सुश्री प्रभा सोनवणे
(आप प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी के उत्कृष्ट साहित्य को साप्ताहिक स्तम्भ – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते हैं।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 72 ☆
☆ उत्सव पर्व ☆
एका केशरी पहाटे
तू भेटलास-
एकाकी सुनसान रस्त्यावर
युगानुयुगे भ्रमंती केल्यावर
जसा भेटावा
कुणी मुसाफिर
जन्मजन्मांतरीचं नातं सांगणारा !
तुझ्या डोळ्यात जादूगरी
आणि ओठांवर
ओळखीचं हसू!
ते इवलंसं हसू
मी मुठीत गच्च धरून ठेवलं-
तेव्हा पासून सुरू झालं
एक उत्सव पर्व-
तुझ्या माझ्या प्रीतीचं!
आता माझी प्रत्येक पहाट
असतेच रे केशरी
अन् प्राजक्त फुलासारखी
सुगंधीही !
दरवळतात मनात
रातराणी चे सुवासिक सोहळे!
तुझ्या क्षात्रतेजाने
गात्रागात्रात
उजळतात लक्ष लक्ष दीप
अन् काजळरात्र ही बनते
लखलखती दीपावली!
© प्रभा सोनवणे
“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈