सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
सुश्री नीलांबरी शिर्के
© सुश्री नीलांबरी शिर्के
श्री सुहास सोहोनी
कवितेचा उत्सव
☆ 😀🐜मुंगीचे तत्वज्ञान 🐜😀 ☆ श्री सुहास सोहोनी ☆
☆
एका मुंगीनं केला नाच —
तिला मिळाले पैसे पाच —
एका पैशाचा बांधला बंगला —
तिन मजल्यांचा मोठा चांगला —
एका पैशाचं आणलं पीठ —
एका पैशाचं आणलं मीठ —
पिठामिठाची केली भाकर —
एका पैशाचा ठेवला चाकर —
एक पैसा रस्त्यात सांडला —
रडुन मुंगीनं हंगामा केला —
जणु लाख मोलाची ठेव —
उडु बघे मुंगिचा जीव —
कसा नशिबाने केला जांच —
केला मुंगिने हुंदके नाच —
*
पुन्हा मुंगीने केला नाच —
कोणी बघेना, जिवाला आंच —
मग मुंगीनं निर्धार केला —
निवडणुकीचा अर्ज भरला —
झाली आमदार एवढीशी बया —
गेली पालटुन सारी रया —
मग लाचार मुंगळे धावले —
फेर धरून भंवती नाचले —
आणि मुंगीनंही केला नाच —
तिला मिळाले खोके पाच —
कधी पाचांचे पंचविस झाले —
त्याचे दुप्पट दसपट झाले —
मुंगिलाही नाही कळले —
रंगे इंद्रधनूषी कांच —
केला मुंगीनं कथ्थक नाच —
*
*कशि सरली वर्षे पाच —
कसा थांबला मुंगीचा नाच —
कशि पडली दोनदा धाड —
कसं गावलं मोठं घबाड —
कसा दोन वर्षांचा काळ —
गजाआड जाईना वेळ —
हितचिंतक दूर पळाले —
मित्रांचे शत्रू झाले —
सखि दिसे जरी रस्त्यात
ना दिसे भाव डोळ्यांत —
नच दिसे भेट आनंद —
ना टुकुटुकुचा संवाद —
झाला मुंगीला पश्चात्ताप —
म्हणे चुकांचे भरले माप —
स्मरे पिठामिठाची भाकर —
स्मरे जुनापुराणा चाकर —
स्मरे रस्त्यात सांडला पैसा —
भाग्य घेऊन गेला कैसा —
पुन्हा मुंगीनं निर्धार केला —
सोडली गाडी आणि बंगला —
धरला रस्ता अपुल्या घरचा —
मातीच्या वारुळाचा —
तिथे आप्त सख्या मैत्रीणी —
गेली मुंगी त्यात हरखुनी —
म्हणे मुक्तिचा क्षण तो हाच —
केला मुंगीनं मोराचा नाच —
🌹
© श्री सुहास सोहोनी
रत्नागिरी
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
श्री प्रमोद वामन वर्तक
कवितेचा उत्सव
😡 कोणाच्या जीवावर ?😡 श्री प्रमोद वामन वर्तक
अठरा विशीच्या तरुणांना
तुम्ही बनवणार आळशी,
गाजर दाखवून हजारोंचे
निवडून याल “त्या” दिवशी !
*
मतं घेण्या शेतकऱ्यांची
कर्ज माफी देता त्यांना,
पण राज्यात टाळे लागले
स्वस्त धान्याच्या दुकानांना !
*
सवय मोफत प्रवासाची
तुम्ही महिलांना लावणार,
होता खडखडाट तिजोरीत
हात केंद्राकडे पसरणार !
*
आम्हां कधी कळले नाही
कोणता धंदा तुम्ही करता,
पाच वर्षात कोटींची उड्डाणे
तुम्ही सहज कशी घेता ?
*
पोकळ डोलारा आश्वासनांचा
मध्यमवर्गीयांच्या जीवावर,
तोच ठरतो बळीचा बकरा
कारण इमानदारीत भरतो कर !
*
मतदार राजाच्या भावनांशी
तुम्ही सारे लीलया खेळता,
एकदा निवडून आल्यावर
पाच वर्षांनी पुन्हा दिसता !
पाच वर्षांनी पुन्हा दिसता !
© श्री प्रमोद वामन वर्तक
संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610
मो – 9892561086 ई-मेल – [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
कविराज विजय यशवंत सातपुते
कवितेचा उत्सव # 237 – विजय साहित्य
☆ पैसा…! ☆
☆
दाम करी काम। म्हण झाली खरी ।
लक्ष्मी घरोघरी। वास करी ।। 1।।
*
मिळविण्या तिला। झटे रंक राव।
पैशाचेच नाव। चराचरी ।। 2।।
*
पैसा दुःख मूळ। पैसाच जीवन।
हरवले मन। पैशासाठी ।। 3।।
*
जे जे हवे ते ते। पैसा देतो सारे ।
पैशाचेच वारे। आसमंती ।। 4 ।।
*
पैशावर आता। जन्म मृत्यू तोल ।
षडरिपू बोल। पैशातून।। 5 ।।
*
पैसा जातो म्हणे। पैसे वाल्याकडे।
गरीबाचे रडे। निर्वासित ।। 6 ।।
*
धनिकांचे मढे। फुलांचेच हार ।
द्रव्य अपहार। लेकरात ।। 7 ।।
*
माणसाच्या साठी। पैसा आहे माया।
स्वार्थ लोभी छाया। अपकारी ।। 8 ।।
*
गरजेला जेव्हा। तनाचा बाजार ।
पैशाचा आजार। बळावतो ।। 9 ।।
*
जगविण्या देह। श्वाच्छोश्वास जसा।
पैसा हवा तसा। निरंकारी ।। 10 ।।
☆
© कविराज विजय यशवंत सातपुते
सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे. 411 009.
मोबाईल 8530234892/ 9371319798.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
कवितेचा उत्सव
☆ निवडणूक… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
☆
नेते सगळे झाले ताट
पक्ष भिडले सतरा साठ
राजकारणाची ऐशी तैशी
संविधानाची लावली वाट
*
जो तो उठतो झेंडा घेतो
मनात येईल तसा बरळतो
मीच कसा श्रेष्ठ आहे
सगळ्यांना सांगत सुटतो
*
शाहू फुले अंन आंबेडकर
ज्याच्या त्याच्या असतो तोंडी
छत्रपतींचा मावळा मतदार
करेल ह्यांची खरी कोंडी
*
साड्या पैसे विविध वस्तूही
गुपचूप गुपचूप राती वाटतो
मतदारांना झूलवत ठेवत
मतांची भीक मागतो
*
अरे लुच्चानो अरे धेंडानो
खरे बिंग तुमचे फुटले आहे
समाजाचा एवढा पुळका
खायचे दात वेगळे आहेत
☆
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
डाॅ. निशिकांत श्रोत्री
इंद्रधनुष्य
☆ श्रीमद्भगवद्गीता — अध्याय १६ — दैवासुरसम्पद्विभागयोगः— (श्लोक ११ ते २३) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
संस्कृत श्लोक…
चिन्तामपरिमेयां च प्रलयान्तामुपाश्रिताः ।
कामोपभोगपरमा एतावदिति निश्चिताः ॥ ११ ॥
*
चिंता अपरिमित जन्मभराची ओझे वाहत जगती
विषयभोग आनंद श्रेष्ठतम मानुनि जीवन जगती ॥११॥
*
आशापाशशतैर्बद्धाः कामक्रोधपरायणाः ।
ईहन्ते कामभोगार्थमन्यायेनार्थसञ्चयान् ॥ १२ ॥
*
पाशांनी आशांच्या बद्ध बाधा कामक्रोधाची
अर्थसंग्रह करित अन्याये तृष्णा विषयभोगाची ॥१२॥
*
इदमद्य मया लब्धमिमं प्राप्स्ये मनोरथम् ।
इदमस्तीदमपि मे भविष्यति पुनर्धनम् ॥ १३ ॥
*
प्राप्त जाहले जे मजला करण्या मनोरथ पूर्ती
धनी मी विपुल धनाचा होईल पुनरपि धनप्राप्ती ॥१३॥
*
असौ मया हतः शत्रुर्हनिष्ये चापरानपि ।
ईश्वरोऽहमहं भोगी सिद्धोऽहं बलवान्सुखी ॥ १४ ॥
*
वधिले शत्रूंना मी माझ्या आणखीनही वधेन मी
सिद्धीप्राप्त ईश्वर भोक्ता बलदंड मी सदा सुखी मी ॥१४॥
*
आढ्योऽभिजनवानस्मि कोऽन्योऽस्ति सदृशो मया ।
यक्ष्ये दास्यामि मोदिष्य इत्यज्ञानविमोहिताः ॥ १५ ॥
*
अनेकचित्तविभ्रान्ता मोहजालसमावृताः ।
प्रसक्ताः कामभोगेषु पतन्ति नरकेऽशुचौ ॥ १६ ॥
*
धनवान मी कुलवान मी मजसम ना येथे कोणी
यज्ञ करूनी दाना देइन जीवन जगेन आनंदानी
मोहाच्या या जाळ्यात अडकले अज्ञानाने भ्रांतचित्ती
कामाच्या भोगात गुंतुती महाऽपवित्र नरकात गती ॥१५, १६॥
*
आत्मसम्भाविताः स्तब्धा धनमानमदान्विताः ।
यजन्ते नामयज्ञैस्ते दम्भेनाविधिपूर्वकम् ॥ १७ ॥
*
धनमान मदाने होउनी गर्विष्ठ उन्मत्त
पाखंडी शास्त्रविधीहीन यज्ञासी करतात ॥१७॥
*
अहङ्कारं बलं दर्पं कामं क्रोधं च संश्रिताः ।
मामात्मपरदेहेषु प्रद्विषन्तोऽभ्यसूयकाः ॥ १८ ॥
*
अहंकार बल दर्प कामना संतापाने ग्रस्त
परनिंदेच्या आनंदात दंग होउनी स्वस्थ
देहस्थ आपुल्या इतरांच्या माझी ना जाण
सदैव माझा द्वेष करती धनञ्जया तू जाण ॥१८॥
*
तानहं द्विषतः क्रूरान्संसारेषु नराधमान् ।
क्षिपाम्यजस्रमशुभानासुरीष्वेव योनिषु ॥ १९ ॥
*
क्रूर द्वेषी त्या पाप्यांना कृपा माझी ना लाभे
माझ्याकरवी संसारीं त्यां योनी आसुरी लाभे ॥१९॥
*
आसुरीं योनिमापन्ना मूढा जन्मनि जन्मनि ।
मामप्राप्यैव कौन्तेय ततो यान्त्यधमां गतिम् ॥ २० ॥
*
ऐशा मूढा मी न प्राप्त हो जन्मोजन्मांतरी
प्रतिजन्मी त्यां जन्म लाभतो योनी आसूरी
सदैव त्यांना अधःपात होउनिया नीचगती
घोर नरक त्यांच्या वाटे जाणी रे तनयकुंती ॥२०॥
*
त्रिविधं नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः ।
कामः क्रोधस्तथा लोभस्तस्मादेतत्त्रयं त्यजेत् ॥ २१ ॥
*
काम-क्रोध-लोभाची त्रिविध द्वारे नरकाला
नाश करूनी अधोगतीला नेती आत्म्याला
प्राप्त करण्यासी सद्गती विवेक जागवुनी
त्याग करा या तिन्ही गुणांचा सद्गुण जोपासुनी ॥२१॥
*
एतैर्विमुक्तः कौन्तेय तमोद्वारैस्त्रिभिर्नरः ।
आचरत्यात्मनः श्रेयस्ततो याति परां गतिम् ॥ २२ ॥
*
नरक कवाडे मुक्त जाहला कल्याणाच्या आचरणे
प्राप्त तयासी परम गती ममस्वरूपी विलीन होणे ॥२२॥
*
यः शास्त्रविधिमुत्सृज्य वर्तते कामकारतः ।
न स सिद्धिमवाप्नोति न सुखं न परां गतिम् ॥ २३ ॥
*
स्वैर जयांचे असे आचरण शास्त्रविधी त्यागुनी
सुखही नाही सिद्धी नाही परमगती ना कोठुनी ॥२३॥
*
ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुनसंवादे दैवासुरसंपद्विभागयोगो नाम षोडशोऽध्यायः ॥१६॥
*
ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी दैवासुरसंपद्विभागयोग नामे निशिकान्त भावानुवादित षोडशोऽध्याय संपूर्ण ॥१६॥
☆
मराठी भावानुवाद © डॉ. निशिकान्त श्रोत्री
एम.डी., डी.जी.ओ.
मो ९८९०११७७५४
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुश्री मंजुषा सुनीत मुळे
कवितेचा उत्सव
☆ “मी आणि… मी !!” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆
☆
अध्यात्म आवडे रोजच म्हणते
ऐहिकात मी बुडलेली
राग – लोभ तो मोह नि मत्सर
यातच किती गुरफटलेली ।
*
मला म्हणत मी “मी“ जेव्हा
अहंकार मम उफाळतो
अन “मम“ म्हणते जेव्हा तेव्हा
‘ममत्व‘ हा अर्थच नसतो ।
*
‘मम’ म्हणजे‘ माझे … माझे ‘
माझे हेही.. माझे तेही
‘मी‘ पण केवळ उरते बाकी
दुसरा काही अर्थच नाही ।
*
पोथी-पुराणे रोज वाचते
‘मी‘ वाचते इतके स्मरते
बोध त्यातूनी काही घ्यावा
आठवणीने हेच विसरते ।
*
मग कसे कळावे अध्यात्म
जे ‘आत्म’ च्याही आधी असते
गेले ‘मी‘ च्याही पलीकडे
तिथेच मग ते सापडते ।
*
‘अध्यात्म‘ शब्द हा म्हणू शकते मी
सहजचि येता-जातांना
पण नुसते म्हणून काय करू ‘मी‘
‘मी‘ च्या पुढती पाय जाईना…
☆
© सुश्री मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुश्री अरूणा मुल्हेरकर
कवितेचा उत्सव
☆ ‘नाते संवादाशी…’ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆
☆
मी बोलते स्वतःशी समजावते मनाला
सारेच हे मुखवटे पाठी पळू कशाला
*
वाणीतली मधुरता आहेच साफ खोटी
हे डोंगळे गुळावर फसवू कशी स्वतःला
*
नात्यात नाही उरले काहीच बंध आता
माणूस एकटा हा नाही पुसे कुणाला
*
हा राजहंस विहरे स्वानंद घेत आहे
पाण्यातल्या सुखाचा स्वर्गीय मोद त्याला
*
स्वच्छंद स्वैर जगणे तोडून बंधने ही
घ्यावी अशी भरारी ना मोज त्या सुखाला
*
सूर्यास्त होत आला दिन मावळेल आता
पाने गळून गेली निष्पर्ण वृक्ष झाला
*
संवाद साधते मी नाते जुळे स्वतःशी
कोषात मीच माझ्या हे सांगते जगाला
☆
© सुश्री अरूणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुश्री अपर्णा परांजपे
चित्रकाव्य
विश्वनियंता… ☆ सुश्री अपर्णा परांजपे
☆
शांत, प्रशांत निद्रा की विचारांचे मंथन हे ?
विश्वनियंत्या पुरुषाचे असीम सुंदर स्वरुप हे….
*
आकर्षणाचा केंद्रबिंदू हा महाविष्णु पहुडला जरा
नेत्राला दिसताक्षणी हा माया कोलाहल विरला….
*
आदीशक्ती महालक्ष्मी सावरि भार जगताचा.
बालक होऊन भक्त बोलती गजर आदीमायेचा ….
*
विचार आता कसला करता विश्वाच्या संहाराचा?
“माझे कार्य सृजनाचे, विचार करतो भक्तांचा”…
*
“दयानिधी” हे नाव सार्थकी करणे माझे वचन असे
प्रेमाचे हे कार्य अविरत निद्रा जरि मम भासतसे….
*
सर्जन माझी धरा तशी सागर, पर्वत ह्या सरिता
मनुष्य प्राणी दुखवित मजशी त्रस्त करितसे मम गात्रा…
*
भाविक भक्त जन माझे हे कृतार्थ करिती मम हृदया
चिंतन त्यांचे करून होतसे मोदमय विश्राम सख्या…
*
आत्मशक्तीचे भान ठेवुनी गातिल गीते मम भक्त
हीच शांतता, असिम निळाई मिळे बालका अनुरक्त…
*
एक वचन हे, हाच धर्म ही पालन त्याचे मी करतो
ह्या वचनांवर जो विसावे रक्षण त्याचे मी करतो….
*
स्वधर्म पालन करण्यासाठी उत्पत्ती चे हे काम
पूर्ण करोनी ये तू सखया त्यासाठी हा विश्राम …
*
आस असे ही भेटीची रे जशी तुला मजही तशी
बालक हा असा बघोनी आठवती मज चकोर शशी
*
जाणिव माझ्या या लीलांची ज्या सद्भक्ता होत असे
त्या साठी विश्राम समज हा वाट सतत मी पहात असे…
*
शांत प्रशांत निद्रा की विचारांचे मंथन हे ?
विश्वनियंत्या पुरुषाचे असीम सुंदर स्वरुप हे…
… विश्वनियंत्या पुरुषाचे असीम सुंदर स्वरुप हे…
🌹 भगवंत हृदयस्थ आहे 🌹
© सुश्री अपर्णा परांजपे
कात्रज, पुणे
मो. 9503045495
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈
सुश्री प्रभा सोनवणे
कवितेच्या प्रदेशात # 249
☆ अमरवेल… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆
☆
“अमरवेल” किती सुंदर नाव आहे,
पण ही वनस्पती,
दुसर्याच्या जीवावर जगणारी,
बिनधास्त, बिनदिक्कत!
नाही आवडायचं ,
तिचं हे दुसऱ्याच्या जीवावर,
उड्या मारणं !
अचानकच
जाणवलं—
तिच्यातला चिवटपणाच तिचं
जगणं आहे !
कुणी वंदा कुणी निंदा —-
तिला मिजाशीतच जगायचंय!
आणि असतीलच की,
उपजत काही प्रेरणा स्रोत,
तिच्यातही !
अमरवेल आलेली असते,
काही असे स्थायीभाव घेऊन,
जे असतील ही,
इतरांना त्रासदायक,
पण अमरवेल तग धरून!
ज्याचं त्यानं
जगावं की हवं तसं!
पण काही संकेत पाळायचेच
असतात सगळ्यांनीच!
तर ….
काही गोष्टींना नसतातच,
कुठले नियम वा अटी,
दुसऱ्यांनी नसतेच
ठरवायची इतर कुणाची,
विचारसरणी !
☆
© प्रभा सोनवणे
संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
मोबाईल-९२७०७२९५०३, email- [email protected]
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈