सुश्री नीलांबरी शिर्के
☆
वाडे गेले इमल्या गेल्या
काही वास्तू दुर्लक्षित झाल्या
मोक्याच्या ठिकाणच्या वास्तू
पाडून तिथे सदनिका झाल्या
*
वाड्यातला लळा जिव्हाळा
वडीलकीचा रुबाब आगळा
नात्यामधली ऊब नी माया
त्यावर बसला सारा धुरळा
*
गायी गुरांचे हंबर घुमती
दुधा तुपाची गेली श्रीमंती
काळाचा हा महिमा दाखवी
दुरावली सारी नातीगोती
*
काळासह चालायचे तर
मान्य करावे होईल ते ते
जडण घडण घराची बदले
मानसिकता का उगा बदलते
*
सदनिका असो वा छोटे घर
माणूस वसतो त्यात निरंतर
वागण्यातले बोलण्यातले
वाढत जाते कशास अंतर?
*
जो तो पाही आपल्यापुरते
मी माझे अन आमच्या पुरते
आई बापही अडचण होई
संस्कार संस्कृती मागे पडते
☆
© सुश्री नीलांबरी शिर्के