मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ॠण दुधाचे विसरू नका.. ☆ श्री रवींद्र देवघरे “शलभ’

☆ कवितेचा उत्सव ☆ ॠण दुधाचे विसरू नका..☆ श्री रवींद्र देवघरे “शलभ’ ☆

मराठमोळ्यांची पोशिंदी,

माझी मराठी मायबोली.

ज्ञानोबाची परंपरा,

अमृताने जोपासली.

गाठी शिवबाची शिबंदी

तिच्या वात्सल्यात वाढली.

परि  वाघिणीची दृष्ट,

मायेच्या दुधाला लागली.

नाती मातीची – भाषेची,

जगी ओळख लाभली.

ऋण दुधाचे विसरू नका,

विनवी मराठी माऊली.

 

© श्री रवीन्द्र देवघरे “शलभ’

नागपूर.

मो  9561117803.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मायबोली मराठी.. ☆ सुश्री सुषमा गोखले

☆ कवितेचा उत्सव ☆ मायबोली मराठी.. ☆ सुश्री सुषमा गोखले ☆ 

मायबोली मराठी बोलीन सहर्षे

सन्मान पालखीत मिरवीन कौतुके

ज्ञानदेवीची आण, गौरव तिचा राखीन

मेधा धृती मतीने रक्षेन प्राणपणाने

राज्यभाषा  मराठीचा येवो उत्कर्षकाल

जगद्वंद्य होऊनी राहो चिरंतर…

सर्वात्मक श्रीहरीचा कमलकर

राहो मस्तकी, मायमराठीवर !

सुषम.

© सुश्री सुषमा गोखले

शिवाजी पार्क – दादर

मो. 9619459896

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माझी मराठी… ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी

सौ. शशी नाईक-नाडकर्णी

 ☆ कवितेचा उत्सव ☆ माझी मराठी… ☆ सौ. शशी नाईक-नाडकर्णी ☆ 

 सदैव  माझ्या ओठी

माझी माय मराठी

 

लेई शब्द पैठणी  जरतार

त्यावरी घाले शब्दालंकार

 

सात्विक सालस नार

वेळी होई ती धारदार

 

मुकुट तिचा एकार,ओकार,

इकार कधीतरी रफार

 

पायी रुणझुणती उकार,

बिन्दी भाळी अनुस्वार

 

कधी अर्ध,कधी पूर्णविराम

कधी स्वल्प,कधी प्रश्न चिन्ह

 

कर्मणि,कर्तरी,प्रयोग, भावे

भूत, वर्तमान,भविष्य, काळासवे

 

ज्ञानेश्वर आद्य उपासक

समर्थ,तुका,नाथ पूजक

राजा शिवबा असे रक्षक

 

अभंग,भजन,प्रवचन

कीर्तन, चर्चा, भाषण

 

कथा, कादंबरी, कहाणी

लोकगीत, पोवाडा, लावणी

 

भारूड, नाटक, नाट्यछटा,

एकपात्री, विडिओ,सिनेमा

 

कित्येक पैलू आईचे या

वाणी तोकडी वर्णाया

 

लेकरे अमाप,क्षेत्रे तिची मोठी

वर्णू किती,मती माझी थिटी

 

माझ्या मराठीची अशीच ऐट

विचारू नका तिचा थाटमाट

 

दर बारा कोसी भिन्न हिचा अवतार

तरी एक असे ही माझी म्हराठ्ठी नार

 

© सौ. शशी नाईक-नाडकर्णी

फोन  नं. 8425933533

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ कवितेचा उत्सव ☆ हुकूमशहा ☆ स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆

स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ 

☆ कवितेचा उत्सव ☆ हुकूमशहा ☆ कवी…कुसुमाग्रज ☆

हुकूमशहांचे

काचमहाल

सत्तेच्या आणि संपत्तीच्या

उन्मादाने ओथंबलेले,

जन्म देतात

असामान्यतेच्या आविर्भावातून

अमानुष बलात्कारांना;

पण तोपर्यंतच,

जोपर्यंत सामान्य माणूस

रस्त्यातला

जंगलातला

शेतातला,कारखान्याला

उठत नाही जाळ होऊन

आणि करीत नाही चुराडा

दगडांचा वर्षाव करून

त्या बिलोरी ऐश्वर्याचा.

 

संस्कृतीच्या व्यवहारात

हा एक दिलासा आहे

की सामान्य माणूस

कधीही मरत नाही

कितीही मारला तरी.

 

– स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ‘सात’ – स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆ कवितेचे रसग्रहण☆ प्रस्तुति – सौ.ज्योत्स्ना तानवडे

स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ 

☆ कवितेचा उत्सव ☆ ‘सात’ – स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆ कवितेचे रसग्रहण☆ प्रस्तुति – सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆

[ शिवाजीचा सेनापती प्रतापराव गुजर याचा एके ठिकाणी पराभव होऊन तो पळाला. शिवाजीला ही वार्ता समजताच रागाच्या भरात त्याने सेनापतीला एक निर्भर्त्सनात्मक पत्र लिहिले. ते वाचून आलेल्या उद्वेगाच्या आवेशात प्रतापरावाने सात सरदारांसह थेट शत्रूच्या छावणीत प्रवेश केला. या वेड्या प्रयत्नांमध्ये ते सातही वीर प्राणास मुकले ! कवितेची सुरुवात शिवाजीच्या पत्रापासून आहे. ]

 

वेडात मराठे वीर दौडले सात !

“श्रुति धन्य जाहल्या श्रवुनि आपुली वार्ता

रण सोडुनि सेनासागर आमुचे पळता

अबलाही घरोघर खऱ्या लाजतील आता

भर दिवसा आम्हा दिसू लागली रात

वेडात मराठे वीर दौडले सात !

 

ते कठोर अक्षर एक एक त्यातील

जाळीत चालले कणखर ताठर दील

“माघारी वळणे नाहि मराठी शील

विसरला महाशय काय लाविता जात?”

वेडात मराठे वीर दौडले सात !

 

वर भिवई चढली दात दाबती ओठ

छातीवर तुटली पटबंदाची गाठ

डोळ्यात उठे काहूर ओलवे काठ

म्यानातून उसळे तलवारीची पात

वेडात मराठे वीर दौडले सात !

 

“जरि काल दाविली प्रभु, गनिमांना पाठ

जरि काल विसरलो जरा मराठी जात

हा असा धावतो आज अरी-शिबिरात

तव मानकरी हा घेऊनि शीर करात”

वेडात मराठे वीर दौडले सात !

 

ते फिरता बाजुस डोळे किंचित ओले

सरदार सहा सरसावुनि उठले शेले

रिकिबीत टाकले पाय,झेलले भाले

उसळले धुळीचे मेघ सात,

निमिषात वेडात मराठी वीर दौडले सात !

 

आश्चर्यमुग्ध टाकून मागुती सेना

अपमान बुजविण्या सात अर्पुनी माना

छावणीत शिरले थेट,भेट गनिमांना

कोसळल्या उल्का जळत सात दर्यात

वेडात मराठे वीर दौडले सात !

 

खालून आग,वर आग, आग बाजूंनी,

समशेर उसळली सहस्त्र क्रूर इमानी,

गर्दीत लोपले सात जीव ते मानी

खग सात जळाले अभिमानी वणव्यात

वेडात मराठे वीर दौडले सात !

 

दगडांवर दिसतिल अजुनि तेथल्या टाचा

ओढ्यात तरंगे अजुनि रंग रक्ताचा

क्षितिजावर उठतो अजुनी मेघ मातीचा

अद्याप विराणी कुणि वाऱ्यावर गात

वेडात मराठे वीर दौडले सात !

 

– स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’

[विशाखा कवितासंग्रह मिळवून संपूर्ण कविता घेतली. गुगलवर गाण्यातली फक्त चारच कडवी आहेत.]

(या कवितेचे रसग्रहण काव्यानंद मध्ये दिले आहे.)

प्रस्तुति – सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विज्ञानयुग ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

 ☆ कवितेचा उत्सव ☆ विज्ञानयुग ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆

 

विज्ञानाच्या युगात  तंत्रज्ञान चा वापर

 

मनीच्या हितगुजात  टेलिपथीचा वापर

 

विज्ञानाच्या जगात  शोधतात  कार्यकारण

 

भावनांच्या वि श्वात  मिटते कारण.

 

© सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ किमया विज्ञानाची ☆ प्रा. सौ. सुमती पवार

प्रा. सौ. सुमती पवार

 कवितेचा उत्सव ☆ किमया विज्ञानाची ☆ प्रा. सौ. सुमती पवार ☆ 

विज्ञानाची सारी किमया, सारी सुखे हो उभी पहा

ग्रह गोलांना दाखविते ती, दुर्बिण महाकाय महा…

भौतिक सारी सुखे हाताशी, आरामदायी जीवन

घरबसल्या हो सारे मिळते, नको फिराया वणवण

 

सारे सारे सोपे झाले, कामे झाली किती कमी

वेगाने ती होती कामे, वेळ बचतीची ही हमी..

इंटरनेटने जग जवळहे, क्षणातच सारे कळते

जग आता चालत नाही, सुसाट वेगाने पळते..

 

लॅाकडाऊनचा काळ नेट ने फार सुखावह तो केला

स्काईप वरती नातलगांशी प्रत्येकच जण बोलला

झाल्या मिटिंगा संमेलनेही काळ कुठे न थांबला

गाडी सुरू राहून पहा हो माणूस नाही आंबला..

 

शाळा शिक्षण काम काज ते पहा राहिले हो चालू

विज्ञानाचे महत्व आपण सारे जाणू नि मानू

एक फोन करताच पहा हो सारी सुखे ती हाताशी

अवघ्या काही तासातच हो विमान गाठते हो काशी…

 

शस्र आहे पहा दुधारी संयम त्यावर उपाय

अघोरी पणा करी घात हो करतो मग तो अपाय

वापरले जर नीट पहा ते फक्त आहे वरदान

पान न हाले त्याच्या वाचून….

विज्ञान विश्वाची…. शान…

 

© प्रा.सौ.सुमती पवार ,नाशिक

दि: ३/०२/२०२१

वेळ: ०५:०९

(९७६३६०५६४२)

[email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विज्ञान: तलवार दुधारी ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

? श्री श्यामसुंदर महादेवराव धोपटे जी यांना आज त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ?

☆ कवितेचा उत्सव ☆ विज्ञान: तलवार दुधारी ☆ श्री शामसुंदर महादेवराव धोपटे ☆ 

विज्ञानाची किमया झाली

सारी दुनिया मुठीत आली

क्षणात साता समुद्रापारही

सामन्यही संवाद करती झाली.

 

विज्ञानाची प्रगती झाली

वैदक क्षेत्रात क्रांती आली

सिटीस्कॅन क्ष किरण सोनोग्राफी

निदानाच्या उजळल्या वाती.

 

मोबाईलच्या रुपात आली

हातात सर्वांच्या नवलाई

संप्रेषण,संदेश पडले मागे

वॉट्सप,पे मनी फेसबुकच वाली

 

पोलिसांनीही शोधल्या नवीन चाली

कॅमेरे, डी एन ए, संगणक च्या ढाली

लाय डिटेक्टर टेस्ट,

रासायनिक परीक्षणे मदतीस आली

 

विज्ञान पडता नको त्या हाती

साऱ्या मानवतेची केली माती

हिरोशिमा नागासाकी आहे साक्षी

सत्तेतव मानव मानवास भक्षी

 

विज्ञान  हीओळख निसर्गाची

स्वार्थी मानव खेळतो जीवनाशी

शेतीची झाली निकस माती

काम न मिळे श्रमीका हाती

 

विज्ञान ही तलवार दुधारी

कल्याण साधक हिरकणी

अतिरेक होता होता त्याचा

कोरोनाच्याही येती साथी.

 

© श्री शामसुंदर महादेवराव धोपटे

चंद्रपूर,  मो. 9822363911

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – ☆ कवितेचा उत्सव ☆ पाऊल – चिन्हे ☆ स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ ☆

स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’ 

☆ कवितेचा उत्सव ☆ पाऊल – चिन्हे ☆ कवी…कुसुमाग्रज ☆

    मी एका रात्री त्या नक्षत्रांना पुसले

‘परमेश्वर नाही’घोकत मन मम बसले

परि तुम्ही चिरंतन विश्वातील प्रवासी

का चरण केधवा तुम्हास त्याचे दिसले !

 

स्मित करून म्हणाल्या मला चांदण्या काही,

तो मुक्त प्रवासी फिरत  सदोदित राही

उठतात तमावर त्याची पाऊल-चिन्हे-

त्यांनाच पुससि तू,आहे की तो नाही !

 

– स्व विष्णु वामन शिरवाडकर ‘कुसुमाग्रज’

≈ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हे  कुसुमाग्रज ! ☆ कवी स्व वसंत बापट  

कवी स्व वसंत बापट

जन्म – 25 जुलाई 1922

मृत्यु – 17 सितम्बर 2002

☆ कवितेचा उत्सव ☆ हे  कुसुमाग्रज ! ☆ कवी स्व वसंत बापट  ☆

दूरस्थ विशाखा किरणांच्या स्पर्शाने

उद्ध्वस्त किनारा अस्तित्वाचा झाला

अन् सात नभांची क्षितीजे पार कराया

नाविकांस आम्हा जोश अनोखा आला

 

पालवल्या फिरूनी अनंत अमुच्या आशा

अन् ध्येयासक्ती अनंत पेटुनि उठली

मग दिली बळींनी बलवंता आव्हाने

मृत्यूंजय आम्ही,आम्हांस भीती कुठली

 

हे कुसुमाग्रज ! तुम्ही रहिवासी गगनाचे-

परि कृतार्थ केली तुम्ही मराठी माती

या मातीमधल्या अगण्य अणुरेणूंची

जोडलीत  सार्या  नक्षत्रांशी नाती

 

तुम्ही कुठे कुणाला कधी दिला उपदेश

कधी बोट धरून नच चालवले कवणाला

प्रवचने,चिकित्सा सदैव केली वर्ज्य

परि कविकुलगुरू ही पदवी फक्त तुम्हाला

 

हे मुक्त विहंगम,निळ्या नभाच्या पांथा

तू असाच राही पेरीत उज्वल गाणी

गुंफित रहा तू कृतिशुरांच्या गाथा

अन् पेटव विझल्या डोळ्यामधले पाणी

कवी – स्व वसंत बापट 

(चित्र साभार लोकमत https://www.lokmat.com/maharashtra/todays-memorial-day-vasant-bapat/)

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares