कवितेचा उत्सव
☆ सप्तदशी स्वातंत्र्याची ☆ श्री हरिश्चंद्र कोठावडे ☆
मध्यरातिच्या घन अंधारी
उष:काल हो स्वातंत्र्याचा
लख्ख उजळल्या दहा दिशाही
अनुपम उत्सव नवस्वप्नांचा !
किती हुतात्मे,क्रांतिवीरही
झिजले, भिडले शतमरणांना
देशभक्तिचा उरी निखारा
अर्पण समिधा शतयज्ञांना !
देश दुभंगे,भिजले रुधिरी
निशाण अर्धे स्वातंत्र्याचे
दिव्यप्रभेवर स्वातंत्र्याच्या
पडले सावट शोककथेचे !
पुसून अश्रू, विसरुन जखमा
तिमिर निघाला प्रकाशाकडे
सर करण्याला उन्नत शिखरे
धाव मातिची नभापलिकडे !
संविधान मग येता जन्मा
सार्वभौम हा देश जाहला
शतकोटीच्या क्षितिजावरती
पुन्हा नव्याने सूर्य उगवला !
संविधान हे तंत्र न केवळ
गणराज्याचा मंत्र हा महा
समान संधी ,अभिव्यक्तीचा
विशाल व्यापक मंच हा महा !
शुभ्र कबूतर विश्वशांतिचे
नीलाकाशी मुक्त सोडले
पण सीमेवर त्रयदा त्याचे
पंख फाटले,रक्त सांडले !
अवर्षणाचा शाप भयंकर
शापावर उ:शाप शोधले
महानद्यांना बांध घालुनी
क्षेत्र कृषीचे सिंचित केले !
पोखरणीचा धूमधडाका
‘बुद्धहि हसला’ गालोगाली
व्यर्थ अहिंसा बलहीनांची
शांति राखितो शक्तीशाली !
प्रज्ञा,प्रतिभा उदंड येथे
देशविदेशी अपुले झेंडे
सक्षम, उत्सुक तरुणाईही
जिंकायाला सारी क्षितिजे !
प्रबोधनाचे सूर्य तळपले
तरी न सरली पुरती राती
अजून येथे खुशाल शाबुत
धर्मजातिच्या विषाक्त भिंती !
‘आहे’ आणिक ‘नाही’ मधले
सरावयाचे कधि रे अंतर
शाप भुकेचा अन् दास्याचा
दारोदारी अपरंपार !.…..
उत्थानास्तव पददलितांच्या
कोट्यवधींचे भरले रांजण
सदैव गळका रांजण रांजण
शुक्राचार्या झारी आंदण !
कायद्यातले उरले ‘लेटर’
बाष्पीभुत रे ‘स्पिरीट’ सारे
न्यायव्यवस्था संपन्नांस्तव
बंद विपन्ना तिची कवाडे !
पदी निखारे धगधगणारे
अजून यात्रा ती अनवाणी
स्वातंत्र्याच्या गंगौघाचे
जिथे पोचले नाही पाणी !
सप्तदशीचा प्रवास सरला
वळुन पाहिले थोडे मागे
किती विणले नि किती उसवले
भारतभूचे रंगित धागे !
© श्री हरिश्चंद्र कोठावडे
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈