मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 213 ☆ मकर संक्रांत ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 213 ?

मकर संक्रांत ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सण आवडता संक्रांतीचा,

अनेक पदर असलेला !

आठवतो…

लहानपणीचा,

काळ्या गर्भ रेशमी ताग्याचा,

वडिलांनी मला आणलेला,

खऱ्या जरीचा– परकर पोलक्यासाठी !

 

आणि आईची चंद्रकळाही !

तीळगुळ वडी, आईचं हळदीकुंकू,

अत्तरदाणी गुलाबदाणी !

 

तिचं काचेच्या बांगड्याचं वेड !

आडव्या खोक्यातले चुडे!

अंगणातील सडा रांगोळी!

आजीचा आशीर्वाद,

“जन्म सावित्री व्हा, सोन्याचे चुडे ल्या!”

 

सुगडं, ओंब्या, ओवसा !

“सीतेचा ओवसा जन्मोजन्मीचा

ओवसा”म्हणत,

सासूबाईंनी दिलेला वसा !

डोईवरचा पदर,

हातभार चुडे..उंबरठ्यात पाय अडे!

 

पण मी “नारी समता मंच” मधे

जायला लागले,

आणि सोडून दिली,

नावापुढे सौ.ची उपाधी लावणं,

हळदीकुंकवाला केला राम राम!

आणि

समजला संक्रांतीचा खरा अर्थ,

नात्यात गोडी असेल तरच

जगणं सार्थ…नाहीतर सारंच व्यर्थ,

संक्रांत आता माझ्या लेखी,

फक्त तिळगुळाच्या देवाणघेवाणीचा !

   समृद्ध जीवनानुभवाचा,

  सण– कर्मकांडाच्या पलिकडचा!

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मकर संक्रांत… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

सौ. मंजुषा सुधीर आफळे

? कवितेचा उत्सव ?

मकर संक्रांत… ☆ 🖋 सौ. मंजुषा सुधीर आफळे ☆

उत्तम पोषण

गोडवा गुळाचा

क्रांती संक्रमण

आधार जगाचा

मऊ मुलायम

तिळाची स्निग्धता

अक्षय हृदयात

निस्वार्थ जपता

स्नेह वृद्धिंगत

होईल सर्वांचा

मकर संक्रांत

सण शुभेच्छांचा

निरोगी मनात

उच्च सुविचार

गोड उच्चारण

विनम्र आचार

आनंद देईल

प्रेमळ  वर्तन

सत्यात येणार

आजचे कवन.

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “तिळगूळ…” ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

? कवितेचा उत्सव ?

☆ “तिळगूळ…” ☆ श्री सुनील देशपांडे

[१]

तिळा मधे गूळ, संक्रांतीचं खूळ

तिळावरचा हलवा, दागिन्यांचं खूळ

पोळीतही आई, घालायची गूळ

गोड गोड बोला, म्हणायचं खूळ

वाटलं का आज, होतं तेही खूळ

शैशवातलं हेच, आनंदाचं मूळ

[२]

तिळात ना स्नेह. गुळात ना गोडी

संक्रांतीची खोडी,    काढू नये.

भाकरी न लोणी, गुळपोळीची न चव

संक्रांतीला जेव,   म्हणू नये

लाडूही ना वडी,  ना हलव्याचा घोळ

त्याचे गोड बोल,  मानू नये

विकतचे सारे,  विकतची गोडी

कसे प्रेम जोडी, सुन्या म्हणे.

[३]

शब्दांचीच गोडी,  शब्द प्रेम जोडी

शब्द तोडी जोडी,  मित्र भाव

गुळाचीच गोडी,  तीळ स्नेह जोडी

तिळगुळ जोडी, मित्र भाव

मित्र भाव मनी, शिवी देई कोणी

तरी जागे मनी, प्रेम भाव

प्रेमाची महती,  तिळगूळ चित्ती

शब्द जागवीती, प्रेम भाव

कडू गोड शब्द, मित्र भावे बद्ध

जोडी सारे शब्द, प्रेम भाव

मनामध्ये सदा, गोडभाव हवा

तेंव्हाच शब्दांना, गोडी खरी

मुखामधे येई,  शब्द कोणताही

मैत्री स्नेह देई, सुन्या म्हणे.

© श्री सुनील देशपांडे

मो – 9657709640

email : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #220 ☆ तन काटेरी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 220 ?

तन काटेरी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

तन काटेरी आत गोडवा

जीवन अपुले असेच घडवा

नको दुरावा नकोच भांडण

नकोच प्रेमाचे या शोषण

तीळगुळासम हृदये जुळवा

तन काटेरी आत गोडवा

हलवा करतो अमृत सिंचन

मुखात असुद्या असेच वर्तन

क्रोध अंतरी किल्मिष दडवा

तन काटेरी आत गोडवा

रंग बिरंगी पंतग आपण

आकाशाचे करुया मापन

अभेद उंची अशी वाढवा

तन काटेरी आत गोडवा

दोर तुटला तरीही झुलतो

वाऱ्यासोबत मस्ती करतो

बालचमुंनी झेलुन घ्यावा

तन काटेरी आत गोडवा

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अनुमान… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ अनुमान… ☆ श्रीशैल चौगुले ☆

अनुमान लावून कधी, जगणे होत नाही

 वचनांची देऊन हमी, भेटणे होत नाही.

आयुष्याची उघडी पाने, मोजणे होत नाही

भावनांनी वेढली मने, वेचणे होत नाही.

हृदयाची केवळ भाषा, बोलणे होत नाही

विस्कटले हवेत क्षण, जोडणे होत नाही.

विरहाचे बंधन दुःख, आकार होत नाही

नजरेत स्वप्नांचे चित्र, साकार होत नाही.

कवणांची साधता साथ, आकांत होत नाही

शब्दांनीच बांधता गाठ, एकांत होत नाही.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ तूच गं ती… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि श्री सुहास सोहोनी ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  तूच गं ती… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि श्री सुहास सोहोनी ☆

श्री आशिष बिवलकर   

? – तूच गं ती… – ? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

( १ )

कोल्ह्याला द्राक्ष लागतात आंबट,

तो ही पून्हा एकदा बघेल चाखून |

मादक सौंदर्य तुझं लावण्यवती ,

कोणीही न्याहाळेल श्वास रोखून |

कामुक नजरेतून तूझ्या सुटती,

मदनाचे मनमोहक बाण |

घायाळ  करतेस पामरांना,

एका अदेत होतात गतप्राण |

विश्वमित्राची तपश्चर्या भंग करणारी,

मेनका तूच ग तीच असणार |

कलयुगात  पुन्हा अवतरलीस,

सांग आता ग कोणाला तू डसणार |

द्राक्षांचे घड मिरवतेस अंगावर,

उगाच कशाला वाढवतेस त्यांची गोडी |

एक एक द्राक्ष झाला मदिरेचा प्याला,

नकोस ग काढू खाणाऱ्यांची खोडी |

चालण्यात ऐट तुझ्या,

साज तुझा रुबाबदार |

ऐन गुलाबी थंडीत,

वातावरण केलेस ऊबदार |

महाग केलीस तू द्राक्ष,

गोष्ट खरी सोळा आणे |

अजून नको ठेऊ अंगावर,

होतील ग त्यांचे बेदाणे |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

श्री सुहास सोहोनी

? – तूच गं ती… – ? ☆ श्री सुहास सोहोनी ☆

( २ ) 

आधीच तुझ्या नजरेत केवढी

ठासून दारू भरलेली

त्यात आणखी द्राक्षांनीच तू

आपादमस्तक भारलेली ll

तूच सांग बाई आता

किती नशा झेपवायची

आधीच केवढी तप्त भट्टी

आणखी किती तापवायची ??

वाईन करण्यापूर्वी द्राक्षे

अशीच “पक्व”त असतील काय ?

दूध तापण्यापूर्वीच त्यावर

अशीच “डक्व”त असतील साय ??

जे काही करीत असतील

करोत,आपलं काय जातं

समोर आहे खाण तोवर

भरून घेऊ आपलं खातं ll

कवी : AK (काव्यानंद) मराठे

कुर्धे, पावस, रत्नागिरी

मो. 9405751698

प्रस्तुती : श्री सुहास सोहोनी 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ झाडं… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ झाडं☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

आजवर उच्यपदस्थ म्हणून मिरवणाऱ्या भामट्यांनो आता तुम्ही खरेच जागे व्हा

बांडगुळांसारखे अधांतरी जगणं सोडून

जरा झाडाबुडीच्या संस्कारक्षम मातीवर या

 

 म्हणजे कळेल तुम्हाला जगवणाऱ्या मुळांची कशी असते दशा आणि कोणती असते दिशा

 

 आम्ही मूळं होऊन जगवलाय डवरलेला समाज वृक्ष

 प्रसन्नतेने डुलणारा डवरणारा निसर्ग नियमांचे पालन करून

 

 मूळं, खोड, फांद्या, फुलं, फळं हे अवयवच आमचे

एकजिन्सी होऊन मातीच्या मांडीवर हसत खेळत ताठ मानेने उभे आहोत

 आणि तुम्ही ऐतखाऊ होऊन अधिपत्य गाजवायला कसे काय आलात रे तिथं अचानक

 

आजवर तुम्ही ज्ञानाचे पोशिंदे म्हणूनच वावरलात

 केलात घात आमचा

 आम्हाला मातीत गाडून

 पण आम्ही कुजणारे नाही वाढणारे आहोत

 हे कसं काय विसरलात ?

रोज उगवणारा नवा सूर्य देतोय नवी ऊर्जा आम्हाला

त्यानं आपली पिलावळ पेरली आहे आमच्या मातीत

तीच तर आता तरारून वाढते आहे

 नवे क्षितीज कवेत घेऊन

त्यांनी केलाय ज्ञानाचा मुलुख पादाक्रांत

मुळांचा उद्धार करण्यासाठी

 

 आता होतील मूळं मजबूत

 वाढेल समाजवृक्ष पुन्हा

बळकट होऊन

पिलावळीतील ग्रह गोल तारे सुद्धा करतील तुमचा खात्मा

सगळ्याच प्रकारची झाडं

निकोप होऊन वाढावीत म्हणून

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 156 ☆ हे शब्द अंतरीचे… अंगणात माझ्या… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

 

?  हे शब्द अंतरीचे # 156 ? 

☆ हे शब्द अंतरीचे… अंगणात माझ्या…! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/

अंगणात माझ्या उभा तो प्राजक्त

सुगंध त्याचा दरवळे नित आसमंत  १

त्याचा प्रश्न सदैव एकच असतो

एकटाच का बरे तू नेहमी असतो    २

नाही कुणी तुला जीव लावणारे

तुझ्यावरी पंचप्राण ते ओवळणारे   ३

नाही का तुझ्या हृदयात कोणी

प्रेमळ हृदयाची जीवन-सांगिनी    ४

प्रेम कधीच नाहीका तुला कुणावर झाले

का कुणीच नाही तुझ्यावर कधी प्रेम केले   ५

हास्य करतो मी फक्त तेव्हा त्या क्षणाला

बोलूच काय मी या चित्तचोर प्राजक्ताला   ६

हृदयात वसते माझ्या अनामिक एक ती

जिच्या साठी जगतो मी दिन आणि राती  ७

तिचे प्रेम लाभेल मनीं आस आहे

तिचे सौख्य लाभेल मी अश्वस्थ आहे   ८

येईल कधीतरी ती आहे विश्वास माझा

आरे प्राजक्ता तू फक्त दे रे साथ माझा… ९

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ औक्षवंत हो… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

सौ राधिका भांडारकर

? काव्यानंद ?

☆ निशाशृंगार… डॉ निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ राधिका भांडारकर ☆

☆ – औक्षवंत हो – डॉ निशिकांत श्रोत्री ☆

काजळ घेउनिया नयनीचे तीट लावते तुला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।ध्रु।।

 

पहिली बेटी ही धनपेटी म्हणती दांभिक सारे

आदिशक्ती तू माझ्या पोटी कौतुक मजला न्यारे

जीवन माझे सार्थ जाहले उधाण आनंदाला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।१।।

 

सीता तू अन् तूच द्रौपदी तूच जिजाऊ माता

गार्गी बनुनी विदुषी होई तारी या भारता

सुनीता राणी अवकाशाची धन्य मानवी बाला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।२।।

 

कृतघ्न किती हा मानव झाला तुझ्या जीवावर घाला

वाढविते तू वंशा, निर्घृण तुझाच वैरी झाला

तेजस्विनी हो, सौदामिनी हो,लखलखती  तू ज्वाला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।।३।।

 

पत्नी जरी तू एका क्षणाची माता तू कालाची

संस्काराचे सिंचन करिते सरस्वती ज्ञानाची

गर्भपात ना कधी घडावा अभय मिळू दे तुला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।।४।।

 

 – डॉ. निशिकांत श्रोत्री.(निशिगंध)

काव्यनन्द

यत्र नार्यस्तु पूज्यन्ते

   रमन्ते  तत्र देवता:।।

पिढ्यानुपिढ्या जपलेलं हे सुंदर विचारांचं, सुसंस्काराचं सुभाषित.  पण प्रत्यक्ष जगताना, अवतीभवतीची पीडित स्त्री जीवनं  पाहताना मनात नक्कीच येतं की सुभाषितं ही फक्त कागदावर. समाज मनावर ती कोरली आहेत का? खरोखरच नारी जन्माचा सोहळा होतो का? स्त्री आणि पुरुष यांचा  दोन व्यक्ती म्हणून विचार करताना सन्मानाच्या वागणुकींचं  पारडं नक्की कुणाकडे झुकतं? आजही एकतरी मुलगा हवाच ही मानसिकता कमी झालेलली नाही. पण जिच्या उदरातून हा वंशाचा दिवा जन्म घेतो तिचा मात्र सन्मान होतो का?

“ तुम्हाला दोन मुलीच?”

 या प्रश्नांमध्ये दडलेला,” मुलगा नाही?” हा प्रश्न बोचरा नाही का?

 अनेक शंका उत्पन्न करणारे असे प्रश्नही असंख्य आहेत. सुधारलेल्या समाजाची व्याख्या करतानाही हे प्रश्न सतत भेडसावत असतातच आणि याच पार्श्वभूमीवर औक्षवंत हो ही डॉक्टर निशिकांत श्रोत्री यांची गीतरचना माझ्या वाचनात आली आणि मी खरोखरच हे काव्य वाचून प्रभावित झाले. त्याचे मुख्य कारण म्हणजे या काव्याचा उगम एका पुरुष मनातून व्हावा याचे मला खूप समाधान आणि तितकेच अप्रूपही वाटले.

हे गीत  वाचल्यावर प्रथमतःच मनासमोर उभी राहते ती प्रेमस्वरूप, वात्सल्य सिंधू आईच. ज्या मातेने नऊ महिने स्वतःच्या उदरात एक गर्भ मोठ्या मायेने  वाढविलेला असतो त्याला जन्म देताना मातृत्वाच्या भावनेने ती ओथंबलेली असते, मग ते मातृत्व मुलाचं की मुलीचं हा प्रश्नच उरत नाही.  कुशीत जन्मलेल्या बाळाची ती आणि तीच फक्त माताच असते.

 काजळ घेऊनिया नयनीचे तीट लाविते तुला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।ध्रु।।

नुकत्याच सोसलेल्या प्रसूती वेदना ती क्षणात विसरलेली आहे आणि जन्मलेल्या आपल्या कन्येला हातात घेताना प्रथम तिच्या मुखातून उद्गार निघतात,” माझ्या डोळ्यातल्या काजळांचं तीट तुला लावते बाळे,  औक्षवंत हो! दीर्घायुषी हो! हाच आशीर्वाद मी तुला देते.”

या ध्रुपदाच्या  दोन ओळींमध्ये अनेक अर्थ दडलेले आहेत. हा एका नुकतंच मातृत्व लाभलेल्या आईने जन्मलेल्या अथवा तिच्या गर्भात वाढत असणाऱ्या स्त्रीअंकुराला दिलेला आशीर्वाद तर आहेच.  पण औक्षवंत हो म्हणताना कुठेतरी तिच्या मनात भय आहे की माझ्या या  मुलीच्या जन्माचा सन्मान होईल का? तिच्यावर कधी अशी वेळ येऊ नये की तिला अर्धवटच हे जगणं सोडून द्यावं लागेल कारण सद्य समाजाविषयी ती कुठेतरी मनोमन साशंक आहे.

आणि म्हणूनच कदाचित तिला आपल्या बाळीला कुणाचीही नजर लागू नये,सर्व दुष्ट शक्तीपासून तिचे रक्षण व्हावे याकरिता डोळ्यातले काजळरुपी तीट लावावेसे वाटत आहे.

 पहिली बेटी ही धन पेटी म्हणती दांभिक सारे

आदिशक्ती तू माझ्या पोटी कौतुक मजला न्यारे

जीवन माझे सार्थ जाहले उधाण आनंदला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।१।

“म्हणताना म्हणतात हो सारे, पहिली बेटी धनाची पेटी असते. पण ओठावर एक आणि मनात एक असणारे हे सारेच ढोंगी आहेत. पण मी मात्र तुझी आई आहे. माझ्या उदरी जणू काही तुझ्या रूपानने आदीमायेनेच जन्म घेतला आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. तुझ्या जन्माने माझी कूस पावन झाली, माझ्या जीवनाची सार्थकता झाली आणि या माझ्या आनंदाला पारावरच नाही. सुखी दीर्घायुष्याचे सगळे मार्ग तुझ्यासाठी मुक्त असावेत हेच माझे आशीर्वचन आहे.”

आशीर्वादाऐवजी कवीने योजलेला आशीर्वचन हा शब्द मला खूपच भावला.  जन्मापासूनच तिने आपल्या कन्येचा योग्य प्रतिपाळ करण्याचा जणू काही वसा घेतला आहे. तिने तसे स्वतःला वचनबद्ध केले आहे असे या शब्दातून व्यक्त होते.

 सीता तू आणि तूच द्रौपदी तूच जिजाऊ माता

 गार्गी बनुनी विदुषी होईल तरी या भारता

 सुनीता राणी अवकाशाची धन्य मानवी बाला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।२।

मुलगी झाली म्हणून त्या मातेला कणभरही कमीपणा वाटत नाही. उलट ती त्या जन्मलेल्या निरागस स्त्री अंशात सीता, द्रौपदी, जिजाऊ माता, विदुषी गार्गी, अगदी अलीकडच्या युगातली अंतराळ वीरांगना सुनीता विल्यमलाच पहात आहे. अशा अनेक गौरवशाली स्त्री व्यक्तिमत्त्वांची तिला आठवण होते आणि आपली ही बालिका ही एक दिवस अशीच दैदिप्यमान कर्तुत्वशाली व्यक्ती असेल असे सुंदर स्वप्न ती पाहते आणि त्या क्षणी पुन्हा पुन्हा ती तिला औक्षवंत हो, कीर्तीवंत हो ,यशवंत हो असे आशिष देत राहते.

कृतघ्न किती हा मानव झाला तुझ्या जीवावर घाला

वाढविते तू वंशा निर्घुण तुझाच वैरी झाला

तेजस्विनी हो सौदामिनी हो लखलखती हो ज्वाला

 औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला।३।

मनातल्या ममतेच्या,वात्सल्येच्या वेगाबरोबरच त्या नुकत्याच, या जगात जन्म घेतलेल्या स्त्री जीवाला दुष्ट, संहारी समाजापासून सावध करण्याचेही भान बाळगते. खरं म्हणजे स्त्री ही सृजनकर्ती, जगाची निर्मिती प्रमुख. तिच्याच उदरातून कुळाचा वंश जन्म घेतो. तिच्याशिवाय ज्याचा जन्मच अशक्य आहे तिचाच मात्र तो वैरी बनतो आणि तिची निर्घृण हत्या करण्यास पुढे सरसावतो. ही केवढी विसंगती आहे!  पण तरीही ही धीरोदत्त माता आपल्या हातातल्या त्या निष्पाप, अजाण, कोवळ्या कळीला समर्थ, सक्षम करण्यासाठी म्हणते,”तू नको कसले भय बाळगूस. तू  मूर्तिमंत तेज हो, थरकाप उडवणारी चपला (वीज) हो, गगनाला भिडणारी लखलखती ज्वाला हो.

तेजस्विनी सौदामिनी ज्वाला हे तीनही शब्द तळपणाऱ्या व्यक्तिमत्त्वासाठीच आहेत. कवीने या तीन शब्दांची औचित्यपूर्ण गुंफण केली आहे. आईच्या मनातले समर्थ, बलवान, धारदार विचार ते सुंदरपणे व्यक्त करतात.

 पत्नी जरी तू एक क्षणाची माता तू कालाची

संस्काराचे सिंचन करते सरस्वती ज्ञानाची

 गर्भपात ना कधी घडावा अभय मिळू दे तुला

औक्षवंत हो माझ्या बाळे आशीर्वच हे तुला ।४।

स्त्री जन्माविषयी असेच म्हणतात ना? क्षणाची पत्नी आणि अनंत कालची माता.  किती सार्थ आहे हे भाष्य! मातृत्व ही अशी भावना आहे किंवा अशी भाववाचक संज्ञा आहे की जिचा काल अनंत आहे. ज्या क्षणापासून तिच्या उदरात गर्भ रुजतो त्या क्षणापासून ते तिच्या जीवनाच्या अंतापर्यंत ती केवळ आणि केवळ माताच असते. स्वतःच्या उदरातून जन्माला आलेल्या तिच्याच अंशाच्या सुखासाठी, स्वास्थ्यासाठी ती अविरत झटत असते. या काव्यामधली ही माता म्हणूनच त्या अंशाला तिच्या जन्माचं महत्त्व पटवून देते. तिला संस्काराचे सिंचन करणारी सरस्वती, ज्ञानदा म्हणून संबोधते आणि निस्सिमपणे एक आशा मनी बाळगते की कळी उमलण्यापूर्वीच  खुडली न जावो. केवळ “मुलीचा गर्भ” हे निदान होताच तिची गर्भातच हत्या कधीही न होवो. आणि म्हणूनच या ठिकाणी औक्षवंत हो या आशीर्वाचनाला खूप व्यापक असा अर्थ लाभतो.

*अनंत कालची माता*हा स्त्रीविषयीचा उल्लेखही खूप विस्तारित अर्थाचा आहे. आयुष्याच्या एकेका टप्यावर पती पत्नीचं नातंही नकळत बदलतं. शृंगारमय यौवनाचा भर ओसरतो आणि त्याच पतीची ती उत्तरार्धातच नव्हे तर वेळोवेळी कशी मातेच्या रुपात भासते हेही सत्य नाकारता येत नाही.मातृत्व हा स्त्रीचा स्थायी भाव आहे. ती पुत्राचीच नव्हे तर पतीचीही माता होते. असंहे मातृत्व खरोखरच अनंतकाली आहे.

 डॉक्टर श्रोत्रींना मी मनापासून वंदन करते, की या गीत रचनेतून त्यांनी स्त्रीचे महात्म्य अधोरेखित करणारा केवढा मौल्यवान संदेश समाजाला दिला आहे! भृणहत्ये विरुद्ध उभारलेलं हे एक काव्यरूपी शस्त्रच आहे.हे गीत वाचल्यावर निश्चितपणे जाणवते ते हे की हे एका कन्येची माता होणाऱ्या अथवा झालेल्या स्त्रीचे मनोगत आहे. कदाचित जन्मलेल्या कन्येशी किंवा गर्भांकुराशी होत असलेला हा एक प्रेमळ,ममतापूर्ण तरीही काहीसा भयभीत, चिंतामिश्रित संवादही आहे.. आपल्या उदरात वाढणारा गर्भ हा मुलीचा आहे असे समजल्यावर तिने सर्व समाजमान्य कल्पनांना डावलून केलेला एक अत्यंत बलशाली निर्धार आहे. तितक्याच समर्थपणे ती  तिच्या गर्भासाठी एक संरक्षक कवच बनलेली आहे.

सर्वच दृष्टीने हे गीत अर्थपूर्ण आणि संदेशात्मक आहे. मातेची महती सांगणारे आहे.

वात्सल्य रसातले तरीही वीरश्रीयुक्त असे रसाळ, भावनिक गीत आहे,

धनाची पेटी तेजस्विनी सौदामिनी ज्वाला आणि ती लखलखती या स्त्रीला दिलेल्या उपमा खूपच सुंदर वाटतात, आणि यथायोग्य वाटतात.

सारे —न्यारे” माता —भारता’ घाला— झाला— जीवाला ही यमके यातला अनुप्रास हा अतिशय डौलदार आहे.

साधी, सहज भाषा, नेमके शब्द अलंकार, वजनदार तरीही अवघड न वाटणारे सुरेख नादमय शब्द यामुळे औक्षवंत हो हे गीत मनावर एक वेगळीच जादू करते. एका वेगळ्याच भावना प्रवाहात अलगद घेऊन जाते.

© सौ. राधिका भांडारकर

ई ८०५ रोहन तरंग, वाकड पुणे ४११०५७

मो. ९४२१५२३६६९

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ धागेदोरे… ☆ सुश्री सुनीता पाटणकर

सौ. सुनीता पाटणकर

? मनमंजुषेतून ?

☆ धागेदोरे… ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆

धागेदोरे तीनशे पासष्ट दिवसांचे, विणतो आपण …. 

सुख दुःखाचे, प्रेमाचे, आनंदाचे,

मैत्र जोडतो, कधी फटकारतो, रुसतो, भुलतो,

कधी ताणतात, कधी सैलावतात, बंध‌ नात्याचे,

 

पौष घेऊन येतो संक्रांत,

” तिळगुळ घ्या अन् गोड बोला म्हणत.”……..

हळदीकुंकू वाण, दागिने हलव्याचे, आणि रथसप्तमी सूर्याची आराधना,

 

येई फाल्गुन .. … प्रेमरंगात रंगे रंगपंचमी,

भलेबुरे जाळायला होळी,

 

चैत्राची पालवी फुटली, गुढीपाडव्याला गुढी उभारली,

गुढी ऐक्याची, सद् भावाची, देशभक्तीची,

सुरु होतं हिंदू नववर्ष,

चैत्रागौर, हळदीकुंकू, डाळ, पन्ह, उसळ हरभऱ्याची,

 

हापूस, पायरीचे आगमन, घरोघरी आमरस पुरीचे जेवण,

वैशाखाचे रणरण ऊन,

परीक्षा,अभ्यास, सुट्टी, निकाल, धामधुम,

 

पावसाची चाहूल, रिमझिम, रिपरिप,

कृषीवलांची‌ लगबग, नांगरणी, पेरणी,

मुलांची सुट्टी संपली, शाळा, कॉलेज, रेनकोट,छत्री, पुस्तक,वह्या, गणवेश,

 

जेष्ठाचे आगमन,… ललनांची‌ वटसावित्री,

आषाढस्य प्रथम दिवसे म्हणत, येणारा मेघदूत,

निसर्गपूजा, बैलांचे कौतुक बैलपोळा.. 

 

श्रावण आला, पूजा नागोबाला…. 

सोमवारी शिवामूठ, मंगळवारी मंगळागौरी,

बृहस्पति पूजा बुधवारी, शुक्रवारी लक्ष्मी येई घरी,

शनिवारी मुंज मुलांना जेवण, रविवारी आदित्यांचे पूजन,

नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, भावाबहीणीच गठबंधन,

रोज गोडधोड … खीर, दींड, पुरणपोळी, नारळीभात, खांतोळी, पेढे,बर्फी, मेवामिठाई,

मसालेभात, कटाची आमटी, भजी, वडे डाव्या बाजूला,

 

पाठोपाठ गणराया आला … सुशोभन, रांगोळी 

गणेशाचे आगमन …. पूजा आरती,मंत्रपुष्पांजली … आली,आली मोदकांची थाळी,

 

अश्विनात विजयादशमी … लगेचच येणार दिवाळी,

आकाशकंदील, किल्ला… फराळाचा हल्लगुल्ला,

वसुबारस, धनत्रयोदशी, लक्ष्मीपूजन, पाडवा, भाऊबीज,

पाहुण्यांची लगबग, तुळशीच लग्न, घरच्या लग्नांचे मुहूर्त, “शुभमंगल सावधान”,

 

मार्गशीर्षातल्या गुरुवारी श्रद्धेने पूजन, उपवास करिती महिला,

म्हणेतो,येतो नाताळ, तो साहेबाचा … परिणाम थोडा गुलामीचा,

 

असे संपतात बारा महिने, संकल्प राहतात अधुरे,

पुन्हा नववर्ष, नित्य,नवा हर्ष, उभारी, नवे संकल्प, उत्साहाचे वारे  

 

जीवनाचं हेच असे सार … 

इंग्रजी महिन्यातच जगतो, तरी मराठे महिने जगवूया,

ते पाठ‌ करण्याचा संकल्प करुया,

 

इतकीच छोटीशी इच्छा,

….. नववर्षाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा……

© सौ. सुनीता पाटणकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares