मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ वैदिक राष्ट्रगीत ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ वैदिक राष्ट्रगीत ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

शुक्ला यजुर्वेदातील बाविसाव्या अध्यायातील बाविसावा श्लोक हा वैदिक राष्ट्रगीत म्हणून प्रसिद्ध आहे. 

या मंत्रात राष्ट्राचे मानचित्र साकारण्यात आले आहे.

☆ संस्कृत श्लोक

आ ब्रह्मन् ब्राह्मणो ब्रह्मवर्चसी जायतामा राष्ट्रे राजन्य: शूरऽइषव्योऽतिव्याधी महारथो जायतां दोग्ध्री धेनुर्वोढानड्वानाशु: सप्ति: पुरन्धिर्योषा जिष्णू रथेष्ठा: सभेयो युवास्य यजमानस्य वीरो जायतां निकामे निकामे न: पर्जन्यो वर्षतु फलवत्यो नऽओषधय: पच्यन्तां योगक्षेमो न: कल्पताम्।।

-यजु० २२/२२

अर्थ समजायला सुलभ जावे म्हणून मी या श्लोकाची खालीलप्रमाणे विभक्त मांडणी केली आहे. 

आ ब्रह्यन्‌ ब्राह्मणो बह्मवर्चसी जायताम्‌

आ राष्ट्रे राजन्यः शूर इषव्यः अति

व्याधी महारथो जायताम्‌

दोग्ध्री धेनुर्वोढानड्वानाशुः सप्तिः

पुरंध्रिर्योषा जिष्णू रथेष्ठाः सभेयो

युवाअस्य यजमानस्य वीरो जायतां

निकामे निकामे नः पर्जन्यो वर्षतु

फलवत्यो न ओषधयः पच्यन्ताम्‌

योगक्षेमो नः कल्पताम्

सुलभ अर्थ

हे ब्रह्मात्म्या , आमच्या देशात समस्त वेदादी ग्रंथांनी देदीप्यमान विद्वान निर्माण होवोत. अत्यंत पराक्रमी, शस्त्रास्त्रनिपुण असे शासक  उत्पन्न होवोत. विपुल दुध देणाऱ्या गाई आणि भार वाहणारे बैल, द्रुत गतीने दौडणारे घोडे पैदा होवोत.  

तैलबुद्धीच्या स्त्रिया जन्माला येवोत. प्रत्येक नागरिक श्रेष्ठ वक्ता, यशवंत आणि रथगामी असो.   या यज्ञकर्त्याच्या गृहात विद्या, यौवन आणि पराक्रमी संतती निर्माण होवो. आमच्या देशावर आमच्या इच्छेनुसार वर्षाव करणारे जलद मेघ विहारोत आणि सर्व वनस्पती फलदायी होवोत. 

आमच्या देशातील प्रत्येकाच्या योगक्षेम पूर्तीसाठी त्यांना प्राप्ती होवो. 

भावानुवाद :-

☆ वैदिक राष्ट्रगीत

विश्वात्मका हे देवा समृद्ध देश होवो

 

वेदांत ज्ञानी ऐसे शास्त्रज्ञ जन्म घेवो

अतिबुद्धिमान ललना देशाला गर्व देवो

यशवंत ज्ञानी वक्ता रथगामी मान मिळवो

यौवन-ज्ञानपूर्ण संतती शूर निपजो 

विश्वात्मका हे देवा समृद्ध देश होवो

 

भूभार वाही वृषभ, दुभत्या धेनु निपजो

वेगात पवन ऐशी पैदास अश्व होवे

इच्छेनुसार वर्षा अंबरी जलद विहरो

फळभार लगडूनीया द्रुमकल्प येथ बहरो

विश्वात्मका हे देवा समृद्ध देश होवो

 

सकलांचे योगक्षेम परिपूर्ण होत जावो 

विश्वात्मका हे देवा समृद्ध देश होवो…… 

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ छापा की काटा… ☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆

श्री सुहास सोहोनी

? वाचताना वेचलेले ?

छापा की काटा…☆ प्रस्तुती – श्री सुहास सोहोनी ☆ 

दोघांचीही निवृत्ती झाली होती

साठी कधीच ओलांडली होती

अजूनही परिस्थिती ठीक होती

हातात हात घालून ती चालत होती

 

तो राजा होता ती राणी होती

जीवन गाणे गात होती

झुल्यावरती झुलत होती

कृतार्थ आयुष्य जगत होती

 

अचानक त्याची तब्येत बिघडते

मग मात्र पंचाइत होते

तिची खूपच धावपळ होते

पण कशीबशी ती पार पडते

 

आता तो सावध होतो

लगेच इन्शुरन्स कंपनी गाठतो

वारसाची पुन्हा खात्री करतो

मृत्यूपत्राची तयारी करतो

 

दुसर्‍या दिवशी बँकेत जातो

पासबुक तिच्या हातात ठेवतो

डेबिट कार्ड मशीनमध्ये घालतो

तिलाच पैसे काढायला लावतो            

 

पुन्हा तिला सोबत घेतो

वीज-पाण्याच्या ऑफिसात जातो 

तिलाच रांगेत उभं करतो

बिल भरायचं समजावून सांगतो

 

अचानक तिला सरप्राईज देतो

टचस्क्रीन मोबाईल हाती ठेवतो

वाय-फाय नेटची गंमत सांगतो

नवा सोबती जोडून देतो

 

बाहेरच्या जगात ती वावरू लागते

प्रत्येक व्यवहार पाहू लागते

कॉन्फिडन्स तिचा वाढू लागतो

निश्चिंत होत तो हळूच हसतो     

 

बदल त्याच्यातला ती पहात असते 

मनातलं त्याच्या ओळखत असते

थोडं थोडं समजत असते 

काळजी त्याचीच करत राहते

 

एक दिवस वेगळेचं घडते

ती थोडी गंमत करते

आजारपणाचा बहाणा करते

अंथरूणाला खिळून राहते

 

भल्या पहाटे ती चहा मागते

अन् किचनमध्ये धांदल उडते

चहात साखर कमी पडते

तरीही त्याचे ती कौतुक करते

 

नाष्ट्यासाठी उपमा होतो

पण हळदीच्या रंगात खूपच रंगतो

दिवसा मागून दिवस जातो

अन् किचनमधला तो मास्टर होतो

 

कोणीतरी आधी जाणार असतं

कोणीतरी मागं रहाणार असतं

पण मागच्याचं आता अडणार नसतं

अन् काळजीच कारण उरणार नसतं

 

सह-जीवनाचं नाणं उडत असतं

जमिनीवर ते पडणार असतं

आधी काटा बसतो की छापा दिसतो

प्रश्न एकच छळत असतो…!! …… 

 

संग्राहक – सुहास सोहोनी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ झेप क्षितीजापलिकडे… ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ झेप क्षितीजापलिकडे ☆ सुश्री वृंदा (चित्रा) करमरकर ☆

संसाराच्या खेळामधले

 राजा आणिक राणी

निराशेच्या अंधारातील

अशीच एक विराणी

 

घर  ते होते  हसरे सुंदर

स्वप्नांनी सजविलेले

तुटीचे अंदाजपत्रक

सदा भवती वसलेले

 

तरीही होती साथसंगत

अविरत  अशा कष्टांची

भाजी भाकरीस होती

अवीट चव पक्वान्नांची

 

अचानक आक्रीत घडले

दुष्काळाचे संकट आले

शेतातील पीक करपूनी

जगणेची मुश्किल जाहले

 

नव्हती काही जाणीव

चिमण्या त्या चोचींना

राजा राणी उदासले

बिलगूनीया पिल्लांना

 

 कभिन्न अंधाऱ्या रात्री

 दीप आशेचा तेवला

 उर्मीने मनात आता

प्रकाश कवडसा पडला

 

होती जिद्दीची तर राणी

राजाचा आधार झाली

बळ एकवटूनी तीच आता

दुःखावरी सवार झाली

 

झेप क्षितीजा पलिकडे

घेण्या,

बळ हो आत्मविश्वासाचे

राजाराणीच्या संसारी

 फुलले झाड सौख्याचे

 

© वृंदा (चित्रा) करमरकर

सांगली

मो. 9405555728

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 116 ☆ ऐक कृष्णा… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 116 ? 

☆ ऐक कृष्णा

(अष्टअक्षरी…)

हाक तुला अंतरीची

ऐक कृष्णा पामराची

नसे तुझ्याविना कोणी

आस तुझ्या चरणाची…!!

 

दाव तुझे रूप देवा

भावा आहे माझा भोळा

पावा वाजवी कृपाळा

नको अव्हेरू या वेळा…!!

 

दोषी आहे मीच खरा

तुला ओळखलेच नाही

आता करितो विनंती

स्नेह भावे मज पाही…!!

 

राज नम्र शुद्ध भावे

दास म्हणवितो तुझा

प्रेम अपेक्षित तुझे

स्वार्थ पुरवावा माझा…!!

 

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 47 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 47 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

८७.

किती आशेनं मी तिला शोधायला निघतो.

माझ्या खोलीच्या कोणत्याही

कोपऱ्यात ती मला सापडत नाही.

माझं घर छोटं आहे.

एकदा हरवलेली वस्तू त्यातून पुन्हा मिळत नाही.

तुझं निवासस्थान अफाट आहे.

हे स्वामी हरवलेली ती वस्तू शोधायला

मी तुझ्या दाराशी आलो आहे.

सायंकालीन आकाशाच्या सोनेरी छताखाली

उभं राहून माझे उत्सुक डोळे

तुझ्या चेहऱ्याकडे मी लावतो.

जिथून काहीच नाहीसं होणार नाही

त्या शाश्वताच्या काठावर मी आलो आहे.

आशा,सुख,दृष्टी जी आसवांतूनही पाहू शकते –

हे काहीही नाहीसं होणार नाही.

माझं रिकामं आयुष्य त्या सागरात इतकं

बुडवून टाक की ते पूर्णपणे आतपर्यंत भरू दे.

मला एकदाच त्या विश्वाच्या पूर्णतेचा

मधुर स्पर्श अनुभवू दे.

 

८८.

भग्न मंदिरातील देवते!

वीणेची तुटलेली तार तुझं स्तवन गीत गात नाही.

सायंकालीन घंटानाद तुझ्या पूजेची वेळ झाली

हे सांगणार नाही.

तुझ्या भोवतीची हवा स्तब्ध, शांत आहे.

 

उनाड वासंतिक वारा

तुझ्या निर्जन निवासात शिरतो.

आपल्या बरोबर तो फुलांचा सुगंध आणतो.

पण ती फुलं तुझ्यावर पूजेत उधळली जात नाहीत.

 

पूर्वीचा तुझा पुजारी अजून भटकतो आहे.

आपली तेव्हाची मन:कामना पूर्ण होईल असं त्याला वाटतं.

सायंकाळी जेव्हा उन आणि सावल्या धुळीच्या अंधारात मिसळून जातात

तेव्हा मनात आशा धरून थकून -भागून तो या

भग्न मंदिरात येईल.

त्यांच्या पोटात तेव्हा भूक असेल.

भग्न मंदिरातील देवी,

आवाज, गोंगाट न करता उत्सवाचे किती दिवस

तुझ्या मंदिरात येतात.

दिवा न लावताच किती तरी रात्री

प्रार्थना, पूजा न करताच जातात.

 

तल्लख बुद्धीचे किती कारागीर

नवनवीन मूर्ती बनवतात. त्या मूर्ती त्यांची वेळ

येताच विस्मृतीच्या विरून जातात.

फक्त भग्न देवालयातल्या मूर्तीच

मृत्युहीन विस्मरणात अपूजीत राहतात.

 

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ थेम्सच्या किनारी… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆

प्रा.डॉ.सतीश शिरसाठ

? कवितेचा उत्सव ?

☆ थेम्सच्या किनारी… ☆ प्रा.डॉ.सतीश शिरसाठ ☆ 

(काही संदर्भ- लंडन येथील नदीचे नाव- थेम्स, त्या नदीवर एक मोठा ऐतिहासिक पूल आहे- टाॅवर ब्रिज. या पुलाच्या बाजूंना दोन मोठे टाॅवर असून राजघराण्यातील व्यक्ति बोटीने जाताना मध्यभागातून तो उघडला जातो.त्या नदीवर एक मोठा दुसरा पूल असून त्याला लंडन ब्रिज म्हणतात. मी त्यावर  मी लिहिलेली  एक कविता  )👇🏻

थेम्सच्या नदीकिनारी

पाहिला मी टाॅवर  ब्रिज

ब्रिटिश राजसत्तेला

अभिवादन करताना

मध्यातून  मुडपणारा.

 

थेम्सच्या नदीकिनारी

पाहिला मी लंडनब्रिज

मुखवटे घालून फिरणा-या

शेकडो  माणसांच्या

घामांत भिजलेला.

 

थेम्सच्या नदीकिनारी

पाहिला मी एक भिकारी

कळकटलेल्या कपडयांवर

फेकलेली नाणी

गोळा करताना.

 

© प्रा.डाॅ.सतीश शिरसाठ

ईमेल- [email protected]

मो व वाटसॅप नं. – ९९७५४३५१५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वप्नं ☆ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ स्वप्नं ☘️ सौ. शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी) 

       – स्वप्ने इवली इवली

       – बाळमुठी सामावली….

       – स्पर्श होता माऊलीचा

       – खुले ओठांची पाकळी…

 

       – तारुण्याच्या लाटेवर

       – स्वप्नांचा झुलता पूल….

       – पंखांची जाणीव होता

       – पडे आभाळाची भूल….

 

        – ज्येष्ठपण येता येता

        – स्वप्नांनी ओंजळ भरली…

        – सत्याला सामोर जाता

        – जाग पापण्यांना आली….

 

         – स्वप्न॔ हिंदोला झुलता

         – झुले संगे माझे मनं…

         – अंधारल्या दुनियेत

         – एक दीप मी लावीन….

 

          – थकलेल्या पावलांच्या

          – उरी असे एक भाव….

          – क्षितिजाच्या वाटेवरी

          – भेटे मज  ‘ स्वप्नंगांव ‘

 

©  शुभदा भास्कर कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे.३८.

   मो.९५९५५५७९०८ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ काव्यानंद – पाळणा चांगदेवांचा… संत मुक्ताबाई ☆ रसग्रहण ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

सुश्री शोभना आगाशे

? काव्यानंद ?

☆ काव्यानंद – पाळणा चांगदेवांचा… संत मुक्ताबाई ☆ रसग्रहण ☆  सुश्री शोभना आगाशे

☆ पाळणा चांगदेवांचा… संत मुक्ताबाई ☆

निर्गुणाचे डहाळी।

पाळणा लाविला।

तेथे सुत पहुडला।

मुक्ताईचा॥

निज निज बाळा।

न करी पै आळी।

अनुहात टाळी।

वाजविते॥

तेथे निद्रा ना जागृती।

भोगी पै उन्मनी।

लक्ष तो भेदूनी।

निजवतो॥

निभ्रांत पाळी।

पाळणा विणुनि।

मन हे बांधुनि।

पवन दोरा॥

एकवीस सहस्र।

सहाशे वेळा बाळा।

तोही डोळा।

स्थिर करी॥

बालक चुकले।

सुकुमार तान्हुले।

त्याने पै सांडले।

मायाजाळ॥

जो जो जो जो।

पुत्राते निजवी।

अनुहाते वाव।

निःशब्दांची॥

अविनाश पाळणा।

अव्यक्तेने विणला।

तेथे पहुडला।

योगिराज॥

निद्रा ना जागृती।

निजसी काई।

परियेसी चांगया।

बोले मुक्ताबाई॥

– संत मुक्ताबाई 

☆ काव्यानंद – पाळणा चांगदेवांचा… संत मुक्ताबाई ☆ रसग्रहण ☆ सुश्री शोभना आगाशे ☆

रसग्रहण/अर्थ

चवदा वर्षांच्या मुक्ताबाईंच शिष्यत्व १४०० वर्षांच्या चांगदेवांनी, श्री ज्ञानेश्वरांच्या सांगण्यावरून पत्करलं. त्यानंतर गुरूमाऊलीच्या भूमिकेतून मुक्ताबाईंनी चांगदेवांना उद्देशून हा उपदेशपर पाळणा रचला.

मुक्ताबाई म्हणतात,

निर्गुणाच्या फांदीवर तुझा पाळणा मी बांधला आहे जेणेकरून निर्गुण भक्तीच्या मार्गाने परमेश्वर प्राप्ती कशी करून घ्यावी याचं ज्ञान तुला मी देईन. आता तू हट्ट न करता झोप त्यासाठी मी अनाहत टाळी वाजवते आहे. आहत म्हणजे कोणत्याही दोन गोष्टींच्या (वस्तु, विचार, भाव, अहंकार, इच्छा इ.) एकमेकांवरील आघातामुळे निर्माण होणारा नाद म्हणजेच द्वैत तर अनाहत जो आहत नाही तो म्हणजे अद्वैत. ॐ कार नाद हा अनाहत नाद आहे. हा अनाहत नाद तू मनाच्या उन्मनी अवस्थेतच ऐकू शकशील. सामान्यपणे मनाच्या चार अवस्था असतात. जागृती, स्वप्न, सुषुप्ती व तुर्या. सुषुप्ती म्हणजे गाढ निद्रा व  तुर्या म्हणजे आत्मशोध किंवा स्वतःची स्वतःला ओळख पटणे, ब्रम्ह व माया दोन्हींचे पूर्ण ज्ञान होणे. पण या अवस्थेत द्वैत असते. यापुढची अवस्था म्हणजे उन्मनी अवस्था. या अवस्थेत मन तदाकार होते. विश्वातील दिव्यत्व व आत्म्यातील दिव्यत्व यांच्या एकरूपतेची जाणीव होते. अद्वैताचा अनुभव येतो. म्हणून मुक्ताबाई आपल्या शिष्याला सांगत आहेत की तू या उन्मनी अवस्थेचा अनुभव घे. निभ्रांतीच्या म्हणजे निर्मोहाच्या दोरीने तुझा पाळणा विणला आहे. त्याला झोका देण्यासाठी मनाची दोरी बांधली आहे. म्हणजे तुझं मन या निर्मोही अवस्थेचा आनंद घेऊ दे.

सामान्यपणे आपण १०८०० वेळा दिवसा व १०८०० वेळा रात्री श्वास घेतो. मुक्ताबाई सांगतात, सामान्य माणसांप्रमाणे तू एकवीस सहस्र सहाशे वेळा श्वास न घेता, तू तो स्थिर कर म्हणजेच त्यावर ताबा मिळवून त्याची गती कमी कर. (ही गती १०८ पर्यंत खाली आणली तर  परमेश्वर प्राप्ती होते असे म्हणतात.) 

माझं बाळ लहान आहे ते वाट चुकलं होतं.(चांगदेव हे सर्व शास्त्रात पारंगत होते. त्यांना योगीराज म्हटलं जायचं. परंतु त्यांचे ज्ञान सत्संग विरहित होते कारण त्यांना अहंकाराची बाधा झाली होती.) पण आता त्याने माया मोह यांचा त्याग केला आहे. म्हणून अशा आपल्या पुत्राला मुक्ताबाई निःशब्दपणे अनाहत नाद ऐकवून झोपवत आहेत.

हा योगीराज चांगदेव बाळ, गुरूंनी विणलेल्या ज्ञानाच्या अविनाशी पाळण्यामध्ये पहुडला आहे आणि उन्मनी अवस्थेमध्ये आपल्या गुरूंनी सांगितलेल्या योगमार्गातील उपदेशपर गोष्टी ऐकत आहे.

© सुश्री शोभना आगाशे

सांगली

मो. 9850228658

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – सोनेरी किरणे धरतीवर – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?सोनेरी किरणे धरतीवर? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

रविराज अस्ताला जाता

धरतीवर तम हळुहळू येतो

 पांधरूनी काळी शाल जगी

कुशीतली उब सकलांना देतो

निद्रीस्त  होती, विश्रांती घेती

श्रमणारे जीव आपोआप

काही ठिकाणी अंधारातच

चोरटेपणाने फिरते पाप

 पूर्वदिशेला दिनकर येता

 तमस हळू निघूनी जातो

 सोनेरी किरणे धरतीवर

 कणकण उजळीत रहातो

चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ काठाशी… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ काठाशी… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

निरागसतेच्या- काठी

          रिमझिमायचे मेघ

कधी… कुठेही.. हाताशी

          निळे खळाळते ओघ

 

आता तृष्णेच्या- काठाशी

          शिडकावा ना ओलावा

निष्पर्णल्या फांद्यांवर

          मूक पाखरांचा थवा

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares