मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 52 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 52 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

९७.

मी जेव्हा तुझ्याबरोबर खेळत होतो,

तेव्हा तू कोण आहेस ते मी विचारलं नाही.

लज्जा आणि भीतीचा लवलेश माझ्या मनात नव्हता.

माझं जीवन चैतन्यमय होतं.

 

माझ्या मित्रासारखा तू मला सकाळी

लवकर उठवायचास,

गवताच्या पात्यां-पात्यांतून पळताना

माझ्यापुढं असायचास.

 

त्या वेळी तू जी गीतं गाण्यास,

त्यांचा अर्थ मी समजून घेतला नाही.

मी माझ्या आवाजात गात राहिलो.

त्या गाण्याच्या तालावर माझे ऱ्हदय नाचायचं.

 

खेळायची वेळ आता संपलीय.

आता माझ्यावर ही काय वेळ एकदम आलीय?

 

तुझ्या पायाशी सर्व नजरा वळल्या आणि

शांत तारकांतून सारं जग

आश्चर्यचकित होऊन पाहात आहे.

 

९८.

माझ्या पराभवाच्या पुष्पमाला व विजयचिन्हांनी

मी तुझा सन्मान करीन.

अपराजित होऊन निसटणं माझ्या कुवतीत नव्हतं.

 

माझा गर्व नष्ट होईल.

असह्य दु:खात माझं जीवन संपेल,

पोकळ बासरीप्रमाणं माझ्या ऱ्हदयातून सुस्काऱ्यांचे स्वर निघतील,

दगडातून अश्रू वाहतील याची मला खात्री होती.

 

कमळाच्या सहस्र पाकळ्या कायमपणे मिटून राहणार नाहीत.

मधाच्या गुप्त जागा खुल्या होतील, हे मला ठाऊक होतं.

 

निळ्या आकाशातून एक डोळा माझ्याकडे

टक लावून पाहिल आणि शांततेत मला बोलवेल.

माझं असं काहीच असणार नाही, काहीच नाही.

केवळ मृत्यूच तुझ्या पायी मला मिळेल.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ उघडुन डोळे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆

श्री हरिश्चंद्र कोठावदे

? कवितेचा उत्सव ?

☆ उघडुन डोळे… ☆ श्री हरिश्चंद्र कोठावदे ☆ 

(वृत्त : पादाकुलक)

☆ 

उघडुन डोळे सताड अपुले

तपशीलासह जग निरखावे

मिटून लोचन कधी आपुले

अंतर्यामी खोल बुडावे !

☆ 

एक फूल पण जन्मच गंधित

दो किरणांनी नभ उजळावे

दोन क्षणांचे अमृत चंचल

मातीच्या कुंभात भरावे !

☆ 

कधी नभातुन कोसळतांना

डंख स्वतःला स्वतः करावे

पतनाच्या मग राखेतुनही

फिनिक्स होवुन पुन्हा उडावे !

☆ 

चुका तयांच्या होत्या क्षुल्लक

सजा तुझी पण प्राणांतिक रे

तोडिलेस तू तुझेच लचके

चिंतन हेही कटू करावे !

☆ 

उत्कट व्याकुळ घन बरसाया

परी भिजाया नाही कोणी

तेजोभंगित  दातृत्वाचे

शल्य मूक हे हृदी धरावे !

☆ 

कोण इथे रे अजातशत्रू

जन्मच जेथे एक रणांगण

निशाण निवडुन तूही अपुले

रणधर्माने रण झुंजावे !

☆ 

© श्री हरिश्चंद्र कोठावदे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्त्री शक्ती… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ स्त्री शक्ती… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

हरेन मी पुन्हा पुन्हा

जिंकेन परी मी शेवटी

यत्न ना सोडेन कधी

असले जरी मी एकटी ||

 

अबला न मी, कृतीशील मी

गंभीर पण खंबीर मी

ओझे आहे खांद्यावरी

आकाशही पेलेन मी ||

 

ध्येयधुंदी अंतरी

उत्साह मज बेबंद आहे

संकटांना नमविण्याचा

मज अनोखा छंद आहे ||

 

कोण मजला अडवितो

तटबंदीही भेदेन मी

दश दिशा मज मोकळ्या

सगळीकडे विहरेन मी ||

 

ढासळणारे धैर्य सावरुन

कोसळताना उठते मी

वैफल्याच्या धुक्यातूनही

क्षितिजा पल्याड बघते मी ||

 

गर्व आहे मज स्त्री शक्तीवर

पर्व नवे अनुभवते मी

अवश्य या आशीष द्यावया

सिद्ध आहे स्वागतास मी ||

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ निसर्गातील रंगपंचमी…  ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ ? निसर्गातील रंगपंचमी… ? ☆ सुश्री वर्षा बालगोपाल

अंबर जेधवा कृष्ण होते

लीला सगळ्या तेथे दावते

अंबर रंगीत ल्याली धरा

रंग उडवित राधा होते॥

अंतर दोघांचे एक होता

साद दोघांची मन ऐकते

अंतर सरते नकळत

अंतरंग प्रेमात रंगते॥

रंग पिचकारी रोखलेली

कृष्णांग इंद्रधनू भासते

रंग दावी कृष्णही राधेला

तरंगात ती भान हरते॥

पंचमी निसर्गाची अद्भुत

बारामाही किमया घडते

पंच मी होते अजाणताच

राधा कृष्ण तयास बोलते॥

धुलवड आज निसर्गाची

वातावरण का भारावते

धूल वड सरमिसळत

धार होऊन सळसळते॥

© सुश्री वर्षा बालगोपाल

9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जागतिक महिला दिना निमित्त –  आदि नारी ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ जागतिक महिला दिना निमित्त –  आदि नारी ☆ श्रीशैल चौगुले ☆

      जन्मोजन्मी सदैव युग हे

      नारी गौरव जगद्जननी

      सिता,कुंती सावित्री ही माता

      हे विश्व दिले दर्शना अजनी.

 

      जशी मृदा ही सृष्टी तारते

     कौशल्येच्या संस्कार ऋणांनी

      नि देवकी-यशोदा होऊन

     प्रेम-भक्तीने कृपा क्षणांनी.

 

     या नारीच्या चरणी जीवन

    सर्व सुख यश तीस अर्पण

     अनेक भुमिकेशी संसारी

     केवळ ऊरते ती दर्पण.

 

     या नारीचा हा जयजयकार

     शब्दसुमने ऊधळी मन

     माता मुलगी पत्नी देवी सत्य

     सहस्त्र  युगे  जन्माचे धन.

श्रीशैल चौगुले.

९६७३०१२०९०.

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सर… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ सर… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

जीवलग पावसाच्या

       आल्या लडिवाळ सरी

आठवांच्या पाखरांना

        थिटी मनाची ओसरी

 

भेगाळल्या आयुष्याची

       झाली साय तशी माती

काळोखल्या काळजात

       उजळल्या फूलवाती

 

थबकली आसपास

       दूरावलेली पाऊले

चिंब पागोळ्यात जीणे

       जीवा माहेर भेटले

 

आर्त स्वरांची जाहली

        धुंद सुरेल मैफल

तृप्तावली..ओलावली

          उलघाल.. घालमेल    

 

डहूळली अंतरीची

        स्तब्ध शांतता नीरव

क्षणभरासाठी झाले

         सुने आयुष्य उत्सव

 

(नाही आषाढ-श्रावण

      तरी आली कशी सर..?

कसा थांबता थांबेना

       डोळी दाटलेला पूर……)

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 143 – तू तिथे मी ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 143 – तू तिथे मी ☆

जेव्हा तू तिथे मी अशी

आस जीवाला मिळते।

एकटेपणाची भावना

वार्‍यासवेती पळते ।।

वाळवंटी चालतानाही

शितलता ही जाणवते

काटेकुटे सारे काही

पुष्पा समान भासते ।।

भयान आंधःकारी ही

ज्योत मनी जागते ।

चिंता भीती सारे काही

क्षणार्धात नष्ट होते।।

आस तुझी पावलांना

नवीन शक्ती स्फूर्ती देते।

जगण्याची उर्मी पुन्हा

मम गात्रामध्येयेते।।

पाठीवरचा हात तुझा

निर्धाराला बळ देईल।

अंधधःकारी वाट माझी

आईने उजळून जाईल।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #165 ☆ अंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त – आधार ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 165 – विजय साहित्य ?

☆ आधार ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

(अंतरराष्ट्रीय महिला दिना निमित्त कवितेचा यथोचित सन्मान)

मी एक स्त्री

माझं अस्तित्व

नाही कुणाची परंपरागत मालकी.

मी आहे बाई माणूस

आहे माझ्यातही

कर्तृत्व गाजवणारे शौर्य..!

 

मला  जगायचे आहे

मानानं,स्वाभिमानांन

जाज्वल्य आणि अस्मितेनं..!

राखायचे आहे घरदार..

जागतिक महामारी संकटात

बाळगायची आहे

सावधानी वारंवार ..!

 

मला सावरायचं आहे

माझं कुटुंब..पती.. मुलं

सासू सासरे..

आप्तेष्ट गोतावळा

आणि द्यायचा आहे आकार

माझ्या वर्तमानाला..!

निरामय आरोग्यात

रहायचे आहे मला

सेवा आणि भुतदयेनं

जबाबदारी आणि

कर्तव्य परायणतेनं

जिंकायचं आहे..

माझ्यातलं बाईपण मला…!

 

मला आहे जगायचे

एका एका श्वासासाठी..

वासंनांध नजरेला

द्यायची आहे मूठमाती..

त्यांच्याच आयाबहिणी

सुरक्षित रहाव्या म्हणून

शिकवायचाय धडा..

स्त्री ला अबला समजणाऱ्या

कर्तृत्वहीन भेकड पुरुषांना..!

 

मला द्यायची आहे सोडचिठ्ठी

रिती,रिवाज आणि

हुंडाबळी सारख्या भूतकाळाला.

द्यायची आहे दिशा

माझ्या उज्ज्वल भविष्याला..

 

दाखवायाची आहे

माझ्या त्या कलागुणांची

तेजोमय कलाप्रभा..

करायचे आहे साकार

माझ्याच ध्येयांकित वर्तमानाला..

आणायचाय खेचून

आत्मनिर्भर भारत..

माझ्यातलं बाईपण जपणारा…

 

मला  जगायचे आहे..

माझ्या मनाचं तारूण्य

आणि भावभावनांचं सौंदर्य

अबाधित राखण्यासाठी

मला रहायचं नाही निराधार

बनायचं आहे आधार…

बाईपण हरवलेल्या अन्

स्त्रीत्वं हिरावून घेतलेल्या

अनेकानेक माय भगिनींचा…!

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ज्येष्ठांशी कसे वर्तणे…… ☆ सुश्री मेधा सिधये ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ ज्येष्ठांशी कसे वर्तणे…… ☆ सुश्री मेधा सिधये ☆

श्री समर्थ रामदास स्वामींची क्षमा मागून ज्येष्ठांशी कैसे वर्तणें।

ज्येष्ठांशी कैसे चालणें तें युवकें जाणोनि घेणे। नीटपणे।।

ज्येष्ठ असती बालकासम। मनें निर्मळे निष्पाप।

जग वाटे शुद्ध नगर। शिवसुंदराचे माहेरघर।।

देह असती थकलेले। मन मृदुमवाळ फुलपांकळे।

जाणौनि असावे पुत्रपौत्रे। ढका लावो नये कठोर वाचे।।

ज्येष्ठांसंगे चालावे मंदगती। फरफट करू नये कधी।

पाऊले असती श्रमलेली। जीवनवाट तुडवोनी।।

आहार द्यावा सात्विक। ताजा, गरम, सुग्रास।

चित्त त्यांचे व्हावे प्रसन्न। भोजनथाळी देखोनिया।।

दवापाणी वेळे द्यावे। खर्चवेंच जिव्हे न काढावे।

प्रेम माया सुखवी जीव। याचे स्मरण राखावे।।

ज्येष्ठ मने अति कांतर। जिवाची होय थरथर।

मंद ज्योत वार्‍यासवें। जेवीं थरथरे।।

आपुल्या संसारचिंता। ज्येष्ठां सांगो नये वृथा।

प्रेमभरले अश्राप जीव। असती असहाय, अगतिक।।

देह थकले, मन थकले। कार्यशक्ती उणावली।

जगणे केवळ साक्षीभूत। कसली आस न उरली।।

ज्येष्ठां द्यावा उत्साह, आनंद।उरल्या दिनीं समाधान।।

हे वागणें तुम्हां पुण्यप्रद। इयें जीवनीं।।

नसता ‘ अर्थ’ ज्येष्ठांपासीं। रचो नये अपमानाच्या राशी।

उभे आयुष्य आहे समोरी। तुमच्या, पैका मिळवावया।।

जें जें साधलें तें तें त्यांनी केले। जीव वोवाळिला तुमच्यासाठी।

स्मरण तयाचे राखावे ह्रदयीं। तारुण्याचा मद न करावा।।

अहंकार,क्रोध मोठेच रिपू। त्यांना बाळगू नये जवळी कदापीहि।

एक उणा शब्द करी रक्तबंबाळ मन। संध्यावेळीं तयां जराही न साहवे।।

ज्येष्ठही होते कष्टाळू, कर्तृत्ववान। संसारनौकेचे कप्तान।

म्हणौनि सेवाभाव, कृतज्ञता। सदैव चित्ती राखणें।।

ज्येष्ठांचे आशीष ईश्वरी प्रसाद। त्यास डावलू नये वांकुड्या वर्तनें।।

चूकभुलीं व्हावे सानुलें लेकरूं। लाजो नये कधी क्षमायाचने।।

ज्येष्ठांसंगे तुमचे वर्तन। खरी समजशक्तीची पारख।

शिक्षणाचा अर्क । तोचि होय।।

© सुश्री मेधा सिधये

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ – ऋचा १ ते ४ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ – ऋचा १ ते ४ ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त २२ (अनेक देवता सूक्त)

ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – १ ते ४ अश्विनीकुमार; ५ ते ८ सवितृ;

९ ते १० अग्नि; ११ – देवी; १२ – इंद्राणी; १३, १४ द्यावापृथिवी;

१६ ते २१ विष्णु; : छंद – गायत्री

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील बावीसाव्या  सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी अनेक देवतांना आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे अनेक देवता सूक्त म्हणून ज्ञात आहे. यातील पहिल्या चार ऋचा अश्विनीकुमारांचे, पाच ते आठ या ऋचा सवितृ देवतेचे, नऊ आणि दहा ऋचा अग्नीचे आवाहन करतात. अकरावी ऋचा देवीचे, बारावी ऋचा इंद्राणीचे तर तेरा आणि चौदा या ऋचा द्यावापृथिवीचे आवाहन करतात. कण्व ऋषींनी या सूक्तातील सोळा ते एकवीस या ऋचा विष्णू देवतेच्या आवाहनासाठी रचलेल्या आहेत. 

या सदरामध्ये आपण विविध देवतांना केलेल्या आवाहनानुसार  गीत ऋग्वेद पाहूयात. आज मी आपल्यासाठी अश्विनीकुमारांना उद्देशून रचलेल्या पहिल्या चार ऋचा आणि त्यांचे मराठी गीत रुपांतर सादर करीत आहे. 

मराठी भावानुवाद 

प्रा॒त॒र्युजा॒ वि बो॑धया॒श्विना॒वेह ग॑च्छताम् अ॒स्य सोम॑स्य पी॒तये॑

प्रातःकाळी शकट जोडुनी सिद्ध होत अश्विन

जागृत करि निद्रेतुनिया त्यांच्या जवळी जाउन

झणी घेउनी यावे त्यांना अमुच्या यज्ञाला

आम्हा हो ते प्राप्त कराया अर्पण सोमरसाला ||१||

या सु॒रथा॑ र॒थीत॑मो॒भा दे॒वा दि॑वि॒स्पृशा॑ अ॒श्विना॒ ता ह॑वामहे

महारथी ते चंडप्रतापी अजिंक्य असती रणी

दिव्य रथावर आरुढ होती सहजी रणांगणी

द्युलोकाप्रत जाऊन भिडती कुमार ते अश्विनी

उभय देवतांनो झणी यावे हो अमुच्या या यज्ञी ||२||

या वां॒ कशा॒ मधु॑म॒त्यश्वि॑ना सू॒नृता॑वती तया॑ य॒ज्ञं मि॑मिक्षतम्

ऐकुनिया रव अश्विनांच्या शकट प्रतोदाचा

सोमरसाला सिद्ध करूनी तुमच्या स्वागताला

आशा जागृत होइल सत्य तत्वांचा लाभ 

तुम्हा कृपेने वाहुदेत सुखसमृद्धीचे ओघ ||३||

न॒हि वा॒मस्ति॑ दूर॒के यत्रा॒ रथे॑न॒ गच्छ॑थः अश्वि॑ना सो॒मिनो॑ गृ॒हम्

आरूढ होउनि रथावरती तुम्ही अश्विन देवा

त्वरित धावता ज्या भक्ताने केला तुमचा धावा 

भक्ताचा त्या निवास आहे जवळी सन्निध

ज्याने तुमच्यासाठी केले सोमरसाला सिद्ध ||४||

(या ऋचांचा व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे. )

https://youtu.be/vYklP6fMug0

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 22 Rucha 1 to 4

Rugved Mandal 1 Sukta 22 Rucha 1 to 4

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares