मराठी साहित्य – विविधा ☆ ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

डाॅ. मीना श्रीवास्तव

? विविधा ?

☆ ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ – ☆ डाॅ. मीना श्रीवास्तव ☆

“माझा मराठी चा बोल कौतुके।

परि अमृताते  ही  पैजा जिंके।

ऐसी अक्षरे रसिके।

मेळवीन ।।”

(ज्ञानेश्वरी-अध्याय सहावा)

नमस्कार मैत्रांनो,

२७ फेब्रुवारी हा मराठी भाषेला गौरवान्वित करणारा सुवर्णदिन! २०१३ पासून हा दिवस ‘मराठी राजभाषा गौरव दिन’ म्हणून साजरा केला जात आहे. विष्णू वामन शिरवाडकर उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ – १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. कुसुमाग्रजांना सहा भाऊ आणि कुसुम नावाची एक लहान बहीण होती, ही एकुलती एक बहीण सर्व भावांना जीव की प्राण सर्वांची लाडकी, म्हणून कुसुमचे अग्रज   अर्थात  ‘कुसुमाग्रज’ असे नाव त्यांनी धारण केले.समाजाभिमुख लेखन करणाऱ्या मराठी लेखकांमधील हे शिखरस्थ नाव! बहुउद्देशीय आणि बहुरंगी लेखनकलेचे उद्गाते असे कुसुमाग्रज जितक्या ताकदीने समीक्षा करीत इतक्याच हळुवारपणे कविता रचित. रसिकांच्या मनात ज्या नाटकाचे संवाद घर (उदाहरण द्यायचे तर ‘कुणी घर देता का घर) करून आहेत, असे ‘नटसम्राट’ नाटक, ज्याच्या लेखनाने कुसुमाग्रज ज्ञानपीठ विजेते (१९८७) ठरले! शिरवाडकरांचे वर्णन सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे केल्या गेले आहे. वि.स. खांडेकर (त्यांना ययाती कादंबरीकरता हा १९७४ मध्ये हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला) यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते. त्यांचा जन्म दिवस (२७ फेब्रुवारी) हा मराठी भाषा गौरव दिन अथवा मराठी राजभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो. संतसाहित्यात तर संत ज्ञानेश्वरांनी (१२९०) वरीलप्रमाणे मऱ्हाटी भाषेचे केलेलं हे कौतुक! आपली मराठी भाषासुंदरी म्हणजे ‘सुंदरा मनामधिं भरलि’ अशी रामजोशींच्या स्वप्नातील लावण्यखणीच जणू! अमृताहुनी गोड अशा ईश्वराचे नामःस्मरण करतांना मराठीची अमृतवाणी ऐकायला आणि बोलायला किती गोड, बघा ना: ‘तिन्ही लोक आनंदाने आनंदाने भरुन गाउ दे रे, तुझे गीत गाण्यासाठी सूर लावु दे रे!’    

या महाराष्ट्रात निर्माण झालेले साहित्य म्हणजे साक्षात अमृत ठेवाच! ज्या महाराष्ट्रात गर्भश्रीमंत सुविचारांची अन अभिजात संस्कारांची स्वर्णकमळे प्रफुल्लित आहेत, जिथे भक्तिरसाने ओतप्रोत अभंग अन शृंगाररसाने मुसमुसलेली लावण्यखणी लावणी ही बहुमोल रत्ने एकाच इतिहासाच्या पेटिकेत सुखाने नांदतात, तिथेच रसिकतेच्या संपन्नतेचे नित्य नूतन अध्याय लिहिले जातात. या अभिजात साहित्याचे सोने जितके लुटावे तितके वृद्धिंगत होणारे! म्हणूनच प्रश्न पडतो की मराठीला ‘अभिजात भाषा’ म्हणून सरकारदरबारी मान्यता मिळायला आणखी किती समृद्ध व्हावे लागेल? पैठणीसारखे महावस्त्र नेसल्यावर आणखी कुठले वस्त्र ल्यायचे तिने?

मराठी भाषेचे पोवाडे गायला, तिच्या लावण्याच्या लावण्या गायला आणि तिच्यावरील भक्ती दर्शवण्याकरता अभंग म्हणायला मराठीच हवी. तिचे स्तवन, कीर्तन, पूजन, अर्चन इत्यादी करणारे महान साहित्यिकच नाही तर सामान्य माणसे कुठे हरवली? शब्दपुष्पांच्या असंख्य माळा कंठात लेऊन सजलेली आपली अभिजात मायमराठी आज आठशे खिडक्या नऊशे दारं यांतून कुठं बरं बाहेर पडली असावी? ‘मराठी इज अ व्हेरी ब्युटीफुल ल्यांगवेज!’ असे कानावर पडले की संस्कृतीचे माहेरघर अशी मराठी असूनही, तिच्या हृदयाला घरे पडतील अशी मराठी ऐकून! सगळं ‘चालतंय की’ असे म्हणत म्हणत ‘ती मराठी’ शासकीय आदेशांत बंदिस्त झाली. 

‘मी मराठी’ चा गजर करणारे आपण मराठी साहित्य विकत घेऊन मुलांना ते वाचण्याकरिता किती प्रवृत्त करतो? मराठी सिनेमे घरीच बघत का आनंद मानतो? मराठी नाटकसुंदरीची खरी रंगशोभा रंगमंचावर! कुठलीही भाषा शिकण्याचा प्रारंभ पाळण्यातून होतो. (गर्भसंस्कार विचारात घेतले तर गर्भावस्थेतच) बाळ जन्माला आल्यावर त्याच्या कणावर जे पडते ते अति महत्वपूर्ण शिक्षण! हे बाळ भाषेचा पहिला उच्चार ‘आई’ म्हणून करते का ‘मम्मी’ म्हणून? थोडा मोठा झाला की ते ‘nursary rhymes’ शिकते की रामरक्षा अथवा शुभंकरोती?

बरे, मराठी माध्यमात आपल्या मुलांना शिकवण्याची उर्मी कुणात आहे? मराठी माध्यमातील शाळेत मुलाने जावे हे बऱ्याच पालकांना पटणार नाही. मात्र एक भाषा म्हणून मराठीची निवड करणे अत्यावश्यक आहे. सरकारी पातळीवर हे कार्य सुरु आहेच. मराठी भाषेची गोडी निर्माण होईल असे मराठी भाषेतील साहित्य, नाटके, सिनेमे पालकांनी आणि शिक्षकांनी मुलांना उपलब्ध करून द्यावेत. मला याहीपेक्षा महत्वाचा मुद्दा असा वाटतो की, पालक, आजी, आजोबा आणि शिक्षकांनी यांनी मुलांशी मराठी भाषेतून संवाद साधावा. प्रत्येक मराठी घराघराने किमान एक तास आपल्या भाषेला समर्पित करावा. त्यात अस्खलित मराठी बोलणे, अभिजात मराठी साहित्य वाचणे, सुंदर मराठीत जे असेल ते श्राव्य साहित्य ऐकणे, हे उपक्रम राबवावेत. यात टी व्ही/ ओ टी टी या माध्यमातील मराठी सिरीयल/ सिनेमे इत्यादींचा समावेश नसावा. रोज रोज ती भाषा कानावर पडल्यावर अथवा नजरेखालून गेल्यावर मुलांना आपोआपच ‘मराठी भाषेतून विचार करण्याची’ सवय लागेल. मराठी शुद्धलेखन शिकायचे तर कुठल्याही (शाळेतील पाठ्यक्रम सोडून) अवांतर विषयावर मुलांनी रोज पानभर मजकूर लिहावा किंवा रोजनिशी लिहिण्यास मराठीचा वापर करणे अत्युत्तम!

मात्र यात पालक कुटुंबातील सदस्य, समाजातील व्यक्ती आणि महाराष्ट्र सरकार, या सर्वांच्या सहकार्याशिवाय मराठी भाषेचे संस्कार मुलांवर होणार नाहीत. यासाठी हृदयातून साद यायला हवी ‘माझी माय मराठी!’

या लेखाची सांगता कविवर्य सुरेश भटांच्या प्रेरणादायी मराठी गौरव गीताने करते.

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी

लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी,

धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात माय मानतो मराठी,

आमुच्या मनामनात दंगते मराठी, आमुच्या रगारगात रंगते मराठी,

आमुच्या उरा उरात स्पंदते मराठी, आमुच्या नसानसात नाचते मराठी

आमुच्या पिलापिलात जन्मते मराठी, आमुच्या लहानग्यात रांगते मराठी

आमुच्या मुलामुलीत खेळते मराठी, आमुच्या घराघरात वाढते मराठी

आमुच्या कुलाकुलात नांदते मराठी, येथल्या फुलाफुलात हासते मराठी

येथल्या दिशादिशात दाटते मराठी, येथल्या नगानगात गर्जते मराठी

येथल्या दरीदरीत हिंडते मराठी, येथल्या वनावनात गुंजते मराठी

येथल्या तरुलतात साजते मराठी, येथल्या कळीकळीत लाजते मराठी

येथल्या नभामधून वर्षते मराठी, येथल्या पिकांमधून डोलते मराठी

येथल्या नद्यांमधून वाहते मराठी, येथल्या चराचरात राहते मराठी

पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी

हे असे कितीक खेळ पाहते मराठी, शेवटी मदांध तख्त फोडते मराठी

सुरेश भट

प्रिय वाचकांनो, मराठी भाषेच्या अभिजात सौंदर्याला नटवणाऱ्या आणि सजवणाऱ्या काना, मात्रा अन वेलांट्यांची शप्पथ, माझी अमृताहुनी गोड मराठी मला अतिप्रिय आणि तुम्हाला? 

©  डॉ. मीना श्रीवास्तव

दिनांक – २७ फेब्रुवारी २०२४

ठाणे

मोबाईल क्रमांक ९९२०१६७२११, ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ आला किनारा… कुसुमाग्रज ☆ रसग्रहण – सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? काव्यानंद ?

☆ आला किनारा… कुसुमाग्रज  ☆ रसग्रहण – सौ.मंजिरी येडूरकर ☆

२७ फेब्रुवारी, कुसुमाग्रज यांच्या जन्म दिवसाच्या निमित्ताने

कुसुमाग्रज म्हणजे शब्दांची, कल्पनांची मुक्त उधळण करणारा अवलिया! मराठी वरचं प्रेम, देशावरचं प्रेम, समाजावरचं प्रेम, निसर्गावरचं प्रेम अशा अनेक अंगांनी वाहणारा कवितांचा अखंड झरा! समाजातील विषमता, जाती – जातीतले भेद, अस्पृश्यतेचा कलंक यावर कवितांतून कोरडे ओढणारा समाजवादी! हा तर सरस्वतीच्या मुकुटातला लखलखणारा हिरा!

अशा या शब्दप्रभू च्या स्मृती जागविण्याचा आजचा दिवस! अर्थात कधी एखाद्या दिवसासाठी सुध्दा विस्मरणात जावा, असा हा माणूसच नाही.किमान पक्षी रोज त्यानं पाठीवर हात ठेऊन “लढ” म्हणावं, असं तरी प्रत्येकाला वाटतंच. मी आज त्यांच्या विस्मरणात चाललेल्या सुंदर कवितेची आठवण करून देणार आहे.विस्मरणात चाललेली असं म्हणायचं एकच कारण, मला ही कविता गुगल गुरू कडे मिळाली नाही, त्यावरचा एकही लेख, आठवण काहीही मिळालं नाही. आठवणीतील गाणी यावर सुध्दा मिळाली नाही. शेवटी ती मला टाईप करावी लागली.

मी कधीच ही कविता विसरू शकणार नाही. आम्ही मैत्रिणी सांगलीतील गायिका स्मिता कारखानीस यांच्याकडे गाण्याच्या क्लासला जात होतो.रिटायरमेंट नंतर सुचलेली कला असल्यामुळे त्या सोपी सोपी गाणी शिकवतील आणि निदान गुणगुणण्या एवढं तरी गाणं यायला लागेल अशी माफक अपेक्षा होती. त्या जरा धाडसी शिक्षिका निघाल्या. त्यांनी आम्हाला ही कुसुमाग्रजांची कविता, आम्ही कुठेही कधीही न ऐकलेली, त्यांनी स्वतः चाल लावलेली, शिकविली.तशी चाल अवघड होती, त्यामुळं गाणं चांगलं म्हणायला जमलं नाही, पण इतकी सुंदर कविता कळली, गुणगुणता आली, त्यामुळे पाठ झाली, याचा प्रचंड आनंद होता. त्यासाठी स्मिताला मनापासून  धन्यवाद!

कुसुमाग्रज हे स्वातंत्र्य संग्रमाचा दाह सोसलेले आणि नंतर स्वातंत्र्याचा आनंद अनुभवलेले होते. त्यांच्या बऱ्याच कविता या विषयावरच्या आहेत. त्यांनी हताश होवून सुवर्ण महोत्सवाच्या वेळी लिहिलेली ‘स्वातंत्र्य देवीची विनवणी ‘ ही कविता आज अमृत महोत्सव साजरा झाला असला तरी वर्तमानाला साजेशीच वाटते. कवितेमधून सत्य परखडपणे मांडण्याचं कसब आणि तो सच्चेपणा त्यांच्यात होता.

मी घेतलेली आजची कविता स्वातंत्र्य संग्रामाशी निगडित असली तरी आनंद घेऊन आली आहे. ज्या क्षणाची सगळे वाट पहाट होते तो क्षण जवळ येऊन ठेपला आहे, हे सांगणारी ही कविता आहे.भारतमातेच्या सुपुत्रानी एक खूप मोठ्ठं स्वप्न पाहिलं. त्याच्या पूर्ततेसाठी लाखो लोकांनी अनेक तपे अथक परिश्रम केले. या मार्गात असंख्य अडचणी, अगणित वेदना आहेत हे ठाऊक असूनही, मार्ग सोडला नाही. कारावास भोगला, प्राणांची आहुती दिली, कुटुंबाची होळी केली. जीवाची पर्वा न करता या खवळलेल्या सागरात उडी घेऊन आयुष्य पणाला लावलं. आता किनारा जवळ आला आहे, तो स्वप्नपूर्तीचा क्षण जवळ आला आहे. आता सगळे श्रम संपणार आहेत. ज्यांच्या समर्पणाने आजच्या या क्षणाला आकार दिला त्यांच्या स्मृतीला गौरवाने वंदन करुया आणि किनाऱ्यावर जयाचे झेंडे उभारुया. या अर्थाची सुंदर कविता तुम्हाला स्मिताच्या You tube channel वर त्यांच्या गोड आवाजात ऐकायला मिळेल.

निनादे नभी नाविकांनो इशारा,

आला किनारा, आला किनारा

*

उद्दाम दर्यामध्ये वादळी,

जहाजे शिडावून ही घातली

जुमानित ना पामरांचा हाकारा

आला किनारा, आला किनारा

*

सरायास संग्राम आला आता

तपांची समोरी उभी सांगता

युगांच्या श्रमांचा दिसे हा निवारा

आला किनारा, आला किनारा

*

प्रकाशे दिव्यांची पहा माळ ती

शलाका निळ्या लाल हिंदोळती

तमाला जणू अग्निचा ये फुलोरा

आला किनारा, आला किनारा

*

जयांनी दले येथ हाकारली

क्षणासाठी या जीवने जाळली

सुखेनैव स्विकारुनि शूल – कारा

आला किनारा, आला किनारा

*

तयांच्या स्मृती गौरवे वंदुनी

उभे अंतीच्या संगरा राहुनी

किनाऱ्यास झेंडे जयाचे उभारा

आला किनारा, आला किनारा

*

अशा या शब्दप्रभूला त्रिवार वंदन!!!

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मराठी पुराण — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ मराठी पुराण — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आज मराठी भाषा दिन. त्या निमित्ताने मराठीचे अवलोकन करताना त्यातील बाराखडी व मुळाक्षरांच्या वेगवेगळ्या दर्शनानी भावली आणि मराठी असल्याचा आनंद झाला. पहा तुम्हालाहि मिळ्तोय का? आणि खरच आवड्ल्यास कॉमेन्ट्स द्यायला,शेअर करायला,लाईक करायला विसरू नका.

ऐका मंडळी सुजाण। मराठीचे हे पुराण।वर्षा तुम्हा समजावूनी सांगतसे॥

मराठी भाषेसी ना तोड। तया नाही कशाची जोड।अमृताहूनी गोड, देववाणी॥

३६ मुळाक्षरांची मुळे। बाराखडीची बारा पाने।हलवूनी कल्पवृक्ष साकार होई॥

आता सारे आपण। बाराखडीचे करू अवलोकन।ठेवूनी ध्यान,कान देऊनी ऐका॥

अ असे निराकार। आत्मा होई मिळता आकार। इजा बिजेने भेटा ईश्वरासी॥

उल्हास मनी दाटे। ऊठोनी मन पळू लागे। एकदा तरी धागे ऐसे जुळावे॥

ओज येता भुईवर। औटघटकाभर। अंबराकडे पाहून अः म्हणा॥ 

मुळाक्षरांकडे आता। नजर आपली करू चला।किती संत अन् देवांनी ही भारली असे॥

 

‘क’ असे विठ्ठल। ठेऊनी ऊभा कटेवरी कर। त्यात  तयाचे रूप दिसतसे॥

‘ख’ असे एकमेव। एकत्र येती दोन जीव। जीव-शीव दर्शन घडतसे॥

‘ग’ वाटे गजानन। पहा जरा देऊन ध्यान। सोंड वळवून बसला असे॥

‘घ’ म्हणजे रिद्धि-सिद्धी। तयार  गणेश सेवेसी। चवरी घेऊन, वारा घालती॥

‘ङ’ म्हणजे लक्ष्मी माता। सजली पहा दागिण्यांनी आता। हिरा तिच्या नथणीचा चमकतो॥

‘च’ कडे जाता नजर।साई मज दिसे सत्वर।हात पसरूनी बसला असे॥

‘छ’ म्हणजे छत्रपती।घोड्यावर बसले तलवार हाती।अन्याय मुळीना खपतसे॥

‘ज’ वाटती गाडगेबाबा।गाडगे हाती घेऊनी ऊभा। स्वच्छता सकला मागतसे॥

‘झ’ वाटतो अर्जून। उभा धनूष्य ताणून । मनोवेध अचूक साधतसे॥

‘ञ’ म्हणजे समर्थ रामदास। दंडूका तयांचा हा खास। मनोभावे त्यास करू वंदन॥

‘ट’ म्हणजे कालीमाता।असूरांचा करी वध आता। चरणावरी माथ टेकवू चला॥

‘ठ’ म्हणजे वाटे जनी। तिचे ते जाते असे बाई।पिठ त्यातून दळू चला॥

‘ड’ म्हणजे असे नारद। उभा दारी शेंडी वर।नारायण जप करीतसे॥

‘ढ’ म्हणजे गोराकुंभार।चाक त्याचे अन् माती त्यावर।आकार मडक्यास देत असे॥

‘ण’ म्हणजे बालाजी रूप। गंध त्याचे सुखवी खूप। श्रीमंतीही वाढवू चला॥

‘त’ म्हणजे देवराज ईंद्र। ऐरावताची ती सरळ सोंड। ऐश्वर्य पाहू डोळाभरी॥

‘थ’ म्हणजे हनूमान।बसला चरणी गदा घेऊन। स्वामीभक्तासही नमू आपण॥

‘द’ असे कोणी योगी। तपश्चर्या करी एका पायावरी। सिद्धी तयास मिळोनी जावो॥

‘ध’ असे हो एकवचनी राम।सज्ज बाण भाता घेऊन। पुन्हा रामयूग मागू चला॥

‘न’ म्हणजे बटू कोणी। आला याचक होऊनी।दान तयास देऊ चला॥

‘प’ म्हणजे सावतामाळी मळ्यातील मचाणावर बसोनी तो राखी मळा॥

‘फ’ म्ह्णजे धन्वंतरी । एका हाती कलश घेऊनी। आरोग्य दान करीतसे॥

‘ब’ म्हणजे तुकाराम। उभे गळ्यात एकतारी घालून । विठ्ठल नाम सदा मुखी॥

‘भ’ म्हणजे बलराज भीम। खांद्यावरी ती गदा घेऊन।शक्तीने तो विजयी होई॥

‘म’ म्हणजे कार्तीकेय। मयूरावर बसून। विश्व प्रदक्षिणेस निघाला॥

‘य’ म्हणजे मीरा भोळी।एकतारी करी घेऊनी।एक पाय्वर घेऊनी बसली असे॥

‘र’ म्हणजे पार्वती देवी।सड्पातळ अन गौर वर्णी।तिजलाही वंदन आता माझे॥

‘ल’ असे हो विष्णूदेव।कमल पुष्पावरी स्वार।तिन्ही लोकांचे नियंत्रण करी॥

‘व’ असेहो सूर्य देव। ऊगवे तो क्षितीजावर।चराचरा चैतन्य देई॥

‘श’ असती विवेकानंद।ऊभे फेटा बांधून।हाताच्या घडीसह चिंतन करती॥

‘ष’ असे सरस्वती देवी।मांडीवरती वीणा ठेऊनी।गान मराठीचे गात असे॥

‘स’ वाटे राधाकृष्ण। ऊभा पाय दुमडून। खांद्यावरी राधा विसावतसे॥

‘ह’ म्हणजे पवनदेव।जोराने ती ऊठे वावटळ।परी सकल विश्व व्यापलेसे॥

‘ळ’ म्हणजे ज्ञानेश्वर।बसले पद्मासन घालून।पसायदान मागती हे॥

‘क्ष’ म्हणजे शंकरदेव।उभे ते डमरू घेऊन।एका हाती त्रिशूळ असे॥

‘ज्ञ’ म्हनजे महिषासूर मर्दिनी।पायी महिषासूर, हाती त्रिशूळ घेऊनी।सकल जनास शांती देई॥

ऐसी सर्व मुळाक्षरे वसती पहा मराठी गृही।बाराखडी सवे त्यास सजवावे॥

करावा त्यांचा आदर।शब्दांस द्यावा आधार।शब्दांगण फुलोनी जाई॥

अक्षरांपासून शब्द बनती।शब्द काव्य अथवा लेखन साकारती।तयातून ग्रंथभांडार निर्मीतसे॥

म्हाणोनी घ्यावी शपथ।वर्णमालेसी कंठात घालेन।तिजला सांभाळेन जन्मभरी॥

उतू नये मातू नये। घेतला वसा टाकू नये।मराठीस करावे आपलीशी॥

प्रसार हिचा करू चला।घट्ट वीण गुंफू चला।मराठीस वंदू मनोभावे॥

बोला पुंडलीक वरदा हारी विठ्ठल।श्री ज्ञानदेव तुकाराम।

पंढरीनाथ महाराज की जय।मराठी माऊलीचा जय॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ एक धागा अंतरीचा गाभा… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि श्री ए के मराठे ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  एक धागा अंतरीचा गाभा… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ श्री आशिष बिवलकर आणि श्री ए के मराठे ☆

श्री आशिष बिवलकर   

? – एक धागा अंतरीचा गाभा– ? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

( १ )

गुंफल्या या मूक कळ्या 

गजऱ्याची झाल्या शोभा |

शल्य ना मनी कशाचे,

एक धागा अंतरीचा गाभा |

एक एक कळी गुंफली 

एकमेकींचे वाढवले सौंदर्य |

क्षणभंगुर या जीवनात,

जोपासले आनंदाचे औदार्य |

रंग रूप गंध लाभे,

एक दिवसाचा साज |

सुकता कुणी न पाहे,

आनंदे जगून घेती आज |

गजरा म्हणून एक ओळख,

कोणाचे कुंतल सजवती |

हातात कुणाच्या बांधून ,

मैफलीत गंध दरवळती |

प्रारब्ध होई धागा,

गुंफतो आपल्या कर्माच्या माळा |

क्षण क्षण सत्कारणी लावावा,

सार्थ करावा जीवनाचा सोहळा |

आनंद या जीवनाचा,

सुगंधापरी दरवळावा |

सार लाभल्या आयुष्याचा,

कळ्यांना पाहून ओळखावा |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

श्री ए के मराठे

? – एक धागा अंतरीचा गाभा… – ? ☆ श्री ए के मराठे ☆

( २ )

कळ्या निमूट ओवून घेतात

गजऱ्यामधे स्वतःला

दोष देत बसत नाहीत

सुईला वा सुताला ll

कारण त्यांना माहीत असतं

हेच त्यांचं काम आहे

क्षणभंगुर मिळालेलं आयुष्य

जगण्यामधेच राम आहे ll

रूप,रंग एका दिवसाचा

गंधही उद्या राहणार नाही

फुल होऊन कोमेजल्यावर

ढुंकूनही कुणी पाहणार नाही ll

म्हणून म्हणतो जसं,जेवढं

मिळालंय जीवन जगून घ्यावं

विषालाही अमृत समजून

हसत हसत चाखून प्यावं ll

कवी : श्री ए के मराठे

कुर्धे, पावस, रत्नागिरी

मो. 9405751698

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तारांगण… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ तारांगण☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

आहे तसाच कच्चा पिकलो अजून नाही

मी अंतरात माझ्या मुरलो अजून नाही

*

तपसाधना कराया विजनात वास केला

ज्ञानात पावसाच्या भिजलो अजून नाही

*

त्यांच्या धिम्या गतीने उलटून काळ गेला

काळासवे सुखाने फिरलो अजून नाही

*

बिथरून खूप राती दाऊन धाक गेल्या

भयमुक्त शांत निद्रा निजलो अजून नाही

*

काळीज जाळणारा सोसून दाह सारा

माळावरी उभा मी वठलो अजून नाही

*

पाठीवरील ओझे फेकून द्यायला मी

लांबून खूप आलो शिकलो अजून नाही

*

झोळी भरून माझी ओसंडते सुखाने

कुठल्याच वैभवाने दिपलो अजून नाही

*

कोरून कातळाला थकलोय खूप आता

स्वानंद जीवनाला भिडलो अजून नाही

*

ठरवून संकटांनी हल्ले बरेच केले

लाचार होउनी मी हरलो अजून नाही

*

निरखून भव्य सारे आकाश पाहिले मी

तारांगणी मला मी दिसलो अजून नाही

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 162 ☆ हे शब्द अंतरीचे… तू आणि मी… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 162 ? 

☆ हे शब्द अंतरीचे… तू आणि मी… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆/

अनोळखी तू,अनोळखी मी

असेच एकदा कुठे भेटलो

तुला पाहिले सखे अन्

मला मी तिथेच विसरलो

 

का आलीस समोर माझ्या

का नेत्र शर संधान केले

अबोल माझ्या बोलास

तू बोलते केले…

 

मी होतो एकटा जेव्हा

मस्त होते जीवन हे

तुझ्या येण्याने बदल होता

अडखळती पाय माझे…

 

मोगरा फुलला जैसा

तुझी कांती तैसी

चाफ्याच्या सुवास यावा

तुझी अंगकांती बहरली…

 

डोळ्यांत चमक तुझ्या

जादूगार जशी तू

ओठ जसे प्रिये

डाळिंब फुटले…

 

केस मोकळे रेशमी

गालावर बट रुळते

पाहून हे दृश्य सजने

माझी बोबडी वळते

 

पुन्हा तुला पाहावे वाटते

वेड लावले मला तू

अजूनही उभा तिथेच मी

जिथे भेटली होतीस तू…

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ताळेबंद… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

😳 ताळेबंद 😀 ☆ श्री सुहास सोहोनी ☆

आयुष्याच्या ताळेबंदात

ॲसेटस् किती

नि लायबिलिटीज् किती

निरखुन पाह्यलं तेव्हा कळलं

कशी झाल्येय दारुण स्थिती …

 

ताळेबंद जुळतच नव्हता

दोन्ही बाजूत फरक होता

मालमत्तेच्या मूल्यापेक्षा

जबाबदाऱ्या जास्त होत्या …

 

पुण्यकर्मे पापकृत्ये

पुन:पुन्हा ताडून पाहिली

एकमेका छेद जाउनी

बाकी त्यांची शून्य राहिली …

 

डोके पिकले विचार करता

तोच बोलले कोणी काही

कसा जुळावा ताळेबंद

“अखेर शिल्लक” धरलीच नाही …

 

😨ओह्, अखेर शिल्लक !!!😳

 

झोळीत शिल्लक काय माझ्या

ज्याचे ओझे जड होते

आप्त स्वकीय मित्रांच्या ते

निस्सिम प्रेमाचे होते …

 

प्रेमाच्या निरपेक्ष भावना

फेड तयांची कशी करावी

बहुमोलाची ठेव जणू ही

जबाबदारी कां मानावी …

 

आनंदाच्या ऋणातून या

कधी न वाटे व्हावे मुक्त

“अखेर शिल्लक” वर्धित व्हावी

स्वकीय मित्रांच्या स्नेहात …

 

माथ्यावरती सदैव पेलिन

प्रेमाचे हे वैभव संचित

लाख लाख मोलाची ठेविन

“अखेर शिल्लक” या झोळीत …

© सुहास सोहोनी

दि. २२-२-२०२४

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ क्षणभर स्वतःसाठी ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

 

क्षणभर स्वतःसाठी ☆ सौ कल्याणी केळकर बापट

सध्याचं प्रत्येकाचं जीवनमान हे खूप धकाधकीचे, घाईगडबडीचे झाले आहे.पर्यायाने ते कसल्यातरी तणावाचे पण झाले आहे.आपल्या नित्य दैनंदिन कामकाजात आपण खूप लोकांशी संवाद साधतो.त्या संवादातून, जवळीकेतून कधी मदतीच्या भावनेने आपली कामे इतरांकडून करुन घेतो वा आपण इतरांची कामे करुन देतो.हे सगळं आपण करतो खरं पण अजूनही आपल्याला पूर्णत्वाचा,संतोषाचा,  समाधानाचा कळसोध्याय हा पूर्णच झाल्या नसल्याचे उमगते.आणि मग कारणं शोधतांना एक महत्वाचे कारण सापडते तो म्हणजे आपल्या आतील मनाचा आवाज ऐकण्याचा अभाव.आपले अंतर्मन नेहमी आपल्याला ज्या हव्याहव्याशा वाटणा-या गोष्टी सांगतं त्या खुणावणा-या गोष्टींकडं आपण कधी गरज म्हणून तर कधी संकोच म्हणून, कधी आडमुठेपणा तर कधी संस्कारांचा पगडा म्हणून चक्क कानाडोळा करतो. ह्याचे परिणाम लगेच दिसतं नसले तरी मनावर खोल दूरगामी उमटतं असतात.त्यामुळे सगळं हातातच असून वाळू निसटल्यागतं सारखा गमावल्याचा भास होतो आणि हा भासच आपल्याला आनंदी राहण्यापासून वंचित ठेवत़ो.हा विचार करतांना ह्या मला सुचलेल्या काही ओळी खालीलप्रमाणे……… 

कधी कधी मज रहावे वाटते एकटे,

स्वतःच स्वतःशी बोलावे वाटते नीटसे,

डोकवावे वाटते कधी स्वतःच्याच अंतरी,

कधीतरी न दाबता खंत करावी मोकळी ।।।

*

श्वास घ्यावा मोकळा,दडपण हे संपवावे,

ऊत्तरायणातील दिवस हे मनासारखे जगावे,

सताड उघडोनी कवाडे,स्वातंत्र्याचे वारे प्यावे,

सल मनीचा तो काढून,मुक्तमनाने बागडावे।।।

*

सगळ्यांचा विचार करतांना फार न त्यात गुंतावे,

जखम मनीची ओळखून त्यावर हलकेच फुंकावे,

आपल्यांना साभाळतांना कधी स्वतःलाही जपावे,

नुसतेच झोकून देतांना,”मी”चे महत्व पण जाणावे।।

*

काय हवे हो नेमके मनी एकदातरी पुसावे,

इतरांसाठी जगतांना थोडे आपल्यासाठी पण जगावे,

सगळ्यांना देता देता आपुले न निसटू द्यावे,

झोकून देतांनाही क्षणभर स्वतःसाठी थबकावे

झोकून देतांनाही क्षणभर स्वतःसाठी थबकावे।।

*

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “अथांगता…” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “अथांगता– ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सागराच्या अथांगतेला

न्याहाळत  बसतो

क्षितिजाशी दर्याचे मिलन

 मनी साठवतो

*

उसळत्या लाटांचे  नर्तन 

 उत्साहे पाहतो

पाहता सागर अवघा 

शरिरी भिनतो

*

शेकडो नद्यांचे मिलन 

सागराशी होता

सर्वांना तो आपल्यात

सामावूनी घेतो

*

नर्तन  करती लाटा की

नद्यांचे पाणी

नदिच्या पाण्याच्या जणू

तो लहरी करतो

*

अथांग जलनिधी पुढती

त्याची प्रचंड ताकत 

किती न्याहाळू  तरीही

तृप्ततेचा आभास न होतो ।।।। 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “कोण खरं कोण खोटं ?” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “कोण खरं कोण खोटं ?” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

कोण खरं कोण खोटं

जगण्यापेक्षा असतं का ते मोठं

जे जसं आहे तसं

स्वीकारलं  तर काय बरं बिघडतं  …

*

काय चूक काय बरोबर

ठरवणं महत्वाचं असतं का खरोखर

चुकातूनही शिकता येतं

बरोबर तरी नेहमीच कुठं सोबतीला राहतं…

*

बदल नेहमी चांगला असतो

तरीही नकोनकोसाच वाटतो

न बदलता कुणाला बरं रहता येतं

बदललोच नाही तर जगणंच कठीण होवून बसतं ….

*

माझं ते माझं ,तुझं ते तुझं

सगळंच सारखं सगळ्यांचं

असं का होतं कुठं

वेगळेपण प्रत्येकाचं असतं महत्वाचं …

*

नको तक्रार नको स्पर्धा

तुलनेत जीव होई अर्धा अर्धा

स्वीकारू जो आहे जसा तसा

हाच सुंदर आयुष्याचा मार्ग सोपा…

💞शब्दकळी विजया💞

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares