श्री तुकाराम दादा पाटील
☆ कवितेचा उत्सव ☆ ओवी…. ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆
जगायचे तर आनंदाने जगणे सुंदर आहे
भवसागर हा तरण्यासाठी म्हणती दुर्धर आहे
कर्म धर्म तर गोंदण होते जन्मासोबत भाळी
जगणे मरणे याच्या मधले जीवन अंतर आहे
सुरुवातीचे परावलंबन सरते उरते काही
कर्म चांगले देते किर्ती उरणे नंतर आहे
परावलंबन सरते तेव्हा स्वावलंबनी व्हावे
निसर्गातली अदभुत शक्ती इथे निरंतर आहे
विशाल जगती नवीनतेची नवी योजना मांडा
जग झुलवाया हाती तुमच्या मोठा अवसर आहे
प्रेम आंधळे नका म्हणू ना ते तर डोळस आहे
सुखी व्हायचे दोघा वरती सगळे निर्भर आहे
लळा जिव्हाळा प्रेम वाढवा माणुसकीचे नाते
तुमच्यासाठी हे जग दुसरे मायेचे घर आहे
दु:ख दळायला बसताना ही गीत सुखाचे गावे
संसाराची होते ओवी हेच बरोबर आहे
© श्री तुकाराम दादा पाटील
मुळचा पत्ता – मु.पो. भोसे ता.मिरज जि.सांगली
सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३
दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈