मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ एकदातरी ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी

सुश्री दीप्ती कुलकर्णी

☆ कवितेचा उत्सव ☆ जीवनपट ☆ सुश्री दीप्ती कुलकर्णी ☆ 

एकदातरी

एकदातरीअसं व्हावं

गारा वेचत हरवून जावं

 

दाटलैल्या धुक्याचं पांघरुण घ्यावं

श्रावणसरीत न्हाऊन घ्यावं

 

हिरवाई पाहताच मोहरुन जावं

स्रुष्टीतील नवलाईत हरवून जावं

 

वादळवार्यात गुंगुन जावं

सुखाच्या वर्षावात बेभान व्हावं

 

दुःखाचे घावही सोशित राहावं

स्वतःबरोबर दुसर्याच्या दुःखातही सहभागी व्हावं

 

आभाळमाया आठवत आठवत

क्षमाशील धरतीला उमजून घ्यावं

 

जीवनातील विविध रंगात मनस्वीपणे रंगून जावं

 

एकदातरी प्रत्येकानच जीवन भावुकतेने अनुभवावं.

 

© सुश्री दीप्ती कुलकर्णी

कोल्हापूर

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मन हे दत्तपदी रमले ☆ कवी विकास जोशी

 ☆ कवितेचा उत्सव ☆ मन हे दत्तपदी रमले ☆ कवी विकास जोशी ☆

मन हे दत्तपदी रमले

गाणगापूरी जाता जाता दत्तनाम जपले

मन हे दत्तपदी रमले ||ध्रु||

 

विश्वाच्या कल्याणासाठी

भक्तांच्या उध्दारासाठी

योगीराज नृसिंह सरस्वती भूवर अवतरले ||१||

 

निर्गुण मठी मना विश्रांती

सरते, मिटते भवभय, भ्रांती

दाटून आला शरणभाव अन मस्तक नत झाले ||२||

 

सूर, ताल, लय, गुरुंचे देणे

गुरुस्फूर्ती ही गुरुस अर्पिणे

भक्तीप्रेम हे अखंड राहो इतुकेच प्रार्थिले ||३||

 

© कवी विकास जोशी

गाणगापूर, १५.०१.२०२१

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

 

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ छडी वाजे छम  छम् ☆ श्री राजेंद्र परांजपे

☆ कवितेचा उत्सव ☆ छडी वाजे छम  छम् ☆ श्री राजेंद्र परांजपे ☆

(भरलेल्या वर्गासमोर उभं राहून शिकवण्याची सवय असलेल्या शिक्षकांना ह्या कोरोनामुळे ऑनलाईन शिकवायची वेळ आली. काही दिवसांपूर्वी केलेल्या ह्या कवितेत त्यांचं मनोगत मांडण्याचा प्रयत्न केला आहे.)

नाही फळा तो मागे, नाही खडू हाती !

हे असे शिकवावयाचे अवघड वाटते !

 

करुन खटपटी, शिकलो जरी नवतंत्र !

परी संगणकाची अजून भीती वाटते !

 

दाटतो मम मनी तो गलबला मुलांचा !

रोजची तयांची मज मस्तीही भासते !

 

ते खेळणे तयांचे, दंगा अन् मस्करी !

न पाहू शके ते आज, परी उरी दाटते !

 

कधी पुन्हा उघडून भरेल मम शाळा ?

हे असे शिकवणे मज नकोसे वाटते !

 

थांबला असाच तो घंटेचाही ठणाणा !

निःशब्द जाहली ती जरी मनी वाजते !

 

© श्री राजेंद्र परांजपे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ रंजना जी यांचे साहित्य # 58 – राजमाता स्वराज्याची ☆ श्रीमती रंजना मधुकरराव लसणे

श्रीमती रंजना मधुकरराव लसणे 

☆ रंजना जी यांचे साहित्य # 58 – राजमाता स्वराज्याची ☆

राजे लखूजींच्या गृही

जन्मा आली विद्युलता।

ऊरी स्वप्न स्वराज्याचे

गुलामीची ती सांगता।

 

राजकन्या जाधवांची

कुलवधु भोसल्यांची।

मानबिंदू आदर्शाचा

राजमाता स्वराज्याची।

 

दिले अभय जनाला

घडी बसवी राज्याची ।

अराजक दानवांना

धास्ती तुझ्या शासनाची

 

स्वराज्याचे बाळकडू

तूच राजांना पाजले

सिंह सह्याद्री गर्जता

तक्त दिल्लीचे हालले।

 

बालराजे थोपविती

फोज लांखो यवनांची।

राष्ट्रहीता सज्ज पुत्र

धन्य माय साहसाची।

 

आऊ साहेबा समान

राष्ट्रमाता होणे नाही।

करू त्रिवार नमन

याल का हो लवलाही।

©  रंजना मधुकर लसणे

आखाडा बाळापूर, जिल्हा हिंगोली

9960128105

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ ऋण ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित

श्री सुहास रघुनाथ पंडित

☆ कवितेचा उत्सव ☆ ऋण ☆ श्री सुहास रघुनाथ पंडित ☆ 

वाहिले सर्वस्व तू मज,काय तुजला मी दिले

मी दिलेले भोगून सारे, शब्द माझे झेलिले.

 

राहिली माझ्या सवे होऊन माझी सावली

अन् कधी माझ्याच स्कंधी क्षणभरी विसावली.

 

राग माझा,लोभ माझा आपला केलास तू

वेदनेच्या पायवाटा सुखभरे मळल्यास तू.

 

शांतवाया या मनाला घालशी हळू फूंकर

गंध भरल्या आसमंती अदृश्य जैसा कापूर.

 

त्याग जो केलास तू,ना वाच्यता त्याची कधी

फुलविण्या माझ्या मनाला दुःखासही तव संमती.

 

आज ढळला सूर्य आणि सावल्याही लांबल्या

आठवांच्या सर्व सरिता वाहताना थांबल्या.

 

मुक्त हे आयुष्य माझे रिक्त हस्ते मी उभा

झोळीत नाही आज माझ्या द्यावया तुज दोन दमड्या.

 

चार घे  हे शब्द आणि दोन  अश्रू नयनातले

स्पर्श विश्वासून घे अन् भाव हे  ह्रदयातले.

 

लाट लाटेला मिळावी , एक व्हावी शेवटी

वेगळा ना मी कधी अन् तू कधी ना एकटी.

 

©  श्री सुहास रघुनाथ पंडित

सांगली (महाराष्ट्र)

मो – 9421225491

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य – चिंतेचे घर मनात माझ्या… ☆ कविराज विजय यशवंत सातपुते

 कविराज विजय यशवंत सातपुते

☆ विजय साहित्य ☆ चिंतेचे घर मनात माझ्या..☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

(गागा गागा लगाल गागा)

चिंतेचे घर मनात माझ्या

घरघर त्याची उरात माझ्या.

 

बोलत जातो तुझ्या स्मृतींशी

हळवे वारे घरात माझ्या.

 

मोठे झाले कधी लेकरू

घुटमळतो मी पदात माझ्या .

 

बांधावरती ओली बाभळ

सळसळ बोली सुरात माझ्या.

 

हाती माझ्या प्रगती पुस्तक

रेघ लाल का सुखात माझ्या.

 

निरोप नाही नसे खुशाली

शब्द तुझे का स्वरात माझ्या.

 

लेखणीस या फुटला पाझर

हरवशील तू जगात माझ्या .

 

© विजय यशवंत सातपुते

यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी,  सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.

मोबाईल  9371319798

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ सुजित साहित्य # 63 – शेवटचं पत्र..! ☆ श्री सुजित कदम

श्री सुजित कदम

☆ साप्ताहिक स्तंभ – सुजित साहित्य #63 ☆ 

☆ शेवटचं पत्र..! ☆ 

(एखादी कविता ह्या काव्य संग्रहातून)

विसरली असशील

तू मला पण मी

मी तुला विसरलो नाही

आयुष्यातलं पहिलं वहिलं प्रेम

असं विसरून

चालत नाही

आठवणीत आहेस तू

अजूनही माझ्या

नसेन आठवणीत

मी अजूनही तुझ्या

 

आठवणीत आहेत माझ्या

चार दोन भेटीगाठी

एक दोन मिठ्या

विसरली असशील तू

तेव्हाच्याच काही शपथा

आठवतही नसेल तुला

मी तुला दिलेलं गुलाबाचं फूल

मला मात्र आठवतंय

ते तू ठेवलं होतं

तुझ्या पुस्तकात जपून

 

कदाचित ते अजूनही

त्या पुस्तकातच असेल

लक्षात नाही तुझ्या म्हणून

ते पुस्तकही तू दुसरंच

कोणाला दिलं असेल,

 

जाणवतो मला अजूनही

तुझा तो हळुवार स्पर्श

लक्षात नसेल तुझ्या

तू मला दिला होतास

एक नक्षीदार शंख

जपून ठेवली नसशील

मी तुला दिलेली काही

प्रेमपत्रं..

 

अजूनही माझ्या वहीत

आहे तुझं ते शेवटचं पत्र..

 

© सुजित कदम

पुणे, महाराष्ट्र

मो.७२७६२८२६२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे

सौ.ज्योत्स्ना तानवडे

 ☆ कवितेचा उत्सव ☆ मन ☆ सौ.ज्योत्स्ना तानवडे ☆ 

अथांग सागराहूनी खोल विशाल आकाशाहून थोर

किती पळावे याच्यामागे मन हे अवखळ पोर ||

 

कळे न याचे करावे काय ?

कुठे ठरेना याचा पाय

जो जो जावे याच्या संगे

तो तो होई शिरजोर

किती पळावे याच्या मागे मन हे अवखळ पोर ||

 

क्षणात फिरते आसाभवती

क्षणात पळते खाली वरती

पकडता न ये अचपळ भारी

सुटे मोकाट बंडखोर

किती पळावे याच्या मागे मन हे अवखळ पोर ||

 

कधी धबधबा हास्याचा

तर कधी लटका रुसवा

किती सुखावे आनंदाने

तया दुःख करी कमजोर

किती पळावे याच्या मागे मन हे अवखळ पोर ||

 

असंख्य भावना याच्या उदरी

परी हे चंचल मिश्किल लहरी

कधी न कळते याचे अंतर

सदा स्वच्छंदी बिनघोर

किती पळावे याच्यामागे मन हे अवखळ पोर||

 

अथांग सागराहूनी खोल विशाल आकाशाहून थोर

किती पळावे याच्या मागे मन हे अवखळ पोर ||

 

© सौ. ज्योत्स्ना तानवडे

वारजे, पुणे.५८

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – साप्ताहिक स्तम्भ ☆ कवितेच्या प्रदेशात # 82 – घर माझे …. ☆ सुश्री प्रभा सोनवणे

सुश्री प्रभा सोनवणे

(आप  प्रत्येक बुधवार को सुश्री प्रभा सोनवणे जी  के उत्कृष्ट साहित्य को  साप्ताहिक स्तम्भ  – “कवितेच्या प्रदेशात” पढ़ सकते  हैं।)

☆ साप्ताहिक स्तम्भ – कवितेच्या प्रदेशात # 82 ☆

☆ घर माझे …. ☆

माझ्या साठी जागे असते घर माझे

मी येण्याची वाट पाहते घर माझे

 

घरी परतण्या उशीर होता धुसफुसते

रागावूनी धाक दावते घर माझे

 

या हाताची चव सांभाळी सर्वांना

आस्वादाने भरुन पावते घर माझे

 

पेल्यामधली वादळे, कधी वावटळी

शांतपणाने सर्व साहते घर माझे

 

अवगुण विसरत,जीव लावते कुणा कुणा

माणुसकी चा भार वाहते घर माझे

 

माझे माझे करत साजरे करताना

कधी मला ही बेघर करते घर माझे

 

© प्रभा सोनवणे

“सोनवणे हाऊस”, ३४८ सोमवार पेठ, पंधरा ऑगस्ट चौक, विश्वेश्वर बँकेसमोर, पुणे 411011

मोबाईल-९२७०७२९५०३,  email- [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जाणीव ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे

सुश्री मंजुषा सुनीत मुळे

 ☆ कवितेचा उत्सव ☆ जाणीव ☆ सुश्री मंजुषा सुनीत मुळे ☆

आज एक मज मुंगी भेटली

तुरू तुरु तुरु ती होती चालली

थांब जरा ग म्हणता तिजला

‘ चालत बोलू’ मला म्हणाली ||

 

काय काम ते सांग लवकरी

कामे मजला असती कितीतरी

इवलीशी ती, मला दटावे

घरी जायचे मला लवकरी ||

 

विचारले मी करिशी का तू

सततच इतकी गडबड बाई

इतकी दगदग हवी कशाला ?

बरी मुळी ना इतकी घाई ||

 

थांबली मग ती माझ्यापाशी

म्हणे कशी ग मठ्ठ तू अशी

कण कण वेचत जाणे मजला

लेकरं माझी घरी उपाशी ||

 

आयुष्य किती मज माहीत नाही

जगेन तरी का, ठाऊक नाही

सहजच चिरडे कुणीही मजला

पोचीन घरी ही खात्री नाही ||

 

तुम्ही माणसे भाग्यवान ग

मरणाचेही तुमच्या कौतुक

गुपचुप मरतो आम्ही कारण

जगण्याचेच ग कुणा न कौतुक।।

 

तुमच्याहुन पण आम्ही शहाण्या

आम्हा ही तुमचे नाहीच कौतुक

क्षणभंगुर ठाऊक जगणे तरी

रडणे खचणे आम्हा न ठाऊक ।।

 

इतके बोलून कोडे घालून

हसतच गेली पुन्हा पळून

जाता जाता हळूच आणि

खट्याळ गेली मलाच चावून ||

 

©  सुश्री मंजुषा सुनीत मुळे

९८२२८४६७६२

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares