असं म्हटलं जातं की सावरकर स्वातंत्र्य चळवळीत गुंतले नसते तर नक्कीच महाकवी झाले असते. पण मला हे समजत नाही की, ‘कमला’ व ‘गोमंतक (पूर्वार्ध व उत्तरार्ध असे दोन भाग)’ ही महाकाव्ये, ‘सप्तर्षी’, ‘मूर्ती दुजी ती’, ‘मरणोन्मुख शय्येवर’, ‘आकांक्षा’, ‘चांदोबा चांदोबा, भागलास कां?’, ‘सायंघंटा’ ही सहा दीर्घकाव्ये, व अनेक (शंभरहून अधिक) प्रकाशित तसेच अप्रकाशित काव्यें रचणाऱ्या कवीला महाकवी का म्हणू नये? याव्यतिरिक्त संकल्पित पण अपूर्ण अशा त्यांच्या अनेक रचना उपलब्ध आहेत. असेच ‘पानपत’ हे संकल्पित पण अपूर्ण महाकाव्य. या काव्याचा ‘विरहोच्छ्वास’ हा एक सर्ग त्यांनी पूर्ण केला होता. यात चाळीस उच्छ्वास (कविता) आहेत. त्यापैकी पाच ‘सावरकरांच्या कविता’ या पुस्तकात समाविष्ट आहेत. त्यांचा रसास्वाद आज आपण चाखणार आहोत.
मुकुल नावाचा एक वीर युवक हिंदुपदपातशाहीसाठी लढत असतांना शत्रुच्या हाती सापडतो. मृत्यूदंडाची अपेक्षा करीत कोठडीत काळ कंठीत असतांना त्याने जे भावनापूर्ण सुस्कारे टाकले, ते यात गोंवलेले आहेत.
सावरकरांच्या प्रासंगिक कविता, पौराणिक तसेच ऐतिहासिक संदर्भ असलेल्या कविता, स्वातंत्र्यलढा, तुरुंगवास, अस्पृश्यता निर्मूलन, हिंदुएकता अशा ध्येयाने प्रेरित कविता यांच्या भाऊगर्दीत शृंगाररसयुक्त कविता मागे पडतात. पण अशा कविता वाचल्यानंतर पटतं की सावरकर हे परिपूर्ण कवी होते. या कवितेतले, हल्लीच्या भाषेत म्हणायचं तर कांही बोल्ड किंवा सावरकरांच्या समाजमनातील प्रतिमेशी न जुळणारे शब्द वाचतांना आपल्याला पण अडखळायला होतं. कविता नेहमीप्रमाणेच गेय आहे.त्यांच्यातला शब्दप्रभू/भाषाप्रभू ठिकठिकाणी डोकावतोच. उदा. अनंतापासून निर्मित आनंत्य, आलिंगनापासून आलिंग्य व चुंबनापासून चुंब्य असे अनवट शब्द. थोडंसं या अर्थाने ‘लव’, क्षणोक्षणी साठी ‘अनुक्षण’, बोलावणे साठी ‘बाहणे व त्यापासून बाहू’ (तुज बाहू कुठे अजि सखये), घासासाठी ‘कवल’ असे गोऽड शब्द. ‘संगसुखासव’ यासारखा अपरिचित शब्द. (संगसुखाला आसव हे सफिक्स किंवा अनुप्रत्यय जोडावा ही कल्पनाच अनोखी आहे.) फिरफिरूनि, बघबघुनि, झुरझुरुनि, सारसारुनि, हुंदहुंदुनि असे त्या कृतीला अधोरेखित करणारे नादमय शब्द.
अनेक ठिकाणी कवीने
शब्दांचे खेळ करून काव्यातील आकर्षकता वाढवलेली
दिसून येते. उदाहरणार्थ वाक्यातील कर्ता, कर्म यांची अदलाबदल करून नवीन अर्थपूर्ण वाक्य बनवून, ती दोन वाक्यं पाठोपाठ येतील अशी रचना करणे.
याला क्लृप्ती किंवा इंग्रजीत गिमिक म्हणता येईल. जसे की,
“जरि अंताला अम्हि …. विसरलो, तरी अंत अम्हां विसरेना”, किंवा
“ये विजना त्रासुनि जनी मी आणि त्रासुनि जनां मी विजनी”, तसेच “विरहाग्नीने पुष्ट अश्रू हे आणि विरहाग्नी पुष्ट अश्रूंनी”.
श्लेष अलंकाराचं उदाहरण म्हणून “मी समयांच्या सारसारुनि वाती” ही ओळ उद्धृत करता येईल. ‘समयांच्या’ या शब्दाचे तीन अर्थ होऊ शकतात, पहिला समईचं अनेकवचन समया, दुसरा समय म्हणजे काळ व तिसरा समय म्हणजे करार (इथे नायक व सखी यांच्यातला अलिखित करार) व हे तीनही अर्थ इथे चपखल बसतात. तसेच ‘जपी’ हा शब्द प्रथम क्रियापद म्हणून व पाठोपाठच नाम म्हणून वापरला आहे. असे लीलया केलेले शब्दांचे खेळ पाहून अचंबित व्हायला होतं.
रसग्रहण लांबत चालल्यामुळे आज आपण कवितेच्या अर्थाविषयी फारशी चर्चा करणार नाही. शिवाय अर्थ सोपा आहे. फक्त शेवटच्या कडव्याच्या संदर्भाविषयी थोडं स्पष्टीकरण आवश्यक आहे. नायक आपल्या हृदयस्थ सखीला विचारतो की, शिळेच्या वा धातूच्या मूर्तीची आराधना करीत, त्या त्या प्रतिकांशी मानवी नाती जोडून, मीराबाई, नामदेव, तुकाराम, चैतन्य महाप्रभू या संतांप्रमाणे उत्कट प्रेम केलं तर अंती देवाचं प्रत्यक्ष दर्शन होतं असं म्हणतात, मग तुझ्या सजीव मूर्तीवर मी (देवाचे प्रतीक समजून) उत्कट प्रेम करीत असूनही मला तुझी प्रत्यक्ष भेट का होत नाही?