मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जि  व  ल  ग ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🙏 जि  व  ल  ग ! 🙏 श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

आता थांबवीन म्हणतो

जरा शब्दांशी ते खेळणे,

त्यांनी तरी किती नाचावे

नेहमी माझ्या मनाप्रमाणे !

 

कशी कोण जाणे याची

लागली शब्दांना कुणकुण,

सोडले अचानक त्यांनी

माझ्या डोक्यातील ठाणं !

 

गेले असेच दोन दिवस

सरल्या त्या दोन रात्री,

‘ते’ परतणे शक्य नाही

मज याची झाली खात्री !

 

पण आज अवचित पडता

थाप डोक्याच्या दारावर,

उघडून पाहता दिसले

माझेच मला जुने मैतर !

 

गळा भेट होता आमची

मनोमनी सारे सुखावलो,

नाही सोडणार साथ कधी

एकमेका वचन देते झालो !

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ संघटना… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

सौ.मंजुषा सुधीर आफळे

 कवितेचा उत्सव ?

☆ संघटना… ☆ सौ.मंजुषा सुधीर आफळे ☆

सुविचारी संघटन

यशाचे गमक, सार

ताकदीने पुढे यावा

सृजनांचा कारभार

 

शिस्त युक्ती सातत्य हा

संघटनेचा प्राण हो

कार्यमग्न सेवेकरी

संघटनेची शान हो

 

अन्यायाला प्रतिकार

सभासद शिल्पकार

संघटना उत्कर्षात

प्रामाणिक व्यवहार

 

अविरत ध्यास हवा

नाविण्याचा अंगीकार

संघटन प्रदर्शनी

अप्रतिम अविष्कार

 

नवनवीन क्षेत्रात

पाऊल पुढे पडावे

संघटनेचे मंत्र ते

विश्वाने हो वाखाणावे

 

संस्कृतीची जपणूक

सतर्क धर्म रक्षणी

संघटन असावे जे

असेच बहुलक्षणी

 

जीवन प्रवास होई

संघटनेत सुखाचा

स्वीकारून मार्ग असा

आरंभ व्हावा कार्याचा.

 

© सौ.मंजुषा सुधीर आफळे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – वाट वाकडी… – ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

?️?  चित्रकाव्य  ?️?

?– वाट वाकडी ? ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

वाट वाकडी केली थोडी

तुझ्याचसाठी, सहजपणाने

दृष्टी आड तू दूर तिथे पण

आठव येतो क्षणाक्षणाने

 

पाश पर्व हे संपत नाही

जरी अडकतो इथे तनाने

बाजूस सारून विचार सारे

असतो पोचत तिथे मनाने

© सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एक होता म्हसोबा… ☆ श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? कवितेचा उत्सव ?

☆ एक होता म्हसोबा…👹 ☆ श्री सुहास सोहोनी ☆ 

एक होता म्हसोबा,

एक होती हडळ,

म्हसोबा रहायचा पिंपळावर,

हडळ रहायची चिंचेवर — ॥

 

हडळीला नव्हता नवरा,

म्हसोबाला नव्हती बायको,

म्हसोबा बोलला लगिन करू,

पण हडळ म्हणाली नक्को !

 

हवा कशाला डोक्याला या,

संसाराचा ताप

चैन मज्जा करू, कशाला

व्हावे आई बाप — ॥

 

चंगळ केली, चैनही केली,

रिलेशनाची मज्जा

इच्छा नसता झाला मुलगा

नांव ठेविले मुंजा — ॥

 

ताडमाडसा झाला मुंजा

सदैव खा खा खाई

काय देऊ तुज, हडळ म्हणे त्या

माझी हाडे खाई — ॥

 

लग्न करिन मी, म्हणे मज हवी

नवरी जणु वाघिण

पसंत मजला वडाखालची

नाक फेंदरी जखिण — ॥

 

लग्न लागले, घरातली पण

हरवुन गेली शांती

भांडभांडती खिंकाळति अन्

झिंज्याही खेचती — ॥

 

विचार केला चौघांनी मग

माणुस अपुला भाऊ

तोच शहाणा त्याच्यापाशी

शिकावया जाऊ — ॥

 

बघुन माणसे बसले त्यांना

धक्क्यावर धक्के

स्वार्थी, कपटी, कारस्थानी

खेळति पंजे छक्के — ॥

 

फुकट लाभता पैसा सत्ता

समाधान ना मिळे

हाव अशी की तोंडामधुनी

लाळ खालती गळे — ॥

 

वाघ नि कोल्हे तसे लांडगे

हसून नाटक करिती

संधी मिळता तुटून पडती

विसरुन नाती गोती — ॥

 

आई ढोंगी बाप कोडगा

शरम नसे ना लाज

माणसातल्या मुंजांना मग

चढला भारी माज— ॥

 

हडळ, म्हसोबा, जखीण, मुंजा

रडती पश्चात्तापे

माणुस गेला किती पुढे अन्

हरलो आम्ही भुते — ॥

 

भूतलोकि जातांना म्हणती

अनुभव हा अद्भूत

खरंच सांगतो माणसापरी

नाही दुसरे भूत — ॥ 🤣

© सुहास सोहोनी

रत्नागिरी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 139 – सौंदर्यवती ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 139 – सौंदर्यवती ☆

तुझ्या लावण्याला तोड नसे उभ्या ग जगती।

अशा सौंदर्यवतीची कशी वर्णावी महती।।धृ।।

नाना अलंकार ल्याली नवविध भूषणे सजली।

तुझ्या लावण्याची प्रभा नाना छंदाने नटली।

जगी मानाचा ग तुरा तुझ्या मुकूटा वरती।।१।।

तुझी शृंगारली बोली जाग प्रणयाला आली।

के ले कित्येक घायाळ धुंदी  शब्दांनी चढली।

मधुर रसाची उधळण शब्द अमृतात न्हाती।।२।।

संत तुका चोखा नामा करी अभंग गायना।

भक्तीरस मंथनाला भुले पंढरीचा राणा।

ज्ञानीयांचा राजा जगी तुझी वर्णितो महती।।३।।

वीर रौद्र शांत रस किती निर्मिले सुरस।

हस्य करूण रसाला भाव फुलांची आरास।

दीग्जांनी भूषविली शब्द भूषणे ही किती।।४।।

भारूड गौळणी पोवाडे लोकगीतांचा हा झरा।

करीती जन जागरण देऊन संदेश हा खरा।

माय मराठी ही शोभे राजभाषा स्थानावरती।।५।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ प्रपोज… ☆ श्री राहूल लाळे ☆

श्री राहूल लाळे

? कवितेचा उत्सव ?

☆ प्रपोज… 🌹 ☆ श्री राहूल लाळे ☆

(८ फेब्रुवारीला झालेल्या  प्रपोज डे  निमित्त…)

प्रपोज करूया  आज आपण

आपल्याच  जुन्या नव्या नात्यांना

 

प्रपोज करूया  आज आपण

पुन्हा आपल्या जीवलग मित्रांना

 

प्रपोज करूया  आज आपण

विश्वास आणि श्रद्धेला

 

प्रपोज करूया  आज आपण

धैर्य आणि लढाऊ वृत्तीला

 

प्रपोज करूया  आज आपण

जिद्द-निष्ठा आणि स्वाभिमानाला

 

प्रपोज करूया  आज आपण

आपल्या सच्चेपणाला आणि विनयशील वृत्तीला

 

प्रपोज करूया  आज आपण

सेवाभावी वृत्तीला आणि दातृत्वाला

 

प्रपोज करूया  आज आपण

आपल्यातल्या  माणुसकीला व देवत्वाला

 

प्रपोज करूया आज आपण

पुन्हा आपल्या  जीवनसाथीला

 

प्रपोज करूया आज आपण

आपल्यातल्याच आपल्याला

 

चला तर मग !!!

 

© श्री राहुल लाळे

पुणे 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ विजय साहित्य #161 ☆ गुरू प्रतिपदा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 161 – विजय साहित्य ?

☆ गुरू प्रतिपदा ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(6 फेब्रुवारी 2023 माघ कृष्णप्रतिपदा दिना निमित्त)

नरसिंह सरस्वती

दत्तात्रय अवतार

माघ कृष्ण प्रतिपदा

पुण्यतिथी ही साकार..!

 

लाड कारंजे गावात

जन्मा आले शालग्राम

अंबा भवानी माधव

नरहरी पुत्र नाम….!

 

उपनयनाचे वेळी

वेदवाणी उच्चारण

माता अंबा भवानीने

केले दिव्य संस्करण…!

 

शिव विष्णु गणपती

नरसिंह उपासना

देवी, आराधना सोपी

भक्ती शक्ती संकल्पना…!

 

कृष्णा पंचगंगा काठी

गाव नरसोबा वाडी

पुण्य पावन क्षेत्रात

दत पादुकांची गोडी…!

 

मनोहर पादुकांचा

वाडी मधे आहे वास

कृष्णा काठी औंदुबरी

दत्तात्रेय ‌सहवास…!

 

कृपादृष्टी सेवाफल

नाम विमल पादुका

क्षेत्र गाणगापुरात

दिव्य निर्गुण पादुका..!

 

आज गुरू प्रतिपदा

अवधूत मनी स्मरू

भक्ती सगुण निर्गुण

दर्शनाची आस धरू…!

 

दत्त संप्रदाय क्षेत्री

गुरू प्रतिपदा खास

नरसिंह सरस्वती

दत्त रूप सहवास…!

 

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ व्यथा… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

श्री रवींद्र सोनावणी

? कवितेचा उत्सव ?

📌 व्यथा… ☆ श्री रवींद्र सोनावणी ☆

जर कळसाला कळले असते

पायाखालील ते एकाकीपण?

खजील झाले असते त्याचे

झपाटलेले ते मोठेपण !

 

आकाशाला कळली असती

काळ्या भूमातेची महती

आक्रोशून आसवे ढाळणे

वेळ अशी का आली असती

 

निश्वासांची तशी वेदना

जर श्वासांनी जपली असती?

मला वाटते तर सूर्यावर

नजर शशीची खिळली असती

© श्री रवींद्र सोनावणी

निवास :  G03, भूमिक दर्शन, गणेश मंदिर रोड, उमिया काॅम्पलेक्स, टिटवाळा पूर्व – ४२१६०५

मो. क्र.८८५०४६२९९३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सुजित साहित्य #147 ☆ संत सावता माळी… ☆ श्री सुजित कदम ☆

श्री सुजित कदम

? कवितेचा उत्सव ?

☆ सुजित साहित्य # 147 ☆ संत सावता माळी… ☆ श्री सुजित कदम ☆

अरणचे दैवू माळी

पंढरीचे वारकरी

संत सावता जन्मले

कुटुंबात शेतकरी…! १

 

वृत्ती सज्जन  धार्मिक

शुद्ध चारित्र्य सचोटी

नाम सावता शोभले

सांप्रदायी ठैव मोठी…! २

 

पिढीजात शेतकरी

फुलवला शेतमळा

ऐसी माळियाची जात

हरी भक्ती कळवळा….! ३

 

भक्ती आणि संसाराचा

साधुनीया ताळमेळ

बागायती शेतमळा

शेतीसाठी दिला वेळ…! ४

 

मोट नाडा बैलजोडी

सावत्याची ही पंढरी

मोक्ष मुक्ती नको म्हणे

नांदे विठ्ठल अंतरी…! ५

 

जप जाप्य कर्मकांड

हवा कशाला देखावा

पिकवोनी शेतमळा

त्यात विठ्ठल शोधावा… ! ६

 

अनासक्त वृत्तीतून

साधियला परमार्थ

कांदा मुळा भाजी संगे

दिला सात्विक भावार्थ…! ७

 

अंधश्रद्धा दांभिकता

घणाघाती केले वार

नामसंकीर्तन करा

पहा विठ्ठल साकार…! ८

 

नीतिमत्ता, सहिष्णुता

निर्भयता सदाचार

ईश्वरास आळविले

सावत्याने शब्दाकार…! ९

 

कर्मयोग सावत्याचा

निष्ठा जीवन अभंग

नवरस परीपुर्ण

रससिद्ध काव्य रंग…! १०

 

शांत वत्सल करुण

दास्य भक्ती अभंगात

राखी सावत्याचा मळा

नाचे विठ्ठल मळ्यात…! ११

 

देई सावत्या संदेश

वाचे आळवावा हरी

केली नाही कधी वारी

आला विठू शेतावरी…! १२

 

वैकुंठीचा देव त्यांनी

मेळवीला संकीर्तनी

माळी सावत्याचे घरी

विठू ‌रंगला‌ कीर्तनी….! १३

 

संतवाणी सावत्याची

जनलोकी प्रासादिक

हरिभक्ती वानवळा

झाला अभंग ‌पौष्टिक …! १४

 

कर्म कर्तव्याची जाण

हीच खरी ईशसेवा

शेतमळा राखणीने

दिला हरी भक्ती ठेवा…! १५

 

आषाढीच्या वारीतून

संत जाती पंढरीला

पांडुरंग करी वारी

येई अरणी भेटीला…! १६

 

नवे शब्द रुपकांनी

शब्द मोती अभंगात

निजरूपे विठ्ठलाची

सावत्याच्या अंतरात..! १७

 

आषाढीची चतुर्दशी

घेई सावत्या निरोप

समाधिस्थ होता क्षणी

अभंगांचे फुले रोप…! १८

 

©  सुजित कदम

संपर्क – 117, विठ्ठलवाडी जकात नाका, सिंहगढ़   रोड,पुणे 30

मो. 7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ उत्तरायण….दक्षिणायन… Adv. समीर आठल्ये, देवरुख ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆

श्री सुहास रघुनाथ पंडित

? वाचताना वेचलेले ?

☆ उत्तरायण….दक्षिणायन… Adv. समीर आठल्ये ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित 

उत्तरायण दक्षिणायन संदर्भास चपखल शोभणारी कविता :-

 

सूर्योदय तो पूर्वेला अन्

पश्चिमेस तो अस्त असे 

सृष्टीचा हा नियम मानवा

त्रिकालाबाधित सत्य असे॥

 

रवि जरासा अवखळ भारी

          एका जागी स्थिर नसे 

               एका जागी नित्य उगवणे

                   हेच तया मंजुर नसे॥  

 

वदे रवि तो ब्रह्मापाशी 

जरा मोकळीक द्या मजला

उगवुन येण्या एक ठिकाणी                    

 मजला येईल कंटाळा॥

 

आज येथुनी उद्या तेथुनी

      उगवलो तर होईल छान

         रोज नव्या देशाला देईन

            पहिला बघण्याचा हो मान॥  

 

ब्रह्मदेवही हसले किंचित

हट्ट पाहुनी सूर्याचा 

दिवस कुठे अन् कुठे रात्र

हा मेळ कसा साधायचा॥

 

मान राखुनी परी रविचा

   ब्रह्मदेव वदले त्याला

       उगवताना पूर्व दिशा अन्

            पश्चिमेस जा अस्ताला॥

 

परी उगवता पूर्व दिशेला

उत्तरेकडे सरकत जा 

सहा मास सरताच मागुता

दक्षिण अंगे उगवत जा॥

 

सूर्य तोषला रचना ऐकून 

    उदय आणिक अस्ताची

        दिशा जरी ती एक परंतु

            जागा बदले नित्याची॥

 

उत्तर अंगे उगवत जाता

उत्तरायणी सूर्य असे

दक्षिण अंगे तोच उगवता

दक्षिणायनी तोच दिसे॥

 

संक्रमणाने फुलते जीवन

   गती लाभते जगण्याला

      म्हणुनी दिनकर व्यापुनी फिरतो

          नभांगणातुनी दिवसाला॥

 

जगी चिरंतन टिकून राही

बदल तयाचे नाम असे

असे बदल, परी मार्ग सुनिश्चित

हे देवाचे दान असे॥

 

कवी : Adv. समीर आठल्ये, देवरुख. 

संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares