मिरची म्हटलं म्हणजे ठसकाच लागतो नाही का! एकेकाळी झणझणीत तिखटाला चटावलेली माझी जीभ आता या वयात मात्र नुसत्या मिरचीच्या दर्शनाने देखील होरपळून निघते. माझ्या पानापासून मिरचीने दूरच रहावे अशी मी मनोमन प्रार्थना करत असतो इतकं आता माझं आणि मिरचीचं वैर झाले आहे.
तरीही या मिरचीनेच नुकतेच माझ्यावर थोर उपकार केले, अगदी इंग्रजीत म्हणतात तसे ब्लेसिंग इन डिसगाईज!
माझ्या पानातला एवढा मोठा मिरचीचा तुकडा मला दिसला नाही हे बघताच माझा मुलगा तडक मला नेत्रविशारदाकडे घेऊन गेला. तेथे माझ्या नेत्रपटलात काही तरी गडबड झाल्याचा संशय आल्याने नेत्रपटलाची सखोल तपासणी करण्यासाठी माझूया डोळ्यात औषध घालून मला डोळे बंद करून बसविले होते.
डोळे बंद करताच संपूर्ण जग पापण्यांच्या पलिकडे गेल्यावर मात्र माझ्या मस्तकात विचारांचे मोहोळ उठले. एक डोळा तर नेत्रपटल फाटल्याने फारसे काहीच काम करू शकत नव्हता. गेली पंधरा-सोळा वर्षे मी या एकाच डोळ्याने सगळे करत होतो. हळूहळू मी वैद्यकीय व्यवसायातून निवृत्त झालो होतो. तथापि माझे साहित्यिक लिखाण एका डोळ्याच्या आधारावर चालू होते. आता याही डोळ्याची दृष्टी अधू झाली तर मी लिहायचे कसे; शब्ददेवतेची आराधना करायची कशी? विलक्षण कासावीस झालो मी!
आणि माझ्या मनात शब्ददेवतेला उद्देशून काही विचार येऊ लागले. त्यांना मूर्तस्वरूप द्यायला मी डॉक्टर कडे कागद मागितला. त्यांना वाटले मला डोळे टिपायला कागद हवा आहे. मात्र मी माझा हेतू सांगताच त्यांनी मला डोळे उघडता येणार नाहीत याची आठवण करून दिली.
अन् मी तशाच बंद डोळ्यांनी शब्ददेवतेला उद्देशून काव्य रचून कागदावर लिहिले. ते तुमच्यासाठी सादर करीत आहे.