मराठी साहित्य – काव्यानंद ☆ विरहोच्छ्वास… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ विरहोच्छ्वास… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆ विरहोच्छ्वास… स्व. वि. दा. सावरकर ☆

हा हाय तुझ्या गोड गातची गाना

छळी विरहवेदना प्राणा॥ध्रु.॥

 

सुमकोमलशा प्रेमिं अनंती तुजशी

हे प्रीति, धरुनि हृदयाशी

हा कांहि असे काळ म्हणुनि या जगतीं

विस्मरुनि हीहि गे वृत्ती

जों दंग अम्ही संगसुखासव पीतां

अनुभवित पलीं शाश्वतता

हा हाय विरह तो आला

प्रेमाच्या आनंत्याला

आरोपुनि त्याच्या काला

जरि अंताला। अम्हि तया पलां

विसरलो तरी अंत अम्हां विसरेना

छळी विरहवेदना प्राणा॥१॥

 

ना लागेना गोड अतां मज कांही

मज कुठेंहि करमत नाहीं

ये विजना त्रासूनि जनीं मी आणी

त्रासूनि जनां मी विजनीं

मी केश पुन्हा विंचरीं, पुन्हा विखुरीं

विस्मरत गोष्ट जी स्मरली

फिरफिरुनि तनु लव बसते

बघबघुनि नेत्र लव मिटते

परि हाय अनुक्षण मन तें

झुरझुरूनिया। झुरतेंचि, तया

पल विरम नसे, करित सखी तुझ्या स्मरणा

छळी विरहवेदना प्राणा॥२॥

 

फुलताचि फुलें सहज खुडी मी मोदें

हा तोचि चुरगळूं खेदें?

कीं खोंवुं फुलां केशकलापीं तव ये

तुज बाहुं कुठें अजि सखये?

तव पूर्वीचे प्रेमदूत दिसतां तें

हसतचि झुरें मी खेदें

या इष्ट जनीं समजवितां ‘लव खाई’

लागली भूकही जाई

स्मरत कीं कसे म्यां रुसुनी

बसतांच तुवां मन धरुनी

तव कवल देत मग वदनीं

मृदु पालविलें । मधु कालविले

मधु अधरीं तें करित अमृत जे अन्ना

छळी विरहवेदना प्राणा॥३॥

 

हा हाय अतां भेट अम्हांसी कुठली

आशाहि अजि मज विटली

तरी काकुळती येत विनविलें होते

आधींच का न म्यां तैं तें

कीं भेटीसी हीच एकली राती

ये झणीं नको दवडूं ती

मी समयांच्या सारसारुनी वाती

पाहिली वाट त्या रातीं

पद पथें जरा वाजतांच दचकावे

दूरता शून्य बैसावें

तो दार अहा किलकिललें

हो तूंचि । मज झणीं स्वकरें

हृदिं हुंदहुंदुनी धरिलें!

विसरुनि राती। लवचि उरे ती। भोगुं संगतीं

ढकलिली तुला दूर, धरुनि अभिमाना

छळी विरहवेदना प्राणा॥४॥

 

विरहाग्नीनें पुष्ट अश्रू हे आणि

विरहाग्नी पुष्ट अश्रूंनी

नांदोत असे करित परस्परपूर्ती

हा विरह, आंसवें आणि तीं

मज सुखही दे दुःख, दुःखची तैसे

हो जपी जपी फलद तुम्हां हो तुमची

मज आणि तपस्या माझी

ती शिला नको वा मूर्ति

भावने नसूनी दिसती

आलिंग्य, चुंब्य असती ती

प्रत्यक्ष अशी। तव मूर्ती मशी। समचेतनशी

तींतची दिसो देव माझिया भुवना

छळी विरहवेदना प्राणा॥५॥

  –  कवी – वि दा सावरकर

 

रसग्रहण

८         काव्यानंद  :

            विरहोच्छ्वास 

            कवी…..वि.दा.सावरकर 

            रसास्वाद: शोभना आगाशे

रसग्रहण

असं म्हटलं जातं की सावरकर स्वातंत्र्य चळवळीत गुंतले नसते तर नक्कीच महाकवी झाले असते. पण मला हे समजत नाही की, ‘कमला’ व ‘गोमंतक (पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग)’ ही महाकाव्ये, ‘सप्तर्षी’, ‘मूर्ती दुजी ती’, ‘मरणोन्मुख शय्येवर’, ‘आकांक्षा’, ‘चांदोबा चांदोबा, भागलास कां?’, ‘सायंघंटा’ ही सहा दीर्घकाव्ये, व अनेक (शंभरहून अधिक) प्रकाशित तसेच अप्रकाशित काव्यें रचणाऱ्या कवीला महाकवी का म्हणू नये? याव्यतिरिक्त संकल्पित पण अपूर्ण अशा त्यांच्या अनेक रचना उपलब्ध आहेत. असेच ‘पानपत’ हे संकल्पित पण अपूर्ण महाकाव्य. या काव्याचा ‘विरहोच्छ्वास’ हा एक सर्ग त्यांनी पूर्ण  केला होता. यात चाळीस उच्छ्वास (कविता) आहेत. त्यापैकी पाच ‘सावरकरांच्या कविता’ या पुस्तकात समाविष्ट आहेत. त्यांचा रसास्वाद आज आपण चाखणार आहोत.

मुकुल नावाचा एक वीर युवक हिंदुपदपातशाहीसाठी लढत असतांना शत्रुच्या हाती सापडतो. मृत्यूदंडाची अपेक्षा करीत कोठडीत काळ कंठीत असतांना त्याने जे भावनापूर्ण सुस्कारे टाकले, ते यात गोंवलेले आहेत.

सावरकरांच्या प्रासंगिक कविता, पौराणिक तसेच ऐतिहासिक संदर्भ असलेल्या कविता, स्वातंत्र्यलढा, तुरुंगवास, अस्पृश्यता निर्मूलन,  हिंदुएकता अशा ध्येयाने प्रेरित कविता यांच्या भाऊगर्दीत शृंगाररसयुक्त कविता मागे पडतात. पण अशा कविता वाचल्यानंतर पटतं की सावरकर हे परिपूर्ण कवी होते. या कवितेतले, हल्लीच्या भाषेत म्हणायचं तर कांही बोल्ड किंवा सावरकरांच्या समाजमनातील प्रतिमेशी न जुळणारे शब्द वाचतांना आपल्याला पण अडखळायला होतं. कविता नेहमीप्रमाणेच गेय आहे.त्यांच्यातला शब्दप्रभू/भाषाप्रभू ठिकठिकाणी डोकावतोच. उदा. अनंतापासून निर्मित आनंत्य, आलिंगनापासून आलिंग्य व चुंबनापासून चुंब्य असे अनवट शब्द. थोडंसं या अर्थाने ‘लव’, क्षणोक्षणी साठी ‘अनुक्षण’, बोलावणे साठी ‘बाहणे व त्यापासून बाहू’ (तुज बाहू कुठे अजि सखये), घासासाठी ‘कवल’ असे गोऽड शब्द. ‘संगसुखासव’ यासारखा अपरिचित  शब्द. (संगसुखाला आसव हे सफिक्स किंवा अनुप्रत्यय जोडावा ही कल्पनाच अनोखी आहे.) फिरफिरूनि, बघबघुनि, झुरझुरुनि, सारसारुनि, हुंदहुंदुनि असे त्या कृतीला अधोरेखित करणारे नादमय शब्द.

अनेक ठिकाणी कवीने

शब्दांचे खेळ करून काव्यातील आकर्षकता वाढवलेली

दिसून येते. उदाहरणार्थ वाक्यातील कर्ता, कर्म यांची अदलाबदल करून नवीन अर्थपूर्ण वाक्य बनवून, ती दोन वाक्यं पाठोपाठ येतील अशी रचना करणे.

याला क्लृप्ती किंवा इंग्रजीत गिमिक म्हणता येईल. जसे की,

“जरि अंताला अम्हि …. विसरलो, तरी अंत अम्हां विसरेना”, किंवा

“ये विजना त्रासुनि जनी मी आणि त्रासुनि जनां मी विजनी”, तसेच “विरहाग्नीने पुष्ट अश्रू हे आणि विरहाग्नी पुष्ट अश्रूंनी”.

श्लेष अलंकाराचं उदाहरण म्हणून “मी समयांच्या सारसारुनि वाती” ही ओळ उद्धृत करता येईल. ‘समयांच्या’ या शब्दाचे तीन अर्थ  होऊ शकतात, पहिला समईचं अनेकवचन समया, दुसरा समय म्हणजे काळ व तिसरा समय म्हणजे करार (इथे नायक व सखी यांच्यातला अलिखित  करार) व हे तीनही अर्थ  इथे चपखल बसतात. तसेच ‘जपी’ हा शब्द प्रथम क्रियापद म्हणून व पाठोपाठच नाम म्हणून वापरला आहे. असे लीलया केलेले शब्दांचे खेळ पाहून अचंबित व्हायला होतं.

रसग्रहण लांबत चालल्यामुळे आज आपण कवितेच्या अर्थाविषयी फारशी चर्चा करणार नाही. शिवाय अर्थ सोपा आहे. फक्त शेवटच्या कडव्याच्या संदर्भाविषयी थोडं स्पष्टीकरण आवश्यक आहे. नायक आपल्या हृदयस्थ सखीला विचारतो की, शिळेच्या वा धातूच्या मूर्तीची आराधना करीत, त्या त्या प्रतिकांशी मानवी नाती जोडून, मीराबाई, नामदेव, तुकाराम, चैतन्य महाप्रभू या संतांप्रमाणे उत्कट प्रेम केलं तर अंती देवाचं प्रत्यक्ष दर्शन होतं असं म्हणतात, मग तुझ्या सजीव मूर्तीवर मी (देवाचे प्रतीक समजून) उत्कट प्रेम करीत असूनही मला तुझी प्रत्यक्ष भेट का होत नाही?

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शब्द, देह, रोमांच ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ शब्द, देह, रोमांच ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

जड बोजड शब्दांचा

नको कवितेत पसारा,

साध्या सोप्या शब्दांनी

फुलूदे तिचा पिसारा !

अर्थ भिडता हृदयाला

डोळे भरून यावेत,

नकळत उचलून तिला

कुणीही घ्यावी कवेत !

वाचतांना अर्थगर्भ रचना 

काटा अंगावरी फुलावा,

रोमांचित करुनी अंग अंग

अवघा देहची शब्द व्हावा !

अवघा देहची शब्द व्हावा !

© प्रमोद वामन वर्तक

सध्या सिंगापूर 9892561086

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “इथवर जगल्या आयुष्याचे…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “इथवर जगल्या आयुष्याचे– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

चार घरच्या समवयस्क मैत्रिणी

अनुभव मोठा गाठी बांधुनी

निवांत बसुनी घर ओट्यावर

भवताल सारा घेती समजुनी

इथवर जगल्या आयुष्याचे

चेहर्‍यावरती तेज झळकते

पचवून साऱ्या सुखदुःखाला

ताठ कण्याने निवांत बसते

संस्कृतीची कास धरुनी

प्रत्येकीची वेगळी  कहाणी

नऊवारी साडीतल्या मैत्रिणी

ठेवती महाराष्ट्राची शान जपोनी

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माहित नव्हते… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ माहित नव्हते… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

माहीत नव्हते मजला,

हा पाडाव की पडाव.

निश्चित कांही नाही,

कोणता पुढील गाव

थकल्या माझ्या मना रे,

थोडा तरी विसाव.

उद्या पुन्हा भ्रमंती ,

नवा अभिनव ठाव.

दुर्दम्य निग्रहाने ,

नांगरुन बेत तू ठेव.

निश्चिंत होउन सोड,

पाण्यात तुझी रे नाव.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पर्यावरण… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

 

☆ पर्यावरण… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

 जसं तान्ह्या बाळास पांघरूण,

तसं अवनीस घातले आवरण !

आतून उबदार, बाहेर देखणे,

निसर्गाचे ल्यायले तिने लेणे !

सृजन निर्मिती करीतसे धरा,

सिंचन तिला पावसाचे करा!

माती पाण्याच्या संगतीत,

हिरवी रोपे भूवर तरतात!

जगवते ती प्राणिमात्रांना,

जाणीव ठेवा तिची मना!

सांभाळावी जीवापाड  तिला,

हानी न करावी भूतलाला!

पंचमहाभूतांची निर्मिती,

ईश्वरे केली प्राणीमात्रांसाठी!

जपू या पर्यावरणाला,

 उतराई होऊ या सृजन सृष्टीला!

जाणीव कायम मनात ठेवू,

पर्यावरणाला जपून राहू!

नाही पर्यावरणाचा एकच दिन,

साथ देऊ त्यास आपण रात्रंदिन!

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 205 ☆ शब्द तुझे का स्वरात माझ्या… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 205 – विजय साहित्य ?

☆ शब्द तुझे का स्वरात माझ्या… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

(गागा गागा लगाल गागा)

चिंतेचे घर मनात माझ्या

घरघर त्याची उरात माझ्या .

 

बोलत जातो तुझ्या स्मृतींशी

हळवे वारे घरात माझ्या.

 

मोठे झाले कधी लेकरू

घुटमळतो मी पदात माझ्या .

 

बांधावरती ओली बाभळ

सळसळ बोली सुरात माझ्या.

 

हाती माझ्या प्रगती पुस्तक

रेघ लाल का सुखात माझ्या.

 

निरोप नाही नसे खुशाली

शब्द तुझे का स्वरात माझ्या.

 

लेखणीस या फुटला पाझर

हरवशील तू जगात माझ्या .

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ४ — ज्ञानकर्मसंन्यासयोग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय ४ — ज्ञानकर्मसंन्यासयोग — (श्लोक १ ते १०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

श्रीभगवानुवाच 

इमं विवस्वते योगं प्रोक्तवानहमव्ययम्‌ । 

विवस्वान्मनवे प्राह मनुरिक्ष्वाकवेऽब्रवीत्‌ ॥ ४-१ ॥ 

कथित भगवान

अव्यय योग कथिला मी विवस्वानाला

त्याने कथिला स्वपुत्राला वैवस्वताला ।। १ ।।

अपुल्या सुतास कथिले त्याने मग मनुला

इक्ष्वाकूला मनुने कथिले या अव्यय योगाला ॥१॥

एवं परम्पराप्राप्तमिमं राजर्षयो विदुः । 

स कालेनेह महता योगो नष्टः परन्तप ॥ ४-२ ॥ 

अरितापना राजर्षींनी योग जाणला परंपरेने

वसुंधरेवर नष्ट पावला तो परि कालौघाने ॥२॥

स एवायं मया तेऽद्य योगः प्रोक्तः पुरातनः । 

भक्तोऽसि मे सखा चेति रहस्यं ह्येतदुत्तमम्‌ ॥ ४-३ ॥ 

योग हा तर अतिश्रेष्ठ अन् कारकरहस्य

प्रिय सखा नि भक्त असशी माझा कौन्तेय 

मानवजातीला उद्धरण्या घेउन आलो हा योग

तुजला कथितो आपुलकीने पार्था ऐक हा योग ॥३॥

अर्जुन उवाच 

अपरं भवतो जन्म परं जन्म विवस्वतः । 

कथमेतद्विजानीयां त्वमादौ प्रोक्तवानिति ॥ ४-४ ॥ 

कथिले अर्जुनाने

हे श्रीकृष्णा जन्म तुझा तर अर्वाचीन काळाला

अतिप्राचीन सूर्यजन्म  कल्पारंभी काळाला

महाप्रचंड अंतर तुम्हा दोघांच्याही काळाला

मला न उमगे आदीकाळी कथिले कैसे सूर्याला ॥४॥

श्रीभगवानुवाच 

बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव चार्जुन । 

तान्यहं वेद सर्वाणि न त्वं वेत्थ परन्तप ॥ ४-५ ॥ 

कथित श्रीभगवान

कितीक जन्म झाले माझे-तुझे ऐक परंतपा कुंतीपुत्रा

तुला न जाणिव त्यांची परी मी त्या सर्वांचा ज्ञाता ॥५॥

अजोऽपि सन्नव्ययात्मा भूतानामीश्वरोऽपि सन्‌ । 

प्रकृतिं स्वामधिष्ठाय सम्भवाम्यात्ममायया ॥ ४-६ ॥ 

अजन्मा मी,  मी अविनाशी मला न काही अंत

सकल जीवांचा ईश्वर मी नाही तुजला ज्ञात

समग्र प्रकृती स्वाधीन करुनी देह धारुनी येतो

योगमायेने मी अपुल्या प्रकट होत असतो ॥६॥

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत । 

अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्‌ ॥ ४-७ ॥ 

जेव्हा जेव्हा धर्माची भारता होत ग्लानी 

उद्धरण्याला धर्माला येतो मी अवतरुनी ॥७॥

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्‌ । 

धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ ४-८ ॥ 

विनाश करुनीया दुष्टांचा रक्षण करण्या साधूंचे

युगा युगातुन येतो मी  संस्थापन करण्या धर्माचे ॥८॥

जन्म कर्म च मे दिव्यमेवं यो वेत्ति तत्त्वतः । 

त्यक्त्वा देहं पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन ॥ ४-९ ॥ 

जन्म माझा दिव्य पार्था कर्म तथा निर्मल

मोक्ष तया मिळेल जोही या तत्वा जाणेल

देहाला सोडताच तो मजला प्राप्त करेल

पुनरपि मागे फिरोन ना पुनर्जन्मास येईल ॥९॥

वीतरागभयक्रोधा मन्मया मामुपाश्रिताः । 

बहवो ज्ञानतपसा पूता मद्भावमागताः ॥ ४-१० ॥ 

क्रोध भयाला नष्ट  करुनी निस्पृह जे झाले होते

अनन्य प्रेमाने माझ्या ठायी वास करूनि स्थित होते

ममाश्रयी बहु भक्त पावन होउनिया तपाचरणे ते

कृपा होउनी प्राप्त तयांना स्वरूप माझे झाले होते ॥१०॥

– क्रमशः भाग चौथा 

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विनंती… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ विनंती☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

जिकडे बघतो तिकडे मजला

रघुनंदन दिसतो

स्वर्ग सुखाच्या अभिनवतेचे

स्वप्न रोज पाहतो

 

किती काळ लोटला कळेना

विसरत गेलो सारे

पुराणातल्या कथा वाचतो

वर्तमान ही बघतो

 

सुवर्ण भूमी होता भारत

सतत वाचले आहे

आजकालच्या वास्तवतेने

मनात केवळ झुरतो

 

इथे नांदण्या रामराज्य तर

देव म्हणे अवतरतो

हीच खरी तर श्रद्धा ठेवतं

जमेल तसले जगतो

 

फक्त जगाया हवे आता तर

बाळगतो ही इच्छा

विपरीत सारे सुरळीत होण्या

श्री रामाला भजतो

 

कधी यायचे रामराज्य हे

हीच लागली चिंता

दिशाभूल का होत चालली

जगता जगता म्हणतो

 

मळभ मनातील दूर व्हायला

उपाय नाही काही

मार्ग दाखवा तुम्हीच रामा

हीच विनंती करतो

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे  ☆ शकुनी,एक धगधगता सुडाग्नी ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? क्षण सृजनाचे ?

शकुनी, एक धगधगता सूडाग्नी ! ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

 

काळ्या कभिन्न सावल्यात तारूण्याचा मळा

अन् तुटलेल्या काळजात अजरामर कळा

देहच काय, सगळंच होऊन पडलं गलितगात्र

अन् जरा बनलं एक विदुषकाचं पात्र

काय चुकलं माझं? नसानसात घृणा पेटलेली

जळणाऱ्या डोळ्यांनी, युगायुगाची आग ओकलेली

निधड्या छातीनं भर सभेत लाज ओरबाडली

षंढांच्या बाजारात गोळा केली आसवं गाळलेली

माझा विडा कुणी उचलावा? सावलीत खुडलेलं कर्तृत्व

निवडुंगाच्या उलट्या काट्यांनी पोखरलेलं स्वत्व

गंजलेली शस्त्रं अन् झाकोळलेलं आयुष्य, भितीनं!

कुणाच्या बाहुच्या, कुणाच्या बाणाच्या तर कुणाच्या  नितीनं!

बापानं आपलाच भेजा भरवला बाळवाटीनं!

भूत अन् भविष्य ढकलत राहिला जळत्या काडीनं

 कुरवाळायचं कुठल्या आगीला अन् ठेचायचं कुठल्या आगीला

हे ठरवणार कोण? यांच्या कुलस्त्रिया अन् लंपट बासरीवाला!

मी कधीच हरलो नाही अन् हरणार ही नाही

मी कधीच चुकलो नाही अन् चुकलेल्यांना माफही करणार नाही

माझ्या या अवस्थेस कारणीभूत, ही मूर्ख कौरव प्रजा

हा सूड घेण्यात झालो यशस्वी, नष्ट झाला अंध राजा

अजूनही कित्येक सूड आहेत शिल्लक धगधगते

सत् शील, सत् कर्म, सत् वचन यांच्या बुरख्यात होते

युगानुयुगे मी जन्म घेत राहीन, हा सुडाग्नी पेटता राहील

खरे सत्य युग येईल, तेंव्हाच हा आत्मा शांत होईल!

 

कवितेचा अर्थ स्पष्ट होण्यासाठी शकूनीची कथा, त्याच्याच शब्दात! –

काळ कोठडीतला तो एक एक दिवस अजून पोखरतोय. आई, वडील – सुबल ( गांधार देशाचा राजा),सगळी भावंडं यांना भुकेनं तडफडून मरताना पाहिलंय मी! काय गुन्हा होता आमचा? केवळ गांधारीच्या पत्रिकेतील दोष घालवण्यासाठी केलेला तो एक उपाय होता. तो ही राजा ध्रुतराष्ट्राच्या दीर्घायुष्यासाठी!आणि उगाच विधवेशी लग्न लावून दिलं, असा कांगावा केला. त्यात आमचा काही स्वार्थ होता का? अशी ती कोणती कौतुकास्पद, अभिमानास्पद गोष्ट होती की ती सर्वांना आवर्जून सांगावी. असेलही ती आमची चूक, तुम्हाला न सांगण्याची! पण ती तुमच्या चुकीपेक्षा तर मोठी नव्हती.चूक कसली, फसवणूक होती ती आमची, सत्तेच्या बळावर, स्वार्थासाठी केलेली!

भीष्म पितामह गांधारीचा हात मागण्यासाठी आले होते. त्यांना माहीत होतं, आम्हाला नाही म्हणता येणार नाही, इतकं त्या सोयरिकेला राजकीय महत्त्व होतं. आणि होय म्हणणं पण अवघड होतं. शंकर आराध्य असणाऱ्या त्याचा आशीर्वाद असणाऱ्या एका  सुंदर राजकुमारी ने एका अंध राजाशी लग्न का करावं? शेवटपर्यंत राजा गांधारीला विचारत होता, नाही म्हणू या का ? वडिलांची द्विधा मनस्थिती लक्षात घेऊन गांधारीने डोळ्यावर पट्टी बांधली व प्रतिज्ञा केली की ही पट्टी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत अशीच राहील. आणि म्हणाली आता तुमच्या मुलीला योग्य वर मिळाला आहे नं! लग्न झालं, नंतर आम्हा सर्वांना काळ कोठडीत टाकून गांधार राज्य काबीज केलं.

एक बरं केलं, आम्हाला पोटभर अन्न दिलं नाही. त्यामुळे सगळे लवकर गेले, यातनातून मुक्त झाले. पण त्यांनी मला जगवलं. नुसतं जगवलं नाही तर माझ्या मनात सुडाग्नी धगधगत ठेवला. मी षडयंत्र रचण्यात पटाईत होतो. वडिलांनी मला द्युत खेळण्यास शिकविले. त्यांच्या आज्ञेप्रमाणे मनावर दगड ठेवून मी त्यांच्या हाडांचे फासे केले, जे माझ्या आज्ञेत राहणार होते. किती क्रोध, किती मत्सर, किती जळफळाट माझ्या मनात कोंडला असेल याची कोणी कल्पनाच करू शकणार नाही. माझं नशीब बलवत्तर म्हणून मी एकटा उरल्यावर माझी सुटका केली व चक्क राजमहालात प्रवेश दिला. खोटा अहंकार, फाजील आत्मविश्वास, सत्तेचा माज यामुळे त्यांना वाटलं असेल की हा आपलं काय वाकडं करू शकणार! ही गुर्मी माझ्या पथ्यावर पडली आणि मी या संधीचं सोनं करायचं ठरवलं. मी शांत राहून प्रेमाचं नाटक केलं, सगळ्यांचा विश्वास संपादन केला. नको इतकं त्यांना पांडवांच्या विरूध्द भडकवित राहिलो. द्यूत हा माझा हुकुमाचा एक्का वापरला. पांडवांची मानहानी करून कौरवांच्या मनात आणि महालात स्थान पक्कं केलं.

युधिष्ठिर सद्गुणी, सत्यप्रिय  इत्यादी गुणांचा पुतळा असल्यामुळे  त्याच्यावर कुरघोड्या करणं सोपं होतं.इतर पांडव कसेही असले तरी मोठ्या भावाच्या आज्ञेत होते.

कुंती माता तिच्या तीनही मुलांना घेऊन वनातून हस्तिनापूरला आली, त्यांना युध्दाचं शिक्षण देण्यासाठी!तिकडे माद्रीला अश्विनी कुमार यांच्या पासून दोन मुलगे झाले.ते दोघेही वैद्यक शास्त्रात निपुण झाले. जसं मोठ्या झाडाच्या छायेत लहान झाडं खुरटतात, तसं थोडं त्यांचं झालं. सहदेवला त्रिकाल ज्ञानी होण्यासाठी पंडू राजाने अंत्य समयी आपल्या मेंदूचा काही भाग खाण्यास सांगितले. त्याला भविष्याचे ज्ञान झाले, त्यामुळेच द्युत खेळण्यासाठी सगळे निघाले तेंव्हा त्यांना अडविण्याचा आटोकाट प्रयत्न सहदेव ने केला, निदान द्रौपदीला नेऊ नका म्हणाला, त्याच्या म्हणण्याला महत्त्व कोण देणार? विधिलिखित कुणालाच पुसता येत नाही, ते सहदेवला कसं येणार! दैव माझ्या बाजूने होते कारण माझीही बाजू सत्याचीच होती.

कौरवांनी पांडवांना मारण्याचा प्रयत्न बऱ्याच वेळा केला. पण मी निर्धास्त होतो कारण मला माहित होतं की द्रौपदीला वस्त्र पुरविणारा कृष्ण काहीही करू शकतो. पांडव मेले असते तर कौरव मदोन्मत्त झाले असते, मग माझ्या सुडाचं काय? अखेरीस सगळ्या गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडत गेल्या आणि कौरव – पांडव यांच्यात निर्णायक महाभारत सुरू झालं. अर्थात माझ्याबाबतीत सुध्दा विश्वासघात झालाच.दोघांच्या जवळचे बाण संपल्यावर रथावरून उतरून सहदेव बोलणी करण्यासाठी आला म्हणून मी ही रथावरून उतरून आलो तेंव्हा त्याने मला बेसावध पाहून तलवारीने घाव घातला. मृत्यूचं दुःख नव्हतंच. कारण तो युध्दाचा शेवटचा दिवस होता, त्यामुळे एकन् एक कौरव मारला गेला हे माझ्या डोळ्यांनी पाहून मी तृप्त झालो होतो. माझा जगण्याचा उद्देश्य सफल झाला होता. या युद्धात पांडव, यादव सगळेच भरडले गेले. त्यामुळे माझ्या आनंदात भर पडली होती. पांडव, कृष्ण यापैकी कोणाबद्दल ही मनात ओला कोपरा नव्हताच. कारण शक्य असूनही यांच्यापैकी कोणीही आम्हाला सोडवण्यास  आले नव्हते.  तो भीष्म आणि त्याचा हा सगळा पसारा उध्वस्त झालेला पहायचा होता. भले युद्धानंतर कुणी काय गमावलं, कुणी काय कमावलं यावर चर्चा होत राहतील, पण निष्कर्ष एवढाच असेल की फक्त मी हे युद्ध पूर्णपणे जिंकलो! फक्त मी जिंकलो!!!

गुगल वरील महाभारताच्या ‘न ऐकलेल्या गोष्टी ‘  यांच्यावर आधारित

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – ताई… – ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?️?  चित्रकाव्य  ?️?

? “ताई”? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

तव मायेचे छत्र मजवरी छत्रीविना तू कशी

आज अचानक  येता पाऊस  उगाच का भिजशी ….. 

लहान जरी मी तुझ्याहून  तरी घेईन मी काळजी

नको भिजू तू पावसात  या तू तर ताई माझी ….. 

हे ही सरतील दिवस..  आपुले येतील बघ नक्की

जरी धाकटा, होईन मोठा खूणगाठ  ही पक्की……. 

© श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares