मराठी साहित्य – काव्यानंद ☆ हिंदुनृसिंह…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसास्वाद – सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆  हिंदुनृसिंह…. स्व. वि. दा. सावरकर ☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

☆  हिंदुनृसिंह…. स्व. वि. दा. सावरकर ☆

हे हिंदुशक्ति-संभूत-दिप्ततम-तेजा

हे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजा

हे हिंदुश्री-सौभाग्य-भूतिच्या साजा

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

करि हिंदुराष्ट्र हें तूतें । वंदना

करि अंतःकरण तुज, अभि – नंदना

तव चरणिं भक्तिच्या चर्ची। चंदना

गूढाशा पुरवीं त्या न कथूं शकतों ज्या

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

 

हा भग्न तट असे गडागडाचा आजी

हा भग्न आज जयदुर्ग आसवांमाजी

ही भवानीची ह्या पुन्हा गंजली धारा

ती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारा

गड कोट जंजिरे सारे । भंगले

जाहली राजधान्यांची । जंगले

परदास्य – पराभवि सारी । मंगले

या जगती जगू, ही आज गमतसे लज्जा

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

 

जी शुद्धि हृदाची रामदास शिर डुलवी

जी बुद्धि पांच शाह्यांस शत्रुच्या झुलवी

जी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवी

जी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवी

ती शुद्धि हेतुची कर्मी । राहुं दे

ती बुद्धि भाबड्या जिवां । लाहुं दे

ती शक्ति शोणितामाजीं । वाहुं दे

दे मंत्र पुन्हा तो दिले समर्थें तुज ज्या

हे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा

 –  कवी – वि. दा. सावरकर

☆ रसग्रहण – सुश्री शोभना आगाशे ☆

प्रस्तुत कविता स्वातंत्र्यवीर सावरकरांनी ते रत्नागिरी येथे स्थानबद्ध असताना १९२६ मधे लिहिली आहे. (ते शाळकरी असताना लिहिली असा कांही लोकांचा गैरसमज आहे.)

या कवितेत प्रखर बुद्धिमंत सावरकरांनी फारशा प्रचलित नसलेल्या पण चपखल अशा मराठी व संस्कृत शब्दांचा वापर केला आहे. उदा. संभूत, दिप्तितम, चर्ची, गूढाशा, शोणित इ. या कवितेची रचना भूपतिवैभव या मात्रावृत्तात केलेली आहे.

छत्रपती शिवाजीमहाराज हे भारतीयांचे स्फूर्तिस्थान आहेतच पण त्यांच्याविषयी सावरकरांसारखा प्रखर देशभक्त जेंव्हा स्फुर्तीगीत लिहितो तेंव्हा ते महाराजांच्या भवानी तलवारीसारखं तेजःपुंज व धारदार होतं. पं. हृदयनाथ मंगेशकर व गानकोकिळा लता मंगेशकर या द्वयीने हे गीत स्फूर्तिदायक व रोमांचक बनवण्यात मोलाचं योगदान दिलेलं आहे. त्यांचे सूर व संगीत इतकं अर्थवाही आहे की गीत ऐकल्यानंतर कुणीही भारतीय रोमांचित झाल्याशिवाय रहात नाही. या तीन कडव्यांच्या गीताच्या पहिल्या कडव्यात महाराजांचं स्तुतीपर वर्णन करून त्यांना वंदन केलेलं आहे. दुसर्‍या कडव्यात हिंदुस्थानातील सद्यस्थितीचं (त्या काळातलं -१९२६ मधलं) वर्णन केलं आहे आणि तिसऱ्या कडव्यात महाराजांकडं मागणं मागितलेलं आहे. जेणेकरून आपला स्वातंत्र्य लढा यशस्वी होईल.

पहिल्या कडव्यात ते महाराजांचं वर्णन ” हिंदूंच्या शक्तीतून प्रकट झालेलं तेज, हिंदूंच्या वर्षानुवर्षांच्या तपस्येचं फलित म्हणून जन्मलेला तेजःपुंज ईश्वरी अवतार, हिंदुदेवतेचा सौभाग्यालंकार, नरसिंहाप्रमाणे दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी अवतरलेला प्रभूचा अवतार” असं केलं आहे. आणि ते म्हणतात हे हिंदुराष्ट्र तुला वंदन करीत आहे, चंदनाचा लेप लावून तुझं पूजन करीत आहे, अंतःकरणपूर्वक अभिनंदन करीत आहे. सावरकर म्हणतात, ” माझ्या मनात ज्या गूढ आशा आहेत त्या मी तुला कथन करू शकत नाही. तरी त्या ओळखून, हे नृसिंहाचा अवतार असणाऱ्या शिवाजीराजा माझ्या या इच्छा तू पूर्ण कर. ” ही कविता लिहिली तेंव्हा सावरकर स्थानबद्धतेत असल्यामुळे स्वातंत्रप्राप्तीची इच्छा प्रकट करू शकत नव्हते म्हणून ‘गूढाशा’ हा शब्द वापरला आहे.

दुसर्‍या कडव्यात परकीय आक्रमणामुळे देशाच्या झालेल्या दुरावस्थेचं वर्णन केलं आहे. महाराजांनी निर्माण केलेल्या, जतन केल्या गड किल्ल्यांची अवस्था सांगितली आहे. कुठे तट भंगले आहेत, गड, कोट, किल्ले, जंजिरे भग्न पावले आहेत, राजधान्यांची जंगले झाली आहेत, साऱ्या मंगलगोष्टी परदास्यामुळे पराभूत झाल्या आहेत. महाराजांसारखे वीरपुरूष नसल्यामुळे भवानी तलवारीची धार गंजली आहे. अशातच आई भवानीही आधार देत नाही. अशा या जगात जगणं अत्यंत लज्जास्पद झालं आहे.

तिसऱ्या कडव्यात सावरकर म्हणतात, ” ज्या शुद्ध हृदयाच्या राजाला रामदास स्वामींनी आपलंसं केलं होतं, ज्या बुद्धिमान राजाने विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बरीदशाही व वऱ्हाडची इमादशाही अशा पाच शाह्यांना ‘त्राहि भगवान’ करून सोडलं होतं, जो राजा कूटनीतीचा युक्तीने उपयोग करून, वेळप्रसंगी तह करून, बलवान शत्रुला गाफील ठेऊन पराभूत करीत असे ; त्या राजाची अंतःकरणाची शुद्धी आमच्या कृतीत उतरू दे. ती बुद्धी माझ्या भाबड्या देशबांधवांना लाभूदे. ती शक्ती आमच्या नसानसातून (रक्तातून) वाहू दे. हे राजा, जो स्वराज्याचा मूलमंत्र तुला समर्थ रामदास स्वामींनी दिला, तो मंत्र तू आम्हाला दे. म्हणजे त्या मंत्रसामर्थ्याने, ती शक्ती व युक्ती वापरून, त्या शुद्धी व बुद्धीच्या योगाने आम्ही हिंदुस्थानचे बांधव परकियांना येथून हुसकावून स्वातंत्र्यप्राप्ती करून घेऊ. “

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भिरभिरणारे मन… ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर☆

सुश्री अरूणा मुल्हेरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ पावसाची कविता – ‘भिरभिरणारे मन…’ ☆ सुश्री अरूणा मुल्हेरकर ☆

((वृत्त~ शुभगंगा ८+८+६)

कुठून आले वादळ वारे कळले का

भिरभिरणारे मन हे माझे भिजले का

 

किती प्रतीक्षा वसुंधरेची थकली ती

निष्ठूर नको होऊस असा रडले का

 

एका वेळी अनेक शंका अशा कशा

आभाळातच काळे घन हे भरले का

 

कधी शांतता तुफान केव्हा काय असे

गहिवर जाता ऊन कधी ते पडले का

 

संततधारा कधी बरसल्या भूवरती

तशीच वर्षा मनात माझ्या झरते का

©  सुश्री अरूणा मुल्हेरकर

०९/०७/२०२३

डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एक विशेष  दिवस… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

एक विशेष  दिवस… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

कधीतरी रोजचीच सकाळ

वेगळीच किमया करून जाते

पालथ्या पडल्या हातावर

अत्तर फाया फिरवून जाते …

 

रोजचीच साखर, रोजचीच पावडर

रोजचंच दूध, नि रोजचंच पाणी

रोजचीच बशी नि रोजचाच कप

गंजही रोजचा नि रोजचीच गाळणी

 

तयारी तीच नि सरंजामही तोच

लगबग तीच नि उत्साह तोच

चवही तीच आणि चहाही तोच

करणारा तोच, नि घेणारा तोच,

 

पण आजचा दिवस खास आहे

ओल्या पाउसधारांचा आहे

भागलेल्या काळोखी सूर्याचा आहे

वाफाळता चहा समोरआहे

गरम गरम पहिला घोट तर

“आह्” ची दाद घेतो आहे …

 

अगदी खरं सांगायचं तर

सारं काही तेच असतं

आपलंच मन एखाद्या दिवशी

फुलपाखरू होऊन बागडत असतं

 

कालचं रंगित फूल त्याला

आज जास्त भावतं

कालच्यापेक्षा मध आज

जास्त गोड लागतो

एक नवल गुपित मात्र

त्याचं त्याला माहित नसतं

पंखांवर आज त्याच्या

इंद्रधनू नाचत असतं

 

अशी जादू घेउन येतो

तो दिवस हसरा असतो

मी विश्वाचा विश्वही माझे

सुखाचा मंत्र देऊन जातो

 

आजचा दिवस तर विशेष आहे

दुप्पट तिप्पट सुखाचा आहे

कारण त्याचं खमंग आहे

चहाआधी कांदाभजी

पोटात जाऊन बसली आहेत …..!!

😃

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचे ☆ जीवनपट… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? क्षण सृजनाचे ?

☆ जीवनपट… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

माझे वडील संस्कृत चे माध्यमिक शिक्षक व गाढे अभ्यासक होते. जुन्या अकरावीचे संस्कृत व पी.टी. घेत. करवीर पीठात त्यांनी उत्तम अध्ययन केले. त्यांना पीठाचे शंकराचार्य पद स्वीकारा म्हणत होते पण घरच्या जबाबदाऱ्या मुळे त्यांनी ते स्वीकारले नाही. वृद्धत्वात ते थोडे विकलांग झाले नि ते पाहून मला ही कविता स्फुरली‌.

 – दीप्ती कुलकर्णी

☆ जीवनपट… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

जीवनाच्या या पटावरी

कितीतरी प्यादी येती जाती

माझे,माझे म्हणती सारे

फोलता हि नच ,कुणा ही ठावे

क्षणभंगुरता कळेल का परी

उरते अंती मृत्तिका जरी

यात्रिक सारे सममार्गावरी

नियतीचीही मिरासदारी

नियतीचीही सर्व खेळणी

कुणा छत्र,कुणी अनवाणी

श्वासासंगे श्वास येई रे

दुजा न कोणी सांगाती

जीवनाच्या या पटावरी

कितीतरी प्यादी येती जाती ||

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

हैदराबाद

मो.नं. ९५५२४४८४६१

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – हवे ते मिळे प्रयत्नांती… – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– हवे ते मिळे प्रयत्नांती… – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

विशाल अंबर माथ्यावरती

 सागर पाणी सारे भवती

 उगवून  आले तरीही पण ते 

 प्रचंड या कातळावरती …. 

 तिथे बीजाला रुजण्यासाठी

 कशी मिळाली असेल माती

 त्या मातीतून  पोषणतत्वे

  मिळाली तया कशी न किती? … 

  झाड उभे हे खडकावरती

  दगडासम भक्कमशी छाती

  मान उभारून  जगा सांगते 

  हवे ते मिळे प्रयत्नांती …

© सुश्री नीलांबरी शिर्के

मो 8149144177

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कुणा न ठाऊक… ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆

सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

? कवितेचा उत्सव ?

कुणा न ठाऊक… ☆ सुश्री साधना प्रफुल्ल सराफ 

कसा कुठे अन

किती लांबचा

अज्ञाताचा प्रवास,

कसे कुणी अन किती

 ठरवले प्रत्येकाचे इथले

श्वास!

जन्मभराचा सोबती

अचानक,सोडून जातो साथ

नवल, दुःख आणि

निराशा येते मग

पदरात!

अज्ञाताचे भय

कायमचे मर्त्य

मानवी मनात,

यास्तव मृत्यु

भेवडावतो प्रत्येकाला

जगात

शाश्वत रित्या

ताटातूटही

छिन्न करते

मनास!

उपाय काही

आजवर नाही

सापडला कोणास!

मन तळमळते,

कळवळते अन

अखेर कळते त्यास

उपाय काही नाही

यावर, स्विकार

करण्याशिवाय!

© सुश्री साधना प्रफुल्ल सराफ

संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस, आषाढ आणि  श्रावण !! ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆

सुश्री मंजिरी येडूरकर

? कवितेचा उत्सव ?

पाऊस, आषाढ आणि  श्रावण !! ☆ सौ.मंजिरी येडूरकर

आषाढाचा पाऊस म्हणजे, घट्ट मिठीचा मोका

श्रावणाचा पाऊस म्हणजे, आनंदाचा झोका

आषाढाचा पाऊस म्हणजे, धरतीवर आक्रमण

श्रावणाचा पाऊस म्हणजे, धरतीचं औक्षण

आषाढाचा पाऊस, अखंड रिपरिप

श्रावणाचा …फक्त टिपटिप

आषाढाचा पाऊस देतो, काळोख आंदण

श्रावणाचा पाऊस करतो, पिवळ्या रंगाची शिंपण

आषाढाचा पाऊस म्हणजे, मातीच्या सुवासाची पखरण

श्रावणाचा पाऊस म्हणजे, वृक्षवेलींवर रंगांची उधळण

आषाढाच्या पावसात, अंगणाच्या बंदरावर गर्दी नावांची

श्रावणाच्या पावसात,अंगणी झिम्मा-फुगडी चिमुरड्यांची

आषाढात सूर्य मारतो दडी

श्रावणात तोच होतो, लपाछपीचा गडी

आषाढाचा पाऊस म्हणजे, नंगा नाच पत्र्यांचा

श्रावणाचा पाऊस म्हणजे, प्रेमळ धाक आईचा

आषाढाच्या पावसासाठी, भरतो चातकांचा मेळा

श्रावणाचा पाऊस करतो, फुलपाखरे गोळा

© सौ.मंजिरी येडूरकर

लेखिका व कवयित्री, मो – 9421096611

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 165 – देव गणपती ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 165 – देव गणपती ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

पार्वती तनया

देव गणाधीश।

विघ्ननाशक तू

प्रथमेश ईश।

 

चौंसष्ट कलांचा

तूच अधिपती।

सकल विद्यांचा

देव गणपती ।

 

कार्यारंभी तुझे

करिता पूजन।

कार्यसिद्धी सवे

घडते सृजन।

 

मातृभक्त पुत्र

तत्पर सेवेसी।

शिव प्रकोपाला

झेलले वेगेसी।

 

शिरच्छेद होता

माता आक्रंदन।

शोभे गजानन

पार्वती नंदन।

 

दुंदील तनु ही

मुषकी स्वार।

भाळी चंद्रकोर

दुर्वांकुर हार।

 

मस्तकी शोभती

रक्तवर्णी फुले।

मोदक पाहुनी

मनोमनी खुले।

 

भक्तहिता लागी

घेई अवतार।

अष्ट विनायक

महिमा अपार।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ मैत्री… ☆ सुश्री सुनीता पाटणकर

सौ. सुनीता पाटणकर

? मनमंजुषेतून ?

☆ मैत्री… ☆ सुश्री सुनीता पाटणकर ☆

मैत्री मैत्री मैत्री,

काय असते ही मैत्री ? .. नातं कोणतं हे?

नात्याच्या पार पल्याड काहीतरी…. जिवलग, सखी, मैत्रीण, मित्र …. हीच खरी मैत्री. 

 

या मनीचं त्या मनाला सहज, चटकन, उमगतं, भावतं .. ही मैत्री. 

शब्दांच्या पलीकडील उमगतं ..  ही मैत्री….. डोळ्यातून कळतं ही मैत्री. 

आवाजातून समजतं  ही मैत्री,…. हालचालीतून जाणवतं ही मैत्री. 

… मनाच्या गाभाऱ्यात घट्ट रुतून बसते ही मैत्री,

 

आनंद, दुःख, समाधान, असमाधान, राग, प्रेम,जळफळाट, तडफड.. यातलं काहीही .. 

.. .. व्यक्ततांना आत बाहेर नाही,ही मैत्री,

भावनांच्या हिंदोळ्यावर झुलताना …. हात देते ही मैत्री,

 

सल्ला, मसलत, मार्गदर्शन करते, ही मैत्री. …

सप्तसुर छेडताना,अलवार मिंड देणारी ही मैत्री,

प्रेम, धमकी, योग्य-अयोग्य हे समजवणारी ही मैत्री,

चूक घडता,सावरायला येणारी ही मैत्री,

मदत मागणारी आणि मदत करणारी…. ही मैत्री.

 

हक्काने रागावणारी, झटकन राग विसरून जाणारी ही मैत्री,

मैत्रीची व्याख्या नाही,

भावभावनांचे रेशीम धागे, म्हणजे मैत्री !

ओढ भेटीची म्हणजे मैत्री ! गुज सांगते,असते मैत्री !!!!

 

आयुष्यात माझिया, मोल तिचे अनमोल,

तारले तिनेच मला, …. या संसार सागरातून… 

© सौ. सुनीता पाटणकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ कवी भूषण… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? इंद्रधनुष्य ?

☆ कवी भूषण…  ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

कवी भूषण हे आधी राजा छत्रसाल व नंतर शिवाजी महाराजांच्या दरबारात कवी होते. कवी भूषण यांच्याविषयी फारशी ठोस माहिती उपलब्ध नाही. त्यांचा जन्म कानपूर जिल्ह्यातील त्रिविक्रमपूर येथे झाला. स्वाभिमानी भूषण लहान वयातच घर सोडून बाहेर पडले. अनेक रजपूत राजे तसेच औरंगजेब, कुमाऊँ राजे, छत्रसाल अशा अनेकांच्या दरबारी जाऊन त्यांच्यावर काव्यरचना केल्या. त्यांनी रचलेले भूषण हजारा, भूषण उल्हास व दूषण उल्हास  सारखे अनेक ग्रंथ व काव्यरचना काळाच्या उदरात गडप झाल्या. मात्र त्यांनी शिवरायांच्या पराक्रमाने, व्यक्तिमत्त्वाने प्रेरित होऊन लिहिलेला ‘शिवभूषण’ हा काव्यग्रंथ उपलब्ध आहे. 

छत्रपतींना भेटण्यासाठी ते उत्तर भारतातून रायगडावर १६७० साली आले. तेथील व्याडेश्वर मंदिरात त्यांची महाराजांबरोबर भेट झाली. पण त्यावेळी त्यांना हेच शिवाजी महाराज आहेत हे माहित नव्हते. महाराजांनी विचारणा केल्यावर भूषण यांनी खाली उद्धृत केलेला छंद खड्या आवाजात गायला. तो ऐकून सर्व मावळे रोमांचित झाले. त्यांनी भूषण यांना तो पुनःपुन्हा गायला लावला. तब्बल अठरा वेळा गायल्यानंतर मात्र भूषण यांना थकवा आला. 

मग महाराजांनी आपली खरी ओळख दिली व राजकवी म्हणून त्यांची नियुक्ती केली. गाव, हत्ती वगैरे इनाम दिले. भूषण यांनी तीन वर्षे रायगडावर वास्तव्य केले. मराठ्यांच्या पराक्रमाचा जाज्वल्य इतिहास आपल्या वीररसपूर्ण, अलंकारिक काव्यात शब्दबद्ध  करून तो ‘शिवभूषण’ काव्यग्रंथ १ जून १६७३ रोजी महाराजांना सादर केला. पं. विश्वनाथ प्रसाद  मिश्र यांनी संपादित केलेल्या ‘भूषण ग्रंथावली’ या पुस्तकात कवी भूषण यांचे ५८६ छंद आहेत. त्यापैकी ४०७ शिवभूषणचे, ‘शिवबावनी’ चे ५२  ‘छत्रसाल दशक’ चे १० व  इतर ११७ छंद आहेत. यात संभाजी महाराज, शाहू महाराज, थोरले बाजीराव पेशवे, मिर्झा जयसिंह यांच्यावर रचलेले छंद देखिल आहेत. एकूण त्यांच्या रचना वीररसपूर्ण आहेत. शृंगाररसयुक्त अशा फक्त ३९ रचना आहेत. त्यांनी औरंगजेबाची निंदा करणारे, मुघलांनी उद्ध्वस्त केलेली काशी, मथुरा इ. मंदिरे, तिथे उभ्या राहिलेल्या मशिदी यांचे व धार्मिक अत्याचारांचे वर्णन करणारे छंद देखिल रचले आहेत.

त्यांनी लिहिलेले ५८६ छंद प्रसिद्ध आहेत. त्यापैकी हा पुढील छंद, महाराजांवरील एका टी व्ही सिरीयलच्या शीर्षक गीतात वापरला गेल्यामुळे, अलीकडील काळात जास्त प्रसिद्ध झाला. हा पूर्ण छंद असं आहे —–

 

इंद्र जिमि जंभ पर,

बाड़व ज्यौं अंभ पर,

रावन सदंभ पर

रघुकुलराज है। 

पौन बारिबाह पर, 

संभु रतिनाह पर, 

ज्यौं सहस्रबाहु पर 

राम द्विजराज है। 

दावा द्रुमदंड पर, 

चीता मृगझुंड पर,

भूषन बितुंड पर 

जैसे मृगराज है। 

तेज तम-अंस पर,

कान्ह जिमि कंस पर,

यौंन म्लेंच्छ-बंस पर 

सेर सिवराज है॥

         — कवी भूषण 

याचा थोडक्यात अर्थ असा :-

जसे इंद्राने जंभासुर दैत्यावर आक्रमण करून त्याचा वध केला. 

जसा वडवानळ समुद्रात आग निर्माण करतो. 

जसा रघुकुल शिरोमणी श्रीरामाने अहंकारी रावणाचा वध केला. 

जसे जलवाहक मेघांवर पवनाचे प्रभुत्व असते. 

जसे रतीचा पती कामदेवाची क्रोधित शिवाने जाळून राख केली. 

जसे सहस्त्र बाहु असलेल्या कार्तवीर्य अर्जुनाला परशुधारी रामाने, म्हणजेच परशुरामांनी त्याचे हजार बाहु कापून टाकून त्याचा वध केला. 

जसा जंगलातल्या मोठमोठ्या वृक्षांना दावानल भस्मसात करतो. 

जसा हरणांच्या कळपावर चित्ता तुटून पडतो. 

जसा जंगलाचे भूषण असलेल्या हत्तीवर सिंह झेप घेतो. 

जसा सूर्याच्या तेजाने अंधाराचा विनाश होतो. 

आक्रमक कंसावर जसा श्रीकृष्णाने विजय मिळवला —

— तद्वतच, नरसिंह असलेल्या शिवाजी महाराजांनी मुघल वंशाच्या शत्रुला सळो की पळो करून सोडलेलं आहे.

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

निवेदन- आज याबरोबरच चांगदेव पासष्टी हे सदर संपत आहे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares