मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “अनंत चतुर्दशी …!!!” लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆

? वाचताना वेचलेले ?

🌺 “अनंत चतुर्दशी …!!!” लेखक : अज्ञात 🌺 प्रस्तुती – श्री सुनीत मुळे

ज्याक्षणी या शरीरात अडकणं संपेल

तो क्षणच अनंत – चतुर्दशी !

जेव्हा अहम् आणि त्वम् एकजीव

होतील तीच अनंत – चतुर्दशी !

 

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण 

बाप्पासारखा काही दिवसांचा

कोणी दीड, कोणी पाच

तर कोणी दहा दिवसांचा…

 

थोडा वेळ आहोत इथे

तर थोडं जगून घेऊया

बाप्पा सारखे थोडे 

लाडू मोदक खाऊन घेऊया…

 

इथे सर्वच आहेत भक्त आणि 

सगळ्यांमध्ये आहे बाप्पा

 थोडा वेळ घालवू सोबत

आणि मारु थोड्या गप्पा…

 

मनामनातले भेद मिटतील

मिटतील सारे वाद 

एक होईल माणुस

आणि साधेल सुसंवाद…

 

जातील निघून सारेच

कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला

ना चुकेल हा फेरा

जन्माला आलेल्या कोणाला…

 

बाप्पा सारखे नाचत यायचे 

आणि लळा लावून जायचे

दहा  दिवसांचे पाहुणे आपण 

असे समजून जगायचे…

 

किंमत तुमची असेलही 

तुमच्या प्रियजनांना लाख

आठवणी ठेवतील जवळ 

अन् विसर्जित करतील तुमची राख…

 

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण 

दीड दिवस अन् दहा दिवसाचा

हे जगणे म्हणजे एक उत्सव 

हा काळ दोन घडींच्या सहवासाचा…

लेखक : अज्ञात 

संग्राहक : श्री सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ बाप्पा निघाले गावाला… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ सुश्री निलांबरी शिर्के आणि श्री आशिष बिवलकर ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  बाप्पा निघाले गावाला… (विषय एकच… काव्ये दोन) ☆ सुश्री निलांबरी शिर्के आणि श्री आशिष बिवलकर ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?– बाप्पा निघाले गावाला… – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

( १ ) 

बाप्पा निघाले गावाला

मघे जोरात पाऊस आला

भिजायला लागले बाप्पा

काळजी पडली पोरांना 

निरागसतेने शर्ट  काढला

बाप्पांभोवती गुंडाळला

भाबड्याने वर हातानेच

संरक्षक  दिले गणेशाला

गणेशही भाबडा  निरागस 

डोके काढून घेतो  श्वास

तो पण रमून गेलाय जणू

अशा मिरवणुकीत खास

बाप्पा काय ! बालमन काय !

सारं काही एकच असत 

देवावरच्या श्रद्धेला नित

विश्वासाचं वरदान असतं 

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

श्री आशिष बिवलकर   

?– बाप्पा निघाले गावाला… – ? ☆ श्री आशिष बिवलकर ☆

( २ ) 

कोसळणाऱ्या पावसाने नव्हे

भक्तिभावात चिमुकले ओलेचिंब |

काढून सदरा पांघरती बाप्पाला,

निरागस मनाचे उमटले प्रतिबिंब |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पुढल्या वर्षी…! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ पुढल्या वर्षी…! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

(गणपतीला गावाला गेलेले चाकरमानी आता मुंबईला परतू लागल्या नंतर, गावच्या घरात कायम राहणाऱ्या माऊलीच्या मनातील विचार, खालील रचनेत मांडायचा प्रयत्न केला आहे !)

दहा दिवसांचा सोहळा

आता उद्या संपन्न होणार,

वाजत गाजत आले बाप्पा

वाजत गाजत जाणार !

वेळ होता आरतीची

कानी घुमेल झांजेचा नाद,

गोडधोड प्रसादाचा मिळेल

पुन्हा पुढल्यावर्षी स्वाद !

परत जातील चाकरमानी

घरी आपल्या मुंबईला,

येतील पुढल्या वर्षी लवकर

सारे बाप्पाच्या तयारीला !

घर मोठे गजबजलेले

आता शांत शांत होईल,

सवय होण्या शांततेची

वेळ बराच बघा जाईल !

होता उद्या श्रींचे विसर्जन,

रया जाईल सुंदर मखराची,

घर करून राहील मनी

मूर्ती मखरातल्या गणेशाची !

मूर्ती मखरातल्या गणेशाची !

© प्रमोद वामन वर्तक

सध्या सिंगापूर +६५ ८१७७५६१९

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 172 – कुटुंब ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 172 – कुटुंब ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

विश्वात्मक

कुटुंबाचा।

वारसा हा

भारताचा।

 

जीवसृष्टी

हो साकार

जगण्याचा

अधिकार ।

 

स्वार्थ सोडा

मैत्री करा ।

प्रेमाची हो

खात्री स्मरा।

 

एकमेका

देऊ साथ।

मदतीला

लाखो हात।

 

छोट्यासवे

होऊ सान।

थोरांनाही

देऊ मान।

 

सान थोर

संगतीला।

अंत नसे

प्रगतीला।

 

रुसवा नि

राग थोडा।

सोडुनिया

मने जोडा।

 

चूक भूल

द्यावी घ्यावी

आनंदाचे

गीत व्हावी।

 

चार दिस

जगायचे

कुढत का

बसायचे।

 

उगा नको

कुरवाळू।

मत्सराचा

द्रोह टाळू

 

धुंदीमधे

नको राहू।

नात्याचा तू

अंत पाहू।

 

हाताची ती

सारी बोटे।

कुणी मोठे

कुणी छोटे।

 

साऱ्यांनाच

एक माप ।

लावती ना

मायबाप।

 

आंतराची

भाषा घ्यावी।

शहाण्याने

समजावी।

 

आज जरी

इहलोकी।

उद्या असे

परलोकी।

 

वाहूनिया

श्रद्धांजली।

शांती मना

का लाभली।

 

विश्वासाचे

जपू धागे।

खेद खंत

नको मागे।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पड रं पावसा… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ पड रं पावसा… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆

पड रं पावसा  पड रं पावसा

नको होऊस वैरी

भल्या आशेनं  तुझ्या भरवशी

रानं आम्ही पेरली

 

होतं नव्हतं धान सरलं

पार तळ गाठला

पोटातल्या भुकेचा

कल्लोळ उरी पेटला

 

कारं वाद्या काय आडलं

काळ ढग कुठं दडलं

तुझ्या वाचून रान हिरवं

मान टाकून कलमडलं

 

धावून ये तू डोंगराआडनं

लागूंदे आभाळा गळ

तग धरूंदे शिवार माझं

लागून मातीला गर

 

सोया, भूइमूंग, जवार

पिक उभं डौलदार

फाटक्या पदरी टाक दान

सोड आभाळातनं धार

 

पड रं पावसा  पड रं पावसा

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य #192 ☆ घे निरोप आमुचा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 192 – विजय साहित्य ?

☆ घे निरोप आमुचा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

(वृत्त – चामर)

(गालगाल गालगाल गालगाल गालगा)

चाललास आज तू, गजानना तुझ्या घरा

घे निरोप आमुचा, पुढील साल ये त्वरा. || धृ. ||

आसमंत भारला, निनादल्या दहा दिशा.

रूपरंग आगळे, पुकारती गणाधिशा

आरतीत व्यापला, पदापदात गोडवा

घे निरोप आज तू, उरेल भास रे खरा .|| १ ||

जाणतोस तू मना, अजाणता करी चुका

भाव जाण आतला,नको कश्यात न्यूनता

भव्य दिव्य‌ सोहळा, तुझ्या सवेच साजिरा

श्वास श्वास बोलका, विसावला मनी जरा. || २ ||

पाहुणा घरातला,घराकडेच चालला

गाव सोडले जरी, भरून राहिली मने

बंधुभाव प्रेरणा, स्विकारती निमंत्रणे

लोकमान्य ठेव ही, सुखात ठेव लेकरा. || ३ ||

आठवात मोरया, कणाकणात जागृती

तेजहीन भासतो,फळे फुले प्रसाद‌ ही

नृत्य नाट्य गायनी, चराचरात व्यापला

ओढ लावली मना, सुखावली‌ वसुंधरा. || ४ ||

© कविराज विजय यशवंत सातपुते

हकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गणेशवंदना… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल

 

?  कवितेचा उत्सव ?

गणेशवंदना… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

(सुरनिम्नगा – ललगालगा  ललगालगा ललगालगा ललगालगा)

कर जोडते तुजला सदा मन लावुनी नमते तुला

भव तारका भय हारका जगण्यास दे मजला कला॥

प्रथमेश तू तुज वंदुनी पहिल्या पदा मग ठेवतो

कर पार तू विपदातुनी मनमंदिरी जप चालतो

गणनायका कर दूर तू तम माझिया जिवनातला

भव तारका भय हारका जगण्यास दे मजला कला॥

तुझियामुळे सुख येतसे नलगे मना कसली तमा

चरणावरी शिर ठेवुनी करुणानिधी  करते जमा

मज लाभता वर रे तुझा यश मार्ग हा सगळ्यातला

भव तारका भय हारका जगण्यास दे मजला कला॥

सुर श्रेष्ठ तू असुरां अरी वरदान हे तुज लाभले

जन मानसी तव रूप हे भरुनी असे बघ राहिले

स्मर मोरया म्हण मोरया जयघोष हा तव भावला

भव तारका भय हारका जगण्यास दे मजला कला॥

कर जोडते तुजला सदा मन लावुनी नमते तुला

भव तारका भय हारका जगण्यास दे मजला कला॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता – अध्याय पहला – ( श्लोक ११ ते २० ) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय पहिला — भाग दुसरा – ( श्लोक ११ ते २०) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

अयनेषु च सर्वेषु यथाभागमवस्थिताः।

भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि ॥११॥

तस्य सञ्जनयन्हर्षं कुरुवृद्ध: पितामह: |

सिंहनादं विनद्योच्चै: शङ्खं दध्मौ प्रतापवान् ||१२||

तत: शङ्खाश्च भेर्यश्च पणवानकगोमुखा: |

सहसैवाभ्यहन्यन्त स शब्दस्तुमुलोऽभवत् || १३||

तत: श्वेतैर्हयैर्युक्ते महति स्यन्दने स्थितौ |

माधव: पाण्डवश्चैव दिव्यौ शङ्खौ प्रदध्मतु: || १४||

पाञ्चजन्यं हृषीकेशो देवदत्तं धनञ्जय: |

पौण्ड्रं दध्मौ महाशङ्खं भीमकर्मा वृकोदर: || १५||

अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिर: |

नकुल: सहदेवश्च सुघोषमणिपुष्पकौ ||१६||

काश्यश्च परमेष्वास: शिखण्डी च महारथ: | 

धृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकिश्चापराजित: ||१७||

द्रुपदो द्रौपदेयाश्च सर्वश: पृथिवीपते |

सौभद्रश्च महाबाहु: शङ्खान्दध्मु: पृथक् पृथक् ||१८||

स घोषो धार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत् |

नभश्च पृथिवीं चैव तुमुलो नुनादयन् ||१९||

अथ व्यवस्थितान्दृष्ट्वा धार्तराष्ट्रान्‌ कपिध्वजः।

प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्य पाण्डवः ৷৷२०৷৷

☆ भावानुवाद  ☆

राखू अचल श्रेष्ठ मनोबल अपुल्या सैन्याचे

समस्त आपण करू  संरक्षण  भीष्माचार्यांचे ॥११॥

शार्दूलासम गर्जोनी शंखा  फुंकित देवव्रत

उत्साह करण्या वर्धिष्णु दुर्योधनाचा समरात ॥१२॥

अगणित शंख पणव आनक गोमुख आणि नौबती

एकसमयावच्छेदे रणांगणी नाद करीत  गर्जती ॥१३॥

धवल अश्व रथास ज्यांच्या श्रीकृष्णार्जुनांनी

युद्ध सिद्धता प्रकट केली शंखांसिया फुंकुनी ॥१४॥ 

पाञ्चजन्य केशवशंख देवदत्त धनञ्जयाचा

महाध्वनीचा पौण्ड्रशंख वृकोदर भीमाचा ॥१५॥ 

कुंतीतनय युधिष्ठिराने  अनंतविजय फुंकला

सुघोष नकुलाचा मणिपुष्पक  सहदेवाचा  निनादला ॥१६॥

महाधनुर्धर काश्य शिखंडी महारथी विराट धृष्टद्युम्न 

सात्यकी अपराजित राजा दृपद महाबाहु अभिमन्यु

पञ्चपुत्र द्रौपदीचे ही वीर रथारूढ युद्धसिद्ध 

शंखध्वनीने समस्त योद्ध्ये करीत महानिनाद ॥१७, १८॥

थरकाप नभ वसुंधरेचा  भयाण शंखगर्जनेने

हृदयासी कंप फुटला  कौरव सेनेला भीतीने ॥१९॥

शस्त्रसज्ज कौरवसेना पाहूनी सिद्ध समरासी

कपिध्वज पार्थ उचले  त्वेषाने  गांडीवासी  ॥२०॥

– क्रमशः भाग दुसरा

अनुवादक : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाळणा कवितेचा… ☆ सौ. प्रतिभा संतोष पोरे ☆

सौ. प्रतिभा संतोष पोरे 

परिचय

शिक्षण – एम् एस्सी. बी एड,  योगशिक्षक डिप्लोमा, एम.ए योगशास्त्र.

छंद –   वाचन, कविता, कथा, बालनाट्य इ. लेखन

पुरस्कार – योगभूषण (२०२१), चारूतासागर प्रतिष्ठान तर्फे – उत्कृष्ट कथा पुरस्कार – (२०२३)

? कवितेचा उत्सव ?

☆ पाळणा कवितेचा… ☆ सौ. प्रतिभा संतोष पोरे ☆

✒️

पहिल्या दिवशी आली जन्मासी।

शब्दकळी जणू अलगद फुलसी।

नवरसांच्या धारा बरसती जो बाळे जो जो गे जो।१।

✒️

दुसऱ्या दिवशी जुळली अक्षरे

शब्दांतून सुंदर अर्थ निघे रे

लघुगुरूंचे पडसाद खरे जो बाळे जो जो गे जो ।२।

✒️

तिसऱ्या दिवशी मनातील कचरा

उमटती शब्द होतसे निचरा

शब्दब्रम्हाने अंतरी शुद्धता जो बाळे जो जो गे जो ।३।

✒️

चौथ्या दिवशी साधले यमक

संवेदनशीलतेचे असे गमक

वाचकांसी लाभे सुख अमूप जो बाळे जो जो गे  जो ।४।

✒️

पाचव्या दिवशी कविता सजली

शीर्षक देता गालात हसली

अलंकार नि वृत्ताने बहरली जो बाळे जो जो गे जो ।५।

✒️

सहाव्या दिवशी शब्द मधाळ

वाणीने वदता बहु रसाळ

प्रतिभेचा हा रम्य अविष्कार जो बाळे जो जो गे जो ।६।

✒️

सातव्या दिवशी मोठा गर्भितार्थ

समीक्षकासी ना सापडे अर्थ

करी लेखणी कवी होई प्रख्यात ।  

जो बाळे जो जो गे जो ।७।

✒️

© सौ. प्रतिभा पोरे

पत्ता – ‘सोनतुकाई’, शांतीसागर कॉलनी, सांगली – भ्रमणध्वनी क्रमांक – ८७८८४५८६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #175 ☆ … ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 175 ☆ कामगार…! ☆ श्री सुजित कदम ☆

परवा आमच्या कारखान्यातला

कामगार मला म्हणाला

आपण आपल्या हक्कासाठी

आदोलन करू.. मोर्चा काढू..

काहीच नाही जमल तर

उपोषण तरी करू…

पण..

आपण आपल्या हक्कासाठी

आता तरी लढू

बस झाल आता हे असं लाच्यारीने जगणं

मर मर मरून सुध्दा काय मिळतं आपल्याला

तर दिड दमडीच नाणं..

आरे..

आपल्याच मेहनतीवर खिसे भरणारे..

आज आपलीच मज्जा बघतात

आपण काहीच करू शकणार

नाही ह्या विचारानेच साले आज

आपल्या समोर अगदी ऐटीमध्ये फिरतात

आरे..

हातात पडणार्‍या पगारामध्ये धड

संसार सुध्दा भागत नाही…!

भविष्याच सोड उद्या काय

करायच हे सुद्धा कळत नाही

महागड्या गाडीतून फिरणार्‍या मालकांना

आपल्या सारख्या कामगारांच जगण काय कळणार..

आरे कसं सांगू..

पोरांसमोर उभ रहायचीही

कधी कधी भिती वाटते

पोर कधी काय मागतील

ह्या विचारानेच हल्ली धास्ती भरते

वाटत आयुष्य भर कष्ट करून

काय कमवल आपण..

हमालां पेक्षा वेगळं असं

काय जगलो आपण..!

कामगार म्हणून जगण नको वाटतं आता..!

बाकी काही नाही रे मित्रा..

म्हटल..एकदा तरी

तुझ्याशी मनमोकळ बोलाव

मरताना तरी निदान कामगार

म्हणून जगल्याच समाधान तेवढ मिळावं…!

म्हणूनच म्हटलं

आपण आपल्या हक्कासाठी

आदोलन करू… मोर्चा काढू…

नाहीच काही जमल तर

उपोषण तरी करू…पण

आपण आपल्या हक्कासाठी आता तरी लढू..

© श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares