मराठी साहित्य – कविता ☆ शब्दात वाच माझ्या ☆ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

 

☆ साप्ताहिक स्तम्भ – केल्याने होत आहे रे ☆

☆ शब्दात वाच माझ्या ☆

शब्दात वाच माझ्या

शब्दरुप रम्य गाथा

मुखी नाम तुझे येई

गाते तुझीच गीता !!१!!

 

माझ्या काव्यातुनीच तुजला !

जग दिसेल छान देखणं !

रेखियेले निसर्गदेवाने

आकाशी रंगतोरण !!२!!

 

शब्दात वाच माझ्या

सुख दुःख लपलेले

कधी फव्वारे हास्याचे !

कधी शब्द मस्त हसलेले !!३!!

 

शब्दातच पहा माझ्या

माझ्या मनीचा साज

काव्यातील ऐक माझ्या !

सुंदर सागराची  गाज !!४!!

 

सारेच नाही रे कळत

शब्दात सांगुनीया

डोळेच सांगती सर्व

मनातच  पाहुनीया !!५!!

 

शब्दातून उमटे काव्य !

काव्यात शक्ती मोठी

माध्यम न लगे दुजेही

काव्यातच गाठीभेटी !!६!!

 

एक एक शब्दसुमन

सुंदर सूत्रात विणावे

मंगलमय काव्याच्या

पुष्पहारातच  विलीन व्हावे !!७!!

 

मंगलमय काव्याच्या

पुष्पहारातच विलीन व्हावे!!…

 

©️®️ श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे

सातारा

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नेत्रदान ☆ सौ.अस्मिता इनामदार.

सौ.अस्मिता इनामदार

☆ कवितेचा उत्सव ☆ नेत्रदान ☆ सौ.अस्मिता इनामदार ☆ 

कर्णासारखा उदार दाता

आजच्या कलियुगात नाही

माझे ते माझे, तुझे तेही माझे

असेही म्हणणारे आहेत काही…

 

तीर्थक्षेत्री करूनी दान

पुण्य मिळवती सारेजण

इतर वेळी पापे करूनी

आनंद मिळवती काहीजण…

 

देवा-धर्माच्या नावाखाली

लूटच करती या जगती

दानाच्या त्या पावित्र्याला

नष्ट करणे ही प्रगती…

 

यापरतेही अनेक दाने

जगी आहेत, जाणूनी घ्या

त्या दानातून मिळणाऱ्या

समाधानाचा लाभही घ्या…

 

दानाचेही प्रकार अगणित

द्रव्यदान वा रक्तदान

या साऱ्याहून श्रेष्ठतम ते

ते म्हणजे हो नेत्रदान…

 

अंधकार तो नयनापुढचा

क्षणात एका होईल दूर

नेत्रदानाचे पुण्य घेऊनी

आनंदाला येईल पूर…

 

त्या दानातून कुणी अभागी

पाहील जग हे डोळेभरूनी

आयुष्याच्या वाटेवरती

चालत राहील दुवा देऊनी…

 

© सौ अस्मिता इनामदार

पत्ता – युनिटी हाईटस, फ्लॅट नं १०२, हळदभवन जवळ,  वखारभाग, सांगली – ४१६ ४१६

मोबा. – 9764773842

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सेतू – कवी स्व वसंत बापट  ☆  कवितेचे रसग्रहण सौ.अमृता देशपांडे

स्व वसंत बापट

जन्म – 25 जुलाई 1922

मृत्यु – 17 सितम्बर 2002

☆ कवितेचा उत्सव ☆ सेतू ☆ कवी स्व वसंत बापट  ☆  प्रस्तुति – सौ. अमृता देशपांडे ☆ 

शरदामधली पहाट आली तरणीताठी

हिरवे हिरवे चुडे चमकती दोन्ही हाती

शिरि मोत्याचे कणिस तरारुन झुलते आहे

खांद्यावरती शुभ्र कबूतर खुलते आहे

 

नुक्ते झाले स्नान हिचे ते राजविलासी

आठ बिचा-या न्हाऊ घालित होत्या दासी

निरखित अपुली आपण कांती आरसपानी

थबकुन उठली चाहुल भलती येता कानी

 

उठली तो तिज जाणवले की विवस्त्र आपण

घे सोनेरी वस्त्र ओढुनी कर उंचावुन

हात दुमडुनि सावरता ते वक्षापाशी

उभी राहिली क्षण ओठंगुन नीलाकाशी

 

लाल ओलसर पाउल उचलुन तशी निघाली

वारा नखर करीत भवती

रुंजी घाली

निळ्या तलावाघरचे दालन उघडे आहे

अनिश्चयाने ती क्षितिजाशी उभीच आहे

 

माथ्यावरती निळी ओढणी तलम मुलायम

गालावरती फुलचुखिने व्रण केला कायम

पायाखाली येइल ते ते

खुलत आहे

आभाळाची कळी उगिच

उमलत आहे

 

झेंडू डेरेदार गळ्याशी

बिलगुन बसले

शेवंतीचे स्वप्न सुनहरी

आजच हसले

निर्गंधाचे रंग पाहुनी

गहिरे असले

गुलाब रुसले, ईर्षेने

फिरुनि मुसमुसले

 

फुलांफुलांची हनु कुरवाळित

अल्लड चाले

तृणातृणाशी ममतेने ही

अस्फुट बोले

वात्सल्य न हे! हे ही

यौवन विभ्रम सारे

सराईताला कसे कळावे

मुग्ध इशारे

 

दिसली ती अन् विस्फारित

मम झाले नेत्र

स्पर्शाने या पुलकित झाले

गात्र नि गात्र

ही शरदातिल पहाट…..

की……ती तेव्हाची  तू?

तुझिया माझ्या मध्ये

पहाटच झाली सेतु

 

कवी – स्व वसंत बापट 

(चित्र साभार लोकमत https://www.lokmat.com/maharashtra/todays-memorial-day-vasant-bapat/)

(या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.)

सौ अमृता देशपांडे

पर्वरी- गोवा

9822176170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 56 – जीवनाच्या रंगमंची ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 56 – जीवनाच्या रंगमंची ☆

जीवनाच्या रंगमंची

सुख दुःखाची आरास।

समन्वय साधुनिया

नाट्य येईल भरास।

 

बालपण प्रवेशात

स्वर्ग सुखाचे आगर।

बाप विधाता भासतो

माय मायेचा सागर।

 

स्वार्थ रंगी रंगलेली

सारी स्वप्नवत नाती।

तारुण्यास मोहवीते

स्वप्न परी ती सांगाती।

 

आलो भानावर जरा

खाच खळगे पाहून ।

माय पित्याच्या भोवती

लाखो संकटे दारूण।

 

इथे पिकल्या पानांना

सोडू पाहे जरी खोड।

रंगविती पिलांसाठी

वसंताचे स्वप्न गोड।

 

जीवनाच्या रंगमंची

खेळ रंगे जगण्याचा।

दुःख उरी दाबुनिया

अभिनय हासण्याचा।

 

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जीवनपट ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ जीवनपट ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

जीवनाच्या या पटावरी

कितीतरी प्यादी येती जाती

माझे,माझे म्हणती सारे

फोलता ही नच,कुणाही ठावे

 

क्षणभंगुरता कळेल का परी

उरते अंगी म्रुत्तिका जरी

यात्रिक सारे सममार्गावरी

नियतीचीही मिरासदारी

 

नियतीचीही सर्व खेळणी

कुणा छत्र,कुणी अनवाणी

श्वासासंगे श्वास येई रे

दुजा न कोणी सांगाती

 

जीवनाच्या या पटावरी

कितीतरी प्यादी येती जाती.

 © सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ते झाड ☆ श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी

श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी

☆ कवितेचा उत्सव ☆ ते झाड…! ☆ श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी ☆ 

सरत्या वेळेला कवटाळत

ऊन पाऊस झेलत

मान डोलवत आजही

जागाच आहे बुंधा…

 

फांद्यांना अजून

नाही लागलं डोहाळं

नेहमीची जागा सोडून

वेगळं बस्तान बसवण्याचं…

 

त्या अजूनही गुरफटलेल्या

तशाच एकमेकीत

पानांतल्या हरितकणांच्या

ललाट रेषा आखत…

 

मूळांचं आधार देणं

आजही आहे सजग

मातीतल्या सगुणत्वाला

तारकापुंज दाखवत…

 

पाखरांची घरटी

आजही होतात स्थिरस्थावर

वडिलोपार्जित परंपरेच्या

चंदन भूमीवर…

 

आजतागायत फुलांनी

बहरणं नाही सोडलं

आतड्यांचं रितेपण

फळांनी नाही सोसलं…

 

भूकेला घास

जगण्याला श्वास

ही जपमाळ

जपतेच आहे झाड…

 

म्हणूनच आता झाडांचं

करावं लागेल गॅझेट

‘माणूस’ नावाच्या

नामावलीत,

माणूसपणाचा टक्का

सहस्रांच्या रेषा लांघत

ब्रम्हांडाचा दर्प होऊन

सूर्याला उजळण्यासाठी…

 

©  श्री महेशकुमार गुंडाप्पा कोष्टी

मिरज, जि. सांगली

मोबाईल : 9922048846

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 75 – बालमैत्रीण ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 75 ☆

☆ बालमैत्रीण ☆

मला याद येते जुन्या त्या दिनांची

तिच्या  भोवती नित्य झेपावण्याची

सखी दूर गेली कशी काय आता

तिथे एक होता जिवाला विसावा

 

घराचे घराशी असे काय नाते

तिचे मैत्र वाटे जिवीच्या जिवाचे

तिथे त्या घराशी उभी एक जाई

तशी  माय वाटे मला पूर्ण आई

 

किती  स्वच्छ होती घरे अंगणेही

कुणी ना कुणाला उगा मात देती

मनाला मुभा नित्य संचारण्याची

स्वतःला स्वतःशी तिथे भेटण्याची

 

सखे मैत्रिणी मी तुला काय देवू

जुन्या  आठवांना नको हात लावू

मनीमानसी मी तुला पांघरावे

युगान्ती  वसावे तसेही जगावे

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मागणे…. ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

☆ कवितेचा उत्सव ☆ मागणे…. ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆ 

मागू का मी आज काही

सांग देवा तुजकडे

मागू की नाहीच मागू

आज पडले साकडे ……

 

हे हवे परी ते नको

हे नित्यची चालू असे

ऐकतोस की नाही तू

हेही मला ठावे नसे…..

 

आज एकची मागते

तू लक्ष दे माझ्याकडे

वृत्तीची निवृत्ती होवो

‘मीपणा‘ ने तुजकडे…

 

एव्हढे देशील तर

मी मागणे विसरेन

तव स्मरणी गुंगता

मी मलाच विसरेन ….

 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आजी… / गोष्ट ☆ श्री आनंदहरी

☆ कवितेचा उत्सव ☆ आजी… /   गोष्ट  ☆ श्री आनंदहरी ☆

सोप्यातल्या कडीपाटावर बसून

सांगत राहायची आजी

गोष्टी

आम्हां भावा-बहिणींना कुरवाळत

रात्रीची जेवणं झाल्यावर..

कधी रामायण-महाभारतातील,

कधी जिजाऊ-शिवबाची

कोंडाण्याची,  पावनखिंडीची

कधी झाशीच्या राणीची

कधी सांगत राहायची

तिच्या बालपणीचे काही बाही

आठवणींच्या झुल्यावर झुलत

कुठंतरी दूर नजर लावून

जणू पाहत असल्यासारखी

स्वतःचाच बालपण, माहेर

काळोखल्या आकाशात

काळाचा पडदा दूर सारून

आपल्या डोईवरचा पदर सरळ करीत

नकळत थकल्या डोळ्यांना हळुवार पुसत

किंवा

कधी

गात राहायची अंगाई

आपल्या थरथरत्या मायाळू आवाजात

तिच्या आई-आज्जीने तिच्यासाठी गाईलेली

काळाच्या पल्याड जात..

 

आता

मी ही सांगत राहतो त्याच गोष्टी

आणि गोष्टी आजीच्या, माझ्या बालपणीच्या

गात राहतो तीच अंगाई

नातवंडांना जवळ घेऊन

माझ्या आजीच्या मायाळू हातानी कुरवाळत

 

पहात राहतो मनाच्या आकाशात

कालौघात हरवून गेलेले

ते घर, तो सोपा, तो कडीपाट,

आजी आणि ते दिवस

 

उद्या ती ही सांगतील गोष्टी कदाचित

आपल्या मुलाबाळांना, नातवंडांना

आजीची परंपरा जपत

 

तेंव्हा

माझीही झाली असेल एखादी गोष्ट

आजीसारखीच.

 

© श्री आनंदहरी

इस्लामपूर, जि. सांगली

भ्रमणध्वनी:-  8275178099

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 74 ☆ अंधाराचे चित्र ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 74 ☆  अंधाराचे चित्र

अंधाराचे चित्र काढणे अवघड नाही

रंग एकला दुजा कुणाची लुडबुड नाही

 

मिसळुन गेले काळ्या रंगा तुझ्यात पाणी

ओठी त्याच्या फक्त तुझी रे दंगल गाणी

झुळझुळ टपटप अशी करत ते बडबड नाही

अंधाराचे चित्र काढणे अवघड नाही

 

केस रेशमी छान ब्रशाचे आहे काळे

काळ्या रंगा तुझेच त्यावर आहे जाळे

शांत पहुडला कोरा कागद फडफड नाही

अंधाराचे चित्र काढणे अवघड नाही

 

सूर्यावरती मात करोनी जमले ढग हे

शेतावरती तुटून पडले काळे ठग हे

कुणास येथे ऐकू आली गडगड नाही

अंधाराचे चित्र काढणे अवघड नाही

 

प्रवास आहे अखेरचा हा अंधारातुन

मार्ग शोधने अवघड नसते बिलकुल त्यातुन

ओझे नाही खांद्यावरती कावड नाही

अंधाराचे चित्र काढणे अवघड नाही

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print