मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ स्वातंत्र्याच्या वेदी… ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे

☆ स्वातंत्र्याच्या वेदी ☆ सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆

स्वातंत्र्याच्या वेदी वरती,

यज्ञाची सुरुवात जाहली!

यज्ञामध्ये पहिली समिधा,

वासुदेवानी अर्पियली!

*

ज्वाला तेव्हा पेटून उठली,

पारतंत्र्य दूर करण्या झणी!

घेतला वसा स्वातंत्र्याचा,

भगतसिंग ने तरूण पणी!

*

पेटून उठले एकाच रणी,

साथ सुखदेव, राजगुरूची!

धाडस त्यांचे अपूर्व होते,

गाठ घेतली ती मृत्यूची!

*

निर्भयाचे प्रतीक आहे,

कथा त्यांच्या साहसाची!

आठवणीने व्याकुळ होतो,

परिसीमा होती त्यागाची!

*

मनास होती तीव्र वेदना,

आठवून त्यांचा असीम त्याग!

एक दिवसाच्या आठवणीने,

होते का मनीची शांत आग!

*

वंदन करावे त्यांच्या स्मृतीला,

थोर देशभक्त जन्मले भारती!

कधी न विसरू त्यांचा त्याग,

गाऊ आपण त्यांची आरती!

© सुश्री उज्वला सुहास सहस्रबुद्धे

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ सु सं वा द! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

😁 सु सं वा द! 😅 श्री प्रमो वामन वर्तक ⭐ 

असू नये गोष्टी वेल्हाळ

लावू नये जास्त पाल्हाळ,

सत्य वाचे सदा वदावे,

जेव्हढ्यास तेव्हढे बोलावे!

*

घालून डोळ्यात डोळे

संवाद आपण करावा,

खोटे न बोलती डोळे

भाव मनीचा पोचवावा!

*

संवाद साधतांना सदा

नका करू हातवारे,

शब्द मुखातुनी मधाळावे

न करता अरे ला कारे!

*

स्वर पट्टी सांभाळून

बोलू नये उगा तारस्वरे,

पकडता संवादाचा धागा

शब्द भिडती ह्रदयी खरे!

*

नियम साधे हे संवादाचे

पाळा करतांना संवाद,

होता ध्येय साध्य मनीचे

मिटून जाती फुकाचे वाद!

मिटून जाती फुकाचे वाद!

© श्री प्रमोद वामन वर्तक

१०-०३-२०२५

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ चिमण्यांचे झाड… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य ?️?

☆ चिमण्यांचे झाड… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

झाडावर बसल्या चिमण्या

झाडास लगडल्या चिमण्या

झाड चिमण्यांचे होऊन गेले

फुलं, पान फळही झाल्या चिमण्या……

*
चिमण्यांच्या चिवचिवाटाने

जणू बोलू लागले झाड

चिमण्यांच्या बागडण्याने

सुखे डोलू लागले झाड…….

 सुखे डोलू लागले झाड…….

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ २० मार्च : जागतिक चिमणी दिवस  — तीन कविता ☆ श्री आशिष बिवलकर, श्री प्रमोद वामन वर्तक आणि शुभदा भा. कुलकर्णी ☆

?️?  चित्रकाव्य  ?️?

? २० मार्च : जागतिक चिमणी दिवस  — तीन कविता ☆ श्री आशिष बिवलकर, श्री प्रमोद वामन वर्तक आणि शुभदा भा. कुलकर्णी ☆

(या निमित्ताने वेगवेगळ्या भावना व्यक्त करणाऱ्या तीन कविता.)

श्री आशिष बिवलकर

( १ ) 

दार बंद करून,

चिऊताई बसली |

कळत नाही,

का बर ती रुसली |

*

ओसरीवर रोज नाचणारी,

आता ती दिसेनाशी झाली |

पूर्वापार माणसाळलेली,

माणसांपासून दूर गेली |

*
एक घास चिऊचा, एक काऊचा

भरवत पिढ्यानपिढ्या वाढल्या |

चिऊताई तुझ्या गोष्टी ऐकत,

लहानाच्या मोठ्या झाल्या |

*
काळ बदलत गेला,

फ्लॅट संस्कृतीत कुठं राहिली ओसरी |

तुझेच घरटे हिरावले आम्ही,

भूतदयेचे संस्कार सगळेच ते विसरी |

*
तुझा चिवचिवाट ऐकायला,

मनाची फुरसतच ती राहिली नाही |

चार दाणे तुला टाकायचे असतात,

सुचतच नाही आता मनाला काही |

*

असेल तिथे सुरक्षित रहा,

नामशेष मात्र नकोस होऊ |

चूकचूक करते पाल मनी,

चित्रात तरी उरशील का गं चिऊ?

© श्री आशिष बिवलकर

बदलापूर 

मो 9518942105

श्री प्रमोद वामन वर्तक

(२) 

निघे शुचिर्भूत होण्या 

सात चिमण्यांची फौज,

लक्ष ठेवती त्यांच्यावर दोघी

रोखून आपली नजर तेज!

*

पंख चिमुकले बुडवून जलात 

घेती आनंद स्नानाचा मनमुराद,

अंग शहारता गार पाण्याने 

झटकून टाकती पाणी क्षणात!

*

उरे बोटावर मोजण्या इतकी 

यांची संख्या बघा आजकाल,

येत्या ग्रीष्मात पाण्यावाचून

आपण त्यांचे टाळूया हाल!

आपण त्यांचे टाळूया हाल!

© श्रीप्रमोद वामन वर्तक

मो 9892561086

सौ. शुभदा भा. कुलकर्णी (विभावरी) 

(३)  

चिऊताई आली नाचत 

माझ्या दारी अंगणात 

या ग सा-या खेळायला

करू म्हणे गंमत जंमत 

*
छान आहे इथे सारे

हिरवी हिरवी झाडे 

पाना -पानातून लहरते

हवेहवेसे मंद वारे |

*

शांत सुंदर मंत्रांचा 

नाद कानी निनादतो

जगतांना माणसाला 

संदेश देऊया मैत्रीचा |

*

कवयित्री : शुभदा भा. कुलकर्णी.

 मो. ९५९५५५७९०८/

©  शुभदा भा.कुलकर्णी (विभावरी)

कोथरूड-पुणे

मो.९५९५५५७९०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ जसा मनाचा विचार असतो… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆

श्री विनायक कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ? 

☆ जसा मनाचा विचार असतो… ☆ श्री विनायक कुलकर्णी ☆ 

[वृत्त..वनहरिणी  [मात्रा८+८+८+८=३२]]

चार असतो जसा मनाचा तशी आपली असते दृष्टी

वास्तवतेचे भान विसरते कल्पनेतली दिसते सृष्टी

होकारार्थी भाव हरपतो नकारतेची कूस उजवते

असून नाती अवतीभवती एकांताची होते वृष्टी

*

जे नाही ते दिसते सारे डोळ्यांवरती असून पट्टी

आभासांच्या आकारांशी घट्टच जाते जमून गट्टी

दुर्जनतेशी छान मित्रता सज्जनतेशी वैर लाभते

स्नेहासमवे विरह येतसे सौजन्याशी होते कट्टी

*

साधकबाधक विचारांमध्ये सुरूच होते जंगी मुष्टी

भला असूनी जीव बिचारा उगाच होतो दुःखी कष्टी

उघड करावे विवंचनेला कशास नुसती गुंतागुंती

सत्संगाची साथ लाभता सुधारणेला मिळेल पुष्टी

© श्री विनायक कुलकर्णी

मो – 8600081092

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ || तुही व्हावेस शहाणे || ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे)

? कवितेचा उत्सव ?

|| तुही व्हावेस शहाणे || ☆ म. ना. दे. (श्री मयुरेश देशपांडे) ☆

तुम्ही थांबाल तिथेच, मला मात्र वाहायचे

माझ्या प्रिय कठड्यांनो, तुम्हा नाही कळायचे

*

तुम्हा वाटेल आनंद, पाय रोवून थांबण्या

मला हौस वेगळीच, नवा प्रदेश पाहण्या

*

तुम्हा भोवती नांदेल, पाना फुलांचा संसार

माझ्या सोबती राहिल, सारा गाळ निरंकार

*

कधी भरती अहोटी, वेगवेगळा आकार

टचकन ओले करी तुम्हा, तेवढाच उपकार

*

तुही व्हावेस शहाणे, जरा माणसा यातून

वर कठोर कठडा, आणि वाहता आतून

कवी : म. ना. देशपांडे

(होरापंडीत मयुरेश देशपांडे)

+९१ ८९७५३ १२०५९ 

https://www.facebook.com/majhyaoli/ 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ ॥ निर्वाण षटकम्॥ – मराठी भावानुवाद : आद्य शंकराचार्य ☆ भावानुवादक : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ ॥ निर्वाण षटकम्॥ – मराठी भावानुवाद : आद्य शंकराचार्य ☆ भावानुवादक : डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

मनो बुद्ध्यहंकारचित्तानि नाहम् न च श्रोत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे

न च व्योम भूमिर् न तेजॊ न वायु: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥

*

न च प्राण संज्ञो न वै पञ्चवायु: न वा सप्तधातुर् न वा पञ्चकोश:

न वाक्पाणिपादौ न चोपस्थपायू चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥

*

न मे द्वेष रागौ न मे लोभ मोहौ मदो नैव मे नैव मात्सर्य भाव:

न धर्मो न चार्थो न कामो ना मोक्ष: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥

*

न पुण्यं न पापं न सौख्यं न दु:खम् न मन्त्रो न तीर्थं न वेदा: न यज्ञा:

अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥

*

न मृत्युर् न शंका न मे जातिभेद: पिता नैव मे नैव माता न जन्म

न बन्धुर् न मित्रं गुरुर्नैव शिष्य: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥

*

अहं निर्विकल्पॊ निराकार रूपॊ विभुत्वाच्च सर्वत्र सर्वेन्द्रियाणाम्

न चासंगतं नैव मुक्तिर् न मेय: चिदानन्द रूप: शिवोऽहम् शिवॊऽहम् ॥

*

भावानुवाद :: 

निर्वाण षटक

मन, बुद्धी मी ना अहंकार चित्त 

कर्ण ना जिव्हा, नाही नासा न नेत्र

व्योम न धरित्री, नसे तेज वायू

चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||१||

*

न मी चेतना ना असे पंचवायू

नसे पंचकोष मी ना सप्तधातू

मी वाचा न हस्त ना पादोऽन्य गात्र

चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||२||

*

न संतापी द्वेषी नसे लोभ मोह

नसे ठायी मत्सर ना मी मदांध

धन-धर्म-काम ना मी मोक्षातीत

चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||३||

*

न मी पुण्य-पाप न सौख्य न दुःख

नसे मंत्र, तीर्थ न वेद ना यज्ञ

नसे अन्न वा ना भरविता न भोक्ता

चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||४||

*

मज मृत्युभय ना न जाणे मी जाती 

मला ना पिता-माता मी तर अजन्मी

नसे बंधू स्नेही गुरु शिष्य नसती

चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||५||

*

विकल्पाविना मी न आकार मजला 

मी सर्वव्यापी इन्द्रियात वसला

बंध मला ना मज नाही मुक्ती

चिदानंदरुपी मी शिवस्वरूपी ||६|| 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 244 – गझल – आकाश भावनांचे…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 244 – विजय साहित्य ?

☆ गझल – आकाश भावनांचे…! ☆

आकाश भावनांचे गझले तुझ्याचसाठी,

हे विश्व आठवांचे मतले तुझ्याचसाठी…! 

  *         

आकाश बोलणारे जमले तुझ्याचसाठी,

हे पंख, ही भरारी, इमले तुझ्याचसाठी…!

 *   

माणूस वाचताना, टाळून पान गेलो.

काळीज आसवांचे, तरले तुझ्याचसाठी..!

*

सारे ऋतू शराबी, देऊन झींग गेले

प्याले पुन्हा नव्याने, भरले तुझ्याचसाठी..! 

*

हा नाद वंचनांचा , झाला मनी प्रवाही

वाहतो कुठे कसा मी?, रमलो तुझ्याच साठी..!       

*

जखमा नी वेदनांची,आभूषणे मिळाली

लेऊन  साज सारा, नटलो तुझ्याचसाठी..!

*

काव्यात प्राण माझा, शब्दांत अर्थ काही

प्रेमात प्रेम गात्री, वसले तुझ्याचसाठी..!

*

आयुष्य सांधताना,जाग्या  अनेक घटना

हे देह भान माझे हरले तुझ्याचसाठी…!

*

कविराज रंगवीतो, रंगातल्या क्षणांना

चित्रात भाव माझे, उरले तुझ्याचसाठी..!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंगांचं रूप… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆

सौ. वंदना अशोक हुळबत्ते

? कवितेचा उत्सव ?

☆ रंगांचं रूप… ☆ सौ. वंदना अशोक हुळबत्ते ☆ 

रंग विस्कटलेला समाज

होळीचा रंग उधळतोय

बेगडी संस्कृती

परंपरा जोपासतोय

*

रंग येतील ही……

गळ्यात गळे घालून

घ्यावी लागेल त्यांची

अस्मिता तपासून

*

रंग स्वतःमध्ये रंगलेले

कोणी ओरबडले…

वेगळे केले…..

विभागात वाटून दिले

*

रंग झाले

अक्राळविक्राळ

आक्रमक

घोषणा देणारे

आपले गट पोसणारे

*

भिती वाटते

रंगाना आपलं म्हणणं

त्यापेक्षा सोयीचे असेल

रंगहिन असणं

© सौ.वंदना अशोक हुळबत्ते

मो.९६५७४९०८९२

सांगली

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ रंगपंचमी… ☆ श्री अनिल वामोरकर ☆

श्री अनिल वामोरकर

? कवितेचा उत्सव ?

☆ रंगपंचमी☆ श्री अनिल वामोरकर ☆

रंगू दे

रंगात तुझिया

शाश्वत अशा

आत्मानंदात….

*

रंगू दे

रंगात तुझिया

बोधाच्या अशा

नितळ झ-यात…

*

रंगू दे

रंगात तुझिया

उत्कट अशा

निर्व्याज प्रेमात…

*

रंगू दे

रंगात तुझिया

सेवा, त्यागाच्या

निर्भेळ वृत्तीत…

*

रंगू दे

रंगात तुझिया

मी ने व्हावे वजा

सदैव राहो शून्यात…

© श्री अनिल वामोरकर

अमरावती

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

Please share your Post !

Shares