श्रीमति उर्मिला उद्धवराव इंगळे
या भागात देवीच्या विविध रुपांचे वर्णन व तिच्या भक्तीचे स्वरुप .
– साधक उर्मिला इंगळे
☆ केल्याने होतं आहे रे ☆
श्रीचामुण्डेश्वरी चरणावली -5
!!श्रीराम समर्थ!!
माता माहूर गडाची
तांबुलाचा होई लाभ
शालू हिरवा नेसली
अलंकारे राखी आब !!
भरजरी पैठणीत
खुलुनिया दिसे रुप
भक्ती शक्ती देवतेचे
अंतरंगी निजरुप !!
कुमारिका पूजनाने
ऐश्र्वर्याची प्राप्ती होते
सुखशांती समाधान
जगन्माता सौख्य देते !!
रामानेही केली पूजा
पूजियेली भगवती
केला वध रावणाचा
दिले सौख्य सेवाव्रती !!
सप्तशती श्रीसूक्तही
यथाशक्ती करु पाठ
भक्तीभाव वृद्धिंगत
मांगल्याचे गेही ताट !!
दुर्गास्तोत्र रामरक्षा
करु पाठ भक्तीभावे
पावतसे जगदंबा
परिपूर्ण मनोभावे !!
मंत्रातील एक एक
शक्तीवंत हे अक्षर
नामजप उच्चारण
देवी नामाचा जागर !!
मन होई शुचिश्मंत
देवी आराधना करु
नवरात्रात सुंदर
पूजा संकीर्तन करु !!
शिवनेरी किल्ल्यावरी
शोभे दैवत शिवाई
कुलदेवी माहेरची
पूजीताती जिजाबाई !!
आई अंबेचा गोंधळ
माता रेणुका गोंधळ
बोला सप्तशृंगी उदो
महालक्ष्मी उदो उदो !!
उदो उदो उदो उदो उदो उदो उदो..ऽऽ..ऽऽ..
क्रमश: …..
©️®️ साधक- उर्मिला इंगळे
सातारा
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈