आजी होणे किंवा आजोबा होणे या इतके परम सुखाचे क्षण मनुष्य जीवनात कोणते असू शकतील?
नातवंडे म्हणजे आजी आजोबांच्या डोळ्यात चमकणाऱ्या दागिन्यांसारखी असतात.
नातवंडं असणे म्हणजे जणू काही जगाचे मालक होणे.
तो असा एक खजिना आहे की त्याचे मूल्य म्हणजे फक्त हृदयातील प्रेम.
नातवंड म्हणजे मुखवटा घालून आलेला देवदूतच.
तुमच्या हृदयापर्यंत, हसण्याचा, तुमचे जीवन आनंदाने भरण्याचा आणि तुमचे जग प्रेमाने भरुन टाकण्याचा देवाचाच मार्ग.
घरात नातीचा जन्म झाला आहे आणि आजोबांचं मन आनंदाने तुडुंब भरून गेले आहे. या आनंद भावनांचं हे आनंद गीत आगमन कवी आहेत डॉ. निशिकांत श्रोत्री (निशिगंध काव्यसंग्रहातून)
☆ – आगमन… – कवी : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆☆☆☆☆
मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली
आगमनाने तुझ्या ग स्नेहा जीवन आशा पालविली ।ध्रु।।
*
नाजूक जिवणी हळूच हंसली मुग्ध कलीका दरवळली
इवले इवले हात चिमुकले स्फूर्ति उमेद सापडली
आर्त नजर तव प्रेमे सजुनी अंगागातुन मोहरली
मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली १
*
प्रतिक्षेमध्ये तुझाच पिल्ला दुष्कर वर्षे साहविली
तुझ्या पावले सुकर जाहली सार्थ अपेक्षा जोजविली
ज्योतिर्मयी हो सर्वांसाठी दिव्य प्रार्थना आळविली
मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली २
*
खंडित कैसे जीवन होणे ज्योत नव्याने तेजविली
स्त्रोत वाहतो अखंड अमृत तुझ्याच रूपे जाणविले
संपुनि जाता सूर आमुचे वीणा हाती सोपविली
मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली ३
– डॉ. निशिकांत श्रोत्री
अतिशय हळुवार मनातलं, वात्सल्य जागं करणारं हे भावुक गीत. “आजोबा’ या नव्या पदवीने बहरून गेलेलं कवीचं मन गातंय.
मावळतीच्या क्षितिजावरती उदयाची जाणीव झाली
आगमनाने तुझ्या ग स्नेहा जीवन आशा पालविली।ध्रु।
खरं म्हणजे जीवनातलं हे संध्यापर्व. मावळतीच्या रंगानं रंगत असणारं. पण जीवनाच्या या टप्प्यावर नव्या आशा पल्लवित करुन स्नेहा तुझे आगमन झाले आणि या संध्येच्या क्षितिजावर नव्या उदयाचीच जाणीव झाली. जणू काही मागे गेलेली अनेक वर्षे पुन्हा एकदा तुझ्या जन्माने नव्याने बहरली.
नाजूक जिवणी हळूच हसली मुग्ध कलीका दरवळली
इवले इवले हात चिमुकले स्फूर्ति उमेद सापडली
आर्त नजर तव प्रेमे सजुनी अंगांगातून मोहरली
मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली १
गोड गुलाबी कोवळ्या ओठातलं तुझं हास्य जणू काही मूक कळीतून दरवळणाऱ्या सुगंधासारखंच. तुझ्या इवल्याशा चिमुकल्या हाताने माझ्यात कशी नवस्फूर्ती,नवचैतन्य उसळवलं. तुझी ती इवल्याशा डोळ्यातली निष्पाप नजर प्रेमाचा एक वेगळाच रंग घेऊन माझ्या अंगा अंगातून मोहरली. खरोखरच या उतार वयात माझ्या जीवनात पडलेल्या तुझ्या पावलाने माझाही जणू नवजन्मच झाला.
प्रतिक्षेमध्ये तुझ्याच पिल्ला दुष्कर वर्षे साहविली
तुझ्या पावले सुकर जाहली सार्थ अपेक्षा जोजविली
ज्योतिर्मयी हो सर्वांसाठी दिव्य प्रार्थना आळविली
मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली २
किती वाट पाह्यला लावलीस ग बाळे? तुझ्या प्रतीक्षेत घालवलेली ती वर्षे किती कठीण गेली आणि कशी सहन केली ते तुला कसं कळेल! मुलांची लग्न झाली की आता नातवंड कधी मांडीवर खेळेल याची स्वाभाविक उत्सुकता आईवडीलांना असते.पण बर्याच वेळा आपली विवाहित मुले मुल होऊ देण्याचा विचार पुढे ढकलत असतात. त्यामुळे डोळे मिटण्यापूर्वी ते बालरुप दिसावे याची आर्तता उत्कट होत असते.
पण आज मात्र तुझी पावलं जीवनांगणी उमटली आणि स्वप्न पूर्ण झालं. जणू सारं काही भरून पावलं. आयुष्याचे सार्थक झाले. आता या क्षणी माझी ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे की’” त्या भास्कराचं तेज तुला मिळो! आणि सर्वांच्या वाटा तू या दिव्य प्रकाशाने उजळवून टाकाव्यात.
खंडित कैसे जीवन होणे ज्योत नव्याने तेजविली
स्रोत वाहतो अखंड अमृत तुझ्याच रूपे जाणविली
संपूनि जाता सूर आमुचे वीणा हाती सोपविली
मावळतीच्या क्षितिजा वरती उदयाची जाणीव झाली ३
वाटलं होतं आयुष्य आता सरत आलं. पण तुझ्या जन्मानं या देहातली विझत चाललेली प्राण्याजोत जणूं काही पुन्हा नव्याने चेतवली गेली. पुन्हा नव्याने जगण्याची आशा पालवली. पुन्हा जगण्यात रंग भरले गेले. तुझ्या जन्माच्या रूपाने जणू काही अमरत्वाचा स्त्रोत वाहतो आहे असं वाटू लागलं. अंतर्यामी सुकलेले झरे पुन:श्च आनंदाने बरसू लागले आहेत. मी आता निवृत्तीच्या वाटेवर असताना माझी कर्मवारसारूपी वीणा तुझ्याच हाती सोपवत आहे. म्हणजे पुन्हा सूर सजतील. संपत आलेली मैफल पुन्हा एकदा नादमय होईल. नवे रस, नवे गंध, नवे रंग या माझ्या मावळतीच्या क्षितिजावर पुन्हा एकदा आनंदाने फेर धरतील.
खरोखरच डॉक्टर श्रोत्री यांचं हे गीत म्हणजे वात्सल्य रसाचा अमृतमय झराच. वाचक हो! श्रोतेहो! प्रत्येकाच्या आनंद अनुभवाला जोड देणारं हे ममत्त्व गीत. भावभावनांचा, प्रेमाचा अमृत स्पर्श देणारा, अंतरंगातून सहजपणे वाहणाऱ्या ममतेच्या स्त्रोताची जाणीव करून देणारा अत्यंत कोमल, हळुवार आणि सहज शब्दांचा या गीतातला साज केवळ आनंददायी आहे आणि त्यासाठी कवीला माझा त्रिवार सलाम!
तसं पाहिलं तर साधी सरळ भाषा. अलंकारांचा डोईजडपणा नाही. काव्यपंक्तींमध्ये कुठलेही अवघड वळण नाही.भावनांचा प्रवाह वाचकांच्या मनाशी थेट मिळणारा असा शब्दवेध. सहज जुळलेली यमके, गीत वाचताना मनात एक माधुर्याचा ठेका धरतात.
या गीतामध्ये एक वत्सल दृश्य आहे. नुकतंच जन्माला आलेलं बाळ,कापसासारखी मुलायम तनु. नाजूक जिवणी, चिमुकले हात पाय, निर्मळ, निष्पाप नजर आणि या साऱ्या विशेषणांतून जाणवणारं एक दैवी, स्वर्गीय निरागसत्व अंतःकरणात मायेचे तरंग उमटवतं.
प्रतीक्षेमध्ये तुझ्याच पिल्ला दुष्कर वर्षे साहविली या ओळीतला पिल्ला हा शब्द तर मनाला इतका बिलगतो. खरंच बाळा, लेकरा, चिमण्या या शब्दांमध्ये पाझरतं ते फक्त आणि फक्त अंतरातलं वात्सल्य, दाट प्रेम!
पीजे हार्वे यांनी म्हटलं आहे कोणते गाणे प्रेमाबद्दल नाही? मग ते प्रेम पुरुषाकडून स्त्रीवर असो, आई वडिलांकडून मुलांपर्यंत असो किंवा पुढे नातवंडांपर्यंत असो.. ते पुढे जातच असते.
या भाष्याचा अर्थ डॉक्टर श्रोत्रींच्या या गीतात जाणवतो.
आगमनाने तुझ्या ग स्नेहा जीवन आशा पालवली ही ध्रुवपदातील ओळ खूपच बोलकी आहे. स्नेहा हे विशेष नाम असू शकते अथवा स्नेहरुपा या अर्थानेही असू शकते. पण यातून जाणवतो तो नातीच्या जन्माचा कवीला झालेला आनंद. नातीचं बाळरूप पाहता क्षणीच त्यांच्या अंतरात सुखाचा फुलोरा फुलतो. आणि सहजपणे ते उद्गारतात ज्योतिर्मयी हो कवीच्या मनातली ही उत्स्फूर्त संवेदना जाणून माझ्या मनात खरोखरच असंख्य मुग्ध कळ्या सुगंध घेऊन दरवळल्या.
या ठिकाणी आणखी एक नमुद करावेसे वाटते.
संपुनी जाता सूर आमुचे वीणा हाती सोपविली या ओळीतल्या वीणा हाती सोपवणे या वाक्प्रचाराला एक संदर्भ आहे. प्रवचनकार निवृत्त होताना आपल्या वारसाला वीणेच्या रुपात प्रवचनाचा वारसा देतात. या इथे कवीने आपल्या नातीला आपला वारसा मानून जे काही त्यांचं आहे ते तिला देऊन टाकले आहे.
एकंदरच कवीच्या मनातली स्पंदनं या गीतात इतकी सजीवपणे जाणवतात की त्यासाठी डॉक्टर श्रोत्रींना पुन्हा एकदा सलाम.
विषयांतर असूच शकतं पण जाता जाता सहज सुचलं म्हणून लिहिते, डॉ. श्रोत्री हे स्त्रीरोगतज्ञ. व्यवसायाच्या निमीत्ताने त्यांनी अनेक जन्मलेली मुले हाती घेतली असतीलच. तोही अर्थातच व्यावसायिक असला तरी भावनिक सोहळाच. पण जेव्हा स्वत:ची नात जन्माला येते तेव्हां फक्त आणि फक्त “आज मी आजोबा झालो!”
हेच सुख. तेव्हा त्यांच्यातल्या वैद्याचा कवी कसा होतो याचा अनुभव आगमन या गीतात होतो. आणि त्याचीही गंमत वाटते.
ज्याचे रूप ऋग्वेदाची मंडले आहेत, शरीर यजुर्वेद आहे, सामवेद ही किरणे आहेत, जो जगाची उत्पत्ती स्थिती व लय यांचे कारण आहे, जो ब्रह्मदेवाचा दिवस असून अचिंत्य व अलक्षी आहे त्या श्रेष्ठ सूर्य देवतेचे मी प्रातःस्मरण करतो.
रोजच सूर्याला नमस्कार करण्याची आपली पद्धत कारण सूर्य आहे म्हणून आपले अस्तित्व आहे, हे आयुष्य आहे हे आपण केंव्हाच जाणले आहे. आपल्या संस्कृतीत प्रत्येक सण हा चांगल्या विचाराने, भावनेने साजरा केला जातो.तसाच हा माघ शुक्ल सप्तमीचा म्हणजेच रथसप्तमी चा सण, सूर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. तो याच दिवशी साजरा करण्याची कारणे म्हणजे सूर्याचा हा जन्मदिन आहे अशी एक कल्पना, या दिवशी संवत्सर सुरू झाले. याच दिवशी सूर्याला त्याचे वाहन म्हणजे रथ मिळाला ही एक कल्पना!
वास्तव असे आहे की या दिवसापासून सूर्याचे तेज वाढत जाते, तो जास्त वेळ म्हणजे दिवसाचे जास्त तास प्रकाश देतो, आणि आपले आयुष्य आरोग्यदायी करतो.सूर्य आता उत्तरायणात असतो. वसंत ऋतू येतो म्हणजेच सृष्टीची सृजशीलता वाढते.म्हणून सुर्याप्रती कृतज्ञता व्यक्त करावी हा हेतू!त्याचे हे वाढलेले तेज सहन करणारे रथाचे घोडे व त्याचा सारथी अरुण यांच्याप्रती सुध्दा कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी रथासह सूर्याची पूजा करण्याची पद्धत आहे.
(सहज मिळाली म्हणून थोडी रथाबद्दल माहिती सांगते. रथ हे आपले फार प्राचीन वाहन आहे. रथाचे अनेक प्रकार आहेत.देवगणांचा तो देवरथ, राजेमहाराजे यांचा पुष्परथ, खेळांसाठीचा क्रीडारथ, स्त्रियांसाठी चा कणीरथ, रथ विद्येच्या रक्षणासाठी वैजयिक रथ, युद्धासाठी सांग्रमिक रथ.रथ चक्र हे समाज जीवनाच्या प्रगतीचे चिन्ह, उत्कर्षाचे प्रतीक आहे.)
सूर्याच्या रथाला संवत्सर नावाचे एकाच चाक आहे.त्याला बारा राशी म्हणजेच बारा महिन्यांचे प्रतीक म्हणून बारा आरे आहेत.गायत्री, वृहति, उष्णिक,जगती, त्रिष्टुप , अनुष्टुप, पंक्ती हे सात छंद अश्व रुपात सूर्याचा रथ ओढण्याचे काम करतात. रथाचा विस्तार नऊ हजार योजन तर त्याची धुरा एक करोड सत्तावन हजार योजन आहे.( चौथ्या – पाचव्या शतकात सूर्य सिद्धांतानुसार एक योजन म्हणजे ५ मैल -८ किलोमीटर, पण नंतर १४ व्या शतकात परमेश्वर नावाच्या गणितज्ञाने एक योजन म्हणजे ८ मैल – १३ किलोमीटर आहे असे सांगितले)
एका सूर्य किरणात सात प्रकारच्या ऊर्जा असतात.
प्रभा – तमनाशक, प्राण शक्तिदाता
आभा – धर्मशक्ती दाता
प्रफुल्ला – आत्मज्ञान दाता
रश्मी – सृजनशक्ती दाता
ज्योती – भक्तीरस निर्माती
तेजस्विनी – स्थिती म्हणजेच विष्णूला मदत करणारी
महातेजा – उत्पत्ती व लय म्हणजेच ब्रह्माला व शिवाला सहाय्य करणारी
या सात ऊर्जा रुपी किरणांना त्यांचे त्यांचे रंग असतात. या सात ऊर्जा एकत्रित येऊन सविता तयार होते, ही श्वेत असते.
सूर्याच्या जन्मा बद्दल सांगायचे तर तो आजन्मा आहे. कमळाच्या नाभितून ब्रह्माजी अवतरले. त्यांच्या मुखातून प्रथम ओम् शब्द निघाला, हा तेजरुपी सूर्याचे सूक्ष्म रूप होते. त्यानंतर ब्रह्माजींच्या चार मुखातून चार वेद प्रकट झाले. जे ओम् च्या तेजात एकाकार झाले. हे वैदिक तेजच आदित्य आहे. हा वेद स्वरूप सूर्य पंचदेवांपैकी ( शिव, देवी, विष्णू, गणपती, सूर्य ) एक आहे.
वैवस्वत मन्वंतरात अदितीने सूर्याची कठोर आराधना केली, सूर्यदेव प्रसन्न झाले. तिने सुर्यासारखा पुत्र मागितला. कालांतराने अदिती गर्भवती झाली. तिचे कठोर व्रत सुरूच होते. रागावून कश्यप म्हणाले, अशी उपाशी राहिलीस तर गर्भ कसा वाढेल? तिने तो गर्भ शरीरातून काढला तेंव्हा तो सोन्यासारखा चमकणारा होता. कालांतराने त्यातून एक तेजस्वी, सूर्याचा अंश जन्माला आला, त्याचे नाव विवस्वान ठेवले. असे अदिती कश्यप यांना बारा पुत्र झाले, त्यांना द्वादश आदित्य म्हणतात. हे आदित्य अवकाशातील इतर आदित्यांना ऊर्जा पुरविण्याचे कार्य करतात. (म्हणजे अवकाशात अनेक सूर्य निर्माण होतात अशी कल्पना त्याकाळी सुध्दा होती?)
सूर्याचा विवाह देवशिल्पी व विश्वकर्मा यांची मुलगी संज्ञा हिच्याबरोबर झाला. त्यांना वैवस्वत मनू, यमदेव ही दोन मुले व यमुना (नदी) ही मुलगी झाली. परंतु फार काळ संज्ञा सूर्याचे तेज सहन करू शकली नाही म्हणून तिने आपल्या जागी आपली छाया सोडली व आपण वनात निघून गेली. छायेला सावर्णी मनू, शनिदेव हे दोन मुलगे व तपती ही मुलगी झाली. कालांतराने सूर्याला संज्ञा सापडली, त्यावेळी सूर्य घोडीच्या रुपात होते, त्यांच्या मीलनातून जुळ्या मुलांचा जन्म झाला. अश्व रुपात असताना जन्माला आली म्हणून त्यांचे नाव अश्विनीकुमार!
त्रेता युगातील सुग्रीव हा पण सुर्यपुत्र, त्याच्या जन्माची कथा वेगळीच आहे. ऋक्षराज नावाचे वानर होते, ते एका सरोवरात स्नान करण्यासाठी गेले, सरोवराला मिळालेल्या शापामुळे त्यात स्नान केल्यावर त्याला एका सुंदर स्त्री चे रुप प्राप्त झाले. प्रथम त्या स्त्री वर इंद्रदेव मोहित झाले त्यामुळे बाली चा जन्म झाला. नंतर सूर्यदेव ही मोहित झाले आणि सुग्रीवाचा जन्म झाला. दोन्ही मुले त्याने गौतम ऋषी व अहिल्या यांच्याकडे सोपविली. द्वापार युगात मंत्र सामर्थ्याने कुंतीच्या पोटी जन्माला आलेला कर्ण हा पण सुर्यपुत्र!
सूर्यदेवा,
पहाट वारा जेंव्हा भूपाळी गात असतो तेंव्हा एखादा मोत्यांचा सर सुटावा तसे मोती धारेवर विखुरतात. कोठून आले हे मोती? हां! बरोबर आहे, तुझ्या कंठातला तो मोत्यांचा हार पश्चिमेकडे ठेऊन गेला असशील आणि तिने मोत्यांचा सडा टाकला! सूर्यदेवा, तू येण्याआधीच प्राचीवर गुलाल उधळून तुझ्या येण्याची बातमी अरुण देतो.
माथी किरीट, हाती कमळ,चक्रधारी, शंखधारी,आशीर्वाद मुद्रा, कानी मकर कुंडलांची प्रभा, गळ्यात हार,लाल रंगाच्या सात घोड्यांच्या रथावर, वामांगी पत्नीला घेऊन पद्मासनात आसनस्थ झालेलं, सुवर्ण कांती ल्यालेलं हे तुझं देखणं रुप!
तू तर तिन्ही लोकांचा पालनकर्ता अन्नदाता, त्रिगुणधारी,रोगांचा नाश करणारा, स्वयंप्रकाशी,अध्यात्माचा प्रेरक, आकाश रुपी लिंगाची आराधना करणारा, आकाशाचा स्वामी, ग्रह नक्षत्रांचा अधिपती, तमनाशक, असत्याकडून सत्याकडे, मृत्यूपासून अमरत्वाकडे नेणारा, धर्मपरायण, धर्माच्या व कर्तव्याच्या मार्गाने जाणारा म्हणून कधीही लोप न पावणारे तुझे तेज, चौदा भुवनांचा पालक, चराचर सृष्टीचा आत्मा, विश्वाचा साक्षीदेव, विराट पुरुषाचा नेत्र, अंतराळाचा अलंकार, अमूर्त अशा अग्नी देवतेचे मुख, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश तूच, देव,पितर, यक्ष ज्याची सेवा करतात तो तूच, राक्षस, निशाचर, सिद्ध ज्याला वंदन करतात तो तूच, इतका महान असून तुझे किरण क्षुद्र जीव जंतू, मनुष्य, सर्वांचे चरण स्पर्श करून नम्रतेची शिकवण देतात.
कालस्वरूप, कालचक्राचा प्रणेता, निर्मळ, विकल्प रहित, सर्वज्ञानी आहेस. म्हणूनच मारुतीला आणि कर्णाला तू ज्ञान दिलेस. आणखी काय आणि किती लिहू ? सारं न संपणारे! माझा अवाका ही तेवढा नाही. मला माहित आहे, अनासक्त आहेस तू, त्यामुळेच तिन्हीसांजेला तुझा एवढा मोठा पसारा क्षणात आवरून घेतोस.
तुला एक वचन देते, मावळताना तू जी सूक्ष्म रूपातील तुझी शक्ती व तेज दिव्यात ठेऊन जातोस, त्याचा सन्मान आम्ही करू, आणि घरात रोज एक ज्योत तेवती ठेवू.