☆ कवितेचा उत्सव ☆ आजी… / गोष्ट ☆ श्री आनंदहरी ☆
सोप्यातल्या कडीपाटावर बसून
सांगत राहायची आजी
गोष्टी
आम्हां भावा-बहिणींना कुरवाळत
रात्रीची जेवणं झाल्यावर..
कधी रामायण-महाभारतातील,
कधी जिजाऊ-शिवबाची
कोंडाण्याची, पावनखिंडीची
कधी झाशीच्या राणीची
कधी सांगत राहायची
तिच्या बालपणीचे काही बाही
आठवणींच्या झुल्यावर झुलत
कुठंतरी दूर नजर लावून
जणू पाहत असल्यासारखी
स्वतःचाच बालपण, माहेर
काळोखल्या आकाशात
काळाचा पडदा दूर सारून
आपल्या डोईवरचा पदर सरळ करीत
नकळत थकल्या डोळ्यांना हळुवार पुसत
किंवा
कधी
गात राहायची अंगाई
आपल्या थरथरत्या मायाळू आवाजात
तिच्या आई-आज्जीने तिच्यासाठी गाईलेली
काळाच्या पल्याड जात..
आता
मी ही सांगत राहतो त्याच गोष्टी
आणि गोष्टी आजीच्या, माझ्या बालपणीच्या
गात राहतो तीच अंगाई
नातवंडांना जवळ घेऊन
माझ्या आजीच्या मायाळू हातानी कुरवाळत
पहात राहतो मनाच्या आकाशात
कालौघात हरवून गेलेले
ते घर, तो सोपा, तो कडीपाट,
आजी आणि ते दिवस
उद्या ती ही सांगतील गोष्टी कदाचित
आपल्या मुलाबाळांना, नातवंडांना
आजीची परंपरा जपत
तेंव्हा
माझीही झाली असेल एखादी गोष्ट
आजीसारखीच.
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈