मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ आरसा ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक  

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ? आरसा श्री प्रमोद वामन वर्तक ☆

मज पारखून आणले 

बाजारातून लोकांनी,

दोरा ओवून कानातूनी 

टांगले खिळ्यास त्यांनी !

येता जाता, मज समोर 

कुणी ना कुणी उभा राही,

चेहरा पाहून पटकन 

कामास आपल्या जाई !

पण घात दिवस माझा 

आला नशिबी त्या दिवशी,

खाली पडता खिळ्यावरून

शकले उडाली दाही दिशी !

होताच बिनकामाचा 

लक्ष मजवरचे उडाले,

सावध होवून सगळे 

मज ओलांडू लागले !

रीत पाहून ही जनांची

मनी दुःखी कष्टी झालो,

नको पुनर्जन्मी आरसा 

विनवू जगदीशा लागलो !

विनवू जगदीशा लागलो !

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निरोप… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ निरोप… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

गणपती गौराईने

घर किती आनंदले

ब्रम्हांडीचे चैतन्य हे

घरामध्ये सामावले ||

 

गौरी गणेश पुजिले

कृपाप्रसाद लाभला

सालभरची शिदोरी

जीव किती सुखावला ||

 

जाई कुमती लयाला

चित्तवृत्ती आनंदल्या

प्रेम सख्य जोडूनिया

जपे कुटुंब स्वास्थ्याला ||

 

गौरी गणेशाची पूजा

केले मंगल औक्षण

सणांचे हे प्रबोधन

समाजहीत रक्षण ||

 

निरोप हा गौराईला

संगे निघे गणपती

मन जडावले फार

डोळे भरूनिया येती ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काव्य माझे… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ काव्य  माझे… ☆ श्रीशैल चौगुले ☆

काव्य माझे

अश्रुंचे थेंब

शब्दांचे कोंब

हृदया झोंब.

 

काव्य माझे

अनंत सेवा

ज्ञानाचा हेवा

प्रतिभा ठेवा.

 

काव्य माझे

चैतन्य ध्यास

अक्षर श्वास

संतांचे दास.

 

काव्य माझे

ओवीचे श्लोक

नभाचे टोक

टिकेचा रोख.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 201 ☆ आल्या गौराई गं सखे ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 201 ?

आल्या गौराई गं सखे ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

एक गौरी जन्मा आली

जेष्ठ नक्षत्री या दिनी

रूपवती, गुणवती

बुध्दीवान, सुनयनी ॥

 

भाद्रपद मासोत्तम

गौरी जेवणाचा दिन

जन्म झाला देहू गावी

योग हा मणीकांचन ॥

 

आली गौराई गं सखे

घरी सोन पावलांनी

माझी सून – सोनसळी

सुकोमल, सुकेशिनी ॥

 

कधी गौरी, कधी दुर्गा

परी रूपे पार्वतीची

माझी लेक, माझी सून

दोन्ही कृपा गौराईची ॥

 

एक प्रीती दूजी प्रिया

नियतीचीच किमया

सुलक्षणी, सुस्वरूप

अरूंधती, अनसूया ॥

 

गौरायांचे घरोघरी

होते नित्य आगमन

सून आणि लेक छान

आहे गौराई समान ॥

 

करू सन्मान दोघींचा

सोनपावलांना जपू

गौराईचा वसा असा

 सखे, जगताला अर्पू ॥

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ महालक्ष्मी ला निरोप ☆ सौ. विद्या पराडकर ☆

सौ. विद्या पराडकर

? कवितेचा उत्सव ?

☆ 🙏🏻महालक्ष्मी ला निरोप 🙏🏻 ☆ सौ. विद्या पराडकर ☆

अनुराधा नक्षत्रावर गौरीचा आगमन

आनंदाचे,चैतन्याचे घरात वातावरण

जेष्ठा नक्षत्रावर षोडशोपचारे  पूजन

आप्त, स्व कीयांना  असते आमंत्रण☘️

 

चंदेरी साडीला सुवर्णाचा काठ

सुवर्ण अंलकारांचा केवढा थाट

गुलाबांच्या  फुलांचा कंठी शोभे हार

कमळांच्या फुलांचा वेगळाच  बाज☘️

 

महालक्ष्मीला  नैवेद्य  दाखवू पुरण  पोळीचा

केशरी भात अंबिलीचा

त्यांच्या आवडीचे पदार्थ  बनवू

माहेरपण जपण्याकरता काय काय करु☘️

 

अखेर तिसरा मूळ नक्षत्राचा दिवस उगवला

तीन दिवस  पक्ष्याप्रमाणे भुरकंन उडाले

जपून जा गं,फोन करीत जा ग

तिकडे गेली की, तिकडचीच होते गं ☘️

 

तुमचा अहेर,मावशी,मामांनी घेतलेल्या साडया  घेतल्या  कां

मुलांची खेळणी,भेटवस्तू घेतली कां

लाडू,करंज्या, अनारसे  पुरतील कां ग

इकडली काळजी करु नको गं☘️

 

किती किती घाई  होते ना गं

जातांना दही भात  खावून जा ग

हळद कुंकू व ओटी घेवून जा

पुढील वर्षी, यायच बर कां ग ☘️

 

तुमच्या शिवाय जीवन

म्हणजे पाण्याशिवाय  मासा ग

तुम्हाला  सतत पहाता यावे म्हणून

मनाच्या  कॅमेर्‍यात  बंदिस्त  करते ग

© सौ. विद्या पराडकर

वारजे  पुणे..मो – ९२२५३३७३३०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #207 ☆ हळवा कोपरा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 207 ?

☆ हळवा कोपरा… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

रात्र भिजली पावसाने, थांबना आता जरा

मातिच्या गंधात आहे, मिसळलेला मोगरा

काल तू राहून गेला, ना पुन्हा डोकावले

आजही मी रिक्त जपला, तोच हळवा कोपरा

दूर गेला तू जरासा, मी दिला आवाज पण

ऐकता आला तुला ना, शब्द होता कापरा

प्रेमधारा काल निर्मळ, वाहणारी पाहिली

का प्रदूषित आज झाला, तोच प्रीतीचा झरा ?

आग पाणी खेळण्याची, वाटली मज साधने

खोल पाणी त्यात होता, जीवघेणा भोवरा

सर्व नाती सोडली मी, पूजले केवळ तुला

भेटण्याला होत आहे, जीव माझा बावरा

काढले कोणी घरातून, काळजी नाही अता

मृत्युनंतर राखसुद्धा, राखते माझी धरा

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ अशीच घडू दे सेवा… ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– अशीच घडू दे सेवा– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

तुला रंगवता  रंगवता,

तुझ्या रंगात  रंगलो |

एकरूप तल्लीन होऊन,

तुझ्या भक्तीत दंगलो |

साकरली मूर्ती,

फिरवतोय शेवटचा हात |

होशील विराजमान,

घरोघरी अन् मंडपात |

माझ्या कार्यशाळेत,

थोडासाच उरला मुक्काम |

आशिर्वाद तुझे,

मनी भाव असुदे निष्काम |

पार्थिव मूर्ती तुझी,

सर्व विघ्नहर्ता तुझे नाम |

तुला साकारायचे,

या हातांना मिळते काम |

लंबोदर जरी तू असलास,

तुझ्या कृपेने चाले उदरभरण |

अन्नदाताच तू आमचा,

आलो सद् भावे तुझं शरण |

एक सामान्य मूर्तीकार मी,

विनवतो पोटी घे प्रमाद  |

अशीच घडू दे हातून सेवा,

असाच राहू दे कृपा आशिर्वाद |

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मोल… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ मोल… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

रमण्यावरती कोण पेशवा दान वाटतो आहे

पूर्वसुरींच्या घटनांचे तो पाप क्षाळतो आहे

 

विध्वंसाचा डाव भयानक तोच खेळला होता

अपराधांचे कथन कराया मौन पाळतो आहे

 

विरांगणेच्या घटृमिठीचा आठव आला तेंव्हा

अमूर्त सुंदर सखी कुंतली फूल माळतो आहे

 

जगावेगळी प्रीत बावळी त्या दोघांची होती

दोघांचेही प्रेम आंधळे तोच मानतो आहे

 

विरहवेदना काळजातल्या जरी राहिल्या ताज्या

तरी सखीला तोच आपल्या सौख्य मागतो आहे

 

रीत जगाची कोण पाळतो समर्पणाच्या वेळी

आत्मबलाने डाव जिंकणे हेच साधतो आहे

 

मोल जयाचे तया द्यायचे खरेच असते येथे

असा तसा मग कधीतरी हा देह संपतो आहे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 145 ☆ वेदनेच्या कविता… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 144 ? 

☆ वेदनेच्या कविता…

वेदनेच्या ह्या कविता सांगू कशा 

मूक झाली भावना ही महादशा..धृ

 

अश्रू डोळ्यांतील संपून गेले पहा 

स्पंदने हृदयाची थांबून गेली पहा 

आक्रोश मी कसा करावा, कळेना हा.. १

 

नाते-गोते आप्त सारे विखुरले 

रक्ताचे ते पाणी झाले आटले 

मंद मंद मृत शांत भावना.. २

 

ऐसे कैसे दिस आले, सांगा इथे 

कीव ना इतुकी कुणाला काहो इथे 

आंधळे हे विश्व अवघे भासे इथे.. ३

 

सांगणे इतुकेच माझे आता गडे 

अंध ह्या चालीरीतीला पाडा तडे 

राज कवीचे शब्द आता तोकडे.. ४

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ फिनिक्स… कवी: डाॅ.निशिकांत श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

सौ. ज्योत्स्ना तानवडे

? काव्यानंद ?

☆ फिनिक्सकवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆ रसग्रहण.. सौ.ज्योत्स्ना तानवडे  

 डाॅ. निशिकांत श्रोत्री

जीवनात चढउतार येतात, मानापमानाचे खेळ सुरू असतात. बरेचदा अपयश, बदनामीमुळे मानसिक, शारीरिक होरपळ होते. यातूनही नव्या जिद्दीने पुन्हा उभे रहात नवा डाव सुरू होतो. अशाच एका जिद्दी, नव्या उमेदीने पुन्हा डाव मांडणाऱ्या माणसाचे मनोगत डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी ‘फिनिक्स’ या कवितेत मांडले आहे. तिचाच आज आपण रसास्वाद घेणार आहोत.

फिनिक्स  कवी: डाॅ.निशिकांत  श्रोत्री ☆

पुनःपुन्हा पुनःपुन्हा

तोच अनुभव, त्याच ज्वाळा

पेटून निघालोय अंतर्बाह्य

शरीराने अन् मनानेही

……….. नकळतच!

 

क्षणभर बरं वाटलं

अजूनही मन शिल्लक आहे तर …..

            ….. जिवंत आहे

विश्वासच बसत नव्हता!

 

हे सुखही क्षणभराचंच

दुर्लक्ष करता येत नव्हतं

बसणाऱ्या चटक्यांकडे

अन् होरपळून निघालो

याच ज्वाळांच्या

भाजून काढणाऱ्या आठवणींनी!

 

आता मात्र ठरवलंय

जळून खाक व्हायचं

            ….. नेहेमीसारखंच

पण यावेळी मात्र

उठायचं नाही परत फिनिक्ससारखं

पुन्हा भाजून घ्यायला

अन् पुन्हा जाळून घ्यायला!

 

का केलास मग तो

हळुवार संजीवन स्पर्श

माझं मन आणि शरीर

जळून उरलेल्या

या तप्त राखेला

पुन्हा एकदा जन्म द्यायला

एका नव्या फिनिक्सला?

©️ डाॅ. निशिकान्त श्रोत्री

पुन:पुन्हा पुन:पुन्हा

तोच अनुभव, त्याच ज्वाळा

पेटून निघालोय अंतर्बाह्य

शरीराने अन् मनानेही

…. नकळतच !

आयुष्यात अपयशाचा, संकटांचा पुन्हा पुन्हा तोच दाहक अनुभव मी घेतला आहे. त्या धगीने नकळतच मी शरीराने आणि मनानेही पूर्णपणे होरपळून निघालो आहे.

या कवितेचे शीर्षकच कवितेचे सार सांगत आहे. आपल्याच राखेतून नवा जन्म घेत आकाशात झेपावणारा पक्षी म्हणजे फिनिक्स. पौराणिक कथांमध्ये त्याला अमरपक्षी म्हणतात. स्वतःच्या राखेतून उठण्याच्या क्षमतेमुळे त्याला अमर म्हटले जाते. अशीच विजिगीषू वृत्ती असणाऱ्या एका परिस्थितीशी लढणाऱ्याचे हे मनोगत.

मुक्तछंदात असणारी ही कविता प्रथम पुरुषी एकवचनात लिहिलेली आहे. कवी मोकळेपणाने आपण आयुष्यात अनुभवलेले दाहक प्रसंग कथन करीत परिस्थितीशी संवाद साधतो आहे. या अनुभवाने आपण पूर्णपणे गलितगात्र झाल्याचे सांगत आहे. अपयश, बदनामी, प्रेमभंग, अपमान अशासारख्या गोष्टींनी पुन्हा पुन्हा या प्रसंगाला सामोरे जातो आहे. त्याची तीव्रता दाखवायला नुसते पुन्हा पुन्हा असे न लिहिता पुन:पुन्हा पुन:पुन्हा असा प्रभावी शब्दप्रयोग केलेला आहे.

क्षणभर बरं वाटलं

अजूनही मन शिल्लक आहेत तर…

… जिवंत आहे

विश्वास बसत नव्हता !

या अवस्थेची जाणीव झाली. संवेदना जागी झाली आणि खूप बरं वाटलं. कारण हे जाणवण्या एवढं माझं मन अजून सावध आहे म्हणजे मी अजून जिवंत आहे. पण खरंच माझा यावर विश्वासच बसत नाही.

बसलेल्या कठोर आघाताने आपण जणू निष्प्राण झालो, पूर्ण उमेद खचल्याने धुळीला मिळालो अशीच कवीची भावना झालेली असते. पण संवेदना जागृत आहेत हे लक्षात आल्यावर आपण अजून जिवंत आहोत ही जाणीव त्याला होते आणि थोडसं निर्धास्त पण वाटतं.

हे सुखही क्षणभराचंच

दुर्लक्ष करता येत नव्हतं

बसणाऱ्या चटक्यांकडे

अन् होरपळून निघालो

याच ज्वाळांच्या

भाजून काढणाऱ्या आठवणींनी !

मी जिवंत आहे या जाणिवेचे सुख क्षणीकच ठरले. कारण त्या दाहकतेने बसणाऱ्या चटक्यांकडे दुर्लक्ष करता येत नव्हतं आणि त्यांच्या त्या भयावह आठवणींनी पुन्हा पुन्हा जीव पोळून निघत होता.

अशा जीवघेण्या आघातामुळे होणारे शारीरिक मानसिक त्रास, चटके हे नेहमी दृश्य असतात. ते सोसावेच लागतात. त्यामुळे विसरता येत नाहीत आणि त्यांच्या आठवणी या जास्त त्रासदायक असतात. त्यामुळे आपण आता संपलो असे वाटून आत्मविश्वास रसातळाला जातो.

आता मात्र ठरवलंय

जळून खाक व्हायचं

…नेहमीसारखंच

पण यावेळी मात्र

उठायचं नाही परत फिनिक्ससारखं

पुन्हा भाजून घ्यायला

अन् पुन्हा जाळून घ्यायला ?

आता मात्र मी ठरवलंय असा पुन्हा अनुभव आला की, नेहमीसारखं त्यात जळून खाक व्हायचं. म्हणजेच नेस्तनाबूत व्हायचं. पण आता या राखेतून त्या फिनिक्स पक्षासारखं पुन्हा उठायचं मात्र नाही. पुन्हा होरपळत त्यात नव्याने जाळून घ्यायचं नाही. म्हणूनच आता पुन्हा कसलाही प्रयत्न करायचा नाही. जिवंत असूनही मेल्यासारखे जगायचे.

कवी झालेल्या होरपळीने इतका गलितगात्र झाला आहे की, आता पुन्हा पुन्हा हा अनुभव घ्यायची त्याची तयारी नाही. त्यामुळे त्याने आता पुन्हा उभारी घ्यायचीच नाही. असंच उध्वस्तपण सोसत रहायचं असा निर्धार केला आहे.

का केलास मग तो

हळुवार संजीवन स्पर्श

माझं मन आणि शरीर

जळून उरलेल्या

या तप्त राखेला

पुन्हा एकदा जन्म द्यायला

एका नव्या फिनिक्सला ?

या दाहक आघाताने जणू जळून राख झालेल्या माझ्या तापलेल्या मन आणि शरीराला तू का तुझा संजीवन देणारा स्पर्श केलास ? आता यातून पुन्हा एकदा नव्या फिनिक्सला जन्म द्यायचा काय ?

इथे कवीला कुणीतरी आधाराचा हात देणारे, मानसिक उभारी देणारे, पुन्हा लढण्याचे बळ देणारे भेटलेले आहे. त्यामुळे तो पुन्हा उभा राहतोय. पण त्याला या पुन्हा पुन्हा येणाऱ्या अपयशाची, कटू अनुभवाची जबरदस्त भीती वाटते आहे. त्यामुळे तो त्या सुहृदाला विचारतो, ” का मला संजीवन देणारा तुझा स्पर्श केलास ? का माझी जीवनेच्छा पुन्हा जागृत केलीस ? “

झाल्या आघाताने कवीचे मानसिक खच्चीकरण होते. त्यातून तो सावरतो. पुन्हा उभा रहातो. पुन्हा कोसळतो. त्याची असह्य तगमग होते. ही सारी मानसिक, भावनिक आंदोलने सहजसुंदर शब्दरचनेत मांडण्यात कवी अतिशय यशस्वी झालेला आहे.

या कवितेत फिनिक्स या रूपकाचा खूप छान उपयोग केलेला आहे. परिस्थितीने पूर्ण हतबल झालेला कवी पुन्हा नव्या उभारीने परिस्थितीला सामोरे जात नव्याने डाव मांडतो. यासाठी योजलेले फिनिक्सचे रूपक अगदी यथार्थ आहे.

ही कविता प्रथम पुरुषी एकवचनात असली तरी प्रत्येकजणच आपल्या आयुष्यात अशा परिस्थितीला केव्हा ना केव्हा सामोरा गेलेलाच असतो. त्यामुळे ही कविता फक्त एकट्या कवीची न रहाता सर्वस्पर्शी होते. कारण असे अनुभव हे सार्वत्रिक असतात. हे अनन्योक्ती अलंकाराचे छान उदाहरण म्हणता येईल.

माणसाला आयुष्याच्या वाटचालीत कधी शत्रूकडून त्रासदायक आघात, व्यवहारात, व्यवसायात पूर्ण अपयश, मित्रांकडून फसवणूक, जोडीदाराकडून प्रेमात अपेक्षाभंग अशा जीवघेण्या अनुभवांना तोंड द्यावे लागते. तो मोडून पडतो. शारीरिक, मानसिक होरपळ होते. आत्मविश्वास लयाला जातो. अशावेळी एखादा मित्र, एखादा हितैषी, जिवलग, जोडीदार आधाराचा हात देतो. पाठीशी खंबीर उभा राहतो. मनाची उभारी वाढवून पुन्हा लढण्याचे बळ देतो. पुन्हा वाटचाल सुरू होते. पुन्हा अशा अनुभवाची पुनरावृत्ती होते. पण माणसाची दुर्दम्य  इच्छाशक्ती, जबरदस्त जीवनेच्छा गप्प बसू देत नाही. त्यामुळे पुन्हा नव्या उमेदीने तो जगण्याला सामोरा जाण्यास तयार होतो.

अशाच पद्धतीने लढणाऱ्याच्या मानसिक आंदोलनाचा एक सुंदर आलेख कवी डॉ. निशिकांत श्रोत्री यांनी फिनिक्स मध्ये मांडलेला आहे.

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares