मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मराठी माझी… ☆ सौ. प्रतिभा संतोष पोरे ☆

सौ. प्रतिभा संतोष पोरे 

? कवितेचा उत्सव ?

☆ मराठी माझी ☆ सौ. प्रतिभा संतोष पोरे ☆

✒️

वर्णमालेची लाभे श्रीमंती

अक्षर अक्षरांची महती

उच्चाराची गोड प्रचिती

समृद्ध असे मराठी माझी।१।

✒️

संस्कृत भाषेचीच लिपी

वृत्त, अलंकार शोभती

वाक्प्रचार, म्हणी व्याप्ती

देई ज्ञान मराठी माझी।२।

✒️

नवरसांची सजे पेरणी

काव्यसुमनांची पुरवणी

अभंग ,भारूडात देखणी

 गोड गाण्यात मराठी माझी।३।

✒️

महाराष्ट्राची प्रिय मायबोली

मनामनांसी लिलया जोडी

अभ्यासे गवसेना हिची खोली

शिलालेखावरी मराठी माझी।४।

✒️

ज्ञानदेव, तुकारामांची लेखणी

एकनाथ , नामदेवांच्या गायनी

जात्यावर ओव्या गाई जनी

संतांची अभिव्यक्ती मराठी माझी।५।

✒️

मराठी परंपरेचा राखू मान

मातृभाषेचा करूया सन्मान

बोलून, लिहून वाढवू शान

अंतरात साठवू मराठी माझी।६।

शब्दसखी प्रतिभा

✒️

© सौ. प्रतिभा पोरे

पत्ता – ‘सोनतुकाई’, शांतीसागर कॉलनी, सांगली – भ्रमणध्वनी क्रमांक – ८७८८४५८६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 211 ☆ माय मराठी… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

 

? कवितेचा उत्सव # 211 – विजय साहित्य ?

☆ माय मराठी ☆ कविराज विजय यशवंत सातपुते  ☆

माय मराठी मराठी, बकुळीचा दरवळ

दूर दूर पोचवी गं , अंतरीचा परीमल . . . !

*

कधी ओवी ज्ञानेशाची ,कधी गाथा तुकोबांची

शब्द झाले पूर्णब्रम्ह, गाऊ महती संतांची. . . . !

*

संतकवी, पंतकवी,संस्कारांचा पारीजात .

रूजविली पाळेमुळे, अभिजात साहित्यात. . . !

*

कधी भक्ती, कधी शक्ती,कधी सृजन मातीत

नृत्य, नाट्य, कला,क्रीडा,धावे मराठी ऐटीत. . !

*

माय मराठीची वाचा,लोकभाषा अंतरीची .

भाषा कोणतीही बोला,नाळ जोडू ह्रदयाशी . . !

*

कधी मैदानी खेळात,कधी मर्दानी जोषात.

माय मराठी खेळते,पिढ्या पिढ्या या दारात. ..!

*

कोसा कोसावरी बघ, बदलते रंग रूप.

कधी वर्‍हाडी वैदर्भी,कधी कोकणी प्रारूप. . . !

*

माय मराठीचे मळे ,रसिकांच्या काळजात.

कधी गाणे, कधी मोती,सृजनाच्या आरशात. . !

*

महाराष्ट्र भाषिकांची,माय मराठी माऊली

जिजा,विठा,सावित्रीची,तिच्या शब्दात साऊली . !

*

अन्य भाषिक ग्रंथांचे,केले आहे भाषांतर

विज्ञानास केले सोपे,करूनीया स्थलांतर. . . !

*

शिकूनीया लेक गेला,परदेशी आंग्ल देशा

माय मराठीची गोडी, नाही विसरला भाषा. . . !

*

नवरस,अलंकार,वृत्त छंद,साज तिचा .

अय्या,ईश्य,उच्चाराला,प्रती शब्द नाही दुजा.. !

*

माय मराठीने दिला,कला संस्कृती वारसा

शाहीरांच्या पोवाड्यात,तिचा ठसला आरसा. !

*

माय मराठीने दिली,नररत्ने अनमोल.

किती किती नावे घेऊ,घुमे अंतरात बोल. . .!

*

माय मराठी मराठी,कार्य तिचे अनमोल .

शब्दा शब्दात पेरला,तीने अमृताचा बोल. . !

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ – अभिमान  मराठी…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?  कवितेचा उत्सव ?

☆ अभिमान  मराठी ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

माय मराठीच्या दुधाची

साय मी खातो!

गोडवे अभिमानाने

तिचे मी गातो! 

*

अमृताहून असे

मायमराठी  गोड!

ज्ञानदात्या सरस्वतीला

तिचेच असे ओढ!

*

काय सांगू अल्पमती मी

तिची  थोरवी!

हेवा करी  तिचा  तो

तेजपुंज रवी!

*

काय सांगू तिची

ती शीतलला!

शशीला हेवा वाटे

पाहून कोमलता!

*

तिच्या कुशीत बागडले

थोरसंत अन् महाकवी!

गद्य,पद्य, कथा, पटकथा,

रसाळ गाथा अन ओवी!

*

तिची  लेकरे  लावती

झेंडे अटके पार!

दिल्लीचे तख्त राखती

पराक्रम गाजवी अपार!

*

मोकळे पणाने

होतो मराठीत व्यक्त!

धमन्यातून सळसळे

माय मराठीचे रक्त!

*

अभिजात असे माझी

मराठी भाषा!

अज्ञानास ज्ञानी करी

तिच्यात आशा!

*

उंची तिची मोजताना

थिटे  पडे आकाश!

उदरातुन तिच्या वाहे

ज्ञानाचा  प्रकाश!

 

वास्तवरंग

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मराठी” च्या काही व्याख्या… — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

मराठी” च्या काही व्याख्या… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

मराठी कशी आहे.. म्हणजे मराठी म्हणजे काय असे मला वाटते ..  ते या काही व्याख्यांमधून मांडण्याचा प्रयत्न…  मराठी भाषादिनानिमित्त…

 नामनात प्रत्येकाच्या

 राहणारी अशी 

 ठीपक्या ठीपक्यांची सुंदर रांगोळी…… ती मराठी.

 

न्जूळ नादाने 

रात्रंदिवस जी

ठीबकते मन पिंडीवर…… ती मराठी.

 

शाल चंद्राची पेटलेली असताना

रात्रीच्या त्या रम्य आकाशात

ठीणग्या चांदण्यांच्या सांडते…… ती मराठी

 

हाल शब्दांचा सजवून

राग विविध छेडून

ठीकठिकाणी रसाळता शिंपडणारी …… ती मराठी

 

धुर मिलनाची ओढ मनात ठेउन

राजीव अंतरंगी फुलवत 

ठीय्या मनाचा घेऊन क्षणात अंगी भिनते …… ती मराठी

 

हान लेणीमध्ये 

राष्ट्रीयतेचा झेंडा हाती फडकवत

ठीक-या न उडालेला शीलालेख ……. ती मराठी

 

नगाभा-यात जळणारी कापराची लडी जी

रानावनातून भरून वाहणारी दुथडी जी

ठीगळे जोडून ऊब देणारी गोधडी जी ……ती माय मराठी

 

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पाचवा— कर्मसंन्यासयोग — (श्लोक २१ ते २९) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पाचवा— कर्मसंन्यासयोग — (श्लोक २१ ते २९) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

बाह्यस्पर्शेष्वसक्तात्मा विन्दत्यात्मनि यत्सुखम् ।

स ब्रह्मयोगयुक्तात्मा सुखमक्षयमश्नुते ।।२१।।

*

आसक्ती ना विषयसुखांची अंतर्यामी सुखानंद 

ध्यान तयाचे परब्रह्मी  निरंतर समाधानानंद  ॥२१॥

*

ये हि संस्पर्शजा भोगा दु:खयोनय एव ते ।

आद्यन्तवन्त: कौन्तेय न तेषु रमते बुध: ।।२२।।

*

सुखदायी जरी भासती गात्रविषय भोग

दुःखदायी ते खचित असती तू त्यांना त्याग

क्षणात ते भंगुनिया जाती अनित्य ते अर्जुना

प्रज्ञावान विवेक ठेवी रुची त्यांच्यातुनी  ना ॥२२॥

*

शक्नोतीहैव य: सोढुं प्राक्शरीरविमोक्षणात् ।

कामक्रोधोद्भवं वेगं स युक्त: स सुखी नर: ।।२३।।

*

अधीन केले षड्रिपुविकार याची देही इहलोकी

जाणावे त्या योगी म्हणुनी तोच खरा या जगी सुखी ॥२३॥

*

योऽन्त:सुखोऽन्तरारामस्तथान्तर्ज्योतिरेव य: ।

स योगी ब्रह्मनिर्वाणं ब्रह्मभूतोऽधिगच्छति ।।२४।।

*

अंतरात्म्यात सुखी रत  आत्म्यात ज्ञानतेज जया प्राप्त 

योगी अद्वैत परमात्म्याशी शांत ब्रह्म तयासी  प्राप्त  ॥२४॥

*

लभन्ते ब्रह्मनिर्वाणमृषय: क्षीणकल्मषा: ।

छिन्नद्वैधा यतात्मान: सर्वभूतहिते रता: ।।२५।।

*

पापाचे ज्याच्या होत विमोचन  तमकिल्मिष नष्ट प्रकाश ज्ञान

सर्वभूत हितात रत मन परमात्मे स्थित ब्रह्मवेत्त्या परब्रह्म प्राप्त ॥२५॥

*

कामक्रोधवियुक्तानां यतीनां यतचेतसाम् ।

अभितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनाम् ।।२६।।

*

कामक्रोधापासून अलिप्त वश जया चित्त

परब्रह्म त्या साक्षात्कार परमात्मा हो सर्वत्र ॥२६॥

*

स्पर्शान्कृत्वा बहिर्बाह्यांश्चक्षुश्चैवान्तरे भ्रुवो: ।

प्राणापानौ समौ कृत्वा नासाभ्यन्तरचारिणौ ।।२७।।

यतेन्द्रियमनोबुद्धिर्मुनिर्मोक्षपरायण: ।

विगतेच्छाभयक्रोधो य: सदा मुक्त एव स: ।।२८।।

*

वैराग्य मनी रुजवुन । अलिप्त विषयांपासुन ॥

पंचेंद्रिय बुद्धी मन । सदा अपुल्या स्वाधिन ॥ 

भ्रूमध्यात दृष्टी स्थिर । प्राणापानासी रोखून ॥

ऐक्य हो सुषुम्नेतुन । ध्यानातुनी राही मग्न ॥

भयक्रोधेच्छा समस्त ।  नष्ट करूनी त्यागत ॥

वास्तव्य जरी देहात । मोक्षपरायण  मुक्त ॥२७-२८॥

*

भोक्तारं यज्ञतपसां सर्वलोकमहेश्वरम् ।

सुहृदं सर्वभूतानां ज्ञात्वा मां शान्तिमृच्छति ।।२९।।

*

मला जाणतो माझा भक्त यज्ञ तपांचा भोक्ता

सर्वलोक महेश्वर मी सुहृद म्हणोनी  सर्वभूता

प्रेमळ दयाळू निःस्वार्थी मी त्रिकाल आहे पार्थ

जाणीतो मनी हे तत्त्व  तयास शांती हो प्राप्त  ॥२९॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे कर्मसंन्यासयोगो नाम पंचमोऽध्याय: ।।५।।

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी कर्मसंन्यासयोग नामे निशिकान्त भावानुवादित पंचमोऽध्याय संपूर्ण ॥५॥

— अध्याय पाचवा समाप्त —

– क्रमशः भाग तिसरा

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माय मराठी… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

अल्प परिचय

प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी, ज्येष्ठ साहित्यिक

जन्म – 25 डिसेंबर 59

शिक्षण – विद्या वाचस्पती

छंद – बासरी आणि संवादिनी वादन, हरिभजन

साहित्य सेवा – ललित लेख , स्फुट लेख ,कथा लेखन, बऱ्याच दीपावली अंकात, आणि वृत्त पत्रात पण प्रसिध्द

रेशीमकोष काव्य संग्रह, रुद्रमंथन काव्य संग्रह, राज्यस्तरीय पुरस्कारीत

हास्य रंजन – नुकताच ग्रामीण विनोदी कथा संग्रह प्रकाशित

साहित्य संमेलन – सांगली बडोदा

? कवितेचा उत्सव ?

☆ माय मराठी.. ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी

फुला माजी मोगरीचे

परिमळे कस्तुरीचे

केकावली मयुरा ची

 तैसी गा मायबोली

 

दुधा मध्ये नवनीत

 फुलाते मकरंद

फळांमध्ये आम्रफल

 तैसी माझी मराठी

 

एकेक अक्षर असे

मोतीयांची रास

हिऱ्यामध्ये पैलु खास

सारस्वतांची तैसी आस

 

धर्मात धर्म मानवधर्म

तेच सारस्वत मर्म

तेची लेखणीचे कर्म

  माय मराठी

 

सह्याद्रीच्या ठाय

 सरस्वती ती माय

  कामधेनू गाय

 साहित्य सरिता

 

जशी स्वरांची श्रुती

गायकाची स्मृती

तैशी गा सरस्वती

 शारदा माझी

 

नादात नाद अनाहत

तैशी बोली आहत

भाग्य आमचे थोर

आम्ही गातो मराठी

 

 संत पंत तंत

 ज्ञानेश्वर तुका एकनाथ

 शाहीरांची साथ

 दासोपंतांची पासोडी

 

 विष्णुदास भावे थोर

  दीनानाथ मंगेशकर

  देवल ते किर्लोस्कर

  कुसुमाग्रज कानिटकर

 

 मराठी नाट्य संगीत

 हातामध्ये घालून हात

 चळवळ विराजीत

 गुढी सजली मायबोलीची

 

   भाषा हीच गुरू

 सर्व जनाशी अधारू

 भावनाचे कल्पतरू

   साहित्य सरिता

© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी

ज्येष्ठ कवी लेखक

नसलापुर  बेळगाव

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गोडी मातृभाषेची… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

गोडी मातृभाषेची… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

गोडी मातृभाषेची

अमृतापरी साची

तिच्यात ओतप्रोत

माया साय-साखरेची

*

कीर्तनात विठू दंग

भजनात भक्ती रंग

ज्ञानोबा तुकोबांचे

अक्षर-धन अभंग

*

पोवाड्यात वीररस

लावण्य हे लावणीत

ओव्या भारुड जागर

भक्तीपूर्ण गोंधळगीत

*

काव्य कथा साहित्याने

परिपूर्ण  ही ज्ञानगंगा

नवरसयुक्त नवरत्नांचे

साज लखलखती अंगांगा

*

मराठीच्या संवर्धनाचा

ध्यास असो मनामनात

वाचू शिकूया मराठी

प्रसार करु जनाजनांत

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆  श्वान परिषद ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

?  श्वान परिषद श्री प्रमोद वामन वर्तक ☆

बिन मेजाची गोलमेज

भरली होती रस्त्यावर,

आले सगळे आवर्जून

चर्चा करण्या प्रस्तावावर !

*

टॉम, टायगर दोघे होते

श्वान परिषदेचे कन्व्हेंनर,

विसरून सारे जातीभेद

गोल बसले दोन पायावर !

*

तुमच्या त्या उपवासाला 

दूधभात नाही चालणार,

रोजच्या सारखे आम्ही 

चिकन मटणच खाणार !

आमचे भुंकण्याचे स्वातंत्र्य

 तुम्ही कोण हिरावून घेणार ?

 आम्हाला वाटेल तेंव्हा आम्ही

 कधीही, कोणाही चावणार !

*

यापुढे कधी दिलात त्रास

तुम्हांला कोर्टात खेचणार,

आमच्यातर्फे आमची केस

मायबाप “PETA” लढवणार !

मायबाप “PETA” लढवणार !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 219 ☆ माझी मराठी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 219 ?

☆ माझी मराठी ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

(अष्टाक्षरी)

 माय माऊली मराठी

अभिमान माझ्या साठी

डामडौल जगण्याचा

मुळामुठेच्या गं काठी….१

*

भाषा पुण्याची प्रमाण

शुद्ध, सुंदर सात्विक

मराठीचे आराधक

आम्ही आहोत भाविक ….२

*

बोल प्रेमाचे बोलतो

सारे भाषेत तोलतो

असा मनाचा दर्पण

खरे खुरेच सांगतो…..३

*

भाषा सदाशिव पेठी

मला खरंच भावते

माझी शाळा “सरस्वती”

मार्ग मराठी दावते…..४

*

बाजीराव रस्त्यावर

शाळा भक्कम, चांगली

सरस्वती मंदिरात

बाराखडी ती घोकली…..५

*

 मला अभिमान आहे

माझ्या मृदू मराठीचा

मर्द मावळ्या रक्ताचा

आणि पुण्यनगरीचा…..६

© प्रभा सोनवणे

२१ फेब्रुवारी २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माय मराठी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ माय मराठी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

जन्म कुसुमाग्रजांचा,

अस्मिता महाराष्ट्राची !

भाग्यवंत आम्ही येथे,

जन्मलो महाराष्ट्र देशी !….१

*

माय मराठी रुजली ,

आमच्या तनामनात !

दूध माय माऊलीचे,

प्राशिले कृतज्ञतेत !…२

*

साहित्य अंकी खेळले,

लेख,कथा अन् काव्य !

मराठीने तेवला तो,

ज्ञानदीप भव्य दिव्य !….३

*

घेतली मशाल हाती,

स्फुरे महाराष्ट्र गान !

साधुसंत  न्  शौर्याचे,

राखले जनी हे भान!….४

*

लाडकी मराठी भाषा,

कौतुक तिचे करू या!

मी मराठी आहे याचा,

अभिमान बाळगू या!….५

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares