मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वातंत्र्याचं वारं… ☆ डॉ. तेजस्विनी वाळिंबे ☆

डॉ. तेजस्विनी वाळिंबे

अल्प परिचय 

वैद्यकीय

  • सहकार नगर, पुणे येथे गेली 25 वर्षे नेत्रतज्ञ म्हणून कार्यरत.
  • काचबिंदू व मधुमेहातील नेत्रविकार यातील विशेष प्रशिक्षण. 
  • अनेक राज्यस्तरीय व राष्ट्रीय वैद्यकीय परिषदांमध्ये काचबिंदू या विषयावर व्याख्याने.
  • Antiglaucoma drug trials मध्ये सहभाग.

साहित्यिक 

  • ‘पाहू आनंदे, ‘ व ‘स्मृति-सुधा’ ही पुस्तके प्रकाशित.
  • मराठी साहित्य, योगशास्त्र, भारतीय तत्वज्ञान, चित्रकलेची विशेष आवड.

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वातंत्र्याचं वारं… ☆ डॉ. तेजस्विनी वाळिंबे ☆

(प्रतिकूल कौटुंबिक आणि सामाजिक परिस्थितीत आपलं स्वातंत्र्य व अधिकार मिळवण्यासाठी झगडलेल्या सर्व स्त्रियांनी समर्पित)

एकदा असाच वारा आला

पिंजऱ्यातला पक्षी मुक्त आकाशात झेपावला

 

आजी माझी सांगत होती….

एकदा असाच वारा आला

घोंगावणारा वारा तिला उंबऱ्याबाहेर घेऊन गेला

 

वाऱ्याच्या झटापटीत खिडकीची तावदाने फुटली

घरातल्या कोंदट हवेला मोकळी वाट मिळाली

 

असाच एकदा वारा आला

स्वामित्वाच्या भिंती फुटून अहंकार चिरडल्या गेला

 

घरी-दारी कल्लोळ उठला

पिंजऱ्याच्या लोखंडी दांड्या तोडून वारा आत घुसला

 

आजी माझी सांगत होती…

जेव्हा असा वारा आला

माझ्या सखीच्या मनी आकांक्षांचे पंख फुटले

चिमुकल्या पंखांना तिच्या वाऱ्याने बळ दिले

 

स्वातंत्र्याच्या प्रकाशाने आकाश उजळून निघाले

निळ्या नभाच्या मोहकतेने तिचे मन आनंदले

 

असाच एकदा वारा माझ्याही घरी आला

शीतल स्पर्श करून मला हलकेच म्हणाला

 

“ऊठ हो जागी चल जाऊ या, उंच नभी “

असाच एकदा वारा आला

…आकांक्षेला स्वातंत्र्याचे पंख लावून गेला

 

© डॉ. तेजस्विनी वाळिंबे

(नेत्रतज्ञ)

पुणे मो. ८८८८८३१९०५

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ब्रह्मघोटाळा… कवी : आचार्य अत्रे ☆ माहिती संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? इंद्रधनुष्य ?

☆ ब्रह्मघोटाळा… कवी : आचार्य अत्रे ☆ माहिती संग्राहक – श्री सुहास सोहोनी ☆

“ब्रह्मघोटाळा” या सिनेमासाठी १९४९ साली आचार्य अत्रे यांनी एका हास्यस्फोटक अंगाईगीताची रचना केली होती. ते गाणं तुम्ही कधी वाचलं किंवा ऐकलं आहे कां? नसल्यास वाचा आणि ऐका.

☘️ निज रे निज बाळा… – गीतकार – आचार्य अत्रे ☘️

संगीत  :  दादा चांदेकर

गायक :  वसंत एरिक

☘️ 

निज रे निज बाळा, मिट डोळा,

सांगु तुला किती वेळा

निज रे निज बाळा

 

झोके देऊनि रे, बघ आला

हाताला मम गोळा

वाजवु कां आता, हाडांचा

माझ्या घुंगुरवाळा

 

वाजुनि तोंड असे, कां रडसी

अक्राळा विक्राळा

तुझिया रडण्याने, बघ झाली

आळी सारी गोळा

 

रडसि कशास बरे, मिळे आता

स्वातंत्र्यहि देशाला

काही उणे नसता, होशिल तू

मंत्री बडा कळिकाळा

 

लाल संकटाचे, रशियाचे

वाटे का भय तुजला

देऊ पाठिंबा, आपण रे

नेहरू सरकाराला

 

काळ्या बाजारी, बागुल तो 

काळा काळा बसला

थांबव हा चाळा, ना तर मी

घेऊन येईन त्याला

 

तुझिया रडण्याचे, हे गाणे

नेऊ का यूनोला

अमेरिकेमधुनी, येऊ कां

घेऊन ॲटम गोळा

 😀

 

कवी : आचार्य अत्रे

माहिती संग्राहक : श्री सुहास सोहोनी 

मो ९४०३०९८११०

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – ती… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? ती… ? श्री आशिष  बिवलकर ☆

कधी असते ती मायेचा  निर्झर,

कधी  घेते  ती दुर्गेचा  अवतार!

कधी  होते ती रणरागिणी,

कधी देते ती बुडणाऱ्याला आधार!

*
कधी असते ती स्वप्नवेडी,

कधी होते कर्तव्यासाठी  कठोर!

कधी असते ती धुंधीत,

कधी लागतो तिला संसाराचा घोर!

*
कधी उडते ती आकाशात,

तरी  जमिनीची तिला ओढ!

कधी  राबते  ती शेतात,

संसार करते तिचा गोड!

*

अनेक रूपे, अनेक भूमिका

हसत  हसत  ती निभावते!

अंतरातली घालमेल तिची,

हसऱ्या चेहऱ्याआड लपवते!

*

ती शांत राहते, सहन करते,

गृहीतच तिला धरले  जाते!

असते तिलाही तिचे एक मन,

आतल्या आत तिलाच ते खाते!

*

विचार करा तिच्या मनाचा,

जेव्हा होती ती गरोदर!

काळजावर दगड ठेवते,

उदरातली कळी खुडण्याअगोदर!

*

वंशाचा  दिवा हवा म्हणून,

का धरावा तिच्याच पुढे हट्ट!

मुलापेक्षा जणू स्वतः जन्माला येणारीच,

नाते धरून ठेवते कुटुंबाला घट्ट!

*

वाढवा तिच्या पंखातले बळ,

घेऊ दया तिला गरुडझेप!

आकाशी जरी असली ती,

लावायला येईल जखमेवर लेप!

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ तुकोबा समर्था… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ तुकोबा समर्था ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

निघालीय दिंडी चला पंढरीला

तिथे चंद्र भागेत जाऊ पुन्हा

अभंगातगोडी विठू सावळ्याच्या

मुखी नाम त्यांचेच ठेऊ पुन्हा

*

उभ्या पावसाची हजेरी असावी

सुखाच्या सुगीचीच गाणी म्हणू

मनी मानसी या खराभावठेवू

पुढे भक्ति मार्गास जाऊ पुन्हा

*

तुकोबा तुलाही लळा माणसांचा

तुझ्या लोकसेवेत आत्मा तुझा

किती भामट्यांचा तुला त्रास झाला

इथे या जगालाच दाऊ पुन्हा

*

तुकोबा समर्था तुझी थोर गाथा

कळेभाववेड्यास श्रद्धा तिची

खरे ते प्रभावी तिचे ज्ञान आहे

तिच्या ज्ञानगंगेत न्हाऊ पुन्हा

*

ख-या साधनेने रमाआत्मरंगी

तिथे देव भेटीस येतो तुझ्या

नको कर्मकांडे नको अंधश्रद्धा

हरीनाम साधेच घेऊ पुन्हा

*

म्हणा पांडुरंगा सगे खेडुताना

सगेसोयरे तेच तुमचे पुढे

तुम्हा सोबतीने भली थोरली ही

पुढे प्रेम वारीच नेऊ पुन्हा

*

कुठे काय होते कळेना कुणाला

समाजात सा-या दंगा घडे

नको तेवढी ही दुही माजलेली

तिला शांत करण्यास धाऊ पुन्हा

(तुकाराम बीज)

 

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “धर्म…” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “धर्म…” ☆ श्री आशिष मुळे ☆

न्याय-अन्यायाची वाख्या

माझी तशी सोपी आहे

डोक्यावरची धर्माची पगडी

माझी खूपच हलकी आहे

*

माझा देव दगडात नाही

असला तर सगळीकडे आहे

माझा देव माणसात नाही

असला तर त्याच्या कर्मात आहे

*

यम-नियम साधना-समाधी

गुप्त-प्रकट लीन-विलीन

शब्दांचा खेळ सारा

खेळण्यात काय मजा आहे?

*

कुस्तीत कर्माच्या

स्वतःच स्वतःतले

जनावर लोळवण्यात

खरा पुरुषार्थ आहे

*

” स्वतःस होईल दुःख, दुसरा कुणी वागता

तसे दुसऱ्या बरोबर वागू नये ”

इतकाच खरं तर धर्म आहे

अवलंबला एकाचवेळी जगानी तर

क्षणात देव अन स्वर्ग प्रकट आहे…

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ सांज ये गोकुळी… कवी : श्री सुधीर मोघे – रसग्रहण – सुश्री कविता आमोणकर ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? काव्यानंद ?

☆ सांज ये गोकुळी… कवी : श्री सुधीर मोघे – रसग्रहण – सुश्री कविता आमोणकर ☆ प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर

काव्यानंद

सांज ये गोकुळी सावळी सावळी

जेंव्हा दिवस संपून रात्र होण्यास सुरवात होणार असते, त्या वेळी म्हणजेच संध्याकाळी वातावरणात एक गूढता निर्माण होते. उन्हे कलत असतानाच आकाशात रंगीबेरंगी रंगाची उधळण होत असते आणि अशा वेळी अंधारून यायला सुरवात होते… दिवसाच्या प्रकाशात जेंव्हा रात्रीचा अंध:कार मिसळला जात असतो, तेंव्हा निर्माण होणारा सावळा रंग कवी सुधीर मोघे यांना ही मोहवून गेला आणि सांज ये गोकुळी.. सावळी सावळी! .. या सुंदर गाण्यांचे नादमय शब्द त्यांच्या लेखणीतून प्रसवले.

एकच शब्द जेंव्हा दोनदा कवितेत वापरला जातो, तेंव्हा होणारा नाद हा कानाला सुखावतो. या गाण्यात ही सावळी सावळी… या पुन्हा पुन्हा येणार्‍या शब्दांनी जो नाद निर्माण केला आहे, तो नाद आशा ताई यांनी आपल्या आवाजात इतक्या अप्रतिम पणे सादर केला आहे की, हे गाणे ऐकताना आपण अगदी नकळत या गाण्यावर डोलत राहतो. आणि या गाण्यातील शब्दांचे चित्र आपल्या डोळ्यांसमोर अक्षरश: उभे राहते. संगीताच्या सुरांचे बादशाह श्रीधर फडके यांनी पूर्वा कल्याण रागात या गीताला आशा ताई यांचा आवाज देताना गाण्याला उच्च दर्जा प्राप्त करून दिला. आशा ताई यांनी सुरवातीचा जो आलाप घेतला आहे, त्या आलापातच त्यांनी संपूर्ण गाणे जिंकले आहे. हे गाणे “ वजीर ” या चित्रपटामध्ये अश्विनी भावे या अभिनेत्रीवर चित्रीत केले गेले आहे.

सांज ये गोकुळी

सावळी सावळी

सांवळ्याची जणू साउली! ..

या कडव्यात गीतकार सुधीर मोघे यांना संध्याकाळच्या वातावरणात पसरणारी संध्याछाया ही जणू काही सावळ्या कृष्णाचीच सावली भासते! … किती सुंदर उपमा! .. त्या सावळ्या कृष्णाची सावळी छाया.. या सावळ्या वातावरणात अवघे वातावरण हे कृष्णमय होऊन गेले आहे आणि कृष्णाच्या गायी या संध्यासमयी गोधुळ उधळवत निघाल्या आहेत.. ( गायी जेंव्हा संध्याकाळाच्या वेळेस आपल्या घरी जायला निघतात, तेंव्हा त्यांच्या खुरांनी जी धूळ उडते, तिला गोधुळ म्हणतात ) त्या उडणार्‍या गोधुळी मुळे आधीच सावळ्या झालेल्या वातावरणात पायवाटा ही गोधुळीमय झाल्या.. या रंगाला कवी सुधीर मोघे श्यामरंग असे नाव देत पुढे लिहितात…

धूळ उडवीत गाई निघाल्या

श्यामरंगात वाटा बुडाल्या

परतती त्यांसवे

पाखरांचे थवे

पैल घंटा घुमे राउळी…

गोधुळ उडवत गाई निघाल्या आणि त्यांच्या सोबत पाखरांचे थवे ही आपल्या घरट्याकडे परतू लागले आहेत… अशा सावळ्या संध्याकाळच्या रंगात देवळात वाजणार्‍या घंटेचा नाद ऐकू येतो आणि सुंदर असे हे वर्णन या गीतात ऐकताना आपल्या डोळ्यासमोर सावळ्या श्रीकृष्णाची हातात मुरली धरलेली सावळी छबी उभी राहते! ..

वातावरणात भरून राहिलेल्या या सावळ्या रंगात दूर दिसणार्‍या उंचच उंच अशा पर्वतांच्या टोकांवर सावळा रंग हा असा झाकोळला गेलेला आहे की, ती पर्वतांची रांग जणू काही काजळाची रेघ दिसत आहे आणि वातावरणातल्या सावळ्या रंगामुळे समोर असलेल्या डोहात पडलेले पांढरेशुभ्र चांदणे ही सावळे होऊन गेले आहे. आणि हे सर्व कवी आपल्या शब्दांत साकारताना म्हणतात….

पर्वतांची दिसे दूर रांग

काजळाची जणू दाट रेघ

होई डोहातले

चांदणे सावळे

भोवती सावळ्या चाहुली! ….

कवी सुधीर मोघे यांच्या शब्दांतली गूढता इथे जाणवते. सावळ्या रंगात रंगून जाताना अवघे विश्व सावळे म्हणजे कृष्णमय होऊन गेले आहे ही त्यांची कल्पना कृष्णप्रेमाची ओढ दर्शविते.

माऊली सांज अंधार पान्हा

विश्व सारे जणू होय कान्हा..

मंद वार्‍यावरी

वाहते बासरी

अमृताच्या जणू ओंजळी…

सांजेच्या सावळ्या रंगात आता अंधाराला पान्हा फुटत आहे, म्हणजेच आता अंधाराचे साम्राज्य वाढत चालले आहे. आणि सावळ्या रंगाच्या श्रीकृष्णाच्या सावळ्या रंगात अवघे विश्व रंगून ते ही कान्हामय होऊन गेले आहे… संध्याकाळी सुटलेला हा मंद गार वारा हलकेच सुटला आहे आणि झाडापानातून वाहणार्‍या वार्‍याचे सूर हे सावळ्या श्रीकृष्णाच्या सावळ्या साउलीच्या वातावरणात त्या सावळ्या श्रीकृष्णाच्याच बासुरीतूनच वहात येताना अमृताच्या ओंजळीत सामावून जात आहेत, अशी सुंदर कल्पना या गीताच्या ओळींत सुरमय केली आहे.

©️ रसास्वाद – सुश्री कविता आमोणकर

प्रस्तुती – श्रीमती उज्ज्वला केळकर

 

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वातंत्र्याच्या वेदी… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ स्वातंत्र्याच्या वेदी ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

स्वातंत्र्याच्या वेदी वरती,

यज्ञाची सुरुवात जाहली!

यज्ञामध्ये पहिली समिधा,

वासुदेवानी अर्पियली!

*

ज्वाला तेव्हा पेटून उठली,

पारतंत्र्य दूर करण्या झणी!

घेतला वसा स्वातंत्र्याचा,

भगतसिंग ने तरूण पणी!

*

पेटून उठले एकाच रणी,

साथ सुखदेव, राजगुरूची!

धाडस त्यांचे अपूर्व होते,

गाठ घेतली ती मृत्यूची!

*

निर्भयाचे प्रतीक आहे,

कथा त्यांच्या साहसाची!

आठवणीने व्याकुळ होतो,

परिसीमा होती त्यागाची!

*

मनास होती तीव्र वेदना,

आठवून त्यांचा असीम त्याग!

एक दिवसाच्या आठवणीने,

होते का मनीची शांत आग!

*

वंदन करावे त्यांच्या स्मृतीला,

थोर देशभक्त जन्मले भारती!

कधी न विसरू त्यांचा त्याग,

गाऊ आपण त्यांची आरती!

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सु सं वा द! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

😁 सु सं वा द! 😅 श्री प्रमो वामन वर्तक ⭐ 

असू नये गोष्टी वेल्हाळ

लावू नये जास्त पाल्हाळ,

सत्य वाचे सदा वदावे,

जेव्हढ्यास तेव्हढे बोलावे!

*

घालून डोळ्यात डोळे

संवाद आपण करावा,

खोटे न बोलती डोळे

भाव मनीचा पोचवावा!

*

संवाद साधतांना सदा

नका करू हातवारे,

शब्द मुखातुनी मधाळावे

न करता अरे ला कारे!

*

स्वर पट्टी सांभाळून

बोलू नये उगा तारस्वरे,

पकडता संवादाचा धागा

शब्द भिडती ह्रदयी खरे!

*

नियम साधे हे संवादाचे

पाळा करतांना संवाद,

होता ध्येय साध्य मनीचे

मिटून जाती फुकाचे वाद!

मिटून जाती फुकाचे वाद!

© श्री प्रमोद वामन वर्तक

१०-०३-२०२५

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चिमण्यांचे झाड… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ चिमण्यांचे झाड… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

झाडावर बसल्या चिमण्या

झाडास लगडल्या चिमण्या

झाड चिमण्यांचे होऊन गेले

फुलं, पान फळही झाल्या चिमण्या……

*
चिमण्यांच्या चिवचिवाटाने

जणू बोलू लागले झाड

चिमण्यांच्या बागडण्याने

सुखे डोलू लागले झाड…….

 सुखे डोलू लागले झाड…….

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ २० मार्च : जागतिक चिमणी दिवस  — तीन कविता ☆ श्री आशिष बिवलकर, श्री प्रमोद वामन वर्तक आणि शुभदा भा. कुलकर्णी ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? २० मार्च : जागतिक चिमणी दिवस  — तीन कविता ☆ श्री आशिष बिवलकर, श्री प्रमोद वामन वर्तक आणि शुभदा भा. कुलकर्णी ☆

(या निमित्ताने वेगवेगळ्या भावना व्यक्त करणाऱ्या तीन कविता.)

श्री आशिष बिवलकर

( १ ) 

दार बंद करून,

चिऊताई बसली |

कळत नाही,

का बर ती रुसली |

*

ओसरीवर रोज नाचणारी,

आता ती दिसेनाशी झाली |

पूर्वापार माणसाळलेली,

माणसांपासून दूर गेली |

*
एक घास चिऊचा, एक काऊचा

भरवत पिढ्यानपिढ्या वाढल्या |

चिऊताई तुझ्या गोष्टी ऐकत,

लहानाच्या मोठ्या झाल्या |

*
काळ बदलत गेला,

फ्लॅट संस्कृतीत कुठं राहिली ओसरी |

तुझेच घरटे हिरावले आम्ही,

भूतदयेचे संस्कार सगळेच ते विसरी |

*
तुझा चिवचिवाट ऐकायला,

मनाची फुरसतच ती राहिली नाही |

चार दाणे तुला टाकायचे असतात,

सुचतच नाही आता मनाला काही |

*

असेल तिथे सुरक्षित रहा,

नामशेष मात्र नकोस होऊ |

चूकचूक करते पाल मनी,

चित्रात तरी उरशील का गं चिऊ?

© श्री आशिष बिवलकर

बदलापूर 

मो 9518942105

श्री प्रमोद वामन वर्तक

(२) 

निघे शुचिर्भूत होण्या 

सात चिमण्यांची फौज,

लक्ष ठेवती त्यांच्यावर दोघी

रोखून आपली नजर तेज!

*

पंख चिमुकले बुडवून जलात 

घेती आनंद स्नानाचा मनमुराद,

अंग शहारता गार पाण्याने 

झटकून टाकती पाणी क्षणात!

*

उरे बोटावर मोजण्या इतकी 

यांची संख्या बघा आजकाल,

येत्या ग्रीष्मात पाण्यावाचून

आपण त्यांचे टाळूया हाल!

आपण त्यांचे टाळूया हाल!

© श्रीप्रमोद वामन वर्तक

मो 9892561086

सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

(३)  

चिऊताई आली नाचत 

माझ्या दारी अंगणात 

या ग सा-या खेळायला

करू म्हणे गंमत जंमत 

*
छान आहे इथे सारे

हिरवी हिरवी झाडे 

पाना -पानातून लहरते

हवेहवेसे मंद वारे |

*

शांत सुंदर मंत्रांचा 

नाद कानी निनादतो

जगतांना माणसाला 

संदेश देऊया मैत्रीचा |

*

कवयित्री : शुभदा भा. कुलकर्णी.

 मो. ९५९५५५७९०८/

©  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares