श्री अशोक श्रीपाद भांबुरे
(वरिष्ठ मराठी साहित्यकार श्री अशोक श्रीपाद भांबुरे जी का अपना एक काव्य संसार है । आप मराठी एवं हिन्दी दोनों भाषाओं की विभिन्न साहित्यिक विधाओं के सशक्त हस्ताक्षर हैं। आज साप्ताहिक स्तम्भ –अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती शृंखला की अगली कड़ी में प्रस्तुत है एक समसामयिक एवं भावप्रवण कविता “श्वासांची दरी”।)
☆ साप्ताहिक स्तम्भ – अशोक भांबुरे जी यांची कविता अभिव्यक्ती # 55 ☆
☆ श्वासांची दरी☆
का तुझ्या माझ्यात श्वासांची दरी ?
लाव ओठी तू जराशी बासरी
सूर कानी मधुर आले कोठुनी
राधिका होते पुन्हा ही बावरी
अर्पिली देवा तुला मी ही फुले
अन् सुगंधी होत आहे टोकरी
राउळी गेलोच नाही मी कधी
रोज येतो सूर्यनारायण घरी
विठ्ठलू जाते जनीचे फिरवितो
भक्तिची माया असे ही ईश्वरी
माणिकाचे घालु का मी लोणचे ?
पोट भरण्या लागते रे भाकरी
ग्रीष्म मातीने किती हा सोसला
धाडल्या आता सरी तू भूवरी
ईद्र देवाची कृपा ही जाहली
रानभर होती पसरली बाजरी
घाबरावे अंधकारा का तुला ?
धीर देते ही प्रभा तर केशरी
© अशोक श्रीपाद भांबुरे
धनकवडी, पुणे ४११ ०४३.
मो. ८१८००४२५०६, ९८२२८८२०२८