मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वातंत्र्यवीर सावरकर… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वातंत्र्यवीर सावरकर… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆ 

(पुण्यतिथी)

प्रखर देशभक्ती त्यागाचे तुम्ही मंगलधाम

हिंदभूमीच्या शूर सुपुत्रा तुम्हास कोटी प्रणाम

गोदातीरी नाशिक नजीक भगूर ग्राम सुरेख

तिथे जन्मले दामोदर सुत वीर पुरुष एक

 

भारतमाता दास्यशृंखले मधी बंदिवान

सळसळणाऱ्या तारुण्याला मिळे नवे आव्हान

जनतेवर अन्याय निरंतर ब्रिटीश सत्ता जुल्मी

विनायकांच्या मनी उसळल्या स्वातंत्र्याच्या उर्मी

 

विद्याविभुषीत युवक निश्चयी ध्येयधुंद झाला

बॕरिस्टर बिरुदावली मिळवुन लंडनहून परतला

स्वातंत्र्याचा ध्यास अंतरी हाती शस्त्र धरा

शस्त्रावाचुन व्यर्थ लढाई सावरकर देती नारा

 

टणत्कार धनुषाचा आणी तलवारीची धार

शब्द तयांचे करु लागले सत्तेवरती प्रहार

विद्रोही ठरवून तयांवर चालविला अभियोग

दोन जन्मठेपांची शिक्षा कठिण कर्मभोग

 

मार्सेलिसची समिंदर उडी भीषण कारावास

थरथरणाऱ्या भिंती सांगती ज्वलंत इतिहास

ग्रंथसंपदा विपुल तयांची भाषा प्रत्ययकारी

उर्दूवरही त्यांची हुकूमत लिहिल्या गझला भारी

 

जात-पात-विरहित धर्माचा केला त्यांनी प्रसार

नजरकैदही रोखु न शकली धमन्यांतील एल्गार

अन्न औषधे त्यागुन त्यांनी मृत्युस आमंत्रिले

धगधगणारे यज्ञकुंड ते स्वेच्छेने शांतविले

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 171 ☆ मी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 171 ?

☆ मी… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

स्वतःस  पुसते हळूच कोण कोण कोण मी ?

जळात दिसते मलाच, एक दीप द्रोण मी

कुठून वाहे तरंगिणी ? कशास आस ही ?

असाच लागे जिवास, जो उदात्त ध्यास  मी

मला न समजे कधीच, कोणता तरंग मी

नभात विहरे मजेत जो, तसा पतंग मी

अफाट वक्ते असोत, भोवती महंत ही

नसेन कोणासारखी परि जातिवंत मी

नगण्य मी धूळ ही, असेन अल्प स्वल्पही

तुला कधी झेपला नसेल, तो प्रकल्प मी

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ सही तेवढी देऊन जा … ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆

श्री अमोल अनंत केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ सही तेवढी देऊन जा … ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆ 

अडगळीच्या खोलीमधलं

दप्तर आजही जेव्हा दिसतं |

मन पुन्हा तरूण होऊन

बाकांवरती जाऊन बसतं || 

 

प्रार्थनेचा शब्द अन शब्द

माझ्या कानामध्ये घुमतो |

गोल करून डबा खायला

मग आठवणींचा मेळा जमतो ||

 

या सगळ्यात लाल खुणांनी

गच्च भरलेली माझी वही |

अपूर्णचा शेरा आणि

बाई तुमची शिल्लक सही ||

 

रोजच्या अगदी त्याच चुका

आणि हातांवरले व्रण |

वहीत घट्ट मिटून घेतलेत

आयुष्यातले कोवळे क्षण ||

 

पण या सगळ्या शिदोरीवरंच

बाई आता रोज जगतो |

चुकलोच कधी तर तुमच्यासारखं

स्वतःलाच रागवून बघतो ||

 

इवल्याश्या या रोपट्याची

तुम्ही इतकी वाढ केली आहे |

हमखास हातचा चुकण्याची सुद्धा

सवय आता गेली आहे ||

 

चांगलं अक्षर आल्याशिवाय

माझा हात लिहू देत नाही |

एका ओळीत सातवा शब्द

आता ठरवून सुद्धा येत नाही ||

 

दोन बोटं संस्कारांचा

समास तेवढा सोडतो आहे |

फळ्यावरच्या सुविचारासारखी

रोज माणसं जोडतो आहे ||

 

योग्य तिथे रेघ मारून

प्रत्येक मर्यादा ठरवलेली |

हळव्या क्षणांची काही पानं

ठळक अक्षरात गिरवलेली ||

 

तारखेसह पूर्ण आहे वही |

फक्त एकदा पाहून जा |

दहा पैकी दहा मार्क

आणि सही तेवढी देऊन जा |

 

संग्राहक : अमोल केळकर

बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९

poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ घ्या सुखाला खेचूनी… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆

श्री विनायक कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

☆ घ्या सुखाला खेचूनी… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆ 

वृत्त..देवप्रिया (सूट घेवून)  (अक्षरे..१५ मात्रा..२६) 

(गालगागा गालगागा गालगागा गालगा)

जात आहे काळ आता घ्या सुखाला खेचुनी

काय झाले काय नाही द्या तगादा ठेचुनी

 

झाकलेली पापकर्मे आसवांनी पाहिली

काल केलेल्या चुकांना आज वाचा वाहिली

भोग सारे कालच्या भोगातले घ्या रेचुनी

जात आहे काळ आता घ्या सुखाला खेचुनी

 

का नशेची मागणी गावात आहे वाढली

झिंगणाऱ्यांनीच आहे धिंड त्यांची काढली

नाशवंती या नशेला द्या गड्यांनो ठेचुनी

जात आहे काळ आता घ्या सुखाला खेचुनी

 

काळजी का आपल्यांची आपले नाही कुणी

डांबराची काय गोणी साफ केली का कुणी

राख झालेल्या कणांना काय होते वेचुनी

 

जात आहे काळ आता घ्या सुखाला खेचुनी

काय झाले काय नाही द्या तगादा ठेचुनी

© विनायक कुलकर्णी

मो – 8600081092

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #177 ☆ भुरळ… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 177 ?

☆ भुरळ… ☆

नच बोलावता आला, कसा भ्रमर जवळ

पाकळ्यांच्या मिठीमध्ये, होता घुसला सरळ

 

रात्रभर आडकलं, आत पाखरू वेंधळ

झाला जामिन मंजूर, त्याचा होताच सकाळ

 

फुलासाठी सारे प्रेम, फूल होतेच मधाळ

गुंजारव करताच, पडे फुलाला भुरळ

 

सूर्यकिरणांचा मारा, त्यानी होते होरपळ

भुंगा घालेतोय वारा, देई आनंद केवळ

 

थोडी पराग कणात, लागे कराया भेसळ

मध तयार घेईल, जेव्हा मिसळेल लाळ

 

फूल धरु पाहे त्याला, पळे पाखरू चपळ

नशिबात दोघांच्याही, होता विरह अटळ

 

दोन प्रेमीकांच्यामध्ये, कोण खेळतो हा खेळ

गंधाळल्या त्या क्षणाची, आहे तशीच ओंजळ

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माझे मृत्यूपत्र…. – स्वा.सावरकर ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. विद्या वसंत पराडकर ☆

सौ. विद्या वसंत पराडकर

?  काव्यानंद  ?

 ☆ माझे मृत्यूपत्र… – स्वा.सावरकर ☆ कवितेचे रसग्रहण – सौ. विद्या वसंत पराडकर ☆

(देशभक्त वि.दा.सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.)

माझे मृत्युपत्र या कवितेचे रसग्रहण.

सावरकरांना न ओळखणारा या पृथ्वीतलावर विरळाच. भारतमातेच्या मुकुटातील हा दैदिप्यमान हिराच.mयांचे अमरत्व म्हणजे यांचा जाज्वल्य देशाभिमान, देशभक्ती, उदात्त देशप्रेम होय. भारत मातेच्या पायातील परदास्याच्या श्रुखंला तोडण्यासाठी त्यांनी वयाच्या पंधराव्या वर्षी देवासमोर शपथ घेतली. यापुढे मी माझ्या देशाचे स्वातंत्र्य परत  मिळविण्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन.

असा हा तेजस्वी तारा भारतीय क्षितिजावर चमकत राहिला..

स्वातंत्र्य वीर सावरकर हे उत्तुंग प्रतिभेचे कवी होते.यांनी साहित्याच्या सर्व दालनात प्रवेश केला.यांचे साहित्य सर्व व्यापी आहे.

माझे मृत्युपत्र हे यांचे वहिनीस  लिहिलेले पत्रात्मक काव्य‌ आहे.

राजद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना इंग्रजांनी पकडले. त्यांना पन्नास वर्षांची काळया पाण्याची शिक्षा जाहीर केली. यातून आपली सुटका नाही.हे त्यांनी जाणले. हे‌ कटू सत्य वहिनीला कसे सांगायचे? घरची परिस्थिती मोठी प्रतिकूल होती.१९०९मध्ये त्यांच्या ‌मोठया भावाला काळ्या पाण्याची शिक्षा झाली. त्यांचा चार वर्षांचा मुलगा देवाघरी गेलेला. अशा‌ परिस्थितीत ही मर्मभेदी गोष्ट कशी‌ सांगावी या विचारात ते असताना काव्य प्रतिभा हात जोडून उभी‌ राहिली.असा हा या कवितेचा जन्म.ही कविता देशभक्ती ने‌ ओथंबली आहे.आजपर्यत अनेक कवींनी देशभक्तीच्या कविता लिहिल्या.परंतु झाले ‌बहु, होतील बहु परी या सम नसे.

 ☆ माझे मृत्यूपत्र… ☆

हे मातृभूमी तुजला मन वाहिलेले,

वकृत्व वाग्विभवही तुज अर्पियेले,

तुतेची अर्पियली नवी‌ कविता रसाला

लेखाप्रती विषय तुचिं अनन्य झाला.

त्वत्स्थंडिली ढकलिले प्रियमित्रसंघा

केले स्वयें दहन यौवन देह भोगा

तत्कार्य नैतिक सुसंमत सर्व देवा

तत्सेवनीच गमली रघुवीर सेवा

त्वत्स्थंडिली ढकलिली गृहवित्तमता

दावानलात वहिनी नव पुत्रकांता

त्वत्स्थंडिली अतुल धैर्यनिष्ठ बंधू

केला हवि परम कारुण पुण्य सिंधू

त्वत्स्थंडिली वरी  प्रिय बाळ झाला

त्वत्स्थंडिली वरी आता मम देह ठेला

हे काय बंधू असतो जरी सात आम्ही

त्वत्स्थंडिली च असते,दिधले बळी मी

की घेतले  न व्रत हे आम्ही अंधतेने

लब्ध प्रकाश इतिहास निसर्ग माने

जे दिव्य दाहक म्हणूनी असावयाचे

बुद्धयाची वाण धरिले सतीचे.

माझा निरोप तुजला येथुनी हाच देवी

हा वत्सवत्सल तुझ्या पदी  शीर्ष ठेवी

सप्रेम अर्पण असो प्रणति तुम्हाते

आलिंगन प्रियकरा मम अंगनेते

प्रस्तुत कविता सावरकरांच्या जाज्वल्य देशभक्ती चे प्रतीक आहे. सावरकरांची त्यागी भावना दर्शविणाऱ्या या ओळी बघु या.      

हे मातृभूमी तुजला मन वाहिलेले

या स्वातंत्र्य लढ्याच्या अग्नि कुंडात

माझा परिवार, मित्र, यौवन सारे भोग

यांची आहुती दिली आहे.

या काव्याचे वैशिष्ट्य म्हणजे या काव्यातील शब्दसंपदा संस्कृत प्रचुर आहे.या काव्यात वीर रसाला करूण रसाची झालर लावली आहे.

भगवान् श्रीकृष्ण यांनी अर्जुनाला गीतेचे प्रबोधन केले व त्यात ज्ञान,कर्म, भक्ती या योगांची माहिती दिली.सावरकर हे बुद्धिमत्तेचे पुतळे होते.त्यांनी ज्ञान,कर्म,भक्ती मार्गाचा अवलंब केला. ही कविता राष्ट्रीय भावनेची व देशभक्ती ने ओतप्रोत भरलेली आहे. कविता आशय संपन्न आहे.

आम्ही हे मातृभूमीची सेवा आंधळेपणाने घेतली नसून डोळे उघडे ठेवून घेतली आहे. कवि म्हणतो की घेतले व्रत न हे आम्ही अंधतेने ठिकठिकाणी सावरकरांचे मातृभूमी विषयीचे प्रेम कळसास पोहचले आहे. सावरकरांचा निस्वार्थी भाव या ओळीत दिसून येतो 

हे आपले कुलही त्यामध्ये ईश्र्वरांश

निर्वंश होऊनी ठरेल अखंड वंश

सावरकरांना पुढील चित्र दिसत असून ते त्यांनी सुंदर विरोधाभास अंलकाराने रेखाटले आहे.

हिंदुस्थान हा आमचा देश आहे. आमच्या देशात आमचेच राज्य हवे या तत्वनिष्ठ स्वभामुळे त्यांनी स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली.

त्यांचे कार्य हे अतुलनीय आहे.

अंदमानच्या काळ्याभोर कोठडीत खिळ्यांचया साह्याने भिंतीवर लिहिलेली कविता आहे.या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाच्या प्रतिभेला आमचा खरोखरी सलाम.

सौ.विद्या पराडकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मराठी भाषा गौरव दिना निमित्त – माझी मराठी… ☆ डॉ.सोनिया कस्तुरे ☆

डॉ.सोनिया कस्तुरे

? कवितेचा उत्सव ?

☆ मराठी भाषा गौरवदिना निमित्त – माझी मराठी… 🪔 ☆ डॉ. सोनिया कस्तुरे ☆

(मराठी भाषा गौरवदिनाच्या हार्दिक शुभेच्छा…!)

मला मराठीची गोडी

माझी माय माऊली मराठी

लिहिते, वाचते मराठी

माझा अभिमान मराठी.. !

 

अभंग,भजन, मराठी

ज्ञानोबा, तुकोबा मराठी

जनाई, बहिणाबाई मराठी

साधुसंतांचे महात्म्य मराठी..!

 

ओव्या, भारुड मराठी

परिवर्तनाची नांदी मराठी

सावित्रीमाय जोतीबांची

पहिली शाळा मराठी..!

 

मला आवडे मराठी

माझ्या ध्यानी मनी मराठी

माझा आचार,विचार मराठी

माझा स्वाभिमान मराठी..!

 

माझी अनुभूती मराठी

माझा शिवराय मराठी

मावळ्याच्या संगे राजा

बोलला माय मराठी..!

 

माझा उत्साह मराठी

वेदना, संवेदना मराठी

माझ्या हळव्या मनाला

मोठा दिलासा मराठी..!

 

माझा आदर्श मराठी

माझी प्रेरणा मराठी

माझ्या भावनेतला ओलावा

माझे जगणे मराठी..!

 

प्रथम गिरवू मराठी

मग मिरवू मराठी

नित्य बोलते मराठी

वंदू थोरवी मराठी

© डॉ.सोनिया कस्तुरे

विश्रामबाग, जि. सांगली

भ्रमणध्वनी:- 9326818354

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ उरलेले आयुष्य… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

🌹 उरलेले आयुष्य… 🌹 ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

काही न उरले देण्याजोगे

रित्या ओंजळी रिते खिसे,

घेणे आता नको वाटते

देण्याचे लागले पिसे ||

 

या व्यवहारी जगात आहे

देणे – घेणे नित्याचे,

देतांना नच मनात यावे

बदली काही घेण्याचे ||

 

हात देऊनी बुडणाऱ्याला

काठावर घेऊन यावे,

मरणाऱ्याला रक्त देऊनी

यथाशक्य ते जगवावे ||

 

भले न काही देता आले

मनस्ताप तरी देऊ नये,

चटके विझवा सांगुन चुटके

हास्य द्यावया विसरु नये ||

 

दीन जनांचे टिपण्या आसू

आयुष्य उरले खर्चावे,

मरणोत्तरही शरीर अपुले

अभ्यासास्तव अर्पावे ||

 

श्वासामधले भासही आता

ध्यास घेऊनी उठतील,

दुज्यास काही देता देता

दिवस सार्थकी लागतील ||

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 119 ☆ मलाच मी विसरलो… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 119 ? 

☆ मलाच मी विसरलो…

(अंत्य-ओळ काव्य…)

गालावरची तुझ्या खळी

कोडे पडले सखी मला

स्वप्न सुद्धा पडतांना

त्रास देते खळी मला…

 

त्रास देते खळी मला

मी बेचैन जाहलो

तुझ्या खळीच्या नादात

मलाच मी विसरलो…

 

मलाच मी विसरलो

नाही काही आता उरले

तुला भेटण्यासाठी

मनाने पक्के बघ ठरवले…

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ फुंकर… ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

? मनमंजुषेतून ?

☆ फुंकर… – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

फुंकर.. किती सुंदर अर्थवाही शब्द. नुसता शब्द वाचला तरी डोळ्यापुढे तरळतो तो ओठांचा चंबू, ते अर्धोन्मीलित प्रेमव्याकूळ नेत्र, ती माया, ती ममता, तो स्नेह, ती सहवेदना, ती संवेदनशीलता. आणि अस्फुट ऐकूही येतो,  फू ऽऽऽ, तो अलगद सोडलेला हवेचा विसर्ग, एक लाघवी उच्छ्वास.

… फुंकर.. एक सहजसुंदर, स्वाभाविक, हळूवार भावनाविष्कार.

☆ फुंकर … ☆

धनी निघाले शेतावरती

बांधून देण्या भाजी भाकर

चुलीत सारून चार लाकडे

निखार्‍यावरी घाली फुंकर।

माय जाणते दमले खेळून

बाळ भुकेले स्नानानंतर

बशी धरूनी दोन्ही हातानी

दुधावरती हळूच फुंकर।

कुसुम कोमल तान्हे बालक

चळवळ भारी करी निरंतर

ओठ मुडपुनी हसे, घालता

चेहर्‍यावरती हळूच फुंकर।

खेळ खेळता सहज अंगणी

डोळ्यात उडे धूळ कंकर

नाजूक हाते उघडून डोळा

सखी घालते हळूच फुंकर।

राधारमण मुरलीधर

धरूनी वेणु अधरावर

काढीतसे मधु मधूर सूर

अलगुजात मारून फुंकर।

किती दिसांचा वियोग साहे

रागेजली ती प्रिया नवथर

कशी लाजते पहा खरोखर

तिच्या बटांवर घालून फुंकर।

सीमेवरूनी घरधनी येता

अल्प मिळाला संग खरोखर

रात जाहली पुरेत गप्पा

दिवा मालवा मारून फुंकर।

संसारातील जखमा, चटके

सोसायाचे जगणे खडतर

सुसह्य होते कुणी घालता

सहानुभूतीची हळूच फुंकर।

अटल आहे भोग भोगणे

कुणी गेल्याचे दु:ख भयंकर

पाठीवरती हात फिरवूनi

दु:खावरती घाला फुंकर।

कितीक महिने गेले उलटून

मित्र भेटही नाही लवकर

मैत्रीवरची धूळ झटकुया

पुनर्भेटीची घालून फुंकर।

लेखिका — अज्ञात 

संग्राहिका – सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares