मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मातीपण… ☆ सौ.वनिता संभाजी जांगळे ☆

सौ.वनिता संभाजी जांगळे

?  कवितेचा उत्सव ?

☆ मातीपण… ☆ सौ. वनिता संभाजी जांगळे ☆

एकेकाळी तू मातीत राबताना,

मातीच्या कणाकणानी माखून जायचीस.

इतकी की, जणू मातीचीच व्हायचीस

अगदी न ओळखता येण्या इतकी.

इतकं सहजपणे तू मातीपण जपत होतीस.

त्या मातीचा रंग आणि गंध माखून जायचा,

तुझ्या साडीचोळीला.

अन हाताततल्या बांगड्यांचा आवाज,

भिडून जायचा रानाला.

राजा जनकला सुध्दा सीता अशीच

भेटली असेल का ?

कदाचित तुझ्यासारखीच …. मातीने माखलेली.

पण आज तू रानात राबतेस तुझं बाईपण विसरुन

घरातल्या गड्याचा जुनाट सदरा चढवून,

आणि चेहरा रूमालात लपेटून

तुझी कुणबी ओळख लपवून

*

आजकाल त्या मातीचा गंध कुठे दरवळत

नाही ग तुझ्या साडीचोळीला.

काय म्हणावं तुझ्या या तुसडेपणाला.

कुणब्याची लेक तू,

मातीत लोळत वाढलेली.

मातीनेच, अंगाखांद्यावर तुला खेळवलेली.

कदाचित त्या , मातीला पण दुःख होत असेल,

तुझ्या अशा तुटक वागण्याचं…

© सौ.वनिता संभाजी जांगळे

जांभुळवाडी-पेठ, ता. – वाळवा, जिल्हा – सांगली

संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ “मैत्रीचं झाड…” – कवी: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक ☆

सौ. शशी नाडकर्णी-नाईक

? वाचताना वेचलेले ?

☆ “मैत्रीचं झाड…” – कवी: अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शशी नाडकर्णी-नाईक 

मैत्रीच्या थोड्या बिया

मला एकदा मिळाल्या

जिथे जिथे राहिले मी

तिथे लावून टाकल्या…

*

जेव्हा जेव्हा जाते तिथे

वाढलेली पानं डोलतात

वाकून वाकून माझ्याशी

दोन शब्द तरी बोलतात…

*

आनंदाने सांगतात झाडं

सुखदुःखाच्या कथा

विसरुन जाते मी

माझ्या मनीच्या व्यथा…

*

रोज कोवळी पालवी

अलवार फुटत जाते

तसेच नाते या मैत्रीचे

मनामध्ये रुजत जाते…

*

प्रत्येक झाडाच्या सयी

मनात ठेवल्या साठवून

कधी एकटी असताना

सोबत होते आठवून…

*

एक झाड असेल माझं

तुमच्या शेजारी कदाचित

जमलं तर वाढवा त्याला

भेटेन मी त्यात अवचित !

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : सौ. शशी नाडकर्णी-नाईक

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ निरागस कळ्या… – दोन काव्ये ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ निरागस कळ्या… – दोन काव्ये ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

( १ )

इवल्या इवल्या पोरी

निष्पाप निरागस

आपल्या बाबांच्या 

वयाच्या पुरूषाला 

काका म्हणणाऱ्या

मोठ्या मुलांना दादा

दादा म्हणून बोलणाऱ्या …. 

*

त्यांना कळतच नाही

याच दादा काकांमध्ये 

वावरत असतो नीचपणा

हलकट पाशवी वृत्ती

त्यांना तुमच्यात दिसतं 

तुमचं मुलगी असणं ….. 

*

त्यांना ओळखताही येत नाही

किंवा विशेषण नसत त्यांना

तुमच्या निरागसतेला

सावध करण्यासाठी

ते संभावितपणे वावरतात

समाजात सहजपणे

अन मोका मिळताच 

चुरगळतात निष्पाप कळ्या …… 

*

कशा ठेवायच्या लेकीबाळ्या 

जरा मोठ्यांना काही 

सांगता तरी येतं  ,

पण तरीही घरातली पोर

बाहेर गेली की मन

कावरंबावरं होतंच होतं …. 

*

आल्यावरही लक्ष जातंच

 ती गप्प आहे का ?

तिला कोणी छेडलं तर नसेल

अशा नाही नाही त्या विचाराने…

कवयित्री : नीलांबरी शिर्के 

( २ )

कसे कळावे जनसमुदायी

कोण सज्जन आणि संत

भय वाटते सततच आता

अस्वस्थतेला नाही अंत

*

निरागस कळ्या घराघरातील

वावरती  घरीदारी शाळेत

सुरक्षित त्या नाहीत आता

धाकधुक अन वाटतसे खंत

*

अबोध अजाण मूक कळ्या

चुरगळल्या जाती वाटे मना

कसा ओळखू हरामजादा

मती गुंग अन काही कळेना

*

असेल ज्याच्या मनात पाप

वाटे तयाला फुटावे शिंग

कुकर्म  त्याच्या मनात येता

आपसूक सडावे त्याचे लिंग ….

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ मावळतीवर… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? कवितेचा उत्सव ? 

☆ मावळतीवर… ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

(२१ ऑगस्ट : जागतिक ज्येष्ठ नागरीक दिनानिमित्त)

निसर्गाने नेमलेल्या नियमांनी

नियतीने आखून दिलेल्या चाकोरीत 

आयुष्याने नेलेल्या मार्गावर

जीवनक्रमण करत आलो 

विहित कर्मे समर्पित

निरपेक्ष बुद्धीने करता करता 

मावळतीच्या क्षितिजासमीप 

नकळतच येऊन पोहोचलो 

*

उगवतीच्या कोवळ्या उन्हाचे 

मध्यान्हाला झालेले रणरणते ऊन

हळू हळू कसे क्षीण होत गेले 

मावळतीच्या क्षितिजावर

समजलेच नाही

*

तरीही याच लोभसवाण्या

भेडसावणाऱ्या मावळतीच्या क्षितिजावरून

हातून सुटलेले कित्येक छंद 

जाणवतायत मोहकशी साद घालतांना 

माझ्यातल्या लपलेल्या कौशल्यांना 

उदयोन्मुख व्हायचे आव्हान देतांना 

किती आतुरतेने

*

तिन्हीसांजेला उषःकालासाठी

मध्यरात्रीला भेटावेच लागेल

निसर्गाचे हे चक्र 

उलटे कसे फिरेल माझ्यासाठी

पुन्हा उदयाची आंस   असली तरी

परतीचा मार्ग

केव्हाच बंद झाला आहे

*

पुन्हा प्राचीवर यायला 

मावळतीच्या क्षितिजा पलीकडे

बुडी मारायलाच हवी

पश्चिमेला मावलायालाच हवे

अस्त करून घ्यायलाच हवा.

कवी : © डॉ. निशिकान्त श्रोत्री

           एम. डी. , डी. जी. ओ.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ “कविता बहिणीची —” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे ☆

श्री नितीन सुभाष चंदनशिवे

? कवितेचा उत्सव  ?

☆ “कविता बहिणीची —” ☆ श्री नितीन सुभाष चंदनशिवे 

या चिमण्या कुणाच्या

या बहिणी वाघाच्या

त्यांचा हात सोन्याचा

माझ्या बहिणी गुणाच्या

*

कावळ्याची काव काव

काल थांबलीच नाही

माहेराहून गाडी

अजून आली कशी नाही

*

आला आला गं मुराळी

बंधू न्यायला सकाळी

भाऊ मारीतो गं हाळी

कुंकू लावते कपाळी

*

माहेराची माझी वाट

गाडी चढतिया घाट 

भाव माझा समिंदर

मी काळजाची लाट 

*

आली पूनिव राखीची

माझी राखी चांदीची

ताट भावाला ओवाळी

त्याच्या डोळ्यात दिवाळी

*

तोंडी साखर गोडीची

मिशी वाकड्या मोडीची 

माझ्या भावाच्या घामाची

आली ओवाळणी साडीची

*

चिमण्या चालल्या नांदायला

त्यांचा संसार बांधायला

लेकुरवाळी बहिणीची

कविता संपली भावाची

कवी : नितीन चंदनशिवे. (दंगलकार)

© श्री नितीन सुभाष चंदनशिवे

संपर्क – मु. पोस्ट. कवठेमहांकाळ, जि. सांगली.

मो 7020909521

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ चंद्र… ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

? कवितेचा उत्सव  ?

☆ चंद्र…  सुश्री नीलांबरी शिर्के 

बोला  म्हणून त्यांना 

सांगायचे कशाला !    

अव्यक्त मौन आपुले

सोडायचे कशाला !

*

जखमा उरातल्या या

ज्यांनी बहाल केल्या

त्यांच्यासमोर अश्रू

ढाळायचे कशाला !

*

 कोंडेल वाफ जोवर

 तोवर तशीच ठेऊ

 विस्फोट होऊ दे

मग भ्यायचे कशाला !

*

ओटीत चंद्र माझ्या

अन तारका सवेही

हलकेच चांद त्यांना

मी दाखवू कशाला !

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ विजय साहित्य # 234 ☆ अधिक मास दिवस पंधरावा…! ☆ कविराज विजय यशवंत सातपुते ☆

कविराज विजय यशवंत सातपुते

? कवितेचा उत्सव # 234 – विजय साहित्य ?

☆ अधिक मास दिवस पंधरावा…! ☆

पौराणिक कथा,

वैज्ञानिक जोड

आहे बिनतोड,

कथासार…!

*

जाणूनीया घेऊ,

चांद्र, सौर ,मास .

कालाचा प्रवास, सालोसाल…!

*

कलेकलेनेच,

होई वृद्धी, क्षय

चंद्रबिंब पूर्ण,

पौर्णिमेस…!

*

पौर्णिमेच्या दिनी,

नक्षत्राचा वास

तोच चांद्रमास, ओळखावा…!

*

नक्षत्रांची नावे,

मराठी महिने

बारा महिन्यांचे,

चांद्रवर्ष…!

*

पौर्णिमांत आणि,

दुसरा अमात

चांद्रवर्ष रीत,

गणनेची…!

*

तिनशे चोपन्न ,

चांद्रवर्ष दिन

सौरवर्ष मोठे,

अकरानी…!

*

मासभरी सूर्य,

एकाच राशीत

म्हणोनी संक्रांत,

राशी नामी…!

*

हर एक मासी,

प्रत्येक राशीत

सूर्याची संक्रांत,

सौरवर्षी…!

*

मधु, शुक्र, शुचि ,

माधव, रहस्य.

इष नी तपस्य ,

संज्ञा त्यांच्या…!

*

अकरा दिसांचा,

वाढता आलेख

अधिकाची मेख, तेहतीस…!

*

कविराज लेखी,

अधिकाचा नाद

अंतर्यामी साद,

मानव्याची…!

© कविराज विजय यशवंत सातपुते

सहकारनगर नंबर दोन, दशभुजा गणपती रोड, पुणे.  411 009.

मोबाईल  8530234892/ 9371319798.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ आडवं येतय वय आता!… ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ 🤠 आडवं येतय वय आता!…😜 ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

😝 आजच्या “सिनिअर सिटीझनडेच्या” निमित्ताने, माझ्यासकट सत्तरीपार सर्व तरुण म्हाताऱ्यांसाठी !😍

जड पिशवी उचलतांना

फुलतो छातीचा भाता,

मनाने मानले नाही तरी

आडवं येतय वय आता !

*

स्मार्टफोन हाताळतांना

छोटा नातू नाराज करतो,

फोन हातातला घेऊन

“लेट मी शो यू” म्हणतो !

*

कधी टेनिस खेळतांना

सार शरीर संप करते,

“कॅरमला” नाही पर्याय

मन निक्षुन त्या बजावते !

*

धावती बस धरण्याचा प्रयत्न

शरीर आता हाणून पाडते,

‘ओला’ शिवाय नाही तरणोपाय

मन त्याला पुन्हा समजावते !

*

पाहून एखादी रूपगर्विता

शिट्टी मारण्या मन मोहवते,

पण तोंडातून फक्त हवा जाता,

खरी ताकद शरीराची कळते !

खरी ताकद शरीराची कळते !

© प्रमोद वामन वर्तक

२१-०८-२०२४

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.)

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – इंद्रधनुष्य ☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १२ — भक्तियोग — (श्लोक ११ ते २0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री☆

डाॅ. निशिकांत श्रोत्री 

? इंद्रधनुष्य ?

☆ श्रीमद्‌भगवद्‌गीता — अध्याय १२ — भक्तियोग — (श्लोक ११ ते २0) – मराठी भावानुवाद ☆ डाॅ. निशिकांत श्रोत्री ☆

संस्कृत श्लोक… 

अथैतदप्यशक्तोऽसि कर्तुं मद्योगमाश्रितः । 

सर्वकर्मफलत्यागं ततः कुरु यतात्मवान्‌ ॥ ११ ॥

*

असाध्य तुजला असतील अर्जुना ही सारी साधने

मतीमनाचा जेता होउनी त्याग कर्मफलाचा करणे ॥११॥

*

श्रेयो हि ज्ञानमभ्यासाञ्ज्ञानाद्ध्यानं विशिष्यते । 

ध्यानात्कर्मफलत्यागस्त्यागाच्छान्तिरनन्तरम्‌ ॥ १२ ॥

*

अजाण अभ्यासाहुनिया खचित श्रेष्ठ ज्ञान

ज्ञानापरिसही अतिश्रेष्ठ परमेशरूप ध्यान

तयापरीही श्रेष्ठतम जाणी त्याग कर्मफलांचा 

त्वरित प्राप्ती परम शांतीची लाभ असे त्यागाचा ॥१२॥

*

अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एव च । 

निर्ममो निरहङ्कारः समदुःखसुखः क्षमी ॥ १३ ॥ 

सन्तुष्टः सततं योगी यतात्मा दृढनिश्चयः । 

मय्यर्पितमनोबुद्धिर्यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १४ ॥

*

निस्वार्थी अद्वेष्टी दयावान प्रेमळ क्षमाभाव

ममत्व नाही निरहंकार सुखदुःखसमभाव

योगी सदैव संतुष्ट दृढनिश्चयी आत्मा जयाचा

मतीमनाने अर्पण मजला भक्त मम प्रीतिचा ॥१३, १४॥

*

यस्मान्नोद्विजते लोको लोकान्नोद्विजते च यः । 

हर्षामर्षभयोद्वेगैर्मुक्तो यः स च मे प्रियः ॥ १५ ॥

*

कुणापासुनी नाही पीडा कोणा ताप न देय

मोद मत्सर नाही भय उद्वेग मला भक्त प्रिय ॥१५॥

*

अनपेक्षः शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यथः । 

सर्वारम्भपरित्यागी यो मद्भक्तः स मे प्रियः ॥ १६ ॥

*

निरपेक्ष मनी चतुर तटस्थ शुद्ध अंतर्बाह्य 

दुःखमुक्त निरभिमानी भक्त असे मजसी प्रिय ॥१६॥

*

यो न हृष्यति न द्वेष्टि न शोचति न काङ्क्षति । 

शुभाशुभपरित्यागी भक्तिमान्यः स मे प्रियः ॥ १७ ॥

*

हर्ष ना कधी शोकही नाही ना थारा द्वेषा इच्छेला

शुभाशुभ कर्मांचा त्याग भक्तीयुक्त तोची प्रिय मला ॥१७॥

*

समः शत्रौ च मित्रे च तथा मानापमानयोः । 

शीतोष्णसुखदुःखेषु समः सङ्गविवर्जितः ॥ १८ ॥

*

शत्रू असो वा मित्र मान  असो अपमान अथवा

विचलित होई ना मनातुनी  जोपासे समभावा

शीतउष्ण सुखदुःख असो समान ज्याची वृत्ती

साऱ्यापासून अलिप्त राही कसलीच नसे आसक्ती ॥१८॥

*

तुल्यनिन्दास्तुतिर्मौनी सन्तुष्टो येन केनचित्‌ । 

अनिकेतः स्थिरमतिर्भक्तिमान्मे प्रियो नरः ॥ १९ ॥

*

निंदा कोणी अथवा वंदा मनातुनीया स्थित

प्राप्त तयात निर्वाह करूनी सदैव राही तृप्त 

निकेताप्रती उदासीनता कशात ना आसक्त

अतिप्रिय मजला जणुन घ्यावे स्थिरबुद्धी भक्त ॥१९॥

*

ये तु धर्म्यामृतमिदं यथोक्तं पर्युपासते । 

श्रद्दधाना मत्परमा भक्तास्तेऽतीव मे प्रियाः ॥ २० ॥

*

धर्मामृत सेवन करती निष्काम प्रेमभावना 

श्रद्धावान मत्परायण भक्तप्रीती मन्मना ॥२०॥

*

ॐ तत्सदिति श्रीमद्भगवद्गीतासूपनिषत्सु ब्रह्मविद्यायां योगशास्त्रे

श्रीकृष्णार्जुनसंवादे भक्तियोगो नाम द्वादशोऽध्यायः ॥ १२ ॥

 

ॐ श्रीमद्भगवद्गीताउपनिषद तथा ब्रह्मविद्या योगशास्त्र विषयक श्रीकृष्णार्जुन संवादरूपी भक्तीयोग नामे निशिकान्त भावानुवादित द्वादशोऽध्याय संपूर्ण ॥१२॥

 

मराठी भावानुवाद  © डॉ. निशिकान्त श्रोत्री

एम.डी., डी.जी.ओ.

मो ९८९०११७७५४

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचतांना वेचलेले ☆ भाऊराया – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी ☆

📖 वाचताना वेचलेले 📖

भाऊराया – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. शीतल कुलकर्णी 

कोण म्हणतं बहीण

ओवाळणीसाठी ओवाळते

भावासाठी बिचारीचे

अंतःकरण तळमळते ।।

*

भाऊरायाच्या रूपाने

माहेर येतं घरी

म्हणून येतात काळजात

आनंदाच्या सरी ।।

*

या निमित्ताने तिला वाटतं

भावाशी खूप बोलावं

माहेरच्या फांदीवर

क्षणभर तरी डोलावं ।।

*

कशी आहेस? एवढाच प्रश्न

सुखावून जातो

दुःखातसुद्धा एखाद-दुसरा

आनंद अश्रू येतो ।।

*

साडी आणली का नोट

कोणी पहात नाही

भाऊ दिसेपर्यंत तिला

घास जात नाही ।।

*

लग्न होऊन सासरी जाणं

खूप कठीण असतं

बाप नावाच्या आईला

सोडून जायचं असतं ।।

*

उपटलेल्या रोपट्यासारखं

सोडावं लागतं माहेर

जन्मदात्या आईकडून

स्वीकारावा लागतो आहेर ।।

*

वाटतो तितका हा प्रवास

सहज सोपा नसतो

भावासाठी काळजात एक

सुंदर खोपा असतो ।।

*

रक्षाबंधन ,भाऊबीज हे

फक्त नाहीत सण

बहिणीसाठी ते असतं

समाधानाचं धन ।।

*

सुरक्षेचं कवच आणि

पाठीवरचा हात

बहिणींसाठी भाऊ म्हणजे

दुःखावरची मात ।।

*

कुणीतरी आपलं आहे

भावनाच वेगळी असते

म्हणून बहीण दाराकडे

डोळे लावून बसते ।।

*

रक्षाबंधन, भाऊबीज

दिवस राखून ठेवा

आईच्या माघारी बहीणच

आई असते देवा ।।

कवी :अज्ञात

प्रस्तुती :सौ. शीतल कुलकर्णी

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares
image_print