☆ शतजन्मशोधितांना… वि. दा. सावरकर ☆ रसास्वाद : अज्ञात ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆
☆
शत जन्म शोधिताना ।
शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्यमालिकांच्या ।
दीपावली विझाल्या ॥
☆
तेव्हां पडे प्रियासी ।
क्षण एक आज गांठी ।
सुख साधना युगांची ।
सिद्धीस अंति गाठी ॥
☆
हा हाय जो न जाई ।
मिठी घालू मी उठोनी ।
क्षण तो क्षणांत गेला ।
सखी हातचा सुटोनी ॥
“संन्यस्त खड्ग” ह्या संगीत नाटकांतील हे पद म्हणजे सावरकरांनी लिहिलेल्या अत्त्युच्च पदांमधील एक!! ह्या माणसाच्या प्रतिभेवर साक्षात सरस्वतीने भाळून जावे इतक्या विलक्षण प्रतिभेचा धनी, बौद्धिक संपदा अशी की चक्क कुबेराला आपली पारमार्थिक संपत्ती त्याच्यापुढे फिकी वाटावी, आणि राष्ट्रभक्ती तर अशी की भारतमातेने तिच्या ह्या पुत्राला झालेल्या यातनांनी आसवे गाळावीत तर तिचे अश्रूचं विनायक दामोदर सावरकर ह्या तेजपुंज व्यक्तिमत्वासमोर थिजून जावेत!! स्वातंत्र्यवीर/हिंदूहृदयसम्राट विनायक दामोदर सावरकर म्हणजे अग्निकुंड. अटलजी म्हणायचे तसे सावरकर म्हणजे तितीक्षा, सावरकर म्हणजे तिखट. अशा राष्ट्रपुरुषाला प्रेम काव्य सुचलं तर ते कसे असेल ह्याची दिव्यानुभूती म्हणजे वरील पद!!
अंदमानातून सुटका झाल्यावर सावरकरांनी रत्नागिरीत स्थानबद्ध असतांना ”संन्यस्त खड्ग“ लिहिले. ह्या नाटकात पात्रे आहेत बुद्ध, विक्रमसिंग, वल्लभ आणि सुलोचना. सुलोचना ह्या पात्राच्या तोंडी हे गीत आहे. सुलोचना ही वल्लभची पत्नी. त्यांच्या लग्नाला जेमतेम काही दिवस झालेले असतात. नवीन-नवीन संसाराची आता कुठे वेल फुलायला लागली असते. एकेदिवशी त्यांचा प्रेमळ संवाद सुरु असतांना अचानक राज्यसभेचा निरोप येतो म्हणून वल्लभ तो प्रेमळ संवाद उमलायच्या आत अर्ध्यावरच सोडून तडक उठून राज्यसभेत निघून जातो. उशिरा केंव्हातरी सैनिक निरोप घेऊन सुलोचनेकडे येतो की सेनापती तर राज्यसभेतूनच थेट रणांगणावर युद्धासाठी गेले आहेत. तेंव्हा सुलोचनेच्या मनात आलेल्या ह्या भावना म्हणजे हे गीत.
आता गंमत बघा सुलोचना ही साधी स्त्री नाहीय. ती कर्तृत्ववान आहे. त्यामुळे ती फक्त प्रेमळ विरह गीत कसे गाईल?? सावरकरांची विलक्षण प्रतिभा बघा . प्रेम विरह गीतात देखील सुलोचनेच्या जाणिवा प्रगल्भ आहेत.तिचे विचार परिपक्व आहेत. अशी दमदार स्त्री जेंव्हा विरह गीत गात असेल ते देखील किती अत्त्युच्च असेल नाही??
शत जन्म शोधिताना ।
शत आर्ति व्यर्थ झाल्या ।
शत सूर्यमालिकांच्या ।
दीपावली विझाल्या ॥
सुलोचना म्हणते माझा प्रियकराचा शोध हा जन्मोजन्मांचा आहे. माझ्या ह्या शोधापुढे ‘शत’ आर्ति (दुःख, पीडा) व्यर्थ आहेत, आणि ह्यात सुलोचनेने कशाची आहुती दिली आहे तर शत सूर्य मालिकांच्या दीपावलीची. म्हणजे सामान्य माणसांप्रमाणे सुलोचनेची दीपावलीची पणती ही मातीची नाहीय तर ती आहे शंभर सूर्यमालिकेची!! कल्पना देखील किती भव्य असावी??
तेव्हां पडे प्रियासी ।
क्षण एक आज गाठी ।
सुख साधना युगांची ।
सिद्धीस अंति गाठी ॥
प्रियकर मिलनाचे सायास तिला (सुलोचना) कष्टप्रद तपश्चर्येसारखे वाटत नाहीत. तिच्यासाठी तर ही आनंदाने केलेली साधना आहे, जिची सिद्धी आता कुठे तिने ’गाठली’ आहे. सावरकरांची शब्दप्रभू संपन्नता बघा गांठी (गाठभेट) आणि गाठी (पोचणे किंवा गाठणे) काय भन्नाट यमक त्यांनी जुळविले आहे!!
हा हाय जो न जाई ।
मिठि घालु मी उठोनी ।
क्षण तो क्षणांत गेला ।
सखी हातचा सुटोनी ॥
पुढे सुलोचना म्हणते नुकतीच तर आमची भेट झाली आहे. त्याला (वल्लभाला) मिठी मारायला म्हणून मी उठले तर, तर तो क्षण एका क्षणात माझ्या हातून सुटून गेला, संपून गेला!! पु.ल.देशपांडे ह्यांनी म्हटल्याप्रमाणे ह्या एका ओळीसाठी सावरकरांना खरोखर साहित्यातील नोबेल पुरस्कार द्यायला हवा.
सावरकरांची अनेक रूपं मला आवडतात. विज्ञानाधिष्ठित सावरकर, शब्दप्रभू सावरकर, लढवय्ये सावरकर, कवी सावरकर, लेखक सावरकर, सामाजिक चळवळीचे प्रणेते सावरकर, ब्रिटिशांवर तुटून पडलेले सावरकर, धाडसी सावरकर, राष्ट्रासाठी आपल्या घराची राखरांगोळी केलेले सावरकर. एक मनुष्य त्याच्या सबंध आयुष्यात कदाचित परमेश्वरही घेण्यास धजावणार नाही इतकी जाज्वल्य रूपं घेऊ शकतो?? आणि ह्या प्रतिभावान आत्म्याला आपण करंटे भारतीय एका जातीत तोलून त्याला माफीवीर म्हणतो?? ह्याहून करंटा समाज कुठल्या तरी देशात असेल. सावरकरांच्या त्या जाज्वल्य आयुष्यातील धगधणाऱ्या अग्निकुंडातील एकतरी अग्निशिखा होण्याचे सौभाग्य मिळाले तरी एखाद्याचा जन्म सत्कारणी लागायचा. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांना शतशः नमन!!
☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २७ (अग्निसूक्त) : ऋचा १ ते १२ — मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆
☆
ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २७ – ऋचा १ ते १२
ऋषी – सुनःशेप आजीगर्ति : देवता – १ ते १२ अग्नि; १३ देवगण
ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील सत्ताविसाव्या सूक्तात शुनःशेप आजीगर्ती या ऋषींनी अग्नी देवतेबरोबरच इतरही देवतांना आवाहन केलेले असल्याने हे अग्नि व अनेक देवतासूक्त म्हणून ज्ञात आहे. आज मी आपल्यासाठी हे संपूर्ण सूक्त आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे.
मराठी भावानुवाद ::
☆
अश्वं॒ न त्वा॒ वार॑वन्तं व॒न्दध्या॑ अ॒ग्निं नमो॑भिः । स॒म्राज॑न्तमध्व॒राणा॑म् ॥ १ ॥
जिराहधारी वारू तव चरणी नतमस्तक
आम्ही तुमच्या पायांवरती ठेवितो मस्तक
वंदन करुनी अनेकदा करितो तव बहुमान
यज्ञे यज्ञे तुम्ही असता सदैव विराजमान ||१||
☆
स घा॑ नः सू॒नुः शव॑सा पृ॒थुप्र॑गामा सु॒शेवः॑ । मी॒ढ्वाँ अ॒स्माकं॑ बभूयात् ॥ २ ॥
योगाच्या सामर्थ्याने हा युक्त दिव्य दाता
एक समयी सर्वव्यापी हा सकलांचा त्राता
सौख्याचा वर्षाव करी तो समस्त भक्तांवरी
कृपा करुनिया आम्हावरती सदैव धन्य करी ||२||
☆
स नो॑ दू॒राच्चा॒साच्च॒ नि मर्त्या॑दघा॒योः । पा॒हि सद॒मित्वि॒श्वायुः॑ ॥ ३ ॥
सर्व सृष्टीचा आत्मा तू तर सकलांचे जीवन
सन्निध अथवा दूर असो आम्ही तुमचे दीन
अवनीवरती कितीक जगती करुनी पापाचरण
त्यांच्या पासून तुम्ही करावे अमुचे संरक्षण ||३|| ☆ इ॒ममू॒ षु त्वम॒स्माकं॑ स॒निं गा॑य॒त्रं नव्यां॑सम् । अग्ने॑ दे॒वेषु॒ प्र वो॑चः ॥ ४ ॥
आर्त होउनीया श्रद्धेने किति स्तोत्रे रचिली
अर्पण करण्या देवांना भक्तीभावे गाईली
श्रवण अग्निदेवा करता तव मनास भावली
देव समुदायामध्ये तू स्तुती त्यांची केली||४||
☆
आ नो॑ भज पर॒मेष्वा वाजे॑षु मध्य॒मेषु॑ । शिक्षा॒ वस्वो॒ अन्त॑मस्य ॥ ५ ॥
प्राप्त कराया उत्तम मध्यम कसलेही सामर्थ्य
सन्निध अमुच्या सदा असावे मनात आम्ही आर्त
परम कोटीच्या संपत्तीला कसे करावे प्राप्त
कॢप्ती शिकवा आम्हा अग्ने होउनी अमुचे आप्त ||५||
☆
वि॒भ॒क्तासि॑ चित्रभानो॒ सिन्धो॑रू॒र्मा उ॑पा॒क आ । स॒द्यः दा॒शुषे॑ क्षरसि ॥ ६ ॥
अलौकीक कांती तेजोमय देदीप्यमान
दान करावे संपत्तीचे हा तुमचा मान
कृपा प्रसादाचा तू असशी थोर महासागर
प्रसाद लहरी सन्निध त्याला संपत्तीचा पूर ||६||
☆
यम॑ग्ने पृ॒त्सु मर्त्य॒मवा॒ वाजे॑षु॒ यं जु॒नाः । स यन्ता॒ शश्व॑ती॒रिषः॑ ॥ ७ ॥
(या ऋचांचा व्हिडीओ गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)