मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – काय पावसा…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – काय पावसा…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

काय पावसा,

मुक्काम वाढवलास तू.

दसऱ्याला सीमोल्लंघन करता करता,

दिवाळीसाठी थांबलास तू.

 

काय पावसा, 

शेतात पिकवलं होतंस तू.

तोंडात घास देता देता,

असं कसं हिसकावलंस तू.

 

काय पावसा,

तहान भागवलीस तू.

धरण भरता भरता,

काठ वाहून नेलास तू.

 

काय पावसा,

छान बरसला होतास तू.

पाय काढता काढता, 

थयथयाट केलास तू.

 

काय पावसा,

सारं हिरवंगार केलंस तू.

पण.. उन्मत्त होऊन कोसळता कोसळता,

डोळ्यात पाणी आणलेस तू. 

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माहेराची ओढ… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

माहेराची ओढ…  ☆ सौ. वृंदा गंभीर

किती लागली जीवाला ओढ

संसारातून सापडेना कधी वाट

माहेरची जाईना आठवण मनातून

अवघड आहे हा संसाराचा घाट

*

दीपावली ला जावे आईस भेटावे

भाऊबीज करून माघारी फिरावे

आठवणीने वाहे पाणी डोळ्यातून

वेड्या मनाला सांगा कसे सावरावे

*

नको काही भाऊराया फक्त प्रेम

तुझी चटणी भाकरी लागते गोड

माहेरा वाचून नाही उरला राम

भावाबहिणीचे काही सुटेना हे कोडं

*

सुखी आहे सासरी यावे माहेरी

क्षणाचा तो आनंद बळ देई संसारी

एकच आहे अपेक्षा प्रेम कमी नको

वर्षातून एकदा जागा हवी माहेरी

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 193 ☆ अभंग… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 193 ? 

अभंग ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

सायंकाळ होता, पक्षी घरट्यात

गाई ही गोठ्यात, विसावती.!!

*

आयुष्याची होता, सायंकाळ तैसी

जवळीक ऐसी, मिळो मज.!!

*

विझुनिया जाता, आयुष्य पणती

मोक्षाची पावती, प्राप्त व्हावी.!!

*

असत्य संपूनी, सत्यची मिळावे

बाकीचे जळावे, वेशीवर.!!

*

कवी राज म्हणे, इच्छा पूर्ण व्हावी

जीवनात यावी, विरमता.!!

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अनोळखी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ अनोळखी… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

कधी तरी एखाद्या भयाण शांत वेळी

उचंबळूनयेतो मनाचा तळ आक्रस्ताळी

आकाश घुमवत जाते एक किंकाळी

तमा न बाळगता एकाकी असल्याची…

 

जगण्याच्या अनावर ओढीन जगलेले

पोरके दिवस आठवतात

हल्लेखोरासारखे येतात अंगावर

तेव्हा तरी मी कुठे असतो माझ्यात‌.

भलत्याच क्रांतीकारक गर्जनात

वाहून गेलेला असतो दूर दूर आसमंतात…

 

पुन्हा माझं अस्तित्व गोळा करायला

खूप करावे लागतात सायास

तरीही असतोच काही अंशी विखूरलेला.

इथेतिथे पडद्यामागे अस्तित्वाच्या

भविष्याचे करत अवलोकन

भयाण असणा-या…

 

एकटाच, अनोळखी

मलाच मी ओळखत नसलेला…

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अनासक्त… ☆ सुश्री स्वाती सुरंगळीकर ☆

सुश्री स्वाती सुरंगळीकर

परिचय

शिक्षण : MSc BEd,  Ex लेक्चरर (नागपुर)

कवयित्री- एकपात्री कलाकार

  • कवितांचे केवळ वाचन ;पठण किंवा गायन न करता माफक देहबोली आणि वाचिक अभिनयातून कविता सादर करण्याची वेगळी शैली.
  • गेल्या 25 वर्षांपासून ; देश विदेशात (अमेरिका, कॅनडा,  ऑस्ट्रेलिया, दुबई ) काव्य सादरीकरणाचे एकपात्री प्रयोग सुरू.”दिलखुलास” चा 500 वा प्रयोग नुकताच नागपूर येथे सादर झाला.
  • चारोळी संग्रह, ३ कवितासंग्रह
  • काव्यवाचनाची ध्वनीफीत आणि एकपात्री कार्यक्रमाची DVD प्रकाशित.
  • इंटरनॅशनल पोएट्री फेस्टीव्हल अ भा साहित्य संमेलन,  विदर्भ साहित्य संमेलन, औंध साहित्य संमेलन (पुणे), पुणे फेस्टिवल, भीमाफेस्टिवल, अ .भा. नाट्य संमेलन नागपूर
  • इ टीवी मराठी च्या साहित्य दरबार कार्यक्रमात सहभाग.

सन्मान –

  • वर्ष २०२२ चा मानाचा “बालगंधर्व एकपात्री कलाकार पुरस्कार” प्राप्त.
  • काव्यशिल्प पुणे च्या काव्यस्पर्धेत प्रथम पुरस्कार;
  • रंगत संगत प्रतिष्ठान चा “हास्यरंगत “सन्मान;
  • कै माई देशपांडे प्रतिष्ठान चा काव्यगौरव पुरस्कार;
  • ‘पद्मगंधा प्रतिष्ठान‘ नागपुरचा “काव्यपद्म” व’अभिव्यक्ती’ ‘वैदर्भीय लेखिका संस्थेचा, “लक्षवेधी कवयित्री” सन्मान

? कवितेचा उत्सव ?

☆ अनासक्त… ☆ सुश्री स्वाती सुरंगळीकर ☆

त्याच्या मुखी हरिनाम ,

तो भक्तीत रंगलेला…

तीही  प्रपंचात दंग,

करी संसार चांगला !

*

सदा त्याच्या वागण्यात,

विरक्ती ही दाटलेली…

तिची सर्वांवर छाया,

नाही माया आटलेली!

*

विठोबाच्या दर्शनाला,

निघाली घरून दोघं…

डोईवर होतं थोडं,

घर-संसाराचं ओझं !

*

आड-वाटेवर त्याने,

पाहिले सोन्याचे कडे…

कसे लपवावे त्यास?

मनामध्ये प्रश्न पडे !

*

या संसारी बायकोचे,

जर का गेले लक्ष…

ती घेईल उचलून,

आहे ना संसारदक्ष !

*

कड्यावर हळू त्याने,

लोटली थोडीशी माती…

निघाला वेगाने पुढे,

घेत कानोसा मागुती !

(चमकून ती म्हणाली..)

अहो ! काय केले तुम्ही?

मती तुमची फिरली!

सांगा तुम्ही कशापायी?

माती ,मातीनं झाकली !

*

गेला तुम्ही विसरून,

माऊलीची शिकवण…

सोने चांदी हीरे मोती,

असती मृत्तिकेसमान !

असती मृत्तिकेसमान !!

© सुश्री स्वाती सुरंगळीकर

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अंधाराचा कावा… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ अंधाराचा कावा… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

अंधार वाढतो आहे

नीत डोळे उघडे ठेवा

भिववितो बंद डोळ्यांना

तो अंधाराचा  कावा  – –

*

बंद पापण्या आत

स्वप्नांचा असतो गाव

कणभरही भीती नसते

धाबरण्या नसतो वाव – – 

*

अंधारी  डोळे मिटले

 मन बागलबुवा होते

 मग उगा भासते काही

 जे अस्तित्वातच नसते – – 

*

 सरावता अंधारा डोळे

 अंदाज बांधता येतो

 अंधारात वावरायाला

 तो साथ आपणा देतो – –

*

  अंधार भोवती फिरतो

  वेगळाली घेऊन रूपे 

  हिमतीचा प्रकाश असता

  होते मग सार सोपे – –

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ दिव्यात ज्योती जळत राहिली… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

दिव्यात ज्योती जळत राहिली… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

 तूफानांशी लढत राहिली

 दिव्यात ज्योती जळत राहिली

*

 रक्ताला या मनस्वितेचा

 जन्मजात अभिशाप असावा

 म्हणुन कदाचित घुमटामध्ये

 नाद निनावी घुमत असावा

*

 सूर आतला जपत राहिली

 दिव्यात ज्योती जळत राहिली

*

 वर्मावरती घाव कुणाचा

 छिन्नभिन्न नभ, धरा फाटली

 हळूहळू मी केली गोळा

 शकले माझी विखूरलेली

*

 राखेतुनही उठत राहिली

 दिव्यात ज्योती जळत राहिली

*

 अभिजाताच्या साहित्याने

 अक्षरांस या दिधली दीक्षा

 एकच भाषा रक्ताश्रूंची

 एकच अग्नी, अग्निपरीक्षा

*

 मंत्र दिशांचे पठत राहिली

 दिव्यात ज्योती जळत राहिली

*

 कधी अचानक गोठुन गेले

 प्राणामधले निर्झर सारे

 माझ्या सोबत अंत कथेचा

 वाटे आता सरले सारे

*

 घटात अमृत भरत राहिली

 दिव्यात ज्योती जळत राहिली

*

 सवंग पेठा अनुबंधाच्या

 लागू होत्या अटी नि शर्ती

 उपचारास्तव केवळ उरल्या

 उचंबळाच्या रेशिमगाठी

*

 बहिष्कृतासम भ्रमत राहिली

 दिव्यात ज्योती जळत राहिली

*

 सरतिल दुःखे विझतिल वणवे

 गातिल पक्षी रानोरानी

 वीराण्यांवर निशागितांच्या

 झरेल नक्षत्रांचे पाणी

*

 स्वप्नास्तव या जगत राहिली

 दिव्यात ज्योती जळत राहिली !

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुगी… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ सुगी… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆

घाम जिरला जिरला

पिकं आलया तुर्‍याला

जणू शरदाचं चांदणं

जखडलं शिवाराला

*

पिकं आलया भराला

चालं सुगीचा घयटा

घाई घाईच्या चालीनं

चालं रानाकडं वाटा

*

नको येऊस पावसा

नको पदराची लुटं

भल्या आशेनं ठेवली

होती कुरीवरी मुठ

*

नाय कुठला आसरा

शेतावरी जीव सारा

अवकाळी पावसाचा

नकोच रं गळी फासा

*

सारं जग मज म्हणे

हाय जगाचा पोशिंदा

भुख भागवितो माझी

खाऊन भाकर कांदा

*

धन-धान्याच्या रासी

 हे भाग्य मजपासी

 गाढ झोपेत निजतो

कधी राहून उपासी

*

येती सुगीचं दिस

हाच दिवाळी दसरा

शरदाच्या चांदण्याचा

मळणीला तो आसरा

*

दिस कलला मिटाया

लखलख पाय वाटा

कष्टा-भाग्यानी उजळं

माझा कुणब्याचा ओटा

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ अडिसरी… कवी – अज्ञात ☆ डॉ. माधुरी जोशी ☆

डॉ. माधुरी जोशी

📖 वाचताना वेचलेले  📖

☆ अडिसरी… कवी – अज्ञात डॉ. माधुरी जोशी 

मराठीची कमाल बघा तर. — – 

अडीच अक्षरांचा कृष्ण

 अडीच अक्षरांची लक्ष्मी

अडीच अक्षरांची श्रद्धा

अडीच अक्षरांची शक्ती !

*

अडीच अक्षरांची कान्ता

 अडीच अक्षरांची दुर्गा

अडीच अक्षरांची इच्छा

 अडीच अक्षरांचा योध्दा !

*

अडीच अक्षरांचे ध्यान

 अडीच अक्षरांचा त्याग

अडीच अक्षरांचेच कर्म

 अडीच अक्षरांचाच धर्म !

*

अडीच अक्षरांत भाग्य

 अडीच अक्षरांत व्यथा

अडीच अक्षरांतच व्यर्थ

 बाकी सारे मिथ्या !

*

अडीच अक्षरांत संत 

 अडीच अक्षरांचा ग्रंथ

अडीच अक्षरांचा मंत्र

 अडीच अक्षरांचे यंत्र !

*

अडीच अक्षरांची तुष्टी

 अडीच अक्षरांचीच वृत्ती

अडीच अक्षरांतच श्र्वास

 अडीच अक्षरांतच प्राण !

*

अडीच अक्षरांचा मृत्यू

 अडीच अक्षरांचाच जन्म

अडीच अक्षरांच्याच अस्थि

 अडीच अक्षरांचाच अग्नि !

*

अडीच अक्षरांचा ध्वनी

 अडीच अक्षरांचीच श्रुती

अडीच अक्षरांचा शब्द

 अडीच अक्षरांचाच अर्थ !

*

अडीच अक्षरांचा शत्रू

 अडीच अक्षरांचा मित्र

अडीच अक्षरांचेच सत्य

 अडीच अक्षरांचेच वित्त !

जन्मापासुन मृत्युपर्यंत अडीच अक्षरांत बांधले आयुष्य हे मानवाचे,

… नाही कुणा उमगले नाही कुणा समजले.

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : डॉ. माधुरी रानडे जोशी.

 ≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 236 ☆ शब्द प्रवास… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 236 – विजय साहित्य ?

☆ शब्द प्रवास ☆

अक्षरांचे एक बीज

कोणी काव्यात सांडले

जीवनाच्या पारंबीला

उभे आयुष्य टांगले…!

*

माय झाली त्याची कथा

बाप झाला कादंबरी.

अनुभव पाठीराखा

सुख दुःखाच्या संगरी…!

*

अक्षरांची झाली भाषा

भाषा साधते संवाद.

लेख, कविता, ललित

प्रतिभेची लाभे दाद…!

*

दिली शब्दांनीच कीर्ती

दिले शब्दांनीच धन

शब्दानांच जाणवले

लेखकाचे अंतर्मन…!

*

मिळालेले पुरस्कार

अंतरीचे शब्दमित्र

जीवलग दोस्तापरी

व्यासंगाचे शब्दचित्र…!

*

साहित्यिक प्रवासात

अर्धचंद्र गुणदोषा .

स्वभावाचा समतोल

असुयेच्या कंठशोषा…!

*

नाही शब्दांची कविता

नाही कविता अक्षर .

साधकाने वाचकाला

देणे द्यायचे नश्वर…!

*

साहित्याच्या दरबारी

कुणी नाही सान मोठा

प्रसिद्धीच्या लालसेत

होऊ नये शब्द खोटा…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares
image_print