मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #173 ☆ मौनाचे हत्यार… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 173 ?

☆ मौनाचे हत्यार… ☆

हाती माझ्या हे मौनाचे हत्यार आहे

त्या मौनाला सहिष्णुतेची किनार आहे

 

रणात केवळ मृत्यूचे या तांडव घडते

युद्धासाठी कायम माझा नकार आहे

 

दोन वेळच्या अन्नासाठी भीक मागती

तरिही म्हणती युद्धासाठी तयार आहे

 

प्रज्ञा समृद्धीच्यासोबत इथे नांदते

घरात माझ्या प्रतिभेची बघ वखार आहे

 

प्रतिभेची या चोरी करता आली नाही

तिच्यासमोरच सुटली माझी इजार आहे

 

कुणी शिव्या द्या ऐकुन घेइन नेता म्हणतो

संस्कारातच उच्च प्रतीचा विचार आहे

 

डीजे ऐकुन कान फाटले होते माझे

म्हणून बसलो हाती घेउन सतार आहे

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ 🇮🇳 तिरंगा 🇮🇳 ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

? कवितेचा उत्सव ?

☆ 🇮🇳 तिरंगा 🇮🇳 ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

🇮🇳

पूर्वी आठ आण्याला मिळायचा

आता तो दोन रूपायला मिळतो

माझा मुलगा तिरंगा

छातीला लावून फिरतो

मलाही लपेटतील का?

असे तिरंग्यात

टिव्ही वरचा कार्यक्रम पाहून विचारतो

त्याकरिता देशासाठी शहिद व्हावे लागते

मी एवढ्यावरच थांबतो

असतो कधी क्रिकेटचा सामना

भारताचा पाकिस्तान बरोबर

तेव्हा मात्र त्याचा आणि माझा

देशाभिमान जागा होतो खरोखर

हाती तिरंगा आणि एक पिपाणी घेऊन

दोघे बसतो टिव्ही समोर

खरेच सांगतो त्या दिवशी

बायकोच्याही जीवाला लागला असतो घोर

परवा आला सांगत

झाली आहे माझी निवड एन सी सी मध्ये

देणार आहोत तिरंग्याला सलामी

स्वातंत्र्य दिनाच्या संचलनामध्ये

किती दिवस चालली होती

त्याची तयारी

पाहून सारे प्रयत्न त्याचे

माझ्या मनाला उभारी

आता तो तिरंग्यासाठी

पैसे मागत नाही

सामना कुठला जिंकला म्हणून

तिरंगा घेऊन गल्लीतून फिरत नाही

तिरंग्याचे महत्व म्हणे

कळले आहे त्याला

बाप म्हणून याचाच

अभिमान वाटतो आहे मला

कवी : म. ना. दे.

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

https://www.facebook.com/majhyaoli/ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे शब्द अंतरीचे # 115 ☆ सत्यपरिस्थिती… ☆ महंत कवी राज शास्त्री ☆

महंत कवी राज शास्त्री

?  हे शब्द अंतरीचे # 115 ? 

☆  सत्यपरिस्थिती

 अध्याय माझा संपेल

मी रुद्र भूमीत असेल 

घरी पेटतील चुली

सडा सारवण होईल 

 

 जेवायला बसतील सर्व

अश्रू डोळ्यांचे थांबतील 

माझ्याच घरातील सर्व

भोजनाचा स्वाद घेतील… 

 

 स्वाद घेत घेत भोजनाचा

आग्रह एकमेकांना होईल 

रुदन संपेल त्या क्षणाला

कामाला हात लागतील…

 

 हे जीवन क्षणभंगुर

इथे कुणाचे स्थिर ते काय 

आला त्याला जावे लागणार

यात आश्चर्य नाय…

© कवी म.मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ गीतांजली भावार्थ … भाग 46 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी

? वाचताना वेचलेले ?

☆ गीतांजली भावार्थ …भाग 46 ☆ प्रस्तुति – सुश्री प्रेमा माधव कुलकर्णी ☆

८३.

हे माते! माझ्या दु:खाच्या अश्रूंनी

तुझ्या गळ्यात घालण्यासाठी

मी मोत्यांचा हार बनवेन.

तुझे चरण चांदण्यांच्या तेजाच्या पैंजणांनी सजवले आहेत. पण माझा हार तुझ्या वक्षस्थळावर रुळेल.

 

संपत्ती आणि कीर्ती तूच देतेस.

ती देणं न देणं तुझ्याच हाती आहे.

पण हे दु:ख केवळ माझ्या एकट्याचं आहे.

ते तुला अर्पण करायला मी आणतो

तेव्हा तुझ्या वैभवाचं वरदान तू मला देतोस.

 

८४.

ताटातुटीचं दु:ख जगभर फैलावतं,

अनंत आकाशात अगणित आकार जन्मतात.

 

रात्रीच्या प्रहरी ताटातुटीच्या या दु:खानं

आवाज न करता तारका एकमेकींकडे पाहतात

आणि जुलैच्या पावसाच्या रात्री

अंधारात त्यांचीच गीते होतात.

 

सर्वत्र पसरत जाणारं हे दु:ख प्रेमात,

आनंदात,वासनांत आणि

माणसांच्या घराघरात झिरपत राहतं.

माझ्यासारख्या कवींच्या ऱ्हदयातून, गीतांच्या रूपानं सतत झरत राहतं.

 

८५.

आपल्या धन्याच्या प्रसादातून पहिल्यांदाच

योद्धे बाहेर पडले तेव्हा त्यांनी

आपले सामर्थ्य कुठे लपवलं होतं?

त्यांची शस्त्रं चिलखतं कुठं होती?

 

आपल्या धन्याच्या महालातून ज्या दिवशी

ते बाहेर पडले तेव्हा त्यांच्यावर बाणांचा वर्षाव झाला, तेव्हा ते किती दीनवाणे,

असहाय्य दिसत होते.

 

आपल्या धन्याच्या महालाकडं ते माघारी परतले

तेव्हा त्यांनी आपलं सामर्थ्य कुठं लपवलं होतं?

 

तलवार,बाण, धनुष्य त्यांनी फेकलं होतं.

त्यांच्या चेहऱ्यावर शांतता होती.

आपल्या आयुष्याचं साफल्य त्यांनी

धन्याच्या महाली जाताना मागेच ठेवली होती.

 

८६.

मृत्यू, तुझा हा चाकर,

माझ्या दाराशी आला आहे.

अनोळखी समुद्र ओलांडून आणि

तुझा सांगावा घेऊन तो आला आहे.

 

रात्र अंधारी आहे. मनात माझ्या भीती आहे.

तरी मी दिवा घेईन. माझा दरवाजा उघडेल,

नम्रपणे वाकून त्यांचं स्वागत करेन.

तुझा दूत माझ्या दाराशी आला आहे.

 

हात जोडून व साश्रू नयनांनी मी त्याला वंदन करेन. माझ्या ऱ्हदय गाभाऱ्यातील संपत्ती त्याच्या चरणांवर वाहून त्याची पूजा करेन.

 

आपलं काम पूर्ण करून एक काळी सावली

माझ्या प्रभात समयावर ठेवून तो परत जाईल.

माझ्या निर्जन घरात माझं निष्प्राण अस्तित्व

तुझ्या पूजेसाठी राहील.

मराठी अनुवाद – गीतांजली (भावार्थ) – माधव नारायण कुलकर्णी

मूळ रचना– महाकवी मा. रवींद्रनाथ टागोर

 

प्रस्तुती– प्रेमा माधव कुलकर्णी

कोल्हापूर

7387678883

[email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भीष्मविषाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? कवितेचा उत्सव ? 

☆ भीष्मविषाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

पडून पंजरी पार्थ शरांच्या प्रतीक्षा करी मृत्यूची

आंस लागली उत्तरायणी नसे वासना जन्माची ||ध्रु||

 

पांचालीच्या अब्रूसाठी फुरफुरले ना हे बाहू

किती विनविले चरणांपाशी किती काय मी साहू

एक वस्त्र ना पुरे पडावे होळी झाली लज्जेची

लाज राखली कृष्ण बांधवे वाण नसे मग चीरांची ||१||

 

हाच काय पुरुषार्थ आमुचा शिखंडी ही वाटतो भला

पुरुष नसोनी न्यायासाठी धाक दावितो किती मला

शौर्य आमुचे क्लैब्य जाहले शस्त्रे ही गाळायची

धनंजयाचे बाण झेलुनी काया मग अर्पायाची ||२||

 

पश्चात्ताप हा जाळुनिया आत्म्याला नी कायेला

देहासाठी शरपंजर परी ना आधार शीराला

मस्तकाचे क्लेश जाणुनी तीर धावले  पार्थाचे

परतफेड ही धनंजयाची उपकारे  अन्यायाची ||३||

© डॉ. निशिकान्त श्रोत्री

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ कर्म आणि मर्म ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

🖊️ कर्म आणि मर्म 🖊️ श्री प्रमोद वामन वर्तक ⭐ 

कर्म…

जे असते लिहिले यात

नाही कधीच चुकायचे,

याच जन्मी इथेच सारे

सर्वांनी बघा भोगायचे !

 

          आपले आपण करावे

          न धरीता फळाची आशा,

          मग कधी पडणार नाही

          पदरी तुमच्या निराशा !

 

… आणि मर्म !

अती जवळ येता कोणी

तो सारे आपले जाणतो,

मतलब साधण्या स्वतःचा

यावर नेमके बोट ठेवतो !

 

          यात बांधून कुणी ठेव

          ती आयुष्यभर जपतो,

          कोणी दुखवण्या कोणा

          यावर तो घाव घालतो !

© प्रमोद वामन वर्तक

दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086

ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ या झोपडीत माझ्या… कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆ रसग्रहण – सौ. सुचित्रा पवार ☆

सौ. सुचित्रा पवार

? काव्यानंद ?

☆ या झोपडीत माझ्या… कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆ रसग्रहण – सौ. सुचित्रा पवार

☆ या झोपडीत माझ्या… कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆

राजास जी महाली

   सौख्ये कधी मिळाली

   ती सर्व प्राप्त झाली

   या झोपडीत माझ्या….

 

भूमीवरी पडावे

ताऱ्यांकडे पहावे

प्रभूनाम नित्य गावे

या झोपडीत माझ्या..

 

पहारे आणि तिजोऱ्या

त्यातून होती चोऱ्या

दारास नाही दोऱ्या

या झोपडीत माझ्या

 

  जाता तया महाला

    ‘मज्जाव’शब्द आला

    भीती न यावयाला

     या झोपडीत माझ्या.

 

   महाली मऊ बिछाने

   कंदील श्यामदाने

    आम्हा जमीन माने

     या झोपडीत माझ्या..

 

   येता तरी सुखे या

    जाता तरी सुखे जा

    कोणावरी ना बोजा

     या झोपडीत माझ्या

 

  पाहून सौख्य माझे

       देवेन्द्र तो ही लाजे

        शांती सदा विराजे

         या झोपडीत माझ्या..

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

 – कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज

☆ या झोपडीत माझ्या… कवी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ☆ रसग्रहण – सौ. सुचित्रा पवार

झोपडी म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती झोपडपट्टी,झोपड्यांची गळकी वस्ती,दुःख, दैन्य,दारिद्र्य,बकाल वस्ती आणि तिथली व्यसनाधीनता,अस्वच्छता,

गुन्हेगारी.थोडक्यात जिवंतपणी नरक.

मोठमोठ्या शहरात अशाच प्रकारचे चित्र असते.आणि बऱ्याचदा झोपड्या हटत नाहीत त्याला झोपडपट्टीचे एक राजकारण असते.बऱ्याचदा बेरकी माणसांच्या  परिस्थितीची ती एक ढाल असते.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी  त्यांच्या एका कवितेत वर्णन केलेली झोपडी मात्र खूपच आगळी वेगळी आहे.प्राप्त परिस्थितीत सुखी राहण्याचा जणू आनंदी मंत्र!

  राजास जी महाली

   सौख्ये कधी मिळाली

   ती सर्व प्राप्त झाली

   या झोपडीत माझ्या….

राजाचा महालसुद्धा माझ्या झोपडीपुढं फिका आहे कारण त्याला इतका खर्च करून बांधलेल्या महालात जी सुख समृद्धी लाभल्या ती माझ्या चंद्रमौळी झोपडीमध्ये काहीच खर्च न करता अनुभवतो आहे.कोणती सौख्ये कवी अनुभवत आहे?

भूमीवरी पडावे

ताऱ्यांकडे पहावे

प्रभूनाम नित्य गावे

या झोपडीत माझ्या..

साधी गोष्ट आहे!तुम्ही सहजच माझ्या झोपडीतल्या जमिनिवर झोपलात तर आकाशात नजर जाईल आणि असंख्य लुकलुकत्या चांदण्या तुमचं मन वेधून घेतील.ते चांदण्याचे आभाळ दिलासा देत असतानाच मुखात मात्र प्रभूचे नाव नित्य असते  कारण त्याचीच तर सर्व कृपा आहे.हे चांदण्यांचे आकाश,ही हवा, हा स्वच्छ सूर्यप्रकाश त्याचीच तर रूपे आहेत!त्याच्याच कृपेने आपण हे सारे अनुभवतो आणि श्वासदेखील घेतो.या माझ्या झोपडीत फक्त इतकेच करायचेआहे.

महालात हे काहीच तुम्हाला अनुभवता येणार नाही.

पहारे आणि तिजोऱ्या

त्यातून होती चोऱ्या

दारास नाही दोऱ्या

या झोपडीत माझ्या

महालात रात्रंदिवस पहारेकरी दाराशी असतात, गस्त घालतात.संपत्तीचे रक्षण करण्यासाठी मोठमोठ्या अवजड तिजोऱ्या असतात तरीही तिथं चोरी होतेच पण झोपडीत माझ्या ही भीती मुळीच नाही.माझ्या झोपडीला दरवाजा नाही,पहारेकरी नाहीत की लुटारूनी चोरून नेण्यासाठी ऐहिक संपत्तीदेखील ;त्यामुळं चोरी होऊच शकत नाही. अष्टौप्रहर माझी झोपडी कुणालाही सामावून घेण्यास सज्ज असते.असे असूनही चोर मात्र कधीच चोरी करत नाहीत.(कारण ऐहिक असते त्यालाच लोक मौल्यवान म्हणतात आणि आत्मिक अदृश्य चिरंतन असते त्याला मात्र सोडून देतात)

      जाता तया महाला

    ‘मज्जाव’शब्द आला

    भीती न यावयाला

     या झोपडीत माझ्या..

महालात तुम्ही सहज जावयाचे म्हणले तर पहारेकरी लगेच अडवतात,आत जायला मज्जाव अर्थात बंदी असते पण इकडं माझ्या झोपडीच्या शब्दकोशात मज्जाव हा शब्दच नाही.ती कुणालाही सहजच आत सामावून घेते.कुठलाही पहारेकरी तुम्हाला दरडावणार नाही की भीतीही घालणार नाही.सहजच कुणीही यावे न माझ्या झोपडीत विसावावे.

       महाली मऊ बिछाने

   कंदील श्यामदाने

    आम्हा जमीन माने

     या झोपडीत माझ्या..

महालात सर्वांना झोपायला मऊ मऊ बिछाने असतात.परांच्या गाद्या,मऊ उश्या डोक्याखाली, पांघरायला ऊबदार पांघरुण असतात.वर छताला छान छान ,आकर्षक झुंबरे,प्रकाशासाठी कंदील- शामदाने लटकवलेली असतात.छान,शांत झोपेसाठी सर्वप्रकारच्या सोयी सुविधा केलेल्या असतात पण तरीही सुखाच्या झोपेची शाश्वती नसते; मात्र आमच्या झोपडीत जमीन अंथरायला, आभाळ पांघरायला असते,जमिनीला पाठ लागताच शांत सुखाची झोप लागते.

      येता तरी सुखे या

    जाता तरी सुखे जा

    कोणावरी ना बोजा

     या झोपडीत माझ्या..

महालात जाताना सर्वसामान्य माणसाला एक अनामिक भीती,दडपण असते.तिथल्या भव्य -दिव्यपणाने उर दडपतो; पण झोपडीत तुम्हाला असे काही वाटणार नाही.माझ्या या झोपडीत प्रत्येकाने कधीही केंव्हाही आनंदाने यावे-जावे,इथं कुठलंच भय नाही की अवघडलेपण वाटणार नाही.

      पाहून सौख्य माझे

       देवेन्द्र तो ही लाजे

        शांती सदा विराजे

         या झोपडीत माझ्या..

असं हे झोपडीतलं वैभव आणि सौख्य पाहून प्रत्यक्षात इंद्राला सुद्धा लाज वाटते,इंद्रसुद्धा माझ्या झोपडीचा आणि तेथील सौख्याचा हेवा करतो,यापेक्षा झोपडीतली महानता मी काय वर्णावी?माझ्या या झोपडीत नेहमीच शांतता वसते.आणि जिथे शांती तिथेच सौख्य आणि समाधानही.

अगदी साध्या सोप्या शब्दात तुकडोजी आपल्या झोपडीचे वर्णन करतात.माणसाचे चित्त समाधानी असेल तर त्याला कोणत्याही भौतिक ऐश्वर्याची गरज नसते हेच यातून सूचित होते.माणूस भौतिक सुखांच्या मागे लागतो आणि चिरंतन,शाश्वत मनाची शांती हरवून बसतो.कितीही सुख मिळाले तरी त्याचे मन भरत नाही आणि हाव सुटत राहते.यातच त्याचे मानसिक स्वास्थ्य हरवते आणि सुखाची निद्रा देखील.

एखाद्या शेतकऱ्याच्या बांधावरील खोपसुद्धा अशीच असते ना?खोपीत सुद्धा हेच सुख असते.

काय नसते या झोपडीत?

समोरील शेत शिवार,नाना पाखरांचे नाना आवाज,भिरभिरता मोकळा वारा,काम करून भूक लागल्यावर खाल्लेली अमृताहून रुचकर खर्डा भाकरी महालातील पंच पक्वान्नाला मागे सारते.

सुखाचे परिमाण आपल्या मनातच असते.म्हणूनच महालात सर्व सुखे असून तिथली माणसे सुखी असतीलच असे नाही आणि झोपडीत काही नाही म्हणून तिथली माणसे दुःखी असतीलच असेही नाही.

© सौ.सुचित्रा पवार 

तासगाव, सांगली

8055690240

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – आत गोडवा वर काटेरी – ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

?आत गोडवा वर काटेरी – ? ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

वरवरचे हे रूप तुझे रे

ऊगा कशाला असे दावशी ?

बाहेरून तू ओबडधोबड

पोटी तुझ्या रे अमृत  राशी

काही चांगले हवे असे तर

कष्टायाची करा तयारी

हेच सांगते रूप तुझे रे

आत गोडवा वर काटेरी

मिळवायास्तव गरे आतले

हवीच असते शक्ति युक्ति

सहज लाभे तुझा गोडवा

प्रयत्नांवर असावी भक्ति

चित्र साभार –सुश्री नीलांबरी शिर्के

© सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आवेग… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ आवेग… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

कृष्णमेघ पावसाचे,

नभात जमले होते.

इतिवृत्त पावसाचे,

वार्‍यास ज्ञात होते.

बेबनाव पावसाचे,

पूर्वनियोजित होते.

अंदाज पावसाचे,

माझेच चुकले होते.

वाटेत एकटा मी,

अनभिज्ञ पुरता होतो.

गनिम पावसाने मज,

चाैफेर घेरले होते.

या थरारनाट्यांनी,

मी थिजून गेलो होतो.

आंधळ्या आवेगांनी,

चिंबचिंब भिजलो होतो.

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंजना जी यांचे साहित्य # 137 – हरवलेले माणूसपण ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे ☆

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

? कवितेचा उत्सव ?

☆ रंजना जी यांचे साहित्य # 137 – हरवलेले माणूसपण ☆

समृध्दीने नटलेल घर पाहून हरवले देहभान ।

शोधून सापडेना कुठेही हरवलेले माणूसपण ।।धृ।।

 

कुत्र्या पासून सावध राहा भलीमोठी पाटी।

भारतीय स्वागताची आस ठरली खोटी।

शहानिशा करून सारी आत घेई वॉचमन ।।१।।

 

झगमगाट पाहून सारा पडले मोठे कोडे ।

सोडायचे कुठे राव हे तुटलेले जोडे ।

ओशाळल्या मनाने कोपऱ्यात ठेऊन ।।२।।

 

सोफा टीव्ही एसी सारा चकचकीतच मामला।

पाण्यासाठी जीव मात्र वाट पाहून दमला ।

नोकराने आणले पाणी भागली शेवटी तहान ।।३।।

 

भव्य प्रासादातील तीन जीव पाहून ।

श्रीमंतीच्या कोंदणाने गेलो पुरता हेलावून ।

चहावरच निघालो अखेर रामराम ठोकून।।४।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares