मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ शिवराय… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

? कवितेचा उत्सव ?

☆ शिवराय… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक ☆ 

शिवनेरीचे  दगडचिरे  उजळले,

क्षितिजावरल्या शिवसूर्याच्या प्रकाशात,

लोकपाखरांचा थवा घेऊन,

झेपावला हा गरूड,

भारतवर्षाच्या आभाळात;

जन्म दिला इतिहासाला,

अर्थ दिला वर्तमानाला,

दिशा दिली भविष्याला,

अर्पितो ही प्राजक्त शब्दफुले-

विश्ववंद्य राजाला,

शिवरायांना …

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ उर्फ कवि भादिक

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निःशब्द… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी

सुश्री संगीता कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ निःशब्द… ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆ 

अर्थ नसे ज्या शब्दांना…

उगाचच बोलू लागतात. ..

अनोळखी जिवांना एकमेकांत गुंफू पाहतात…..

बांध सुटून भावना…

शब्दांतून ओसांडून वाहतात…

नाजूक बंध जुळतात. …

स्पंदनांना साथ देत

दिवसामागे दिवस सरतात. …

संपतात शब्द..तुटतो धागा. ..

नातं ही तुटतं क्षणार्धात. ..

होतो त्रास. .

वाटतं वाईट. .

डोळ्यातलं आटतं पाणीही शेवटी. ..

हरवून जातात

शब्द मुके होऊन राहतात

तशाच आठवणी मनाच्या कोपर्‍यात. ..!!

©  सुश्री संगीता कुलकर्णी 

लेखिका /कवयित्री

ठाणे

9870451020

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ झाला फांदीचा चमचा… ☆ श्री प्रमोद जोशी ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

 ?  झाला फांदीचा चमचा…  ?  श्री प्रमोद जोशी ☆

झाला फांदीचा चमचा,

नवनीत झाले ढग!

अशा लोण्याच्या ओढीने,

झाले बालकृष्ण जग!

कृष्ण रांगत येणार,

आली चमच्या पालवी!

अशा चित्रामुळे कळे,

जग कन्हैय्या चालवी!

निळ्या अनंतासमोर,

असे दिसताच लोणी!

सांगा बालकृष्णाविणा,

दुजे आठवे का कोणी?

चराचर बघे वाट,

कुठुनही यावा कान्हा!

निळ्या निळ्या आकाशाला,

पुन्हा पुन्हा फुटो पान्हा!

धुके लावी विरजण,

वारा घुसळतो दही!

निळ्या कागदावरती,

फांदी..ईश्वराची सही!

लोण्यावर किरणांची,

आहे नजर तेजस्वी!

वाट पहात कान्ह्याची,

त्यांची प्रतिक्षा ओजस्वी!

अनंताच्या भुकेसाठी,

घास व्यापतो आकाश!

सूर्य निरांजन होतो,

मग सात्विक प्रकाश!

चित्रकारा नमस्कार,

त्याची दृष्टी शोधी दिव्य!

साध्या फांदी नि ढगाना,

गोकुळाचे भवितव्य!

© श्री प्रमोद जोशी

देवगड.

9423513604

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पाऊस… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

सुश्री दीप्ती कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ पाऊस… ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

(नुकत्याच झालेल्या वर्धा येथील अ.भा.साहित्य संमेलनात सादर केलेली कविता)

पाऊस आला,पाऊस आला, घेऊन मृदगंधाला

ग्रीष्मातील त्या उष्ण धरेचा कणकण संतोषला

जलधारांनी बरसत आला,थेंबातुनी प्रगटला

बळीराजाही,पेरायाला,शिवारात गुंतला ||१||

 

इंद्रधनुचा मोहक पट तो,आकाशी उमटला

बालचमुसह ,सर्वांसाठी, आनंददायी बनला

जलाशयाचा,तरुवेलींचा ,जीवनदाता ठरला

चिंबही भिजल्या,सृष्टीचा तो,सखा जणू भासला ||२||

 

धरतीनेही हिरवा शालु,अंगभरी ल्यायला

गवतफुलांचा,फळाफुलांचा,सुगंध साकारला

मातीतुनी या,नव कोंबांचा,हर्ष दिसु लागला

तनामनाने चाहुल घेता,आसमंती विहरला ||३||

 

चातकासही थेंबा घेऊनी, जन्म नवा लाभला

रिमझिम येता जलधारांचा,नादही झंकारला

पाऊस आला,पाऊस आला, मोद असा जाहला

नव आशांचा,नव स्वप्नांचा, झुला जणू झुलला ||४||

© सुश्री दीप्ति कुलकर्णी

कोल्हापूर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 140 – मंद वारा सुटला होता ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 140 – मंद वारा सुटला होता

मंद वारा सुटला होता, गंध फुलांचा दाटला होता।

आज तुझ्या आठवांनी कंठ मात्र दाटला होता।।धृ।।

हिरव्या गार वनराईला चमचमणारा ताज होता।

मखमली या कुरणांवरती मोतीयांचा साज होता।

चिमुकल्यां चोंचीत माझ्या,तुझ्या चोंचिचा आभास होता।।१।।

पहाटेलाच जागवत होतीस , झेप आकाशी घेत होतीस ।

अमृताचे कण चोचीत ,आनंदाने भरवत होतीस।

आमच्या चिमण्या डोळ्यांत ,स्वप्न फुलोरा फुलत होता ।।२।।

आनंद नद अपार होता, खोपा स्वर्ग बनला होता।

विधाताही लपून छपून , कौतुक सारे पाहात होता।

आज कसा काळाने वेध तुझा घेतला होता।।३।।

आता बाबा पहाटेला ऊठून काम सारं करत असतो।

लाडे लाडे बोलत असतो गाली गोड हसत असतो।

आज त्याच्या डोळ्यांचा कडं मात्र ओला होता।।४।   

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ बापाची पुस्तकं… – श्री सौमित्र  ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे  ☆

सौ. मंजुषा सुनीत मुळे

? वाचताना वेचलेले ?

☆ बापाची पुस्तकं… – श्री सौमित्र  ☆ सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆ 

मी गेल्यावर

तुला वाटेल की आपल्या बाबांनी

वाचलीयेत ही सारी पुस्तकं,

पण नाही

अर्धंही वाचता आलेलं नाहीय,

येणारही नाही हे ठाऊक होतं मला

तरी

मी जमवत गेलो होतो ही पुस्तकं.

 

माझ्यासाठी माझ्या बापाने

काहीच सोडलं नव्हतं मागे,

ही अक्षर ओळख सोडून फक्त

जिच्या मागे धावत मी

पोहोचलो आहे इथवर….

 

तुला सांगण्या समजावण्यासाठी की

मलाही सोडता येणार नाहीय मागे

काहीच स्थावर जंगम तुझ्यासाठी….

 

ही काही पुस्तकं  आहेत फक्त!

जी तुला दाखवतील वाट

 

चालवतील तुला, थांबवतील कधी, पळवतील कधी

निस्तब्ध करतील,

बोलतं करतील कधी

टाकतील संभ्रमात

सोडवतील गुंते….

 

वाढवतील पायाखालचा चिखल

कधी बुडवतील ,  तरवतील कधी,

वाहवतील कधी थोपवतील प्रवाह,

अडवतील तुडवतील सडवतील…

बडवतील हरवतील सापडतील…

तुझ्याशी काहीही करतील

ही पुस्तकं…

 

तू समोर आल्यावर नेहमीच कवेत घेऊन मी माझ्यातली धडधड

तुला देण्याचा प्रयत्न करतो

तशीच ही पुस्तकं

उघडतील . मधोमध पसरतील हात.

मिठीत घेतील तुला…

आपोआप होतील हृदयाचे ठोके.

 

यांच्यात रहस्यं आहेत दडलेली

अनेक उत्तरंही असतील

प्रश्नांमधे

कदाचित कुठेच

प्रश्नही नसतील..

 

एक लक्षात ठेव,

आपलं आयुष्यच

पल्प फिक्शन

कधी क्लासिक

सेल्फ हेल्प फिलॉसॉफिकल

कधी कवतिक,

कधी किचकट

कधी सोपं असतं.

 

लक्षात असू दे या सगळ्यात

वाईट काहीच नसतं.

त्या वेळी हाती लागलेलं पुस्तक

त्याच वेळची गरज असतं . समज नसतं….

 

मी नसेन तेव्हा ही पुस्तकं असतील..

जी नेतील तुला जायचं आहे तिथं…

 

फक्त, मी असेन तिथं मात्र…

तुला पोहोचता येणार नाही.

कारण,मी आधीच

होऊन गेलेलो असेन तुझ्यासाठी-

एखादी कथा एखादी कादंबरी….

एखादी कविता एखाद्या पुस्तकातली.

 

माझी आठवण आली की

या प्रचंड ढिगाऱ्यातलं

ते एखादं पु्स्तक शोध

तुझा प्रवास,बघ, कसा

सोपा होऊन जाईल.

लेखक : श्री सौमित्र

संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ व्हॅलेन्टाइन डे… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

🌹 व्हॅलेन्टाइन डे… 🌹 ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

तार तार हृदयाची छेडित

अवखळ अल्लड यौवन फुलवित

मौज-मस्तीचा गुलाल उधळित

आला व्हॕलेंटाईन डे ||

 

दिवस आजचा तरुणाईचा

परस्परांना तोषविण्याचा

नाजुक हस्तांदोलन आणिक

रोमांचाने फुलण्याचा ||

 

मौन धरावे शब्दांनी अन्

केवळ स्पर्शातुन बोलावे

डोळ्यांमधल्या निमंत्रणाला

अलगद ओठांनी झेलावे ||

 

घट्ट बसावी गाठ मनांची

चिरंजीवी हा बंध रहावा

धगधगणाऱ्या धुंद क्षणांचा

अल्पजीवी उन्माद नसावा ||

 

तुझ्या मनातिल प्रेम जिव्हाळा

गुलाब होऊन गाली फुलला

कौल प्रीतीचा स्पष्ट साजणी

तुला समजला मला उमगला ||

 

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #162 ☆ वसंत गीते ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 162 – विजय साहित्य ?

☆ वसंत गीते ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

भावमनातील वसंत गीते ,पुन्हा पुन्हा ऐकावी .

हात घेऊनी हातामधे, ही चैत्रवेल झुलवावी.

 

शब्दकळ्यांच्या हिंदोळ्यावर ,भावगौर सजवावी.

अर्थगर्भीच्या सदाशिवासह ,अनुदिनी नित्य पुजावी.

 

सप्तपदीची चांदण गाथा, पदोपदी नांदावी .

कधी मागुती कधी बरोबर, साथ तुझी लाभावी .

 

संसाराचा सारीपाट हा, उमाशंकरा चुकला नाही .

खेळत गेलो खेळ नव्याने ,तरी वाटते बाकी काही.

 

सहजीवनाच्या मनांगणी त्या ,स्वप्न पाउले वाजावी .

अनुरागाची प्रेमप्रीतीची ,अविरत शब्दफुले बरसावी.

 

सदा घेतला राग समजुनी , कधी कोपली स्वप्नाली.

वसंततिलका मोहरताना, चुकभूल ती द्यावी घ्यावी.

 

पानगळीचे ऋतू देखणे, त्यात पाउले नाचावी .

चैत्रपौर्णिमा नव्या पिढीची,त्यात आयुष्ये मिसळावी.

 

सांजवेळ ही आयुष्याची, पुन्हा नव्याने वाचावी .

आठवणीतून जन्मा येते ,अशी कविता शोधावी.

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – विविधा ☆ “किमया प्रेमाची…” ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

सौ कल्याणी केळकर बापट

? विविधा ?

☆ “किमया प्रेमाची…”  ☆ सौ कल्याणी केळकर बापट ☆

प्रत्येक गोष्टीकडे बघण्याचा प्रत्येकाचा दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो.आणि प्रत्येकजण आपापल्या परीने रास्तच असतो. त्यामुळे आधी आपल्या मताला,आवडीला आपल्या दृष्टिकोनाला महत्त्व हे द्यावंच पण त्याचबरोबर दुसऱ्या बाजूचाही थोडी वेगळी वाट उमजून, समजून घ्यावी.

गेले सात दिवस व्हँलेटाईन उत्सव साजरा होत होता. आता हे  आनंदाची,प्रेमाची उधळण करीत आलेले सात दिवस साजरे करायचे की त्याकडे “नसती थेरं”हे बिरुद लावून अगदी जाणीवपूर्वक त्याला फक्त आणि फक्त विरोधच करायचा ह्याबाबतीत प्रत्येक व्यक्तीचं स्वतंत्र असं मत असणारच आहे परंतु एक नक्की काही वेळा आपल्या मतांना थोडं दूर ठेऊन, आवडींना जरा बदलाची कलाटणी फोडणी देऊन साजरे करायचे हे आपले आपण ठरवायचे.

.. नुकताच कुठे आत्ता हा तरुणाई चा उत्सव संपला, जरा कुठे हुश्श झालं बघा.कुठलीच संस्कृती, धर्म, पंथ कधीच चुकीची शिकवण देत नसतो. खरतर चुकीचा असतो आपला दृष्टिकोन त्याकडे बघण्याचा,चुकीची असते ती कुठलीही आपली टोकाची भुमिका.काही जणांनी पूर्ण सप्ताह वेगवेगळ्या दिवसांचे महत्व जाणून साजरा केला तर काही जण प्रेम करायला ह्या दिवसांची गरजच नाही मुळी, प्रेम ही सदासर्वकाळ मनातून उमलून येऊन करण्याची गोष्ट ह्या मतांचे.दोन्हीही विचार आपापल्या जागी योग्यच.अश्याच एका “तो”आणि “ती”ची गोष्ट. हे दोघेही नुकतेच ह्या स्वप्नाळू आठवड्या तून बाहेर पडून परत आव्हानं स्विकारुन जगायला सिद्ध झालेत. नुकतीच दोघही ह्या आभासी जगात फेरफटका मारून मोठ्या कष्टाने काडीकाडी जमवून साठवलेली गंगाजळी ह्या प्रेमाच्या लाटेत जरा अटलीच ह्या वास्तवतेची जाण येऊन भानावर आलीत. रोज आपण जो गिफ्ट्स चा मारा केला तो एक मार्केटिंग फंडा होता हे त्यांना उमगले.शेवटी सगळे हप्ते जाऊन महिना अखेर किती उरलेत ह्याचा हिशोब ती करु लागली.शेवटी प्रेम हे मनातून फुललं,जपलं,जाणवलं,आतून वाटलं तेच खरं आणि हे शेवटापर्यंत पुरून उरणारं असतं हे पण खरं.त्यामुळे आता संपूर्ण वर्ष परस्परांची काळजी घेऊन,एकमेकांच्या सोयी बघून,त्यानुसार वागून हा कायमचा वर्षभराचा व्हँलेंटाईन जास्त सुख देईल हे पण त्यांना उमगले.तरीही ह्या साजरा केलेल्या उत्साहाने त्या निमीत्ताने का होईना आपण दोघे जरा जास्त जवळ आल़ो हे पण त्यांना कळले. असो

ह्या निमित्ताने मागे मीच केलेल्या रचनेने आजच्या पोस्टची सांगता करतेयं.

 

काय ते गिफ्ट्स, काय ते बुके,

बाजार नुसते सजले होते,

हीररांझा,सोनीमहिवाल काय ह्या

“डेज”ची वाट बघत बसले होते,?

 

पानोपानी फुल फुलावे,

पडावे अंगणी प्राजक्ताचे सडे,

ख-या प्रेमाचा साक्षात्कार झाला,

तर रोजच असेल व्हँलेंटाईन डे.।।

 

व्हँलेंटाईन म्हणजे नको खरतरं

एकमेकांत अजिबात दुरावा,

आठवण इकडे अन उचकी तिकडे,

हाच असेल बघा फक्कड पुरावा,

प्रेमात नको नुसत्याच अपेक्षा,

हवे जोडीला त्याग आणि समर्पण,

मग काय रोजच व्हँलेंटाईन आणि

अंगणी फुलेल बघा नंदनवन।।

 

नकोत नुसती उणीदुणी,

हवे एकमेकांशी समरसून जगणे,

व्हँलेंटाईन म्हणजे तरी काय हो,

शेवटी परस्परांना सांभाळूनच तर घेणे,।।।

 

प्रेम म्हणजे नसतो नुसताच सहवास,

प्रेम म्हणजे खरतरं एक सच्चा “एहसास”,

मनोमनीच्या प्रेमाची किमयाच न्यारी,

कोसो अंतरे ते लिलया पार करी,

कोसो अंतरे ते लिलया पार करी,।।।

 

©  सौ.कल्याणी केळकर बापट

9604947256

बडनेरा, अमरावती

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १९ (अग्निमरुत् सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ गीत ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १९ (अग्निमरुत् सूक्त) ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

ऋग्वेद – मण्डल १ – सूक्त १९ (अग्निमरुत् सूक्त)

ऋषी – मेधातिथि कण्व : देवता – अग्नि, मरुत् 

ऋग्वेदातील पहिल्या मंडलातील एकोणीसाव्या सूक्तात मेधातिथि कण्व या ऋषींनी अग्नी आणि मरुत् या देवतांना आवाहन केलेले आहे. त्यामुळे हे सूक्त  अग्निमरुत् सूक्त म्हणून ज्ञात आहे. 

मराठी भावानुवाद  

प्रति॒ त्यं चारु॑मध्व॒रं गो॑पी॒थाय॒ प्र हू॑यसे । म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ १ ॥

चारूगामी अती मनोहर याग मांडिलासे 

अग्निदेवा तुम्हा निमंत्रण यज्ञाला यावे

मरुद्गणांना सवे घेउनीया अपुल्या यावे

यथेच्छ करुनी सोमपान यज्ञाला सार्थ करावे ||१||

न॒हि दे॒वो न मर्त्यो॑ म॒हस्तव॒ क्रतुं॑ प॒रः । म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ २ ॥

अती पराक्रमी अती शूर तुम्ही अग्नीदेवा 

तुमच्या इतुकी नाही शक्ती देवा वा मानवा 

संगे घेउनि मरुतदेवता यज्ञाला यावे

आशिष देउनी होमासंगे आम्हा धन्य करावे ||२|| 

ये म॒हो रज॑सो वि॒दुर्विश्वे॑ दे॒वासो॑ अ॒द्रुहः॑ । म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ३ ॥

द्वेषविकारांपासुनी मुक्त दिव्य मरूतदेवता

रजोलोकीचे त्यांना ज्ञान अवगत हो सर्वथा

अशा देवतेला घेउनिया सवे आपुल्या या 

अग्निदेवा करा उपकृत ऐकुनि अमुचा धावा ||३||

य उ॒ग्रा अ॒र्कमा॑नृ॒चुरना॑धृष्टास॒ ओज॑सा । म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ४ ॥

उग्र स्वरूपी महापराक्रमी मरूत देवांची

तेजधारी अर्चना तयांस असते अर्काची 

समस्त विश्व निष्प्रभ होते ऐसे त्यांचे शौर्य

अग्नीदेवा त्यांना घेउनिया यावे सत्वर ||४||

ये शु॒भ्रा घो॒रव॑र्पसः सुक्ष॒त्रासो॑ रि॒शाद॑सः । म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ५ ॥

धवलाहुनीही शुभ्र जयांची अतिविशाल काया

दिगंत ज्यांची कीर्ती पसरे शौर्या पाहुनिया  

खलनिर्दालन करण्यामध्ये असती चंडसमर्थ

त्यांना आणावे त्रेताग्नी अंतरी आम्ही आर्त ||५|| 

ये नाक॒स्याधि॑ रोच॒ने दि॒वि दे॒वास॒ आस॑ते । म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ६ ॥

द्यूलोक हे वसतीस्थान स्वर्गाचे सुंदर

तिथेच राहत मरूद देव जे दिव्य आणि थोर

आवाहन अमुच्या यज्ञासत्व वीर मरूद देवा

त्यांना घेउनिया यावे हो गार्ह्यपती देवा ||६||

य ई॒ङ्‍ख्य॑न्ति॒ पर्व॑तान् ति॒रः स॑मु॒द्रम॑र्ण॒वम् । म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ७ ॥

किति वर्णावे बलसामर्थ्य हे मरूद देवते

नगस्वरूपी जलदा नेता पार सागराते  

नतमस्तक मरुदांच्या चरणी स्वागत करण्याला  

अग्नीदेवा सवे घेउनीया यावे यज्ञाला ||७||

आ ये त॒न्वन्ति॑ र॒श्मिभि॑स्ति॒रः स॑मु॒द्रमोज॑सा । म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ८ ॥

चंडप्रतापी मरुद्देवता बलशाली फार

अर्णवास ही आक्रमिती सामर्थ्य तिचे बहुघोर

सवे घेउनिया पवनाशी आवहनीया यावे 

हविर्भाग अर्पण करण्याचे भाग्य आम्हाला द्यावे ||८||

अ॒भि त्वा॑ पू॒र्वपी॑तये सृ॒जामि॑ सो॒म्यं मधु॑ । म॒रुद्‍भि॑रग्न॒ आ ग॑हि ॥ ९ ॥

सोमपान करण्याचा अग्ने अग्रमान हा तुझा 

प्रथम करी रे सेवन हाची आग्रह आहे माझा

मरुद्गणांना समस्त घेउनी यज्ञाला यावे

सोमरसाला मधूर प्राशन एकत्रित करावे ||९||

(हे सूक्त व्हिडीओ  गीतरुपात युट्युबवर उपलब्ध आहे. या व्हिडीओची लिंक येथे देत आहे. हा व्हिडीओ ऐकावा, लाईक करावा आणि सर्वदूर प्रसारित करावा. कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करावे.)

https://youtu.be/y5VJJebUi-s

Attachments area

Preview YouTube video Rugved Mandal 1 Sukta 19 :: ऋग्वेद मंडल १ सूक्त १९

Rugved Mandal 1 Sukta 19 :: ऋग्वेद मंडल १ सूक्त १९

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares