सुश्री संगीता कुलकर्णी
निवेदन –
आपण अनेक पुस्तके वाचतो. त्यातील काही पुस्तकं आपल्याला आवडतात. त्यावर बोलावं, इतरांना सांगावं, असं आपल्याला वाटतं. कित्येकदा आपल्या पुस्तकाबद्दल इतरांशी बोलावं, आपली त्यामागची भूमिका मांडावी, असंही काही वेळा वाटत. या वाटण्याला शब्द देण्यासाठी एक नवीन सादर सुरू करत आहोत, ‘पुस्तकांवर बोलू काही.’ आज त्यातील पहिला लेख सुश्री संगीता कुलकर्णी यांचा.
संपादक मंडळ – ई – अभिव्यक्ती
☆ पुस्तकांवर बोलू काही ☆ लघुकथा संग्रह “संवेदना” अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर ☆ सुश्री संगीता कुलकर्णी ☆
अनुवादित पुस्तक – संवेदना
मूळ हिंदी लेखक – डाॅ. कमल चोपडा
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
समकालीन हिंदी प्रस्थापित लेखकांमध्ये डॉ कमल चोपडा हे एक महत्वाचं नाव. त्यांच्या हिंदीतील निवडक लघुत्तम कथांचा अनुवाद संवेदना या नावाने श्रीमती उज्ज्वला केळकर यांनी केला आहे..
आपल्या सभोवतालचं जीवन त्यातील सहजता, गंभीरता, तर कधी कधी भयावहताही ते सहजतेने पाहतात व अनुभवतात. तसेच आपल्या भोवती घडणारे घटना- प्रसंग, ते घडवणा-या विविध व्यक्ती, त्यांचे विचार, विकार, वर्तमानात जाणवणारी सुसंगती- विसंगती, स्वार्थ, त्याग, सांमजस्य ताठरता यांचे ते सूक्ष्म निरीक्षण करतात.
श्रीमती उज्ज्वला केळकर
या त्यांच्या पुस्तकातील कथांत लक्षणीय विविधता आहे. कौटुंबिक नातेसंबंध, सामाजिक व्यवहार, सांप्रदायिक दंगे, राजकारण अशा विविध क्षेत्रांतील अनेक पैलू या कथांमध्ये आहेत. कौटुंबिक नात्यातील अनेक प्रकारचे भावबंध त्यांनी उलगडलेले आहेत. मुलं, त्यांचे आई-वडील भावंड, सासवा- सूना या नात्यातील आत्मियता, प्रेम, जिव्हाळा त्यांच्यातील ताण-तणाव त्यातून प्रगट झालेले भाव- भावनांचे कल्लोळ या सा-याला चिटकून राहिलेले दारिद्रयाचे अस्तर त्यातूनच झरणारी आत्मीयतेची माणुसकीची जाण हे सर्व या कथांमधून प्रगट होते.
सासू-सुनेचे संबंध तर जगजाहीर… पण इथे मुलगा आणि सून यांच्यातील बेबनाव दूर करणारी सासू आहे. “ओठांत उमटले हसू– मूळ कथा छिपा हुआ दर्द ” या कथेत तर गावाहून सासू-सास-यांना भेटायला आल्यावर घरात फक्त मक्याचचं पीठ शिल्लक आहे बाकी काही नाही हे कळल्यावर…आम्ही फक्त तुमच्याच हातच्या मक्याच्या रोट्या खायला आलो आहोत पण त्या सोबत दूध, लोणी, तूप, साखर असं काहीही घालू नका. डाॅक्टरांनी आम्हाला खाऊ नका म्हणून सांगितलयं…असं म्हणत सासूचा आत्मसन्मान जपणारी समंजस सून आहे.
पतीचा अन्याय सहन करणारी स्त्री हे चित्र तर आपल्याला जागोजागी दिसतं. ” पती परमेश्वर–मूळ कथा- पालतू ” या कथेत तर दुस-या बाईकडे जाण्यासाठी बायकोकडे पन्नास रुपये मागणा-या नव-याचे पाय सुपारी देऊन गुंडाकडून निकामी करणारी व नंतर त्याला औषधोपचार करून भाजीच्या गाडीवर बसवून त्याला कामाला लावणारी व माझा पती ” पती परमेश्वर ” असेही म्हणणारी विरळा बायको भेटते…. दारूडा नवरा मेल्यानंतर आठ दहा वर्षांचा मुलाला सोडून दुसरा घरोबा करणा-या आईचं दुःख समजून घेणारा..आपल्याला सोडून गेल्यावरही आपल्यात कटुता येऊ न देणारा ” असेल तिथे सुखी असो– मुळ कथा– जहाँ रहे सुखी रहे ” अशी इच्छा बाळगणारा मुलगाही येथे आपल्याला भेटतो..
सांप्रदायिक दंग्याच्या पार्श्वभूमीवरच्या अनेक कथांही यात आहेत. पण प्रत्येक कथेचा रंग वेगळा सांगण वेगळ…” विष-बिज ” मूळ कथा विष-बिज मधील म्हातारी म्हणते लूटमार, आगं लावणं यामुळे तुमच्या धर्माची प्रतिष्ठा कशी वाढेल? उलट अशा प्रत्येक घटनेतून तुमच्या शत्रूंची संख्याच वाढत जाईल आणि मग ही आग तुमच्या घरापर्यंत, तुमच्या मुलांबाळांपर्यंत पोचेल….
तर “तपास–मूळ कथा- शिनाख्त ” या कथेत पोलिसांची कुत्री त्या भागातला एक कुख्यात गुंड एक आमदार एक गुन्हेगार यांच्यापर्यंत पोचतात. इन्स्पेक्टर आझाद आपल्या अधिका-याला अहवाल सादर करतो. खरे गुन्हेगार कोण? हे कळल्यावर तो अधिकारी म्हणतो तुला ‘ तपास ‘ नाही ‘ तपासाच नाटक ‘ करायला सांगितलं होतं. त्यावर इन्स्पेक्टर म्हणतो माझा तपास पूर्ण झालाच नव्हता. चौथ्या गुन्हेगारापर्यंत मी पोचलोच नव्हतो. चौथा गुन्हेगार पोलिस म्हणजे आपण..
आजारी मुलाच्या औषधपाण्यासाठी पैसे हवे असलेला एक सामान्य माणूस..पैशासाठी बस मध्ये बाँम्ब ठेवायला तयार होतो. उतरता उतरता त्याला एका लहान मुलाचं रडणं ऐकू येतं. त्याला ते आपल्याच मुलाचं वाटतं व तो बस मध्ये बाँम्ब आहे हे सगळ्यांना सांगून खाली उतरायला लावतो. लहान मुलाचे रडण्या- हसण्याचे आवाज आपल्याच मुलासारखे कसे वाटतात? मग ते कुठल्या का धर्माचे असेनात…कथा– ‘धर्म– मूळ कथा– धरम ‘
‘सफरचंद– मूळ कथा– फल’ व ” पैसा आणि परमेश्वर — मूळ कथा–पैसा और भगवान ” या कथांत तर मुलांचे मन, त्यांना पडणारे गमतीदार प्रश्न मांडले आहेत. ” पैसा व परमेश्वर ” या कथेत तर देवाला पैसे टाकताना पाहून ‘ देव भिकारी आहे का? ‘ त्याला पैसे टाकून त्याच्याकडे भिका-यासारखं काही का मागतात? त्याला जर पैसे हवे असतील तर तो आपल्या जादूने पैशाचा ढिग निर्माण करणार नाही का? असं विचारणारा व विचार करायला लावणारा निरागस पिंकू इथे आहे…
अशा अनेकविध कथांतून सांप्रदायिक कट्टरतेच्या दरम्यान सद्भभावना आणि मानवी मूल्यांच्या जपणुकीचा आशय अतिशय सुंदररित्या मांडलाय..विविध पातळ्यांवर विविध अंगाने होणा-या शोषणाचे अनेक रूपरंग त्यांच्या या कथांतून प्रगट झाले आहेत..
डाॅ. कमल चोपडा यांच्या कथा जीवनातील, लोक व्यवहारातील, आचार-विचारातील विसंगतीवर नेमकं बोट ठेवते व मोजक्याच शब्दांतून त्यांचं मार्मिक दर्शनही घडवतं..
© सुश्री संगीता कुलकर्णी
ठाणे
मो 9870451020
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈