मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “प्रेम…” – कविवर्य कुसुमाग्रज ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “प्रेम…” – कविवर्य कुसुमाग्रज ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

प्रेम

प्रेम कुणावर करावं ?

प्रेम कुणावरही करावं.

 

प्रेम

राधेच्या वत्सल स्तनांवर करावं,

कुब्जेच्या विद्रुप कुबड्यावर करावं,

भीष्म द्रोणाच्या थकलेल्या चरणावर करावं,

दुर्योधन कर्णाच्या आभिमानी,

अपराजित मरणावर करावं

प्रेम कुणावर ही करावं.

 

प्रेम

रुक्मिणीच्या लालस ओठावर् करावं,

वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं,

मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं,

प्रेम काळजाच्या नात्यावर करावं,

आणि खड्गाच्या पात्यावरही करावं

प्रेम कुणावर ही करावं.

 

प्रेम

ज्याला तारायचाय त्याच्यावर तर करावंच

पण ज्याला मारायचंय त्याच्यावरही करावं,

प्रेम योगावर करावं,

प्रेम भोगावर करावं,

आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं,

 

प्रेम

प्रेम कुणावर करावं

प्रेम कुणावरही करावं.

कविवर्य वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज)‍

प्रस्तुती : सौ. उज्ज्वला केळकर 

संपर्क – निलगिरी, सी-५ , बिल्डिंग नं २९, ०-३  सेक्टर – ५, सी. बी. डी. –  नवी मुंबई , पिन – ४००६१४ महाराष्ट्र

मो.  836 925 2454, email-id – [email protected] 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माणूसपण… ☆ श्री सुजित कदम  ☆

श्री सुजित कदम

 

? कवितेचा उत्सव ?

☆ माणूसपण… ☆ 

☆ 

परवा ह्या झाडाखाली बसलो

तेव्हा खूप छान वाटलं

आज त्याचे हाल पाहून

टचकन डोळ्यात पाणी दाटलं..!

 

म्हटलं विचारावं झाडाला

नक्की झालं तरी काय?

कोणत्या नराधमाने

त्याचे तोडले हात पाय

 

मी म्हटलं… ऐकना रे झाडा

तुझ्याशी थोडं बोलायचंय

तुझ्या मनातलं आज मला

सारं काही ऐकायचंय..!

 

सुरवातीला झाड …

काही एक बोललं नाही;

आणि नंतर कितीतरी वेळ

त्याचं रडणं काही थांबलं नाही..!

 

मी म्हटलं झाडा असं

रडू नको थांब

काय झालं एकदा

मला तरी सांग

 

काय सांगू मित्रा तुला

झालं काल काय ..?

कुणीतरी येऊन माझे

तोडू लागलं पाय..!

 

पायाबरोबर जेव्हा माझे

हात सुध्दा तोडू लागले

तेव्हा मात्र माझ्या मनातले

माणूसपण पुसू लागले..!

 

मी जोर जोरात

ओरडत होतो

पण ऐकलं नाही कुणी

आणि तेव्हा कळलं देवानं

आपल्याला दिली नाही वाणी.

 

काय चूक झाली माझी

मला सुद्धा कळलं नाही

इतकी वर्षे सावली दिली

ती कुणालाच कशी दिसली नाही..?

 

कुणीतरी म्हटलं तितक्यात

उद्या येऊन झाडाचे बारीक तुकडे करा..!

बारीक बारीक तुकडे नंतर

गाडीमध्ये भरा…!

 

अरे सावली देणारे हातांचे

असं कुणी तुकडे तुकडे करतं का..?

तूच सांग मित्रा माणसांचं

हे वागणं तुला तरी पटतं का..?

 

माझे हाल झाले त्याचं..

मला काहीच वाटत नाही

पण..आज परतून येणा-या पाखरांना

त्याचं घर मात्र दिसणार नाही

 

मित्रा…

झाडांमध्ये ही जीव असतो

हे माणसांना आता कळायला हवं

आणि आमचा आवाज ऐकू येईल

इतकं माणूसपण तरी टिकायला हवं..!

© श्री सुजित कदम

मो.7276282626

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ऋणानुबंध… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रा. सौ. सुमती पवार

? कवितेचा उत्सव ?

☆ ऋणानुबंध… ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆

प्रथम ऋण ते परमेशाचे जन्म देतो तोच आम्हा

उठल्यावरती म्हणत चला हो, रामा रामा हरे रामा

उपकृत करते वसुंधरा हो ऋण किती ते मोजा ना

गणना करता सरेल आयु ध्यानी मनी हो तुम्ही घ्याना…

*

चंद्र सूर्य हे रोज उगवती करून पहाना सेवा अशी

हात जोडूनी उभा ठाकतो सहस्त्ररश्मी दाराशी

मातपिता ते कसे मी वर्णू अनंत त्यांचे ऋण शिरी

रक्षणकरण्या पाठवतो तो परमदयाळू श्रीहरी..

*

वसुंधरेची बाळे सारी वृक्ष नि वेली उद्याने

किती फुलवली वसुंधरा ती अमाप त्या सौंदर्याने

पिकपाणी नि धनधान्ये ती खनिजे पाणी रत्ने ही

किती ते देणे वसुंधरेचे अफाट पडतो पाऊस ही…

*

राती चांदणे फुलते कसे हो कुंभ सांडती धरेवरी

रजतपटी तो खेळ खेळतो खड्या चांदणी श्रीहरी

नक्षत्रे ती किती मनोहर  नयनपारणे फिटते हो

झुंबर चंद्राचे ते पाहून मनच हरखून जाते हो…

*

वारे वाहती नद्या हासती प्रपात कोसळती मोदे

आम्ही देतो इतके म्हणूनी कधीच केले ना सौदे

अफाट आहे ऋण धरतीचे नारायण तो कृष्णाचे

म्हणून म्हणते व्हा उतराई मुखी नाम राहो त्यांचे…

© प्रा.सौ.सुमती पवार 

 नाशिक

मो. ९७६३६०५६४२; ईमेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – बिंब – प्रतिबिंब – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

सुश्री ज्योत्स्ना तानवडे

?️?  चित्रकाव्य  ?️?

? – बिंब – प्रतिबिंब – ☆ सुश्री ज्योत्स्ना तानवडे ☆

बिंबाचे हे प्रतिबिंब 

किती दिसते साजिरे 

बसे मायेच्या कुशीत 

पहा दृष्टी भिरभिरे ||

*

वात्सल्याच्या पदराला 

कशी घेते लपेटून 

अनुकरण आईचे

दिसे भारीच शोभून ||

*

मायलेकीतली नाळ 

असे घट्ट बांधलेली 

तिच्या भावी आयुष्याची 

स्वप्नं उरी दाटलेली ||

*

कष्ट मायेचे बघते 

जाण लेकीत रुजते 

लेकीसाठी राबताना 

माय स्वप्नात रंगते ||

*

स्वप्नं माझी हरवली 

लेक आणील सत्यात

तिच्या रूपाने लाभले 

बळ कष्टांना हातात ||

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मराठी कविता ☆ कवितेच्या प्रदेशात # 260 ☆ राधा… ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

सुश्री प्रभा सोनवणे

? कवितेच्या प्रदेशात # 260 ?

राधा ☆ सुश्री प्रभा सोनवणे ☆

☆ 

चंदेरी रात्र

कालिंदी पात्र

उत्सुक गात्र

राधा आतुरली !

 *

कृष्णाचा छंद

मोगरी गंध

प्रीतीत दंग

राधा सुखावली!

 *

विरह शाप

अधुरे माप

तृष्णेत ताप

राधा दुखावली !

शीतल छाया

चंदनी काया

मोहन माया

राधा विसावली !

© प्रभा सोनवणे

संपर्क – “सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार

पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माघाची थंडी… ☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆

सौ. ज्योती कुळकर्णी 

? कवितेचा उत्सव ?

☆ माघाची थंडी ..☆ सौ. ज्योती कुळकर्णी ☆  

माघामधली थंडी केवढी सोसना बाई

बळीराजाचं सोनं घेतलं बनवली रजई

*

शेतकर्‍याचं जिणं किरपा हो अस्मानी

मालाला त्याच्या भाव दया सुलतानी

पैका नसता त्याला माल इकायची घाई

बळीराजाचं सोनं घेतलं बनवली रजई

*

कष्टानं फुलवितो बाई माजा भावं शेती

पांढरं सोनं पिकवितो काळी काळी माती

पान्याचा धिंगाना उरलं सुरलं हाटात नेई

बळीराजाचं सोनं घेतलं बनवली रजई

*

धनी माझं घरी आलं शेकोटीला बसलं

भाकर अन चटणी खाऊन मन तृप्त जालं

निजायला मी मग हंथरली हो चटई

बळीराजाचं सोनं घेतलं बनवली रजई

*

माघामधली थंडी केवढी सोसना बाई

बळीराजाचं सोनं घेतलं बनवली रजई

 

© सौ. ज्योती कुळकर्णी

अकोला

मोबा. नं. ९८२२१०९६२४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती #271 ☆ दळते वाळू… ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

? अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 271 ?

दळते वाळू ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे ☆

º

हजार वर्षे दगड घासतो बनते वाळू

किती दूरवर नदी सोबती फिरते वाळू

º

प्रपात पडतो खूप वरूनी दरीत कायम

त्याच्यासोबत वरून खाली पडते वाळू

º

पारदर्शिता वाळूमधली कुणा न दिसली

हे काचेचे रुपडे म्हणजे असते वाळू

º

सिमेंट आणिक वाळूचे या होता मिश्रण

का भीमेच्या पात्रामधली मळते वाळू

º

उघड्यावरती मस्त वावरे जरी कालवर

दोन विटांच्या मधेच आता लपते वाळू

*

नव्या युगाला आरामाची सवय लागली

तेलासाठी ती म्हातारी दळते वाळू

º

या वाळूची सवय अशी की गळून जाते

मरते वेळी अपुल्या हाती नसते वाळू

º

पाठीवरच्या रेषा *

º

तो ओठाने चुंबुन घेई, ओठावरच्या रेषा

भविष्य समजत नाही पाही, हातावरच्या रेषा

º

गप्पांसोबत वाळूवरती, कधी मारल्या होत्या

कुठे राहिल्या पुसून गेल्या, काठावरच्या रेषा

º

तिची काळजी दिसते आहे, मुखकमळावर सारी

जेव्हा जेव्हा पहात होतो, भाळावरच्या रेषा

º

जशी कातडी सोलावी तो, तसेच सोलत होता

तरी जागच्या हलल्या नाही, देठावरच्या रेषा

º

गर्भवतीचा ताण उतरला, बाळाच्या येण्याने

तडतडलेल्या सांगत होत्या, पोटावरच्या रेषा

º

किती सोसले सांगत नाही, काही ती तोंडाने

परंतु सारे सांगत होत्या, पाठीवरच्या रेषा

º

इतिहासाने नोंद घेतली, दोनचार नेत्यांची

सळसळ करती आंदमानच्या, बेटावरच्या रेषा

© श्री अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विलाप… ☆ श्रीशैल चौगुले ☆

श्रीशैल चौगुले

? कवितेचा उत्सव ?

☆ विलाप… ☆ श्रीशैल चौगुले ☆

तुझे-माझे म्हणता-म्हणता

निघून जाते सारे आयुष्य

मनातले संकल्प-विकल्प

मागे पडून राहे भविष्य.

*

अल्लड मेळा तारुण्य शाळा

वाट ऋणांची करे सोबत

हृदयी पक्षी विरह स्मृती

कधी काळांचे खेळ नौबत.

*

असे आभाळ नयनी दाटे

पुन्हा मिठीत सत्य दर्पण

जर्जर पाहून धीर सुटे

तेंव्हा मी पण दुःखा अर्पण.

 

© श्रीशैल चौगुले

मो. ९६७३०१२०९०.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ माहेर नसलेल्या मुली… – कवयित्री: सौ. लक्ष्मी यादव ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ माहेर नसलेल्या मुली… – कवयित्री: सौ. लक्ष्मी यादव ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर

माहेर नसलेल्या मुली

कुठं जात असतील सणावाराला?

सासरी थकून गेल्यावर

चार दिवसांच्या माहेरपणाला?

 

कुणाला सांगत असतील

नवऱ्यानं झोडपल्यावर

भरलेल्या घरात

पोरकं पोरकं वाटल्यावर?

माहेर नसलेल्या मुलींचं

गाव कोणतं असेल?

 

कुठून घेत असतील त्या साडी चोळी

कुणाला बांधत असतील राखी

वडील भावाची ढाल नाही म्हणून

त्या नेहमी भिऊन राहत असतील का जगाला?

दुसऱ्यांच्या आईचा खरखरीत हात

नातवांच्या तोंडावरून मायेनं फिरताना पाहून

काळीज जळत असेल का त्यांचं?

 

माहेर नसलेली मुलगी

आपल्या लेकरांना कसं सांगत असेल

मामा- मामी आजी- आजोबा या हक्काच्या नात्यांबद्दल?

मामाच्या गावाला जायचं

गात असतील का तिचीपण मुलं?

 

आईनं दिलेल्या वानवळ्याच्या पिशव्या कोणी पोचवत असेल का त्यांना?

बापानं उष्टावून आणलेला रानातला पेरू

कधी मिळत असेल का त्यांना खायला?

 

माहेर नसलेल्या मुली

निवांत झोपू शकत असतील का कुठं

जिथून त्यांना कुणीही लवकर उठवणार नाही?

कधी घेत असतील का त्या मोकळा श्वास

फक्त त्यांचाच अधिकार असलेला?

 

माहेर नसलेल्या मुलींना

येत असतील का रोज आईचे फोन

तू बरी हाईस का विचारणारे?

कधी तिला आवडतं म्हणून घरात काही बनतं का

की ती उपाशी निजली

तरी कुणाच्या लक्षातही येत नसेल?

 

माहेर नसलेल्या मुलींचे हुंदके

विरत असतील का हवेत

कुणीही तिला उराशी न कवटाळता?

किंकाळी फोडून रडावं

अशी कूस असलेली जागा मिळते का त्यांना कधी कुठं?

 

माहेरचा आधार नाही म्हणून

माहेर नसलेल्या मुलींना

जास्तच छळत नसेल ना नवरा?

त्रास असह्य झाल्यावर

माहेरला निघून जाईन

अशी धमकी देत असतील का त्या नवऱ्याला?

घर सोडून कुठंतरी जावं या भावनेनं

हजारदा भरलेली पिशवी पुन्हा फडताळात ठेवताना

 चिंध्या होत असतील का त्यांच्या काळजाच्या?

 

माहेरची माणसं असूनही

माहेर नसलेल्या मुलींची वेदना खोल

की माहेरच्या माणसाचा मागमूसही न राहिलेल्या मुलीची जखम ओली

हे ठरवता येत नाही

 

माहेर नसलेल्या मुली

त्यांच्या लेकी-सुनांचं माहेर बनून

भरून काढत असतील का

स्वत:ला माहेर नसण्याची उणीव?

 

माहेर नसलेल्या मुलींना

आयुष्याच्या शेवटाला

कोण नेसवत असेल माहेरची साडी

की निघून जात असतील त्या

या जगातून

‘माहेर नसलेली मुलगी’

हेच नाव धारण करून?

कवयित्री : सौ. लक्ष्मी यादव  

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ – शेवटी हात रिकामेच… – ☆ श्री आशिष बिवलकर ☆

श्री आशिष  बिवलकर

?️?  चित्रकाव्य  ?️?

? शेवटी हात रिकामेच? श्री आशिष  बिवलकर ☆

जोडून कवडी कवडी,

व्यवसाय धंदा वाढवत नेला।

सारं काही सोडून येथे,

रिकाम्या हाती एकटाच तो गेला।

*

दिलखुलास स्वभाव त्याचा,

एक एक माणूस जोडत गेला।

साध्या मराठी माणसाचा,

दिलदार शेट नकळतच झाला।

*

अपार कष्ट उपसले त्याने,

नशीब देत गेलं त्याला साथ।

धावपळीत विसरला मात्र,

उत्तम आरोग्याची मुख्य बात।

*

अक्षम्य दुर्लक्ष केलं स्वतःकडे,

हात पाय पसरण्याचा लागला ध्यास।

काय लागत जगायला जगी,

सुखाची निद्रा आणि खळगीत घास।

*

उत्तम आरोग्य -कौटुंबिक स्वास्थ्य,

यावर असते जीवनाची खरी भिस्त।

बाकी कमावणं -गमावणं गौण सारं,

मोह टाळायाची असायला हवी शिस्त।

*

प्रत्येकाने काही क्षण थांबून जरा,

स्वतः आत्मचिंतन नक्कीच करावं।

कुठे होतो-कुठे आहे-कुठे जायचं,

आध्यात्मिक विचार करुन ठरवावं।

*

प्रत्येक जन्माला येणारा,

कधी ना कधी जाणारच असतो।

मृत्यू सर्वांग सोहळा,

काळ जगाला दाखवतच राहतो।

वास्तवरंग

© श्री आशिष  बिवलकर

बदलापूर

मो 9518942105

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares