सुश्री प्रभा सोनवणे
☆ गझल ☆
होता इथून मागे तो वाद संपवावा
ठेऊ नको सख्या तू दोघात हा दुरावा
हातात हात देता झाले तुझीच भार्या
देवा नि ब्राह्मणांचा का लागतो पुरावा ?
मेंदीत जीव रंगे, हळदीत देह सारा
सोडून दूर आले माझ्या सुरेख गावा
आयुष्य नोंदले मी नावे तुझ्याच तेव्हा
लक्षात घेतला ना कुठलाच बारकावा
संसार ,मोह ,माया असतोच एक धोका
त्याच्या पल्याड जाण्या सन्मार्ग आचरावा
सौख्यास भोगले की वैराग्ययोग आला
साराच सोहळा हा आजन्म गौरवावा
सांजावता दिशा या बघ वेध लागले ना
नांदू जरा सुखाने, दे शेवटी विसावा
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011