मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #168 ☆ वारकरी…! ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 168 ☆ वारकरी…! ☆ श्री सुजित कदम ☆

पंढरीच्या वाटेवर चालतोया वारकरी

विठ्ठलाला भेटण्याची आस असे त्याच्या ऊरी..!

 

टाळ मृदूंगची लय मना मनात घुमते

एक एक अभंगाने देहभान हरपते..!

 

हर एक वारकरी माझ्या विठूचेच रूप

डोक्यावरी टोपी त्याच्या भासे कळसाचे रूप..!

 

इवल्याशा तुळशीने दिंडी शोभून दिसते

दिंडी पताका घेऊन वारी सुखात चालते..!

 

किर्तीनात मृदूंग ही जेव्हा वाजत रहातो

भक्तिभाव तुकयाचा माझ्या अंतरी दाटतो..!

 

वारीमध्ये चालताना मी ही विठूमय झालो

माऊलीच्या सावलीला काही क्षण विसावलो..!

 

नाही म्हणावे कशाला काही कळेनाच आता

कंठ विठ्ठल विठ्ठल गात आहे गोड आता..!

 

© श्री सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ :: इठ्ठला :: ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे ☆

डाॅ.भारती माटे

वाचतांना वेचलेले

 ☆ :: इठ्ठला :: ☆ प्रस्तुती – डाॅ.भारती माटे 

इठ्ठला… किती येळ असा

रहाणार रं उभा

इथं कुणीबी तुले म्हण्णार न्हाई

बस की रं बाबा…! 

 

तुझ्यासंगं रख्माई बी

हाये ना रं हुभी… 

तिचा इचार कर की जरा

ती बोलायची न्हाय कधी…! 

 

पाय बी किती दुखून दुखून

गळले असतील की रे… 

चार घटका बस ना जरा

वाटल की रं बरे…! 

 

बस जरा थोडं तेल

लावते गरम गरम… 

पायांले पडल आराम

पडतील जरा नरम…! 

 

किती काळ वाट पाहणार

आता पुंडलिकाची… 

वारकरी पाई येतात

तिबी रुपंच की रं त्याची…! 

 

बास झालं सोड आता

हट्ट जगायेगळा… 

रख्माईसंग बैस अता

हो बंधनातून मोकळा…! 

 

कटीवरचे हात बी जरा

उतरव आता खाली… 

भक्तासाठी आजवर तुझी

लय परीक्षा झाली…! 

 

इटेवर हाइस उभा

तसा तू मनात बी आमच्या हायेस… 

अठ्ठाईस युगं कधी व्हणार

आता तू आमचं ऐकणार हायेस… 

कर थोडा आराम

रख्माईला दे तू येळ… 

बायको खूश तर आपच रंगतो

संसाराचा खेळ…!!! 

 

कवयित्री : ©डॉ.प्रितीराणी जुवेकर

संग्रहिका : डॉ. भारती माटे.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वारी ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

 

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? वारी ? ☆ श्री प्रमोद वामन वर्तक 

आषाढाच्या सरींनी

चिंब भिजे धरणी सारी,

टाळ मृदूंगाच्या नादात 

चाले पंढरीची वारी !

 

            शिरी कोणी घेई विठुराया

            कोणी तुळशी वृंदावन,

            गजर चाले सावळ्याचा

            विसरून सारे देहभान !

 

दिसे डोळ्यापुढे पांडुरंग

लागला भेटीचा ध्यास,

वाटेतल्या काट्या कुट्यांचा

सांगा कसा होईल त्रास ?

 

            होता दर्शन आषाढीला

            पारणे डोळ्यांचे फिटेल,

            विरह माय माऊलीचा 

            सारा चंद्रभागी बुडेल !

            सारा चंद्रभागी बुडेल !

© श्री प्रमोद वामन वर्तक

०९-०३-२०२३

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) मो – 9892561086 ई-मेल – pradnyavartak3@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जिवाची  वारी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ जिवाची  वारी… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

जन्मा येई जीव l वारीचे कारण l

जन्म न् मरण l दोन टोके l l…..१

 

वारीचा प्रारंभ l जन्म वेळ असे l

पार करीतसे lएक टप्पा l l…..२

 

बालपण जीवा l एक थांबा असे l

मन रमतसे l बालक्रीडा l l…..३

 

दुसरा तो थांबा l तारुण्यात येई l

संसाराच्या ठाई l गुंततसे l l….४

 

जीव व्यवहारी l रमतो संसारी l

घेई शिरावरी l कार्यध्वज l l….५

 

वय वाढू जाता l वारीची सवय l

मनी येई सय l पांडुरंगा l l….६

 

वारीचा शेवट l जाणवे मनास l

देखे अंतरास l जीव आता l l….७

 

जीवा दिसे आता l देवाचे राऊळ l

पाऊल उचल l वेगे वेगे l l….८

 

© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “येरझारा” ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “येरझारा” ☆  सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

टोपीवाल्या कावळ्यांनी गजबजलंय रान

    आणि कावकाव करण्याला सारखंच उधाण —-

 

या फांदीवरून त्या फांदीवर

      सततच त्यांच्या येरझारा

           त्याने झाडाखाली वाढत चाललाय

               नैतिकतेचाच फक्त कचरा —-

 

पण कावळ्यांना मात्र भान नाही

       या कचऱ्याबाबत तर खंतच नाही

            झाडही झालंय केविलवाणं

                 पण त्यांना बघायलाही उसंत नाही —-

 

“ झाडाची पर्वा आम्ही का करायची ? “

        गरजच वाटत नाही असल्या प्रश्नांची

           गरज आहे ती फक्त टोपीची

               बाकीची फिकीर काय कामाची —-

 

ज्यांना राग येतोय त्यांना येऊ दे

         ज्यांना काळजी वाटतेय त्यांना वाटू दे

              पण झाड ‘ त्यांच्या ‘ मालकीचं नाही –

                   हे मात्र ‘ अशांच्या ‘ लक्षात राहू दे —-

 

आमच्या नावावर केलाय आम्ही

           कधीचा झाडाचा सातबारा

                कसा आणि केव्हा हे का सांगू आम्ही

                     या सज्जन विचारांना आम्ही देतच नाही थारा —-

 

आम्ही असेच फडफडत रहाणार

           मनोरे स्वप्नांचे रचत रहाणार

                गरजेनुसार स्वप्नं बदलणार

                       आणि …. या फांदीवरून त्या फांदीवर

                              येरझारा मारताच रहाणार —

                                   येरझारा मारतच रहाणार —

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

३/७/२३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 189 ☆ चिंब पाऊस… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 189 ?

चिंब पाऊस… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

बाहेर चिंब पाऊस,

आणि मनात

आठवणींचे ढग,

काळजातली,

घुसमट वाढली,

अन् डोळे…

बरसू लागले,

झरझर  !

प्रश्न असंख्य…

उत्तर नाहीच

सापडत!

नीती अनितीच्या

पल्याड…

एक गाव असतं!

कृष्णडोहाशी,

संतत धार पाऊस,

आणि युगायुगांची

तहान…

शुष्क…कोरडीच !!!

 

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- sonawane.prabha@gmail.com

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ परब्रम्ह… ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? कवितेचा उत्सव ?

☆ परब्रम्ह… ☆ सुश्री शोभना आगाशे

न मी कधी जन्मतो

न कधी मृत्यू पावतो

मी असे चिरतरुण

मीच तो अपार करुण

मी नसे नाशवंत

अपूर्व मी अन् अनंत

आनंद मी, भयहीन मी

अढळ मी, अचल मी

नसे मजआधी कुणी

नसे मजसम ही कुणी

मी असे अप्रकट

तरीही भासे प्रकट

मी असे सर्वज्ञाता

मीच असे अन् त्राता

मज नसे सुरवात

आणि नसे मज अंत

साधार मी नच राही

आधार मीच परि देई

स्वामी मी सदोदित

स्वयंस्फूर्त अन् सतत

श्रेष्ठ मी, कनिष्ठ मी

विशाल मी, अणु मात्र मी

मी सर्वाभूती वसे

मी सर्वातीत असे

मी असे नवा सदैव 

मी जुना अन् नित्यैव

मी असे एक शून्य

संपूर्ण मी परि अनन्य

मी न करवितसे कांही

मी अलिप्त सर्वा देही

मी एकाकी, नसे लिप्त

हर्ष शोका परे, अलिप्त

व्यापित मी चराचरा

मज व्यापे भक्ती परा

आदिपुरुष, पुरुषोत्तम

पुरुष मी विराट, उत्तम

बोलत मी नच कांही

ऐकत मी नच कांही

अबोल बोल भक्तांचे

ऐकत मी परि साचे

विविध भक्त मज पुजती

विविध रूपे रेखाटती

मजला परी रूप नसे, 

भक्तांच्या हृदयी वसे

पूर्वज मज नच कोणी

वंशज मज नच कोणी

नाही मज एक गोत्र

समदर्शी मी स्वतंत्र

निर्गुण, निराकार, सतत

परब्रम्ह मी शाश्वत

या सर्वा जाणित जो

अद्वैता मानित जो

तो बोधी कोण असे

मजला ते ज्ञात असे

(ज्ञानेश्वरीतील अध्याय १८, ओवी ११९३ ते १२०० वर आधारित)

© सुश्री शोभना आगाशे

सांगली 

दूरभाष क्र. ९८५०२२८६५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #195 ☆ ‘झकास’ आहे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 195 ?

☆ ‘झकास’ आहे… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

असा कसा रे तुझा जीवना प्रवास आहे

रस्त्यामधला खड्डा सुद्धा उदास आहे

डोळ्यामधला अश्रु झाकतो आहे मुखडा

ओठावरचा शब्द बोलला ‘झकास’ आहे

अडचण झाली सामान्यांना  कोरोनाने

पण नेत्यांचा कुठे थांबला विकास आहे

जडले होते प्रेम गुलाबी नोटांवरती

बंदी येता अडचण येथे ठगास आहे

तेलासाठी वाळूचे कण रगडत बसलो

जिद्द सोडली नाही करतो प्रयास आहे

सुंदर दिसतो पानांवरती डोलत असतो

क्षणभंगुर का जीवन मिळते दवास आहे ?

विकास होता आनंदाने नाचत होतो

अता कशाला म्हणू जिंदगी भकास आहे

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

ashokbhambure123@gmail.com

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – शह – काटशह…– ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– शह – काटशह…– ? ☆ श्री आशिष  बिवलकर ☆

राजकारणाचे  झाड,

सत्तेची झुलणारी फांदी !

भिरभिरणारी पाखरे,

बसून होती आनंदी !

 

आज या फांदीवर,

उद्या दुसऱ्या फांदीवर !

शह कटशह देत,

सत्तेचे चाले स्वयंवर !

 

कोणी न येथे नसे,

मित्र वा शत्रू कायम !

अचूक वेळ येई पर्यंत,

पाळतात सारे संयम !

 

कोण कोणाला नसे,

इथे स्पृश्य अस्पृश्य !

पापणी मिटताच,

पलटते पडद्यावर दृश्य !

 

विचारधारेचे घालतात लोणच,

डावपेचांनी घाले फोडणी !

त्यांच्या ताटाची करी चिंता,

कार्यकर्ते ठरतात अडाणी !

 

कार्यकर्ता भिडतो,

हातात मिरवीत झेंडे !

चामडीच नेत्यांची कडक,

शरमतात पाहुन गेंडे !

 

करेक्ट कार्यक्रम चाले,

कोण किती असो मोठा !

समीकरण जुळवत सारे,

शोधतात सत्तेच्या वाटा !

 

तुमच्या आमच्या पिंडावर,

पोसलेले सारेच  कावळे !

टोच मारण्यास तत्पर,

पंचवार्षिक श्राद्धाचे सोहळे !

 

पाच  वर्षात मतदार,

होतो एक दिवसाचा राजा !

पोकळ आश्वासनांचा,

नेते वाजवती रोज बँडबाजा !

 

खाण्याचे दात अन् दाखवण्याचे,

दात असतात वेगळे !

एका पेक्षा एक नग निघती सारे,

एकाच माळेचे मणी सगळे!

 

लोकशाहीचे  कुरण,

चरण्यात सारे वळू होती दंग !

भूक संपता संपत नाही,

सतेचे  उधळीत सारे  रंग !

 

वेश्या जाणे कोणा समीप,

कोणाला लोटावे ते दुर !

मरे आत्मा,भूत सारी,

सत्तेसाठी बडवती उर !

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चंदेरी क्षण… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे☆

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

☆ चंदेरी क्षण… ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

आठवांच्या चांदराती मनास मोहत येती

धुंद मधुर क्षणांची गाणी ओठांवर येती || ध्रु ||

 

सूर लाभले श्वासांना स्पंदनांची गाणी झाली

चांदण्याची अविरत रम्य बरसात झाली

रसिक चंद्र हासला लोभस उर्मी येती

धुंद मधुर क्षणांची गाणी ओठांवर येती || १ ||

 

त्या क्षणांचेच चांदणे मनात भरुनी राही

अजूनही लाजणे ते गाली विलसत राही

अंतरात पुन्हा अशी आनंद स्पंदने येती

धुंद मधुर क्षणांची गाणी ओठांवर येती || २ ||

 

तूच चांद हृदयीचा तूच रम्य कोजागिरी

तुझ्या सवे विहरता होई पोर्णिमा साजिरी

ज्योत्स्नेची हो बरसात चैतन्य लहरी येती

धुंद मधुर क्षणांची गाणी ओठांवर येती || ३ ||

 

आठवांच्या चांदराती मनास मोहत येती

धुंद मधुर क्षणांची गाणी ओठांवर येती ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares