मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ श्रृंगार ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? कवितेचा उत्सव ?

☆ श्रृंगार ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ 

धरती न्हाती-धुती झाली

साज – शृंगार ग केला

घारा-धारांच्या हातांनी

मेघ कवळितो  तिला

 

मेघ कवळितो  तिला

स्वप्न उरात रुजले

तिच्या कुशीतूनी मग

रुजवण उगवले

 

रुजवण उगवले

गंधवार्ता दर्वंळली

धरित्रीच्या आंगोपांगी

साय सुखाची दाटली.

 

साय सुखाची दाटली.

मोती-दाणे कणसात

हिरव्या राव्यांचा ग थवा

आला उडत उडत

 

धरतीच्या ग ओठातून

हसू  तृप्तीचे सांडले

तृप्त माणसे, तृप्त  पक्षी

तृप्त चराचर झाले.

 

© श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कविता ☆ साप्ताहिक स्तम्भ # 85 – विजय साहित्य – स्त्री एक शिल्पकार . . . . ! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

कविराज विजय यशवंत सातपुते

☆ साप्ताहिक स्तम्भ # 85 – विजय साहित्य  ✒ स्त्री एक शिल्पकार . . . . ! ✒  कविराज विजय यशवंत सातपुते ☆

 

माता महती थोर तरीही

दर्जा दुय्यम का नारीला ?

समानतेचा पोकळ डंका

झळा आगीच्या स्री जातीला. . . . !

 

नाना क्षेत्री दिसते नारी

कुटुंब जपते जपते नाती

तरी अजूनी फुटे बांगडी

पणती साठी जळती वाती. . . . . !

 

साहित्य,कला,नी उद्यम जगती

नारीशक्ती सलाम तुजला

तरी  अजूनी आहे बुरखा

नारी जातीला म्हणती अबला. . . . !

 

शिल्पकार ही, आहे सबला

अग्नी परीक्षा नको तिची

स्वतः जगूनी आधार देते

दिव्यत्वाची घेत प्रचिती. . . !

 

आई, बाई, ताई, माई हाका केवळ

अजून वेशीवरती दिसते वेडी शालन

जातीपातीच्या अजून बेड्या पायी तुझीया

स्त्री मुक्तीचा स्वार्थी जागर की रामायण.

 

न्यायदेवता रूप नारीचे दृष्टिहीन का

भारतमाता प्रतिक शक्तीचे आभासी का

घरची लक्ष्मी अजून लंकेची पार्वती बनते

अजून पुरूषा बाई केवळ शोभा वाटे का?

 

रोज रकाने भरून वाहती होई अत्याचार

मुक्तीचा या  स्वैर चालतो घरीदारी बाजार

जाग माणसा माणूस होऊन नारी शक्ती नरा

स्त्री मुक्तीचा गाजावाजा थांबव हा बाजार.

 

शिल्पकार ही अभंग लेणे मंदिर ह्रदयीचे

हिच्या  अंतरी दडला ईश्वर साठे सौख्याचे

मनोमंदिरी करू प्रार्थना,  ऐशा नारीचे

माया, ममता, आणि करूणा लेणे भाग्याचे.

 

© कविराज विजय यशवंत सातपुते 

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  9371319798.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ग्रूपचं नातं ☆ संग्राहक – सुश्री प्रभा हर्षे

? इंद्रधनुष्य ?

ग्रूपचं नातं ☆ संग्राहक – सुश्री प्रभा हर्षे ☆

पायचं नातं म्हणून,

निर्माण केला ग्रुप..

सगळेच आपले म्हणून,

भावना जपा खूप..

 

कोणी दिला रिप्लाय,

म्हणून हुरळून जायचं नाही..

आणि नाही दिला रिप्लाय,

म्हणून खंत मानायची नाही..

 

सर्वांची मतं कायम,

एकसारखी असतील कशी..

नकारार्थी, सकारार्थी,

प्रत्येकाची वेगळी अशी..

 

राखायची असेल अबाधित,

एकमेकांची साथ..

तर द्यावाच लागतो सर्वांना,

प्रेमाचा हात..

 

प्रत्येकाचं मत,

वेगळं असायलाच हवं..

तरच घडेल इथे,

रोज काहीतरी नवं..

 

काय बरं होईल,

नावडत्या जोकवर हसलं तर..

मनातल्या भावना झाकून,

थोडसं फसलं तर..

 

फक्त एकच करा मित्रांनो,

वेळ काढा थोडा..

प्रत्येक जण असावा,

दुसऱ्यासाठी वेडा..

 

कधी गडबड, कधी बडबड,

कधी बरीच शांतता..

दाखवून द्या ना एकदा,

अंतरंगातील एकात्मता..

 

दुरावलेल्या दोन मनांत,

एक पूल बांधणारा..

एखादा असतोच ना,

निखळणारे दुवे सांधणारा..

 

ग्रुप असो नात्यांचा,

वा असो तो मित्रांचा..

आपल्या हजेरीने बनवा,

स्वप्नांमधल्या चित्रांचा..

 

©  सुश्री प्रभा हर्षे 

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एकच कविता मराठीच्या २८ बोली भाषांमध्ये ! – भाग तिसरा ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ एकच कविता मराठीच्या २८ बोली भाषांमध्ये ! – भाग तिसरा ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

इठ्ठल (पारधी अनुवाद)

पंढरपूरना आगंमांग

छ येक धाकली शाया ;

आख्खा छोकरा छं गोरा

यकजच छोकरो कुट्ट कायो!!

वचक्यो छं मस्त्या करस 

खोड करामं छं अट्टल 

मास्तर कवस करानू काय ? 

कतानै आवस व्हसो तेवतो इठ्ठल !!

प्रविण पवार 

            धुळे

========

इठ्ठल – (बंजारा अनुवाद)

पंढरपूरेर सिमेकन,

एक हालकी शाळा छ!

सारी पोरपोऱ्या गोरे,

एक छोरा कालोभुर छ!

दंगो करचं मस्ती करचं!

खोडी करेम छ अट्टल!!

मास्तर कचं कांयी करू?

काळोभूर न जाणो इ इठ्ठल!!

दिनेश राठोड

 चाळीसगाव

========

विठ्ठल – (वंजारी अनुवाद)

पंढरपुरना हुदफर 

हे एक बारकुली शाळ

हंदा पाेयरा हे गाेरा 

एक पाेयराे निववळ काळाे

केकाटत, मसती करत

खाेडयाे करवामा हे अटट्ल

 मासतर केत करवानाे काय

 न जाणाे हिवानाे विठठ्ल

सायली पिंपळे

        – पालघर

=========

विठ्ठल – (हिंदी अनुवाद)

पंढरपूर नगरमें द्वारसमीप

है एक अनोखी पाठशाला

सुंदर सारे विद्यार्थी वहाँ के

एक बच्चा भी हैं काला…।

उधम मचाये मस्तीमे मगन

है थोड़ा सा नटखटपन

गुरुजन कहे क्या करे जो

हो सकता हैं विट्ठल…।

सुनिल खंडेलवाल

पिंपरी चिंचवड़, पुणे

============

विट्टल – (कोळी अनुवाद)

पंढरपूरश्या  वेहीवर , 

एक हाय बारकी शाळा।                           

 जखली पोरा गोरी गोरी।     

त्या मनी एक हाय जाम काळा।      

दन्गो करता न मस्तीव करता        

खोडी करनार अट्टल।    

न मास्तर हानता काय करु            

न जाणो यो हयेन विट्टल।   

सुनंदा मेहेर

माहीम कोळीवाडा मुंबई

===============

इठ्ठल आगरी अनुवाद)

 पंढरपुरचे हाद्दीव,

हाय येक बारकीच शाला.

सगली पोरा हान गोरी,

येक पोर जामुच काला.

उन्नार मस्ती करतय जाम,

खोऱ्या करन्यान वस्ताद हाय.

गुरूजी सांगतान करनार काय,

नयत त आसल तो इठ्ठल.

निलम पाटील 

बिलालपाडा,नालासोपारा

================

विट्टल – (झाडीबोली)

पंढरपूराच्या सीवेपासी

आहे एक नआनसी स्याळा

सर्वी पोरे आहेत भुरे

एक पोरगा भलता कारा 

दंगा करतो मस्ती करतो

गदुल्या करण्यात अव्वल

मास्तर म्हणत्ये करणार काय ?

न जानो असल विट्टल !

रणदीप बिसने

       – नागपूर

========

 

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ म्हणींचा कविता .. माती ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

? कवितेचा उत्सव ?

☆ म्हणींचा कविता .. माती   ☆ श्रीमती अनिता जयंत खाडीलकर ☆ 

(म्हणी व वाक्प्रचार यांचा वापर करून केलेली कविता)

आज काय ‘मातीला मोल आले’आहे

सर्वांच्याच ‘ओठी बोल आले’आहेत

शिवरायांनी कित्येकदा ‘शत्रूला चारली माती’

मराठ्यांच्या मावळ्यांनी ‘शत्रुची केली माती’

शेतकरी ‘कष्ट करून’ ‘करतो मातीचे सोने’

‘गर्वाने फुगता’जास्त

राग येता मनी

 त्याची ‘करू वाटे माती’

कुठलीही गोष्ट ‘अती करता’ होते ‘अती तिथे माती’

जरी मानवाने प्रगतीसाठी आज ‘लावली जीवाची बाजी’

परी याच प्रगतीने ‘मातीमोल केल्या’कित्येक गोष्टी

अन् तशाच ‘दुर्मिळ केल्या’कित्येक गोष्टी

कमी झाली माणुसकी अन् ‘वाढली लापर्वाही’

सिमेंटचे ‘ जंगल वाढले’

बहू अन्

प्रदूषण झाले अती म्हणूनी ‘आठवते माती’

‘हातूनी गुन्हा घडता’ लोक म्हणती ‘खाल्लीस का रे माती’

नोकरीनिमित्त ‘परदेशी गमन करता’मायभूची ‘आठवते माती’

कितीही प्रगती झाली तरीही ‘असुद्या मनी भक्ती’

‘जाणीव ठेवा’ मनी मायभूमीची

संत म्हणती ‘सोनेचांदी आम्हा म्रुत्तीके समान’

भरपूर प्रगती करून ‘उंचवू मान ‘ देशाची

 

© श्रीमती अनिता जयंत खाडीलकर

सह्याद्री अपार्टमेंट, खाडीलकर गल्ली, बालगंधर्व नाट्यमंदिर समोर, ब्राह्मणपुरी, मिरज,जि. सांगली

मो 9689896341

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सूर्योदय स्वातंत्र्याचा  ☆ सौ. जस्मिन रमजान शेख

? कवितेचा उत्सव ?

☆ सूर्योदय स्वातंत्र्याचा  ☆ सौ. जस्मिन रमजान शेख ☆ 

छाताडावरी झेलूनी ‘वार’

ते  धारातिर्थी  पडले,

भारतमातेसाठी किती

 स्वातंत्र्यवीर हे लढले… !!

 

कुणी पुत्र ,कुणी पिता

कुणाचा कुंकू भाळीचा,

मातेच्या स्वातंत्र्यासाठी

त्याग सर्व या नात्यांचा… !!

 

‘साखळदंडी’ पाहुनी माता

वीरपुत्रांची गर्जे ललकारी,

देऊनी आहुती सर्वस्वाची

मातेचा जयजयकार करी… !!

 

नका विसरू तरुणांनो,

गाथा शूरवीर रत्नांच्या,

सूर्यास्त करुनी प्राणांचा

सूर्योदय दिला स्वातंत्र्याचा… !!

 

एकात्मतेचा ध्यास धरुनी

प्रगतीने उंचवू आपली मान,

सातासमुद्रापार चला वाढवू

जननी ‘जन्मभूमीची’ शान… !!

 

© सौ. जस्मिन रमजान शेख

मिरज जि. सांगली

9881584475

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ एकच कविता मराठीच्या २८ बोली भाषांमध्ये ! – भाग दुसरा ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ एकच कविता मराठीच्या २८ बोली भाषांमध्ये ! – भाग दुसरा ☆ प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर☆ 

इठ्ठल – (बागलाणी अहिराणी) 

पंढरपूर नी येसपन

शे एक उलशी शाळा

सर्वा पोऱ्या गोरापान

येकच पोरगा कुट्ट काळा!

दंगा करस मस्ती करस

खोड्या काढा मा शे अट्टल

मास्तर म्हणतस करवा काय

न जाणो व्हयी इठ्ठल!

वैभव तुपे

 – इगतपुरी 

=======

इठ्ठल  (आदिवासी तडवीभिल बोली)

पंढरपूरची शिवंजवळं

ह एक लहानी शायी

सबन पोऱ्हा हती गोऱ्या

एक पोऱ्या ह कायाकुच

गोंदय करतो मस्ती करतो

खोळ्या करवात ह अट्टल

मास्तर म्हणतंहती करशान काय ?

कोणाल माहित हुईन इठ्ठल

रमजान गुलाब तडवी

– बोरखेडा खुर्द ता. यावल

================

विठ्ठल – (वऱ्हाडी बोली)

पंढरपूरच्या येशीजोळ

लहानचुकली शाळा हाये;

सबन लेकरं हायेत उजय

यक पोरगं कायंशार॥

दांगळो करते, मस्त्या करते

खोळ्या कर्‍याले अट्टल.

गुर्जी म्हंतात कराव काय?

न जानो अशीन विठ्ठल ॥

  अरविंद शिंगाडे

           – खामगाव

===========

इठ्ठल –  (वऱ्हाडी अनुवाद)

पंढरपूरच्या वेसीजोळ

आहे एक लायनी शाळा

सारी पोर आहेत गोरी

एकच पोरगा डोमळा ॥

दंगा करते, दांगळो करते

खोळ्या करण्यात आहेत

पटाईत…

मास्तर म्हणते कराव काय

न जाणो अशीन इठ्ठल ।।

लोकमित्र संजय

            -नागपूर

==========

इठ्ठल – (आगरी अनुवाद)

पंढरपूरचे येशीजरी

यक हाय बारकीशी शाला

सगली पोरा हायीत गोरी

यक पोऱ्या कुट काला।।

दंगा करतंय मस्ती करतंय

खोऱ्या करन्यान हाय

अट्टल…

मास्तर बोलतान कराचा काय?

नायतं तो हासाचा इठ्ठल!

  तुषार म्हात्रे

   पिरकोन (उरण)

============

इट्टल (मालवणी अनुवाद)

पंडरपूराच्या येशीर 

एक शाळा आसा बारकी।

एकच पोरगो लय काळो:

बाकीची पोरां पिटासारकी।।

दंगो करता धुमशान घालता;

खोड्ये काडण्यात लय अट्टल।

मास्तर म्हणतंत करतंलास काय?

हयतोच निगाक शकता इट्टल।।

 मेघना जोशी

         – मालवण

==========

 

प्रस्तुति – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ देश माझा देवभूमी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

? कवितेचा उत्सव ?

देश माझा देवभूमी ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

दिन स्वातंत्र्योत्सवाचा

करू आनंदे साजरा

महामारी रोखूनिया

आश्वासिले घराघरा ||१||

 

देश आपुला महान

शूरवीर नररत्नं

ज्ञान विज्ञान अध्यात्म

साऱ्या कलांचीही खाण ||२||

 

कार्यक्षम युवाशक्ती

आहे संपत्ती देशाची

राखू देश सुरक्षित

कास धरू प्रगतीची ||३||

 

हक्कांसाठी भांडताना

कर्तव्यास नित्य स्मरू

स्वतःआधी देश हीत

ऐसे आचरण करू ||४||

 

विसरूनी भेदाभेद

बळ एकीचे जाणत

देशासाठी संघटीत

राहू नित्य कार्यरत ||५||

 

नैसर्गिक संपन्नता

देश आहे भाग्यवान

निसर्गास या जपून

करू देश बलवान ||६||

 

नाव देशाचे उज्ज्वल

त्याग, शौर्याने करूया

देश माझा देवभूमी

तिचे श्रेष्ठत्व राखूया ||७||

 

© सौ.ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सप्तदशी स्वातंत्र्याची ☆ श्री हरिश्चंद्र कोठावडे

? कवितेचा उत्सव ?

☆ सप्तदशी स्वातंत्र्याची ☆ श्री हरिश्चंद्र कोठावडे ☆ 

मध्यरातिच्या घन अंधारी

उष:काल हो स्वातंत्र्याचा

लख्ख उजळल्या दहा दिशाही

अनुपम उत्सव नवस्वप्नांचा !

 

किती हुतात्मे,क्रांतिवीरही

झिजले, भिडले शतमरणांना

देशभक्तिचा उरी निखारा

अर्पण समिधा शतयज्ञांना !

 

देश दुभंगे,भिजले रुधिरी

निशाण अर्धे स्वातंत्र्याचे

दिव्यप्रभेवर स्वातंत्र्याच्या

पडले सावट शोककथेचे !

 

पुसून अश्रू, विसरुन जखमा

तिमिर निघाला प्रकाशाकडे

सर करण्याला उन्नत शिखरे

धाव मातिची नभापलिकडे !

 

संविधान मग येता जन्मा

सार्वभौम हा देश जाहला

शतकोटीच्या क्षितिजावरती

पुन्हा नव्याने सूर्य उगवला !

 

संविधान हे तंत्र न केवळ

गणराज्याचा मंत्र हा महा

समान संधी ,अभिव्यक्तीचा

विशाल व्यापक मंच हा महा !

 

शुभ्र कबूतर विश्वशांतिचे

नीलाकाशी मुक्त सोडले

पण सीमेवर त्रयदा त्याचे

पंख फाटले,रक्त सांडले !

 

अवर्षणाचा शाप भयंकर

शापावर उ:शाप शोधले

महानद्यांना बांध घालुनी

क्षेत्र कृषीचे सिंचित केले !

 

पोखरणीचा धूमधडाका

‘बुद्धहि हसला’ गालोगाली

व्यर्थ अहिंसा बलहीनांची

शांति राखितो शक्तीशाली !

 

प्रज्ञा,प्रतिभा उदंड येथे

देशविदेशी अपुले झेंडे

सक्षम, उत्सुक तरुणाईही

जिंकायाला सारी क्षितिजे !

 

प्रबोधनाचे सूर्य तळपले

तरी न सरली पुरती राती

अजून येथे खुशाल शाबुत

धर्मजातिच्या विषाक्त भिंती !

 

‘आहे’ आणिक ‘नाही’ मधले

सरावयाचे कधि रे अंतर

शाप भुकेचा अन् दास्याचा

दारोदारी अपरंपार !.…..

 

उत्थानास्तव पददलितांच्या

कोट्यवधींचे भरले रांजण

सदैव गळका रांजण रांजण

शुक्राचार्या झारी आंदण !

 

कायद्यातले उरले ‘लेटर’

बाष्पीभुत रे ‘स्पिरीट’ सारे

न्यायव्यवस्था संपन्नांस्तव

बंद विपन्ना तिची कवाडे !

 

पदी निखारे धगधगणारे

अजून यात्रा ती अनवाणी

स्वातंत्र्याच्या गंगौघाचे

जिथे पोचले नाही पाणी !

 

सप्तदशीचा प्रवास सरला

वळुन पाहिले थोडे मागे

किती विणले नि किती उसवले

भारतभूचे रंगित धागे !

 

© श्री हरिश्चंद्र कोठावडे

 

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 98 ☆ श्रावण सर ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

? साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 98 ?

☆ श्रावण सर ☆

एक रिमझिमती श्रावणी दुपार,

लाॅकडाऊन नंतर

पहिल्यांदाच,

घेतलेला मोकळा श्वास!

सखी म्हणाली,

चल भटकून येऊ कॅम्पातून….

रस्ता फारशी गर्दी नसलेला…

थोडा वेळ भटकत राहिलो,

पावसाची भुरभुर झेलत…

 

आठवला बालपणातला,

तारूण्यातला श्रावण,

झिम्मा फुगडी, झोका,

मेंदी भरले हात पाय,

आघाडा… दुर्वा..फुलं..

मास्क मधूनही जाणवले,

ते आठवणीतले सुगंध…..

 

मनात किलबिलला श्रावण,

आणि पावलं वळली,

मार्झोरीन कडे…

वयाची “संध्या छाया” असली तरी, अनुभवली एक मस्त दुपार….

मार्झोरीनच्या वरच्या मजल्यावरचं

खिडकीशेजारचं दोन खुर्च्यांचं टेबल पटकावताना,

झालेला आनंद शाळकरी मुलीसारखा!

मस्त काॅफी-सॅन्डविच आणि

खिडकीतून ऐकू येणारी,

फाद्यांची सळसळ!

एक निवांत दुपार,

दिवस सोनेरी बनविणारी!

 

आयुष्याच्या कुठल्याही

वळणावर अनुभवावीच

सखीबरोबरची—

अशी एखादी,

अलवार श्रावण सर,

खरं तर…

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

Please share your Post !

Shares