विश्वमारी म्हणा किंवा महामारी
तुम्ही मला काहीही म्हणा
नैसर्गिक आपत्ती किंवा
मानव निर्मित षडयंत्र म्हणा.
अखेर हरणार तुम्हीच.
असेनही मी.. . तुमच्या लेखी
भयानक नैसर्गिक आपत्ती
यापूर्वीही तुम्ही मला पाहिलय
वादळापूर्वीची शांतता म्हणून
सहन देखील केलय… !
प्रचंड घाबरून गेला होतात तुम्ही
चक्रीवादळे, गारपीट
भुकंप, ज्वालामुखी आणि त्सुनामी.
तुम्ही अनुभवलीत या आधी
ओझोन प्रणीत घालमेल
वैश्विक उष्णता
अनाठायी बाष्पीभवन
आणि नैसर्गिक समतोल ढासळणारी
अस्मानी संकटे
पण
तुम्हाला ते पटलं नाही
मग आत्ता तरी मान्य करा…
ही नैसर्गिक आपत्ती नाही
मानव निर्मित षडयंत्रच आहे
ज्याचे कर्ते धर्ते तुम्हीच आहात
तुम्हीच धरलय वेठीला
निसर्गाला नाही
पण
समस्त मानव जातीला.
लाभली होती तुम्हालाही
नश्वर संसार – ब्रह्मांड
सुजलाम सुफलाम वसुंधरा
आणि
हा अलौकिक मानव जन्म
सृजनशील, रमणीय, विहंगम दृश्य
सहा ऋतुचे सहा सोहळे
परीपूर्ण समृद्ध निरोगी जीवन
वनौषधी, वनसंपदा
सुंदर रमणीय धबधबे
शांत समुद्र किनारे
आणि
आणि बरंच काही. . .
अमूल्य ठेव होती ही
आनंदी जीवन जगण्यासाठी.
पण नाही
तुम्ही तुमचेच म्हणणे खरे केले.
या सदाहरित, सुजलाम भुमी पेक्षा
‘वैश्विक ग्राम’ संकल्पना तुम्ही जवळ केलीत.
परंतु ‘वसुधैव कुटुंबकम’ हा मूलमंत्र
तुम्ही सोयीस्करपणे विसरलात.
तुम्ही मानवता, माणुसकी
याचही वर्गीकरण केले
रंगभेद, धर्म आणि जातियवादाच्या नावाखाली.
प्राधान्य दिले तुम्ही
लढाई, युद्ध, विश्वयुद्ध आणि राजकारणाला
प्राधान्य दिले महाशक्ती, अणुशक्तीला
पर्यावरणाच्या असंतुलित लिकसनाला
मद्य, मांसाहार आणि अवैध तस्करीला
विनाश कारी अस्त्र शस्त्रांना
स्वसंहारक जैविक विघातक शस्त्रांना
अहिंसे ऐवजी हिंसेला
प्रेमा ऐवजी ईर्षेला.. स्वार्थाला
तुम्ही तुमची सारी ताकद
खर्ची घातलीत विध्वंसात
गॅस चेम्बर आणि कॉन्सेंट्रेशन कैम्प
हिरोशिमा-नागासाकी आणि भोपाल गॅस दुर्घटना
आहेत साक्षीला.
तुम्ही विसरलात
किती केल्या भृणहत्या
गर्भजल परीक्षा
प्रत्येक सेकंदाला वाढणारी महामारी
कुपोषण समस्या, बेरोजगारी साथीचे रोग
आणि
द्वेष, हिंसा यांनी घेतलेले बळी…
पण तेव्हाच जर का
सारी शक्ती एकवटून
जर केले असते माणुसकीचे संघटन
जर दिला असता आधाराचा हात
आणि केले असते प्रथमोपचार
तर लाभले असते आरोग्य वरदान.
विश्वमारी म्हणा किंवा महामारी
तुम्ही मला काहीही म्हणा
नैसर्गिक आपत्ती किंवा
मानव निर्मित षडयंत्र म्हणा.
अखेर हरणार तुम्हीच.
आज जेव्हा तुम्ही
स्वतःला आरश्यात पाहिले
तेव्हा खरे घाबरलात
आपापल्या घरात दडून बसलात
आत्ता उठा
आणि लढा माझ्याशी
तुम्हीच आहात जबाबदार
या परिस्थितीतीला
अजूनही वेळ गेलेली नाही
निसर्ग समतोल साधा
निसर्गाविरूद्ध जाऊन वागू नका
रंगभेद, धर्म आणि जातियवाद
यातून बाहेर पडा
माणसातल्या माणुसकी वर प्रेम करा.
अगदी स्वतःसाठी नाही
पण येऊ घातलेल्या तुमच्या
पुढील पिढीसाठी तरी
आपल्या जन्माचे सार्थक करा.
तुम्ही जगत आहात
मी पण जगते आहे
तुम्हाला देण्यासाठी
सृजनतेचे वरदान आहे.
ही सुजलाम सुफलाम वसुंधरा
तुमची होती, तुमची आहे
आणि तुमच्या पुढील पिढीकडे ही
समृद्ध होऊन जाईल
तुमच्यातला माणूस फक्त
जीवंत ठेवा
हा शाश्वत ठेवा जपण्यासाठी. . . !
© विजय यशवंत सातपुते