मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ “अगदी मनातले…” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ “अगदी मनातले…” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे 

खाली दगड असोत की वाळू असो 

खत – पाणी असो नसो 

मनापासून फुलणं मी विसरत नाही 

मला कशानेच फरक पडत नाही…

*

रंग नाही रूप नाही 

आकर्षित करणारा सुगंध नाही 

आणि माझ्याकडे कुणी बघतंय की नाही 

याने मला काहीच फरक पडत नाही…

*

बस् निसर्गाची कृपा आहे 

किंचित प्राण माझ्यातही फुंकलेला आहे 

हे माझ्यासाठी काही कमी नाही 

मग फरक मला मुळी पडतच नाही…

*

इवलंसं माझं जग आहे 

इवल्याशा डोळ्यांनी मला ते दिसतं आहे 

मग मी कुणाला दिसो ना दिसो 

मला मुळीच फरक पडत नाही…

*

आयुष्य म्हणजे मुठीतली वाळू 

माणसाला कळतं पण वळत नाही 

मी मात्र मजेत डोलतांनाही हे विसरत नाही 

मग त्याने मला फरक काहीच पडत नाही…

*

मी आज आहे आणि उद्या नसणार आहे 

हे त्रिकालाबाधित सत्य मी जाणलं आहे 

पण म्हणून मी आजच कोमेजणार नाही 

एकदा हे सत्य स्वीकारलं की…

 मला ‘आज’ काहीच फरक पडत नाही…

कवयित्री : सुश्री मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 254 ☆ त्या  वाटेवर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 254 ?

☆ त्या  वाटेवर… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

गतकाळाचा  जन्म जिव्हाळा

आठवणींचा फक्त पाचोळा

त्या वाटेवर ……

 

हुंदडणारे मुग्ध बालपण

नात्यांची गहिरी गुंफण

त्या वाटेवर …….

 

खळखळणारा  अवखळ ओढा

सोनपिवळ्या तरवडाची  गर्दी

पाण्या मधली  दाट लव्हाळी

इथेच होती एकेकाळी …….

पाहते आता ठक्क कोरडी

फुफाटलेली ओढ्याची जागा

त्या वाटेवर ……

 

बुजलेल्या  ढव-याची  खूण,

पाषाणाची  जुनी शुष्क डोण

त्या वाटेवर …….

 

दगडी वाड्याच्या  जागी आता

बोरी ,बाभळी आणि  सराटा ,

परी वास्तुचे  रक्षण करतो ,

भुजंग काळाचा निरंतर …..

त्या वाटेवर ………..

© प्रभा सोनवणे

१४ नोव्हेंबर २०२४

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “कवितेचे झाड….” ☆ सौ विजया कैलास हिरेमठ ☆

सौ विजया कैलास हिरेमठ

? कवितेचा उत्सव ?

☆ “कवितेचे झाड…. ☆ सौ विजया कैलास हिरेमठ 

मनास अंकुर फुटता

भावनांचा जन्म होई

शब्दातून मग कवितेस

फुटे नवी पालवी….

*

अनुभवांचे खतपाणी

संवेदनांचे सिंचन

विचारांची निगराणी

कल्पना वास्तवाचे मिलन…

*

कधी मोहर कधी पानगळ

कवितेचे झाड अवखळ

तिच्यासोबत मी कणखर

आणि जगणे सहज, सुंदर….

*

प्रेम आनंदाने बहरते

कवितेचे झाड माझे

मायेच्या सावलीत त्याच्या

ही शब्दकळी सुखावते….

💞शब्दकळी विजया 💞 

©  सौ विजया कैलास हिरेमठ

पत्ता – संवादिनी ,सांगली

मोबा. – 95117 62351

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – क्षण सृजनाचा ☆ काळरात्र… ☆ श्री सुनील देशपांडे ☆

श्री सुनील देशपांडे

📚 क्षण सृजनाचा 📚

☆ काळरात्र… ☆ श्री सुनील देशपांडे 

कोयनानगर – ज्या भूमीवर माझं बालपण, शालेय शिक्षण झालं ती स्वप्ननगरी १९६७ मध्ये ११ डिसेंबर या दिवशी भूमिगत (!) झाली.  त्याच्या आठवणी अजूनही मधून मधून डोके वर काढतात आणि कधी कधी काव्यरूपातही उमटतात.

☆ काळरात्र … ☆ श्री सुनील देशपांडे 

ती काळरात्र होती, भूमीतुनी उसळली.

तोडून काळजाचा, लचका, निघून गेली

ती काळरात्र होती, फाडून भूमी आली.

गाडून स्वप्ननगरी, कोठे निघून गेली ?

 *

झोपेत साखरेच्या, देऊन वेदनांना,

क्रूर हसत होती, ती काळरात्र होती.

कित्येक चांदण्यांना, विझवून ती निमाली,

की कृष्णविवर कोठे, शोधून लुप्त झाली?

 *

कित्येक भक्त होते, देवास प्यार झाले.

ती काळरात्र मग का, देवाकडून आली?

कित्येक संत गुरुजन, मंत्रून भूमि गेले.

तप पुण्य त्या जनांचे, उधळून ती परतली.

 *

कित्येक वर्ष सरले, तो काळ निघून गेला.

पण काळजावरी ती, दुश्चिन्ह कोरूनी गेली.

 — श्री सुनील देशपांडे

© श्री सुनील देशपांडे

पुणे, मो – 9657709640 ईमेल  : [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “== जीभ ==” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “== जीभ ==” ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

जीभ चालते, सुटते, चावली ही जाते

उचलता जिभेला ती टाळ्याला लागते

हाड नाही तिला, वळेल तसे बोलते

 चाटता जिभल्या कोणी चोचले पुरविते॥१॥

*

सोडताच सैल जीभ म्हणे लगाम घालावा

जीभ चाळवता आवळती ताबा ठेवावा

धार लावून बसू नये तिला आवर घालावा

दावली म्हणून हासडू नये तुकडा न पाडावा॥२॥

*

जीभ वेडावते जडावते चुरचुर करते

काळी जीभ फाटकी जीभ चुकचुक करते

जीभ घोळवित बोलता साखरपेरणी करते

दांडपट्टा जिभेचा चालता कोणा गारद करते॥३॥

*

जीभेचा शेंडा मिरवी कोणी कोणाला शेंडाच नसतो

मुळ पोटात जीभेचे हाताने करता चाखतो

कोणी उगाच जीभ नाकाला की लावतो

गिरणी पट्ट्यासम चालता त्यास सुमार नसतो॥४॥

*

जिभेने चाटून खाताना चव त्यावर रेंगाळते

कधी टाळूला चिकटता वळवळ न करते

जीभ दाताखाली येता तिला जिभाळी लागते

कडवटपणा येता जिभेवर तीळ भिजू न देते॥५॥

*

दोन जीभा असू नये, काळा तीळही नसावा

नको तिचे हुळहुळणे तिखटपणाही नसावा

नको ऐनवेळी लुळी पडाया त्यावर फोडही न यावा

सरस्वतीचे नर्तन करीत जिभेवर साखर खडा असावा॥६॥

*

अशी जीभ बहुगुणी योग्य वापर करावा

पडजीभेविना अधुरी तिचा विसर न पडावा

जीभ देवाची देणगी तिला जपू सारेजण

गोड बोलून तिच्या योगे जपू माणूसपण॥७॥

– कवयित्री : वर्षा बालगोपाल 

तुम्हाला कळले का यात जिभेशी संलग्न किती वाक्प्रचार, म्हणी आल्या आहेत ते? चक्क 53….

 ०१) जीभेला हाड असणे 

 ०२) उचलली जीभ लावली टाळ्याला 

 ०३) जीभ वळेल तसे बोलणे 

 ०४) जीभ तिखट असणे 

 ०५) जीभेवर साखर असणे 

 ०६) जिभल्या चाटणे 

 ०७) जिभेचे चोचले पुरवणे 

 ०८) जीभ सैल सोडणे 

 ०९) जीभेला लगाम घालणे 

 १०) जीभेवर ताबा ठेवणे 

 ११) जीभेवर रेंगाळणे 

 १२) जीभेला धार लावून बसणे 

 १३) जीभ दाखवणे

 १४) जीभ हासडणे 

 १५) जीभेचे मूळ पोटात 

 १६) दोन जीभा असणे 

 १७) फाटकी जीभ असणे 

 १८) काळ्या जिभेचे असणे 

 १९) हाताने केले जिभेने चाखले 

 २०) जीभ चाळवणे 

 २१) जीभ नाकाला टेकवू नका! 

 २२) जीभ ल ई चुरू चुरु बोलती य ब र तुझी 

 २३) जीभेने चाटणे 

 २४) जीभ आवळणे 

 २५) जीभेवर फोड येणे 

 २६) जीभेला शेंडा नसणे 

 २७) जीभ चावणे  

 २८) जीभेला आवर घालणे 

 २९) जिभेवर काळा तीळ असणे 

 ३०) जीभ दाताखाली चावणे 

 ३१) जीभ टाळूला चिकटने 

 ३२) जीभेवर तीळ भिजत नाही 

 ३३) जीभेचा तुकडा पाडणे 

 ३४) जीभ लईच वळवळा करायला लागली 

 ३५) जिभाळी लागणे 

 ३६) जिभेवर कडवटपणा असणे 

 ३७) जीभ हुळहुळणे 

 ३८) जीभ आहे की गिरणीचा पट्टा ? 

 ३९) जीभ वेडावणे 

 ४०) जीभ जडावणे 

 ४१) जिभेला सुमार नसणे 

 ४२) जिभेचा दांडपट्टा चालवणे 

 ४३) ऐनवेळी जीभ लुळी पडणे 

 ४४) जिभेच्या सरबत्तीने गारद करणे 

 ४५) जीभ चुकचुकणे 

 ४६) जीभ चुरचुरणे 

 ४७) जिभेवर सरस्वती नर्तन करणे 

 ४८) जिभेने साखरपेरणी करणे 

 ४९) जिभेचा शेंडा मिरवणे 

 ५०) जीभेचा तुकडा पाडणे 

 ५१) जीभ घोळवत लाडिक बोलणे.

 ५२) चांगलीच जीभ सुटलीये एकेकाला आज 

 ५३) पडजीभ

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #266 ☆ वैभवशाली नक्षी… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 266 ?

☆ वैभवशाली नक्षी ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

मोर पिसावर कुठून सुंदर आली नक्षी

मोर नाचतो दिसते नखरेवाली नक्षी

*

डोंगर माथी विशाल मंदिर कसे बांधले

छान वारसा येथे वैभवशाली नक्षी

*

ती ओठांना लावुन आली होती लाली

तिने काढली होती माझ्या गाली नक्षी

*

असेल अबला म्हणून त्याने छेड काढली

तिने काढली त्याच्या कानाखाली नक्षी

*

हातावरती हिरवी मेंदी तिने काढली

रातभरातच लाल कशीही झाली नक्षी

*

वेणी गजरा तिला आवडे सुगंध त्याचा

फुला फुलांची डोक्यावरती ल्याली नक्षी

*

अडव्या-तिडव्या फांद्यांचे तो रूप बदलतो

त्या झाडावर करतो तो वनमाली नक्षी

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भावना… ☆ सौ. वृंदा गंभीर ☆

सौ. वृंदा गंभीर

? कवितेचा उत्सव ?

भावनासौ. वृंदा गंभीर

कंठात दाटून आल्या भावना

सखे जरा समजून घे ना

प्रिये झालो मी तुझा दास

तू तुझ्यात सामावून घे ना

*

होतो पळत रात्रं दिवस

वाट काही सापडेना

तुझी सावली दिसें परी

तुझा सहवास मज मिळेना

*

हरवलो मी स्वतःतून

तुझी आठवण सखे जाईना

का पळतेस अशी दूर तू

विरह हा मज सहवेना

*

शोधले मनाने तुला मी

प्राण हा तुलाच दिला

तुझा जीव ही मलाच दे ना

पुरे झाले आता, तुझाच

होऊ दे ना

© सौ. वृंदा पंकज गंभीर (दत्तकन्या)

न-हे, पुणे. – मो न. 8799843148

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ रिटायर्ड वडील… कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ रिटायर्ड वडील… कवी – अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

आज जेवून झाल्यावर

वडील बोलले…

” मी आता रिटायर होतोय.

मला आता नवीन कपडे नकोत.

 जे असेल, ते मी जेवीन.

रोज वाचायला पेपर नको.

आजपासून बदामाचा शिरा नको,

मोटर गाडीवर फिरणं बंद,

बंगला नको, बेड नको,

एका कोप-यात, झोपण्यास थोडी जागा मिळाली तरी खूप झालं.

आणि हो तुमचे, सुनबाईचे मित्र व मैत्रिणी,

चार पाहुणे आले तर

मला अगोदर सांगा.

 मी बाहेर जाईन.

 पण त्यांच्यासमोर ‘बाबा, तुम्ही बाहेर बसा’

 असं सांगू नका.

 तुम्ही मला जसं ठेवाल,

तसा राहीन. “

 

काहीतरी कापताना सुरीनं

बोट कापलं जावं आणि

टचकन डोळ्यांत पाणी यावं,

काळीजच तुटावं,

अगदी तसं झालं…

 

एवढंच कळलं, की

आजवर जे जपलं,

ते सारंच फसलं…

 

का वडिलांना वाटलं,

ते ओझं होतील माझ्यावर… ?

 

मला त्रास होईल,

जर ते गेले नाहीत कामावर… ?

 

ते घरात राहिले, म्हणून

कोणी ऐतखाऊ म्हणेल…

 

की त्यांची घरातली किंमत

शून्य बनेल… ?

 

आज का त्यांनी

दम दिला नाही… ?

 

“काय हवं ते करा, माझी तब्बेत बरी नाही,

मला कामावर जायला जमणार नाही… “

 

खरंतर हा अधिकार आहे,

त्यांचा सांगण्याचा.

पण ते काकुळतीला का आले… ?

 

ह्या विचारातच माझं मन खचलं.

 नंतर माझं उत्तर

मला मिळालं…

 

जसजसा मी मोठा होत गेलो,

वडिलांच्या कवेत

मावेनासा झालो.

 

तेव्हा नुसतं माझं शरीरच वाढत नव्हतं, तर त्याबरोबर

वाढत होता तो माझा अहंकार

आणि त्यानं वाढत होता,

तो विसंवाद…

 

आई जवळची वाटत होती.

पण, वडिलांशी दुरावा साठत होता…

 

मनांच्या खोल तळापर्यंत

प्रेमच प्रेम होतं.

पण,

ते कधी शब्दांत

सांगताच आलं नाही…

 

वडिलांनीही ते दाखवलं असेल.

पण, दिसण्यात आलं नाही.

 

मला लहानाचा मोठा करणारे वडील,

स्वत:च स्वतःला लहान समजत होते…

 

मला ओरडणारे – शिकवणारे वडील,

का कुणास ठाऊक

बोलताना धजत नव्हते…

 

मनानं कष्ट करायला

तयार असलेल्या वडिलांना,

शरीर साथ देत नव्हतं…

 

शून्यातून सारं उभं केलेल्या तपस्वीला,

घरात नुसतं बसू देत नव्हतं…

 

हे मी नेमकं ओळखलं… !

 

खरंतर मी कामावर जायला लागल्यापासून,

सांगायचंच होतं त्यांना,

की थकलाहात, तुम्ही आराम करा.

पण

आपला अधिकार नव्हे,

सूर्याला सांगायचा, की

“मावळ आता”… !

 

लहानपणीचे हट्ट पुरवणारे

वडील…

 

मधल्या वयांत अभ्यासासाठी

ओरडणारे वडील…

 

आणि नंतर चांगलं वागण्यासाठी

कानउघडणी करणारे वडील…

 

आजवर सारं काही देऊन

कसलीच अपेक्षा न ठेवता,

जेव्हा खुर्चीत शांत बसतात,

तेव्हा वाटतं, की जणू काही

आभाळच खाली झुकलंय !

 

कधीतरी या आभाळाला

जवळ बोलवून

खूप काही

बोलावसं वाटतं… !

 

पण तेव्हा लक्षात येतं, की

आभाळ कधीच झुकत नाही,

 ते झुकल्यासारखं वाटतं… !

 

आज माझंच मला कळून चुकलं,

की आभाळाची छत्रछायाही

खूप काही देऊन जाते… !

कवी : अज्ञात 

संग्राहक :श्री. अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, 

kelkaramol.blogspot.com  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – खंडोबाची वारी… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? खंडोबाची वारी? श्री आशिष  बिवलकर ☆

चंपाषष्ठी आज | डोंगुर जेजुरी |

खंडोबाची वारी | भक्तीमय ||१||

*

मल्हारी मार्तंड | जय खंडेराया |

जेजुरी गडाया | येळकोट ||२||

*

सोन्याची जेजुरी | उधळी भंडारा |

वाजतो नगरा | मार्तंडाचा ||३||

*

हळद खोबरं | भारी उधळण |

पिवळं अंगण | खंडोबाचं ||४||

*

देव साधा भोळा | भरीत भाकर |

चव रुचकर | नैवेद्यासी ||५||

*वाघ्या मुरळीचा | खेळ जागरण |

गोंधळाचा सण | गडावरी ||६||

*

देवा खंडेराया | भरुनिया तळी |

पसरतो झोळी | कृपेसाठी ||७||

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्मरण… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ स्मरण ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

प्रेमात गुंतलेले मन भावनेत न्हाले

तेव्हाच लेखणीच्या ओठात शब्द आले

अलवार चिंतनाचे हळवे विचार सारे

सांगून टाकताना तन मोहरून गेले

*

हव्यास फक्त होता नव्हती कुठेच सत्ता

भलत्याच आठवानी जगणेच व्यापलेले

गुंत्यात गुंतताना जडल्या अनेक चिंता

उरलेत भास हाती स्वप्नात पाहिलेले

*

आशाळभूत जगणे शिणले कधीच नाही

तारूण्य सर्व अंती झगडून शांत झाले

लटके भविष्य होते फसवून खूप गेले

दिसले कधीच नाही आयुष्य चिंतलेले

*

निर्भिड वागण्याचा उतरून नूर गेला

चुकले अनेक रस्ते चकव्यात गुंतलेले

छळले गती मतीने फाजील धाडसाला

घेरून संकटांनी बेजार खूप केले

*

भोगून भोग सारे जगणे सुरूच आहे

आहे भविष्य त्यांचे काळास बांधलेले

झाले भले बुरे ते आहे घडून गेले

उरले तसेच आहे स्मरणात गोठलेले

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares