श्री तुकाराम दादा पाटील
कवितेचा उत्सव
☆ तुकोबा समर्था… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆
☆
निघालीय दिंडी चला पंढरीला
तिथे चंद्र भागेत जाऊ पुन्हा
अभंगातगोडी विठू सावळ्याच्या
मुखी नाम त्यांचेच ठेऊ पुन्हा
*
उभ्या पावसाची हजेरी असावी
सुखाच्या सुगीचीच गाणी म्हणू
मनी मानसी या खराभावठेवू
पुढे भक्ति मार्गास जाऊ पुन्हा
*
तुकोबा तुलाही लळा माणसांचा
तुझ्या लोकसेवेत आत्मा तुझा
किती भामट्यांचा तुला त्रास झाला
इथे या जगालाच दाऊ पुन्हा
*
तुकोबा समर्था तुझी थोर गाथा
कळेभाववेड्यास श्रद्धा तिची
खरे ते प्रभावी तिचे ज्ञान आहे
तिच्या ज्ञानगंगेत न्हाऊ पुन्हा
*
ख-या साधनेने रमाआत्मरंगी
तिथे देव भेटीस येतो तुझ्या
नको कर्मकांडे नको अंधश्रद्धा
हरीनाम साधेच घेऊ पुन्हा
*
म्हणा पांडुरंगा सगे खेडुताना
सगेसोयरे तेच तुमचे पुढे
तुम्हा सोबतीने भली थोरली ही
पुढे प्रेम वारीच नेऊ पुन्हा
*
कुठे काय होते कळेना कुणाला
समाजात सा-या दंगा घडे
नको तेवढी ही दुही माजलेली
तिला शांत करण्यास धाऊ पुन्हा
(तुकाराम बीज)
☆
© प्रा. तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈