मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आंदण ☆ श्री प्रकाश लावंड

☆ कवितेचा उत्सव ☆ आंदण ☆ श्री प्रकाश लावंड ☆ 

काढू नको उणेदुणे

नको अनावर त्रागा

पाल इथलं उठलं

शोध दुसरी जागा

 

एक हात सुटता

का तुझा जीव कुढे ?

तुला आधार द्यायला

दहा हात येतील पुढे

 

टाक गाडून इथेच

इथल्या आठवणी

फेक चावऱ्या वहाणा

चाल गड्या अनवाणी

 

तुझ्या दुखऱ्या पावलांना

जडो मखमली कोंदण

विधात्याने दिलीय तुला

सारी पृथ्वीच आंदण

 

© श्री प्रकाश लावंड

करमाळा जि.सोलापूर.

मोबा 9021497977

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 70 – कोजागरी ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 70 ☆

☆ कोजागरी ☆

 

ही कोजागरी  येईल  निश्चितच,

एक नवी आशा घेऊन!

मी नव्याने ओळखू लागले आहे,

तुझ्या मनातलं टिपूर चांदणं,

“अतिपरिचयात अवज्ञा”

म्हणतात तसंच झालं होतं—-

आपलं नातं!

समांतर रेषेसारखं जगत राहीलो,

एका छताखाली!

पण ही पौर्णिमा आणि

कोजागरी चा चंद्र,

घडवणार आहे नवा इतिहास….

सारी किल्मिषं निघून जातील….

त्या चांदणधारेत!

ही कोजागरी निश्चितच वेगळी आहे आपल्या दोघांसाठी!

मी बनण्याचा प्रयत्न करेन,

तुझ्या मनातल्या प्रतिमेसारखी!

पण तूही किंचीत बदलायला हवं ना?

या चांदण्या रात्रीच्या साक्षीने!

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव  ☆ डोहाळे ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर

सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ कवितेचा उत्सव  ☆ डोहाळे ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆ 

मावळत्या सूर्याची लालबुंद टिकली

चिकटवून गोऱ्यापान नितळ भाळी

 

चमचमत्या चांदण्या माळीन  म्हणते

लांबसडक  काळ्याभोर   कुंतली

 

हिरव्यागच्च जंगल  झाडांची मेखला

बांधून गरगरीत पोटाकमरेला

 

झुलावं झुळझुळणाऱ्या वाऱ्यासारखं

नाचावं खळखळणाऱ्या झऱ्यासारखं

 

राजा, करशील ना रे

माझे हे डोहाळे पुरे?

 

‘तू काय पृथ्वी  समजतेस स्वतःला? ‘

एक गद्य टोमणा आला

 

आणि मग तेव्हापासून

मिटूनच घेतलं मी स्वतःला

 

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

फोन नं. 9820206306.

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ माती सांगे कुंभाराला ☆ स्व कवी मधुकर जोशी

स्व कवी मधुकर जोशी 

☆ कवितेचा उत्सव ☆ माती सांगे कुंभाराला ☆ स्व कवी मधुकर जोशी ☆ 

माती सांगे कुंभाराला !

माती सांगे कुंभाराला पायी मज

तुडविसी

तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या

पायाशी !

मला फिरविशी तू चाकावर

घट मातीचे घडवी सुंदर

लग्नमंडपी कधी असे मी कधी

शवापाशी!

वीर धुरंधर आले, गेले

पायी माझ्या इथे झोपले

कुब्जा अथवा मोहक युवती अंती

मजपाशी !

गर्वाने कां ताठ राहसी?

भाग्य कशाला उगा नासशी?

तुझ्या ललाटी अखेर लिहिले मीलन माझ्याशी!

कवितेचा

 

स्व कवी मधुकर जोशी

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – काव्यानंद ☆ माती सांगे कुंभाराला ! ☆ श्रीमती अनुराधा फाटक

श्रीमती अनुराधा फाटक

 ☆ काव्यानंद ☆ माती सांगे कुंभाराला ! ☆ श्रीमती अनुराधा फाटक ☆ 

कोणत्याही कवितेची परिपक्वता कविच्या विचार परिपक्वतेवर अवलंबून असते आणि विचार अनुभवसिध्दतेवर आधारलेले असतात.जेव्हा कवीकडून एखाद्या कवितेची प्रसव प्रक्रिया सुरु होते तेव्हा त्याच्या मनातला कल्लोळ आपोआप शब्दबध्द होत असतो.ती कविता वाचक वाचतो तेव्हा ती त्याला विचारप्रवृत्त करते मग त्याला भावेल तसा अर्थ तो लावत जातो त्यामुळे एकाच कवितेतून वेगवेगळे अर्थ निर्माण होऊ शकतात.

कवी मधुकर जोशी यांची,’माती सांगे कुंभाराला !’ ही कविता अशीच विचारप्रवृत्त करणारी आहे.कुंभार ज्या मातीपासून घट निर्मिती करतो ती माती साधीसुधी नसते.एका विशिष्ठ प्रकारच्या मातीत घोड्याची लीद,शेण,राख, धान्याची टरफले मिसळलेली असतात. कुंभार ती माती भिजवून आपल्या पायाखाली तुडवून तुडवून एकजीव करतो.ते करताना त्याच्या मनातील विचार मातीवर संस्कारीत होत असतात. गोरा कुंभार विठ्ठलाचे अभंग गात चिखल तुडवीत असे.

पण ज्या मातीपासून कुंभार घट बनवितो त्या मातीला कुंभाराची आपल्याला पायाखाली तुडविण्याची क्रिया आवडत नाही.म्हणून ती कुंभाराला,

‘तुझाच आहे शेवट वेड्या माझ्या पायाशी’असे ठणकावून सांगते.

ती म्हणते,हे कुंभारा मला चाकावर फिरवत तुझ्या हातातल्या कौशल्याने तू वेगवेगळ्या आकाराचे सुबक, सुंदर घट बनवितोस. ते कोणत्या ना कोणत्या कारणाने वापरले जातात ते,

‘लग्नमंडपी कधी असे मी कधी शवापाशी !’ असतात

लग्नमंडपापासून मानवाच्या अंतीम यात्रेपर्यंत, चांगल्यावाईट सर्व ठिकाणी मी (माती)असते। स्वतःला शूर वीर समजणारे शेवटी माझ्याजवळच येतात. हे माणसा त्याशिवाय पर्याय नाही हे माहीत असतानाही तू कशाला ताठ रहातोस, गर्वाने फुगतोस? भाग्यवान, भाग्य संपवत जगणाऱ्यांना माझ्याशिवाय पर्याय नाही तेव्हा हे कुंभारा, मला पायी तुडवताना,

‘तुझ्या ललाटी अखेर लिहिले मीलन माझ्याशी ! याचा विचार कर.’

कवी मधुकर जोशी यांच्या कवितेतला कुंभार म्हणजे विश्वनियंता ! पृथ्वी, आप , तेज, वायु, आकाश या पंचमहाभूतापासून या विधात्याने विविध आकार, रंगातून मानव निर्माण केला.पण ज्याने आपल्याला निर्माण केले, हे जग दाखवले त्यालाच हा स्वार्थी माणूस विसरला. फक्त स्वतःचाच विचार करणाऱ्या माणसाला आपला पराक्रम, सौंदर्य यांचा गर्व झाला.त्याचा अहंकार फुग्याप्रमाणे फुगला. जसा कुंभार तुडवताना मातीला विसरला तसा माणूस पंचमहाभूतांचा उपभोग घेताना त्याच्या निर्मात्याला, विश्वनियंत्याला विसरला.

आपल्या नियतीचे चाक त्याच्या हातात आहे याचेही भान मानवाला राहिले नाही. धुंदीचा कैफ चढलेला स्वार्थी मानव विधात्याने लिहिलेला भाग्यलेखच खरा ठरणार ही जाणीव हरवून बसला.त्याने जन्मापासून आपले मातीचे असलेले दुर्लक्षित केले.

‘माती असशी मातीस मिळशी’ हे सत्य लक्षात ठेवून प्रत्येकाने जगावे हाच संदेश या कवितेतून मिळतो.

© श्रीमती अनुराधा फाटक

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ श्री अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 69 ☆ तरी म्हणे बायको.. ☆ श्री अशोक श्रीपाद भांबुरे

श्री अशोक श्रीपाद भांबुरे

☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 69 ☆

☆ तरी म्हणे बायको.. ☆

 

घरासाठी तीच राबराब राबते

तरी म्हणे बायको कुठे काय करते

 

सगळ्यांना उठताच हवा आहे चहा

घरी माणसं दोनच वा असोत दहा

सगळ्यांचा चहा टेबलावर ठेवते

तरी म्हणे बायको कुठे काय करते

 

झाडलोट जन्मजात मिळते ही कला

घाम करी फरशिचा बोळा हा ओला

घर नीटनेटकं नि साफसुफ ठेवते

तरी म्हणे बायको कुठे काय करते

 

नाष्टा प्रत्येकाला वेगळाच हवा

कुणी म्हणे थालिपीठ कुणी म्हणे रवा

दोन तलवारीनेच युद्ध ती लढते

तरी म्हणे बायको कुठे काय करते

 

खाली आहे आग वर ठेवला तवा

तिचा अग्निहोत्राशी रोज खेळ नवा

हात अन् भाकरी दोन्हीही भाजते

तरी म्हणे बायको कुठे काय करते

 

चपळता यावी म्हणून टाकते कात

कमी नाही कुठे ही बाईची जात

संकटांना साऱ्या ती पुरून उरते

तरी म्हणे बायको कुठे काय करते

 

© अशोक श्रीपाद भांबुरे

धनकवडी, पुणे ४११ ०४३.

[email protected]

मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ भूल ☆ श्री मुबारक उमराणी

श्री मुबारक बाबू उमराणी

☆ कवितेचा उत्सव :  भूल  ☆ श्री मुबारक उमराणी ☆

फुलपाखराचे गुज

फुल ऐकत बसले

रंग पंखात बघून

देवावरच रुसले

 

पंख दोन पाखराचे

छान कसे गिरविले

रंग पतंग होऊनी

दोरीविना फिरविले

 

माझ्या पाकळ्या पंखात

एक दोन दिले रंग

उडताही हो येईना

मनचित्र झाले भंग

 

वारा झुलवितो मला

वाटे मला पंख आले

देठातच माझे सारे

मन ओले दुःखी झाले

 

सारे मला समजवी

गंध सुगंध सुवास

फुलपाखरात नसे

तुला दिले गंध खास

 

मनोमनी हसे फुल

आत्मशक्ती होई भूल

गंध मकरंद हर्ष

चढविले देवा झुल

 

© श्री मुबारक बाबू उमराणी

शामरावनगर, सांगली

मो.९७६६०८१०९७.

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 21 ☆ संवाद…. ☆ कवी राज शास्त्री

कवी राज शास्त्री

☆ साप्ताहिक स्तम्भ – हे शब्द अंतरीचे # 21 ☆ 

☆ संवाद…. ☆

संवाद मन जिंकणारा असावा

संवाद मन तोडणारा नसावा…

 

संवादातून रम्य सोहळा घडावा

संवादातून प्रलय कधी न यावा…

 

संवाद साधता साधेपणा असावा

संवाद कधीच संधीसाधू नसावा …

 

संवाद मनाची अंतरे जपणारा

संवाद मनाची दुवे जाणणारा…

 

सु-संवाद होता शस्त्र गळून पडते

कु-संवाद होई, तर शस्त्र पाजळते…

 

संवाद सत्कार्यासाठी अवतरतो

या व्यतिरिक्त कट रचल्या जातो…

 

सुसंस्कृत असावे, दुष्कृत्य सोडावे

संवाद साधता, प्रेम द्यावे प्रेम घ्यावे…

 

© कवी म. मुकुंदराज शास्त्री उपाख्य कवी राज शास्त्री

श्री पंचकृष्ण आश्रम चिंचभुवन, वर्धा रोड नागपूर – 440005

मोबाईल ~9405403117, ~8390345500

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ गिऱ्हाईक ☆ सौ.नीलम माणगावे

सुश्री नीलम माणगावे

☆ कवितेचा उत्सव ☆ गिऱ्हाईक ☆ सुश्री नीलम माणगावे ☆

बस मधून जाता-येता

दिसतात मला त्या

रंगवलेल्या लालचुटुक ओठानी

गिऱ्हाईक हेरणाऱ्या!

काजळ भरल्या काळ्या डोहात

माणूसपण जपणार्‍या!

पोटच्या गोळ्याला

बापाचं नाव शोधणाऱ्या!

माझ्या सारख्याच दिसणाऱ्या….

हात, पाय, नाक, डोळे, कान

आणि मनसुद्धा असणाऱ्या,

माझ्याच जातीच्या

नखरेल पुतळ्या!

बाहेरून नटलेल्या

आतून फाटलेल्या

त्या….

त्या गिऱ्हाईक जपत असतात

टिचभर पोटासाठी

आणि आम्ही…. आम्ही ही एकुलतं का होईना

घरंदाज गिऱ्हाईकच तर जपत नसतो ना?

चिऊ-काऊच्या

घरट्यासाठी?

 

©  सुश्री नीलम माणगावे

जयसिंगपूर, जिल्हा कोल्हापूर

मो  9421200421

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ नंदनवन ☆ श्री तुकाराम दादा पाटील

श्री तुकाराम दादा पाटील

 ☆ कवितेचा उत्सव ☆ नंदनवन ☆ श्री तुकाराम दादा पाटील ☆ 

संसाराचे गीत जरासे सुरात गावे

गाता गाता कोरायाची मनात नावे

 

जबाबदारी घेण्यासाठी जपून बांधा

उनाडलेल्या जनावराच्या गळ्यात दावे

 

निसर्गातले धन मोलाचे जिवंत फिरते

शोधा याचे झाडामधले वनात रावे

 

जग मोलाचे बघण्यासाठी तनामनाने

कल्पकतेच्या गरुडा सोबत नभात जावे

 

भले पणाच्या वाटेवरती चालत असता

अडवा याला कोण बनवतो भ्रमात कावे

 

श्रद्धा ज्याची त्याला कळते हे नंदनवन

कृष्ण सख्याचे घुमत राहती दिशात पावे

 

भ्रष्टाचारी सभोवताली जमल्यावर ही

घामगाळुनी जे मिळते ते घरात खावे

 

©  श्री तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares
image_print