजोबांची नजर शून्यात हरवली.

“परमेश्वराने दिलेली शिक्षाच होती ती. सोसायचं बळही त्यानेच दिलं.”

“शिक्षा? तुम्हाला? कशाबद्दल?” मला कांही समजेचना. त्यांची नजर मात्र स्वतःच्याच मनाचा तळ शोधत चाचपडत राहिली.

“तुमच्या लक्षात येतंय का ? हे सगळं ज्या दिवशी घडलं ना, त्या रात्री पहिल्यांदाच मी त्या नव्या कोऱ्या बेडवरच्या मऊसूत गादीवर प्रथमच पाठ टेकून शांत झोपणार होतो. पण देव ‘नाहीs. . ‘ म्हणाला.”

त्यांनी आवंढा गिळला. मी ते पुढे बोलायची वाट पहात त्यांचा प्रत्येक शब्द असोशीने कानात साठवायचा प्रयत्न करीत राहिलो.

” माझ्या मुलं-सुना- नातवंडांनी अपार प्रेमानं देऊ केलेलं ते सुख मी निर्लेप वृत्तीने कुठं स्वीकारलं होतं ? मनात कुठेतरी त्या सगळ्यांना वरकरणी ‘नको. . कशाला?’ असं म्हणत होतो खरा पण या ऐश्वर्याचा क्षणिक मोह मला पडलाच होता ! उमेदीच्या वयापासून कांबळ्याच्या चौघडीवरही शांत झोपणारा मी मग मला हा मोह का पडावा? पण तो पडला होता हे नक्की. आयुष्यात कधीच कसलेच उपभोग हव्यासाने न घेतलेलं हे शरीर मऊ मुलायम बेडवर पाठ टेकायला मात्र आसुसलेलं होतं. मग देवानेच मला बजावलं,

‘ विरक्त मनानं वानप्रस्थ स्वीकारलाय अशी मिजास मारत होतास ना? मग मोह आवरायचा. मोह आणि हव्यास मनातून हद्दपार होईपर्यंत अंथरुणाला पाठ टेकायची नाहीs. ‘ तुम्ही पहाताय ना? करपलेल्या जखमांनी भरलेली ही पाठ घेऊन असा बसून असतो  रात्रंदिवस. आज पंधरा दिवस आणि पंधरा रात्री होतील,याच नव्हे कुठल्याच अंथरुणावर मी पाठ टेकून झोपून शकलेलो नाहीये.”

ऐकून मी थक्क झालो.

———–

त्यांना भेटून मी आत्ताच बाहेर पडलोय. खूप अस्वस्थ आहे. खरंतर  अस्वस्थ त्यांनी असायला हवं. पण ते नेहमीसारखेच शांत आणि स्थितप्रज्ञ !

माझी अस्वस्थता आजोबांबद्दलच्या करुणेपोटीच निर्माण झालीय असं वाटलं होतं. पण नाही. आज त्यांच्या तोंडून बाहेर पडलेल्या प्रत्येक शब्दातून झिरपत राहिलेलं त्यांचं ‘अध्यात्म’ मला अस्वस्थ करतंय. स्वतःच्या अंतर्मनातच आपल्या परमेश्वराची प्रतिष्ठापना केलेल्या त्यांना त्या परमेश्वराच्या मनातला ‘आतला आवाज’ किती स्पष्ट ऐकू आलाय !  कोणत्याही कर्मकांडांत अडकून न पडता,  स्वतःच्या आस्तिकतेचे स्तोम न माजवताही परमेश्वराचं बोट धरून प्रतिकूल परिस्थितीतही किती समाधानाने जगता येते याचं आजोबा म्हणजे एक मूर्तीमंत उदाहरण होते आणि मी. . ?

स्वत:ला आस्तिक म्हणवण्यातच आजपर्यंत धन्यता मानणाऱ्या माझ्या मनातला देव्हारा मात्र रिकामाच असल्याचा भास मला असा अकल्पितपणे  झाला न् त्यामुळेच खरं तर मी खूप अस्वस्थ आहे !!

समाप्त

©️ अरविंद लिमये

सांगली

(९८२३७३८२८८)

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print