मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “म्यान” ☆ श्री आशिष मुळे ☆

श्री आशिष मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “म्यान” ☆ श्री आशिष मुळे ☆

काळाच्या नवीन लढाईत आता

धार निरर्थक झाली आहे

संपलेल्या आव्हानांना आता

शरण मी गेलो आहे

 

जिंकून जगण्याचा दिवस आता

मावळतीला लागला आहे

जिंकूनही हरण्याची रात्र आता

वीरांच्या नशिबात आहे

 

का लढतोय कोणासाठी लढतोय

याला आता अर्थ नाही

सगळेच पराजित येथे

कोणालाच कुठले सुतक नाही

 

काळाच्या या झुंडी समोर

माझ्यातला मी हतबल आहे

तुटलेली तलवार मी आता

म्यान काळजात केली आहे

 

© श्री आशिष मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव  ☆ “लाटा” ☆ स्वैरअनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

? कवितेचा उत्सव ?

☆ “लाटा” ☆ स्वैरअनुवाद – सुश्री मंजुषा सुनीत मुळे  ☆

(सद्गुरू श्री जग्गी वासुदेव यांच्या इंग्रजी कवितेचा स्वैरअनुवाद.) 

अलाई अलाई, अलाई अलाई, अलाई अलाई रे … 

लाट जणू लाट .. ही तर लाट आहे रे ….

धावे मन शोध घेत…  आनंदाचा रे …. 

आयुष्य नेमके कसे .. परि ठावे नसे रे ….  

हैय्या हो …. हैय्या हो ……                                                    

                                                       

इच्छा जन्मे मनी जणू इवली मासोळी 

भान तिचे सुटे नि आता केवढी वाढली ….

बघता बघता अन आता ती ‘व्हेल’च झाली… 

मनोमनी आणि क्षणी मोहरूनी गेली …. 

 

व्हेल हाती लागला.. पण हाव संपेना 

अजून एक मासोळी हवी .. हट्ट थांबेना …. 

इच्छांच्या लाटांवर मन स्वैर उसळे … 

आणि नाव आकांक्षांची.. सदा तिथे डुले …. 

 

लाटा उफ़ाळत्या तशी काळजाची धडधड … 

आणखी पुढे जाण्यासाठी.. जीवाची तडफड …. 

समुद्राची ती वरवरची सळसळ… लाटा वरवर रे … 

आणि ‘ मुक्त ‘ मासोळ्या त्या.. खोलखोल फिरती रे …. 

 

इच्छा म्हणजे मनातले रे .. वरवरचे तरंग … 

खोल आत सळसळती …आनंद तरंग …. 

एवढे तरी समजून घे … माणसा मनात रे … 

तुझ्यातच दडलाय परमानंद .. नकळत जाणवेल रे …. 

 

मग सगळ्या लाटा आनंदमयी .. तुलाच उमजेल रे … 

तुझ्यातच दडलाय परमानंद … खात्री पटेल रे …. 

तुझ्यातच दडलाय परमानंद … खात्री पटेल रे ….

हैय्या हो …. हैय्या हो ……..  

 

सद्गुरू श्री जग्गी वासुदेव 

स्वैरअनुवाद: सुश्री मंजुषा सुनीत मुळे.  

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ प्रति बिंब स्वत:च्या… ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? प्रति बिंब स्वत:च्या… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल

दंड थोपटूनी असे का आज

वृक्ष वृक्षापुढे उभे ठाकले

दंडच त्यांना ठोकला पाहिजे

का माणसासम वागू लागले॥

डोळे उघडून पहावे जरा

हे हात हातात घेत आहेत

डोळेझाक तू करू नकोस रे

तुला छान धडा देत आहेत॥

छत्र तुझ्या घरावरचे डोले

सावली करण्या उन्हेही झेले

छत्र जणू वडिलधार्‍ंयांचे हे

डोई हात फिरवत राहिले॥

कर  निश्चय झाडे लावण्याचा

प्राणवायू प्रमाण जपण्याचा

कर चैतन्याचे फिरती पाठी

घ्यावा मंत्र निरोगी आयुष्याचा॥

प्रति आयुष्याच्या व्हावे कृतज्ञ

सांजेस अंतरंगी डोकवावे

प्रति बिंब स्वत:च्या सत्कर्माचे

त्यात स्वच्छ नी सुंदर दिसावे॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ अंतर्नाद…. ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ अंतर्नाद… ☆ श्रीशैल चौगुले ☆

नभ बोलते अक्षराशी

अब्द होती शब्द माझे

ज्ञान ऋतु बरसतो

चिंब होई काव्य माझे.

 

व्यास लेखणीत उतरे

सरस्वती माय ओळी

हळुवार शब्द पीसे

टोकदार भक्ती कळी.

 

मन सृष्टीत भटके

इंद्रधनु रंग रचा

भाव प्रकट सहज

सूर्य-चंद्र दान रुचा.

 

जीवन सफल साद

निर्मळ समुद्र स्पंद

लाटांना पुर्ण विराम

काव्याचा तीर आनंद.

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 150 – हा मार्ग संकटांचा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 150 – हा मार्ग संकटांचा ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

हा मार्ग संकटांचा, अंधार दाटलेला।

शोधूकसा निवारा, जगी दंभ दाटलेला।धृ।।

हे मोहपाश सारे, अन् बंध भावानांचे।

मी दाखवू कुणाला, आभास वेदनांचे।

प्रेमात ही आताशा, हा स्वार्थ साठलेला।।१।।

लाखोत लागे बोली, व्यापार दो जिवांचा।

हुंड्या पुढे अडावा, घोडा तो भावनांचा ।

आवाज प्रेमिकांचा, नात्यात गोठलेला।।२।।

ही लागता चाहूल, अंकूर बालिकेचा।

सासूच भासते का, अवतार कालिकेचा।

खुडण्यास कळीला, हा बाप पेटलेला।।३।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ मुंबईतील नोकरदार भगिनींची कथा/व्यथा… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆

सौ.शशी.नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

⭐ मुंबईतील नोकरदार भगिनींची कथा/व्यथा… ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सात पस्तीस मिळावी म्हणून पाच पस्तीसला उठणा-या बायका……….

 

योगा, वॉक, आरामाची स्वप्नं

वर्षानुवर्षे डोळ्यात राखत

 

निर्दयी अलार्मचा कान पिळून

ताडकन, काटकोनात उठत

 

‘आज पुन्हा उशीरच, ‘ असा

स्वतःला दोष देत

 

स्वयंपाकपाणी झपझप आवरतात

 

तयार होतात – सुसाट पळतात

हा प्लॅटफॉर्म, तो प्लॅटफॉर्म

चढतात – उतरतात

 

सात पस्तीस शिताफीने

गाठणाऱ्या बायका!

 

सात पस्तीस मिळावी म्हणून

पाच पस्तीसला उठणा-या बायका……….

🚃🚋

गर्दी असतेच

पण, मैत्रिणी असतात

काही बसतात,

काही उभ्या राहतात

 

तीन सीटच्या बेंचवर

चौथी सीट तयार करत

ढकलतात, बुकलतात

 

‘झोपच नाही झाली आज, ‘

एकमेकींच्या कानात

वर्षानुवर्षे कुजबुजतात

 

जप, पोथी, मोबाईल, पुस्तक

सवयीने डोकं

कशात तरी खुपसतात

 

गुड मॉर्निंग, गुड डे

वाढदिवस, ॲनिवर्सऱ्या

गोडधोड, फुलंबिलं

देतात, घेतात,

उत्साही राहतात

 

आनंदी आहोत, हे वारंवार

स्वतःलाच समजावणा-या बायका

 

सात पस्तीस मिळावी म्हणून

पाच पस्तीसला उठणा-या बायका……….

 

कुठल्या तरी स्टेशनवर

गर्दी जरा सुटी होते

तेव्हा कुठे

घुसमटलेला पहिला मोकळा श्वास घेतात

 

आईच्या कुशीत शिरावं तसं

जोजवणा-या डब्याच्या

कुशीत शिरतात

 

खरं तर तो एक

छोटासाच तुकडा वेळेचा,

पण,

बिनघोर, बिनधास्त झोपून घेतात

 

एकमेकींच्या खांद्यावर घुसळत डोकं

एकमेकींच्या अंगावर टाकून भार

आपापलं स्टेशन येईपर्यंत

राहिलेली स्वप्नंही पाहून घेतात

 

छोटीशीच नॅप,

इतकुशीच, पण हक्काची झोप

प्रसन्न करते

 

धावत्या स्वप्नांना

आदल्या स्टेशनवर अचूक ब्रेक देते

 

‘चला, उद्या भेटू, ‘म्हणत

प्रसन्नतेला आत्मविश्वासाने गुणत

प्लॅटफॉर्मवर उतरतात

 

काळाचा तो छोटासा टप्पा

सोन्याचा करुन टाकणा-या बायका

 

सात पस्तीस मिळावी म्हणून

पाच पस्तीसला उठणा-या बायका……! 🚃🚋🚶🏻‍♀️🏃🏻‍♀️

संग्राहिका :सुश्री शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कवितांची साथ? ☆ सुश्री सुमन किराणे ☆

सुश्री सुमन किराणे

? कवितेचा उत्सव ?

☆ कवितांची साथ… ☆ सुश्री सुमन किराणे ☆

 दुःखं झुंडीनं घुसली

 जीव माझा गुदमरे

 त्यांच्या स्वागता मी नेले

 दैव फाटके सामोरे

 

            दिली जुन्यारं नेसाया

            शिळं पाकं पंगतीला

            चंद्रमौळी घरामध्यें

            माझे अश्रू दिमतीला

 

 आज घालती धिंगाणा

 जाच किती करतील

 कंटाळून कधीतरी

 आपोआप पळतील

 

            अचानक कवितांनी

            मला साथ देऊ केली

            काट्या कुट्यांच्या कोंदणी

            फुले बहरास आली

 

 केला शब्दांचा वर्षाव

 आणि लेखनाचा मारा

 दुःखं पळाया लागली

 मज सोडून भरारा

 

            कवितांना सांगितलं

            माझ्या पाशी रहा बाई

            आतां आपण साऱ्यानी

            दुःखा थारा द्यायचा नाही.

 

© सुश्री सुमन किराणे

पत्ता – मु.पो. हेर्ले, ता. हातकणंगले, जि. कोल्हापुर.

मोबा.9850092676

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #172 ☆ माझा हवेली तालुका ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 172 – विजय साहित्य ?

☆ माझा हवेली तालुका ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

पुणे जिल्ह्यातील एक

शोभे तालुका हवेली

मुळा मुठा नदी सवे

ख्याती याची अलबेली….! १

 

आर्वी उरुळी कांचन

गाव कल्याण कवडी

फुरसुंगी नी थेऊर

खेड शिवापूर गढी….! २

 

चिंचवड नी पिंपरी

सोनापूर, तुळापुर

पुणे शहराचा भाग

औद्योगिक त्याचा नुर…! ३

 

पहा मांजरी, मांडवी

शांत, रम्य,‌परीसर

छोट्या मोठ्या ,वाडी वस्त्या

हवेलीत मनोहर…..! ४

 

पीक बाजरी तांदूळ

गहू,ज्वारी हरभरा

साखरेचा कारखाना

समृद्धीची परंपरा….! ५

 

माझा हवेली तालुका

शेती माती जोपासतो

भक्ती शक्ती कलागुण

नाविन्याने भारावतो….! ६

 

औद्योगिक वसाहती

हवेलीची आहे शान

स्थलांतर करूनिया

खगगण घेती मान….! ७

 

स्वराज्याची उभारणी

सह्याद्रीच्या मुशीतून

साकारले शोर्यतेज

हवेलीच्या कुशीतून…!  ८

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ हाचि नेम आता…संत तुकाराम महाराज ☆ रसग्रहण – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆

सुश्री विभावरी कुलकर्णी

 🌸 विविधा 🌸

☆  हाचि नेम आता…संत तुकाराम महाराज ☆ रसग्रहण – सुश्री विभावरी कुलकर्णी ☆ 

काव्यानंद

☆तुकाराम गाथा – अभंग ☆

हाचि नेम आतां न फिरें माघारी । बैसलें शेजारीं गोविंदाचे ॥१॥

घररिघी जालें पट्टराणी बळें । वरिलें सांवळें परब्रम्ह ॥२॥

बळियाचा अंगसंग जाला आतां । नाहीं भय चिंता तुका म्हणे ॥३॥

रसग्रहण 

मला जाणवलेला व उमगलेला अर्थ…….

मनाचा निर्धार आणि संपूर्ण श्रद्धा यांचा अर्थ प्रकट करणारा हा अभंग आहे.

आता हाच माझा नेम (निश्चय केला, व्रत घेतले  किंवा मी ठरवले ) आहे.गोविंदा जवळ आहे,तिथून माघारी फिरायचे नाही.

संसाराचा मोह धरायचा नाही.

त्या गोविंदाच्या घरात मोठ्या प्रयासाने ( जप,तप,नामस्मरण, सदाचारी वर्तणूक, भूतदया इ.मुळे) आले आहे.व माझ्या वर्तणुकी मुळे पट्टराणी झाले आहे. त्या सावळ्या परब्रह्माला मनापासून वरले आहे.आता तेथून माघारी फिरणे नाही.

त्या बलवान म्हणजे सर्वव्यापी,सर्वांना जीवदान देणारा,चिंता हरणारा व षडरिपूं पासून दूर नेणारा असा जो गोविंद आहे त्याचा सहवास लाभला आहे.म्हणून आता कोणतेही भय,चिंता राहिली नाही.

यात गोविंद हा शब्द अचूक वापरला आहे. गो म्हणजे गायी पण त्याचा अजून एक इंद्रिये असाही अर्थ आहे.गोविंद म्हणजे इंद्रियांचा व्यवहार जाणतो व त्याचे नियमन  ( इंद्रिय विषयी विचारांचे उन्नयन ) करतो.

“घररिघी झाले” या चरणात “बळे” म्हणजे बळजबरीने असा अर्थ नसून बळे म्हणजे जो सर्वशक्तिमान आहे त्याची पट्टराणी असा आहे.

या वर विचार केल्यावर असे लक्षात आले की ते जीव व आत्मा यांच्या संदर्भात बोलत आहेत.जो जीव आजवर द्वैताच्या भावनेने वेगळा रहात होता,तोच जीव आता आत्मस्वरूपाच्या आनंदाने सर्वशक्तिमान परब्रह्माशी एकरूप झाला आहे. व संपूर्ण स्वयंभू झाला आहे.

अशा सर्वसाक्षी सर्वव्यापी गोविंदा पासून दूर जायचे नाही. इतर कोणत्याच मोहपाशात परतायचे नाही.परत षडरिपूंच्या आहारी जायचे नाही.आता कोणतीच भय,चिंता राहीली नाही.असे तुकाराम महाराज म्हणतात.

हा अर्थ व्यक्ती परत्वे भिन्न असू शकतो.

© सुश्री विभावरी कुलकर्णी

सांगवी, पुणे

मोबाईल नंबर – ८०८७८१०१९७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २३ – ऋचा १६ ते २४ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २३ – ऋचा १६ ते २४ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २३ (अप्‌सूक्त)

ऋषी – मेधातिथि कण्व 

देवता – १६-२३ अप् (पाणी); २४ अग्नि; 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील तेविसाव्या  सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी अनेक देवतांना आवाहन केलेली असली तरी ती मुख्यतः जलदेवतेला उद्देशून हे अप् सूक्त सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील सोळा ते तेवीस या ऋचा अप् (पाणी) आणि चोविसावी ऋचा अग्नि यांचे आवाहन करतात. या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार  गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी  अप् (पाणी) आणि  अग्नि या देवतांना उद्देशून रचलेल्या सोळा ते चोवीस या ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे. 

मराठी भावानुवाद :

अ॒म्बयो॑ य॒न्त्यध्व॑भिर्जा॒मयो॑ अध्वरीय॒ताम् । पृ॒ञ्च॒तीर्मधु॑ना॒ पयः॑ ॥ १६ ॥

यजमानाच्या या यज्ञाच्या माता प्रेमळ

मोद वर्धिती मधुर करोनी जलास अपुल्यातील 

आशीर्वच देऊन ऋत्विजा मार्गासी जात

कर्तव्याची जाण ठेउनी अपुल्या मार्गे वहात ||१६||

अ॒मूर्या उप॒ सूर्ये॒ याभि॑र्वा॒ सूर्यः॑ स॒ह । ता नो॑ हिन्वन्त्वध्व॒रम् ॥ १७ ॥

सन्निध असती त्या सूर्याला अहो भाग्य त्यांचे

भास्कर जवळी त्यांच्या उजळाया जीवन त्यांचे

त्या तर साऱ्या अमुच्या जननी हित अमुचे चिंतित

आशिष देऊनीया यज्ञाला यशाप्रती नेवोत ||१७||

अ॒पो दे॒वीरुप॑ ह्वये॒ यत्र॒ गाव॒ः पिब॑न्ति नः । सिन्धु॑भ्य॒ः कर्त्वं॑ ह॒विः ॥ १८ ॥

कपिला अमुच्या प्राशन करिती पवित्र तोय जयांचे

आपदेवते कृतज्ञतेने आमंत्रण द्यायचे 

सरितांमधुनी अखंड वाहे अमुचे जीवन  

नतमस्तक होऊन तयांना हवीचे अर्पण ||१८|| 

अ॒प्स्व१न्तर॒मृत॑म॒प्सु भे॑ष॒जम॒पामु॒त प्रश॑स्तये । देवा॒ भव॑त वा॒जिनः॑ ॥ १९ ॥

हे जल आहे अमृतसम दिव्य सर्वगुणी 

ओखदमयी हे निरामयी हे बहुगुणी  संजीवनी

देवांनो यज्ञासी यावे त्वरा करोनी झणी

स्तवन कराया या उदकाचे सुरातुन गाउनी ||१९||  

अ॒प्सु मे॒ सोमो॑ अब्रवीद॒न्तर्विश्वा॑नि भेष॒जा । अ॒ग्निं च॑ वि॒श्वश॑म्भुव॒माप॑श्च वि॒श्वभे॑षजीः ॥ २० ॥

अग्निदेव हा सकलांसाठी दयाळू शुभंकर्ता

राखुनिया अंतर्यामी  जल आरोग्याचा दाता

रोगांचे परिहारक दिव्य उदक श्रेष्ठ बहुगुणी

ज्ञानी केले आम्हाला हे सोमाने सांगुनी ||२०||

आपः॑ पृणी॒त भे॑ष॒जं वरू॑थं त॒न्वे३मम॑ । ज्योक् च॒ सूर्यं॑ दृ॒शे ॥ २१ ॥

जलशक्ती हे तुला प्रार्थना आरोग्या द्यावे

अनंतकाली आम्हासी सूर्याचे दर्शन व्हावे

निरामयाच्या वरदानास्तव  दिव्यौषधी मिळावे

प्रसन्न होऊनी आम्हावरती आशीर्वच हे द्यावे ||२१||

इ॒दमा॑प॒ः प्र व॑हत॒ यत् किं च॑ दुरि॒तं मयि॑ । यद्वा॒हम॑भिदु॒द्रोह॒ यद्वा॑ शे॒प उ॒तानृ॑तम् ॥ २२ ॥

पवित्र पावन निर्मल असशी जलाचिया देवते

दुर्गुण दुष्टावा शत्रुत्व नष्ट करी माते

असत्य वर्तन माझ्या ठायी त्याचे क्षालन करा

जीवनास या कृपा करोनी नेई उद्धारा ||२२||

आपो॑ अ॒द्यान्व॑चारिषं॒ रसे॑न॒ सम॑गस्महि । पय॑स्वानग्न॒ आ ग॑हि॒ तं मा॒ सं सृ॑ज॒ वर्च॑सा ॥ २३ ॥

सर्व जलांनो तुमच्या पायी शरणार्थी झालो

मधुर रसांशी तुमच्या ठायी एकरूप झालो 

जलनिवासि हे अनला देवा प्राप्त येथ होई 

तव तेजाचे दान करोनी कृपावंत होई ||२३||

सं मा॑ग्ने॒ वर्च॑सा सृज॒ सं प्र॒जया॒ समायु॑षा । वि॒द्युर्मे॑ अस्य दे॒वा इंद्रो॑ विद्यात्स॒ह ऋषि॑भिः ॥ २४ ॥

गार्ह्यपत्यदेवा आम्हाला दे आभा संतती

दीर्घायुचा आशिष देई हात ठेवुनी माथी 

तुम्ही दिधले वैभव अमुचे देवांना हो ज्ञात

सर्व ऋषींसह देवेंद्राही होऊ देत विदित ||२४||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक देखील मी शेवटी देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)

https://youtu.be/kMVENAZAqj8

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 23 Rucha 16 – 24

Rugved Mandal 1 Sukta 23 Rucha 16 – 24

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares