कविराज विजय यशवंत सातपुते
(समाज , संस्कृति, साहित्य में ही नहीं अपितु सोशल मीडिया में गहरी पैठ रखने वाले कविराज विजय यशवंत सातपुते जी की सोशल मीडिया की टेगलाइन “माणूस वाचतो मी……!!!!” ही काफी है उनके बारे में जानने के लिए। जो साहित्यकार मनुष्य को पढ़ सकता है वह कुछ भी और किसी को भी पढ़ सकने की क्षमता रखता है।आप कई साहित्यिक, सांस्कृतिक एवं सामाजिक संस्थाओं से जुड़े हुए हैं। कुछ रचनाये सदैव समसामयिक होती हैं। आज प्रस्तुत है एक भावप्रवण कविता “मी….!” )
☆ विजय साहित्य – मी….! ☆
मी….!
हरवतोय मी… की गवसतोय मी..
परीचितांना अपरीचित आणि
अपरिचितांना परीचित वाटतोय मी.
अविश्वासात विश्वास आणि
निस्वार्थात स्वार्थ गोवतोय मी
हरवतोय मी… की गवसतोय मी..!
पुस्तकातले कुटुंब, समाज
त्यांच्यातच रमतोय मी.
माणूस माणूस जोडलेला
पुन्हा पुन्हा वाचतोय मी
हरवतोय मी… की गवसतोय मी..!
गणिताची आकडेमोड
आकडेवारीत विस्तारतोय मी
माझ्याच गरजा, नी जबाबदा-या
कार्य कारण भाव निस्तरतोय मी.
हरवतोय मी… की गवसतोय मी..!
चालतोय मी , थांबतोय मी
माझ्यातल्या मीला शोधतोय मी
लिहितोय मी, वाचतोय मी
विस्तारीत जगणे , आवरतोय मी.
हरवतोय मी… की गवसतोय मी..!
कुणाच्या जमेत , कुणाच्या खर्चात
क्षणा क्षणाला साचतोय मी
ऊन्हातला मी, सावलीतला मी
चक्रवाढ व्याजात नाचतोय मी.
हरवतोय मी… की गवसतोय मी..!
चुकतोय मी , मुकतोय मी
संसार नावेत, डुलतोय मी
कधी काट्यात , कधी वाट्यात
जीवन बाजारात , भुलतोय मी.
हरवतोय मी… की गवसतोय मी..!
कधी भूतकाळात तर कधी
वर्तमानात जगतोय मी
अनुभूती वेचताना थकलो तर
तुझ्याच अंतरात वसतोय मी.
हरवतोय मी… की गवसतोय मी..!
© विजय यशवंत सातपुते
यशश्री, 100 ब दीपलक्ष्मी सोसायटी, सहकार नगर नंबर दोन, पुणे 411 009.
मोबाईल 9371319798