मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संसार… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ संसार☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

मंदिरांना जंगलांचा लाभला आधार होता

वादळाने आज तेथे घुमवला ओंकार होता

सूर्यतेजाने नव्याने वाटले चैतन्य होते

जागृती आल्या धरेने सोडला हुंकार होता

काळजीची रात्र होती भोवताली दाटलेली

तेज ल्यालेल्या प्रभेने संपला अंधार होता

पांखराना जाग आली निर्झराच्या बोलण्याने

कोकिळीने सुस्वरांचा छेडला झंकार होता

दूर कोठे वाजणारा नाद घंटांचाच होता

जाहला दाही दिशांना मोद अपरंपार होता

संकटे सारून मागे सौख्य थोडे भोगण्याला

ध्येयवादी माणसांनी सजवला संसार होता

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 149 ☆ अभंग…मंगल कारक, श्रीकृष्ण समर्थ.!! ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 149 ? 

☆ अभंग…मंगल कारक, श्रीकृष्ण समर्थ !!

मंगल कारक, श्रीकृष्ण समर्थ

सर्वज्ञ सर्वार्थ, शक्तियुक्त.!!

द्वापर युगीच्या, शेवट चरणी

आला मोक्षदानी, महादानी.!!

कंस वधुनिया, धर्माचे स्थापन

स्वतःचे वचन, सिद्धकरी.!!

उद्धव देवाला, चार कळी-केचे

दातृत्व प्रेमाचे, करी कृष्ण.!!

गंध कुब्जीकेचा, चंदन स्वीकार

ऐसा उपहार, स्वीकारीला.!!

अर्जुनास दावी, चतुर्भुज रूप

भव्य ते स्वरूप, चक्रधारी.!!

कवी राज म्हणे, बत्तीस लक्षणी

मूर्त सुलक्षणी, मज दिसो.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?… स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?... स्व. वि. दा. सावरकर ☆

पौर्वात्य खंड अवघें जित यत्प्रतापें

दारिद्रय आणि भय कांपति ज्या प्रतापें

नाशासि पारसिक तेहि पलांत गेले

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?

 

तें जिंकी पारसिक, दे जगता दरातें

जें दिग्जयी बल तुझेंहि शिकंदरा, तें

ध्वंसीत रोम तव राजपुरीं रिघालें

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?

 

साम्राज्य विस्तृत अनंत असेंचि साचें

त्याही महाप्रथित रोमपत्तनाचें

हूणें हणोनि घण चूर्णविचूर्ण केलें

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?

 

हा उन्नती अवनतीस समुद्र जातो

भास्वान् रवीहि उदयास्त अखंड घेतो

उत्कर्ष आणि अपकर्ष समान ठेले

विश्वांत आजवरि शाश्वत काय झालें?

 

जे मत्त फारचि बलान्वित गर्ववाही

उद्विग्न- मानस उदासहि जे तयांहीं

हें पाहिजे स्वमनिं संतत चिंतियेलें

विश्वात आजवरि शाश्वत काय झालें?

     कवी – वि दा सावरकर

रसग्रहण

ही कविता ‘वसंततिलका’ या अक्षरगणवृत्ते बांधलेली आहे. एकवीस मात्रा व १४ अक्षरांच्या ओळी असणारे हे वृत्त वीर रस व शौर्य भावनेला पोषक आहे. प्रत्येक ओळीच्या शेवटी दोन गुरू (प्रत्येकी दोन मात्रांची दोन अक्षरे) येत असल्यामुळे कोणताही विचार, वाचक अथवा श्रोत्यांवर ठसविण्यासाठी ही वृत्तरचना उपयुक्त आहे. सावरकरांची ‘माझे मृत्युपत्र’ ही कवितादेखिल याच वृत्तात निबद्ध आहे. जाता जाता सावरकर निर्मित ‘वैनायक’ वृत्ताचा उल्लेख केल्याशिवाय राहवत नाही. त्यांनी अंदमानात असतांना रचलेल्या ‘निद्रे’, ‘सायंघंटा’, ‘मूर्ती दुजी ती’, ‘मरणोन्मुख शय्येवर’ यासारख्या कांही कविता तसेच ‘कमला’ व ‘गोमंतक’ (उत्तरार्ध) ही दीर्घ काव्ये त्यांनी स्वनिर्मित ‘वैनायक’ वृत्तांतच रचलेली आहेत. एखाद्याच्या प्रतिभेचा संचार किती विविध प्रांतात असावा! अलौकिक!!

प्रस्तुत कविता सावरकरांनी, पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकत असताना, १९०२ साली ‘आर्यन विकली’ साठी रचली. कालांतराने ती ‘काळ’ मध्येही प्रसिद्ध झाली. त्यावेळी त्यांचं वय होतं अवघं १९ वर्षांचं! खरं तर हे वय, निसर्गात भरून राहिलेल्या सौंदर्याचं वर्णन करणार्‍या कविता किंवा शृंगाररसाने युक्त प्रेमकविता करण्याचं! पण सावरकरांनी मातृभूमीलाच मन वाहिलेलं असल्यामुळे, तिच्या स्वातंत्र्या शिवाय दुसरा कोणताच विचार त्यांच्या मनात येत नसावा. प्रखर बुद्धीमत्ता घेऊन जन्माला आलेल्या या तरूणाने, आपलं तारुण्य स्वातंत्र्य देवतेच्या चरणी अर्पण केलं होतं. अफाट वाचन, चिंतन, मनन यामुळे त्यांच्या या बुद्धीमत्तेला तेज धार आलेली होती. त्यामुळेच कोवळ्या तरूण वयात ते शाश्वत/ अशाश्वत यासारख्या विषयावर भाष्य करू शकतात. ते म्हणतात या विश्वात कोणतीच गोष्ट शाश्वत नाही. मग ती चांगली असो वा वाईट, हवीशी असो वा नकोशी! याच्या पुष्ट्यर्थ ते निरनिराळी उदाहरणे देतात.

आपल्या पराक्रमाने ज्यांनी अवघ्या पौर्वात्य खंडावर राज्य केलं, ज्यांच्या राज्यात सुखशांती व सुबत्ता नांदत असे अशा पारसिक म्हणजेच पारशांचं साम्राज्य सिंकंदराने नष्ट केले. म्हणजेच त्यांना जिंकून, त्यांचं शिरकाण करून तसेच धर्मांतर करायला लावून आपलं मुस्लीम साम्राज्य स्थापन केलं. अशा जगज्जेत्या सिकंदराचं जे सत्ताकेंद्र होतं, त्या ग्रीसवर कालांतराने रोमन लोकांनी कब्जा केला. परंतु पुढे जाऊन हूणांच्या रानटी टोळ्यांनी या अजिंक्य समजल्या जाणाऱ्या रोमन साम्राज्याचे तुकडे तुकडे केले. अशा प्रकारे उन्नती पाठोपाठ अवनती येतेच. जे जे म्हणून निर्माण होते, ते ते कालांतराने नष्ट होतेच. जे उदयाला येते त्याचा अस्त होणार हे ठरलेलेच आहे. हे ठसविण्यासाठी ऐतिहासिक दाखल्यांपाठोपाठ कवी, समुद्राची भरती ओहोटी, सूर्याचा उदयास्त असे निसर्गातले परिचित दाखले देतात आणि विचारतात, या विश्वात काय चिरंतन राहिलं आहे? ही गोष्ट बलवान, गर्विष्ठ, उन्मत्त यांच्याप्रमाणेच उदास, उद्विग्न असणाऱ्यांनी देखिल लक्षात ठेवली पाहिजे. कोणतीच स्थिती वा परिस्थिती, मग ती ऐहिक असो वा भावनिक, कायम रहात नाही. ती बदलतेच.

या कवितेतून सर्व भारतीयांना कवी विश्वास देऊ इच्छित असावेत की, भारतमातेची ही दुःस्थिती बदलणार व स्वातंत्र्याचा सूर्योदय होणार हे निश्चित!

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मनातल्या मनातले श्लोक…कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ मनातल्या मनातले श्लोक… – लेखक  – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

 जगी सर्व सुखी असा तोच आहे |

नशीबी जयाच्या गाढ झोप आहे ||

ज्यांच्यावर ईश्वराची कृपादृष्टी होते |

त्यांचेच सकाळी पोट साफ होते ||

पहिला चहा रोज मिळावा आयता |

अनंता तुला मागणे हेचि आता ||

आज कुठली भाजी व आमटी करावी |

रोज रोज मला याची काळजी नसावी ||

कृपा मजवरी नित्य तुझी असावी |

कामाला ‘बाई’ देवा चांगली मिळावी ||

वाटेल तेव्हा मी वाट्टेल ते खावे |

वजन माझे किंचित तरी ना वाढावे ||

मनावाटे तेव्हा शॉपिंग करावी |

कुठलीही ऑफर कधी ना सोडावी ||

सदा सर्वदा ‘मन’ प्रसन्न रहावे |

कितीही राग आला तरी ना चिडावे ||

वय माझे कितीही वाढत रहावे |

परी बालपण थोडे टिकून रहावे ||

नको रे मना काळजी ती कशाची |

मला दे कला आनंदी राहण्याची ||

कवी : अज्ञात 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “सार्थक —” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “सार्थक —” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

माझे माझे म्हणत म्हणत मी

सर्वच ‘ माझे ‘ लुटून द्यावे

आनंदाचे इवले रोपही

रुजवू शकता तृप्त मी व्हावे …..

 

भुकेजलेल्या तहानलेल्या

जीवांस त्या नित शांत करावे

श्रांत क्लांत मम बांधवांस मी

ममतेचे गुळपाणी द्यावे …..

 

ईशकृपे मज मिळेल जे सुख

इतरांसंगे ते वाटावे

सांगातीच्या वाटसरूंना

मदतीचे मम हात मी द्यावे …..

 

अंतरीचे मम धन प्रेमाचे

लुटेन तितके साठत रहावे

निर्व्याजची ते लुटता लुटता

नकळत हे जीवन संपावे ……

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अभंग… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर

सुश्री अरुणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ अभंग… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆

 बसते मी एकांतात / विचार मनी येतात/

 कोण आहे का आपला/ जो तो स्वतःत रमला/

 भरले जग स्वार्थाने / माणूस विके पैशाने/

 एक बांधतो इमला / दुजा बिचारा दुबळा//

 अन्न जाते वाया पाही / दीनामुखी घास नाही/

 विषमता दुःख देई / धाव पाव माझे आई//

 मंदिरात दिसे भक्ती / बाहेरी का आसक्ती /

 ईश जाणतो भक्ताला / नाही थारा दिखाव्याला //

 क्षणभंगुर  जीवन/ करी मानवा पावन/

 एकलाच तू येणार/ एकलाच तू जाणार//

 आहे जीवन तोवर/ करावा रे उपकार/

 पुण्य गाठी बांधशील/ संगे घेऊन जाशील//

 फल संचित कर्माचे/ याच जन्मी भोगायाचे/

 स्मर सदा परमार्थ/ तोच जीवनाचा अर्थ//

© सुश्री अरुणा मुल्हेरकर 

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆– “संवाद — असाही” – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – “संवाद — असाही” – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

आला दिपावली सण

दारी आंब्याचे तोरण

ती बोले तोरणाशी

सुखे जाऊ दे हा सण .—…

फुले नाहीत नसू दे

माझ कुटूंब  हसू दे

घरादाराच्या मुखात

घास गोडाचा जाऊ दे ….

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आकाश-जमीन… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

आकाश-जमीन… ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

आकाश-जमीन

ज्याचं त्याचं आकाश  असतं

ज्याच्या त्याच्या माथ्यावर

आकाश…निळंभोर

गुलाबी, जांभळ्या,नारिंगी,

पिवळ्या

रंगांनी रंगतं

भुलवतं….खुणावतं

कवेत आलं असं वाटतं

कित्येकदा

पण कवटाळायला जावं

तर, दूर ….दूर जातं.

परस्थ होऊन रहातं.

त्याला स्पर्श करण्यासाठी

उड्या  माराव्या

उंच…..उंच…

ते अधिकच उंचावतं

खिजवतं.

वाकुल्या दाखवतं.

त्या प्रत्येक क्षणी

पायतळीची मातकट जमीन

मात्र

पायाला बिलगून असते.

बेछूट,बेताल पावलांना

आधार देते. सावरून धरते.

ज्याचं त्याचं आकाश

एक कल्पना असते.

ज्याची त्याची जमीन

एक वास्तव.

© श्रीमती उज्ज्वला केळकर

संपर्क -17 16/2 ‘गायत्री’ प्लॉट नं. 12, वसंत दादा साखर कामगारभावन के पास , सांगली 416416 महाराष्ट्र

मो. 9403310170, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तो अन ती… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

?  कवितेचा उत्सव ?

तो अन ती… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

दोघांचही आकाश

एकच असले तरी

त्याच्यासाठी ती

जमिनीवरच राहते

तो मात्र

आपल्याच आकाशात

किर्तीचे यान

यशाची विमाने

प्रगतीचे पंख

यांनी मुक्त संचार करतो

आकाशाला हात टेकले

असे त्याला आणि

इतरांनाही वाटते

पण आकाश नेहमीच

त्याला हूल देते

कितीही उंच आला तरी

हाती लागत नाही

पण ती मात्र

ठाम पणे जमिनीवरच

पाय रोवून उभी असल्याने

हेच धुलीकण

स्पर्शायला बहुदा

आकाशच येतं खाली

कधी कधी•••

मग वाटतं

आकाशा पर्यंत जाउनही

मातीच होते

पण•••

जमीनीवर राहूनही

आकाश होता येते

तुकोबां सारखे•••

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 176 – जीवनाचे अंतरंग ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 176 – जीवनाचे अंतरंग ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

जीवनाचे अंतरंग

कोण जाणे  याचा तळ।

स्थिर ठेवू मन बुद्धी

निवळेल थोडा मळ।

 

जीवनाच्या अंतरंगी

संयमाचे अधिष्ठान।

प्रेम जल सिंचनाने

दृढ नाते प्रतिष्ठान।

 

जीवनाला लाभतसे

ऊन सावलीचे दान।

सदा असावे रे मनी

ऋतू बदलाचे  भान।

 

नको धावू मना थांब

तुझी अवखळ खोडी।

ढवळून अंतरंग

चाखतोस काय गोडी।

 

नाना रंग दाखवीते

अंतरंगी तुझी छबी।

प्रतिबिंब काळजाचे

सांगे स्वभाव लकबी।

 

चार दिवसाची नाती

चार दिवसाचा संग।

उणे दुणे सोडूनिया

जपुयात अंतरंग।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares