श्री सुजित कदम
☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #80 ☆
☆ गाणं..! ☆
आज इतके दिवसं झाले पण
पाखरं काही घरट्याकडे परतून आली नाही
जेव्हा पासून ह्या गर्द हिरव्या
पांनानी माझी साथ सोडली ना
तेव्हा पासून ह्या पाखरांनी ही
माझ्याकडे पाठ फिरवलीय
की काय कळत नाही…!
आता पहाटेचं कुणी
माझ्या तळहातावर बसून गाण
गात नाही…. आणि
आपल्या मनातलं काहीच
कुणी आता माझ्या कानात
कुजबुजत नाही…
इतक्या दिवसांत
सवय झालीय म्हणा आता
ह्या गोष्टींची
पण तरीही वाटतं
म्हातारपणात कुणाचा तरी
आधार असलेला बरा..!
सतत वाटतं राहतं
पाखरांनी यावं माझ्या तळहातावर
बसावं हवं तेवढा वेळ
गाणं म्हणावं…,
आता..! सावली देण्याइतके माझे
हात मजबूत राहीले
नसतील कदाचित…
पण इतकी वर्षे
सावली दिलेले,हे हातचं तुम्हाला
बोलावतायत ‘या… या…’
निदान ह्या हातांनी
माझी साथ सोडायच्या आत
मला एकदातरी भेटून जा…. !
माझ्या तळहातावर बसून
माझ्या साठी एखादं तरी गाणं गाऊन जा…!!
© सुजित कदम
पुणे, महाराष्ट्र
मो.७२७६२८२६२६
≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈