मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ बुद्धी दाता आणि ज्ञान दाता ! ☆ श्री प्रमोद वामन वर्तक ☆

श्री प्रमोद वामन वर्तक

? कवितेचा उत्सव ? 

☆ बुद्धी दाता आणि ज्ञान दाता !. श्री प्रमोद वामन वर्तक ☆

साम्य वाटले मजला 

PC आणि गणेशात,

सांगतो समजावून कसे 

धरा तुम्ही ते ध्यानात !

 साऱ्या विश्वाची खबर

 लंबकर्ण कानी आकळे,

 साठवी माहिती जगातून

 PCचे इंटरनेट जाळे !

सोंड मोठी वक्रतुंडाची

करी दुष्टांचे निर्दालन,

अँटीव्हायरस करतो 

स्व जंतूचे स्वतः हनन !

 ठेवी लंबोदर उदरात

 भक्तांच्या पाप पुण्याला,

 PCची हार्डडिस्क पण 

 येते ना त्याच कामाला ?

येई स्वारी गजाननाची

मूषक वाहना वरुनी,

PCचा माऊस पण चाले

एका चौकोनी पॅडवरुनी !

.

पण

.

भले भले भरकटती

PCच्या मोह जालात,

एकच गणेश बुद्धिदाता

ठेवा कोरून हृदयात !

ठेवा कोरून हृदयात !

© प्रमोद वामन वर्तक

संपर्क – दोस्ती इम्पिरिया, ग्रेशिया A 702, मानपाडा, ठाणे (प.) – 400610 

मो – 9892561086 ई-मेल – [email protected]

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ हेच आहे मागणे… ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

श्री तुकाराम दादा पाटील

? कवितेचा उत्सव ?

☆ हेच आहे मागणे ☆ प्रा तुकाराम दादा पाटील ☆

वागणे हळवे बनावे हेच आहे मागणे

भाग्य माझे मज मिळावे हेच आहे मागणे

*

राबणारे हात द्यावे कर्म बनता साधना

दैन्य सारे लुप्त व्हावे हेच आहे मागणे

*

माणसाने माणसाला प्रेम द्यावे जीवनी

सोबतीने जगत जावे हेच आहे मागणे

*

दान देतो देव तेव्हा आसराही लाभतो

शांततेने जगतजावे हेच आहे मागणे

*

संस्कृती जपण्या प्रभूंची नित्य व्हावी प्रार्थना

एकतेचे गीत गावे हेच आहे मागणे

*

माय मातीने दिलेली जपत जावी देणगी

मग श्रमाचे मोल घ्यावे हेच आहे मागणे

*

या जगाचे ध्येय आहे माणसाना जोडणे

स्वप्न त्याने ते जपावे हेच आहे मागणे

*

केवढे सामर्थ्य आहे ओळखावे आपले

संकटांशी मग लढावे हेच आहे मागणे

© प्रा. तुकाराम दादा पाटील

मुळचा पत्ता  –  मु.पो. भोसे  ता.मिरज  जि.सांगली

सध्या राॅयल रोहाना, जुना जकातनाका वाल्हेकरवाडी रोड चिंचवड पुणे ३३

दुरध्वनी – ९०७५६३४८२४, ९८२२०१८५२६

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘आपल्या काळात…’ – लेखक : दलाई लामा –  अनुवाद : शोभा भागवत ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘आपल्या काळात…’ – लेखक : दलाई लामा –  अनुवाद : शोभा भागवत ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

आपल्या काळात इमारतींची उंची वाढली.

पण माणुसकीची कमी झाली

रस्ते रुंद झाले, पण दृष्टी अरुंद झाली.

खर्च वाढला आणि शिल्लक कमी झाली

घरं मोठी पण कुटुंब छोटी…

सुखसोयी पुष्कळ, पण वेळ दुर्मिळ झाला

पदव्या स्वस्त झाल्या आणि शहाणपण महाग

माहितीचे डोंगर जमले, पण नेमकेपणाचे झरे आटले

तज्ज्ञ वाढले आणि समस्याही वाढल्या

औषध भरपूर, पण आरोग्य कमी झालं

मालकीची भाषा वाढली, मूल्यांची कमी

आपण बोलतो फार… प्रेम क्वचित करतो… आणि तिरस्कार सहज करतो…

राहणीमान उंचावलं. पण जगणं दळभद्री झालं

आपल्या जगण्यात वर्षाची भर पडली, पण आपल्या वर्षांमध्ये जगण्याची नाही.

आपण भले चंद्रावर गेलो-आलो,

पण शेजारच्या नव्या माणसाला भेटणं काही होत नाही.

बाहेरचा परिसर आपण जिंकत चाललो आहोत. पण आतल्या हरण्याचं काय?

हवा शुध्द करण्यासाठी आटापिटा, पण आत्म्याच्या गुदमरण्याचं काय?

आपली आवक वाढली, पण नीयत कमी झाली

संख्या वाढली, गुणवत्ता घसरली

हा काळ उंच माणसांचा, पण खुज्या व्यक्तिमत्त्वांचा

उदंड फायद्यांचा, पण उथळ नात्यांचा

जागतिक शांतीच्या गप्पांचा पण घरातल्या युध्दांचा

मोकळा वेळ हाताशी, पण त्यातली गंमत गेलेली

विविध खाद्यप्रकार, पण त्यात सत्त्व काही नाही

दोन मिळवती माणसं, पण त्यांचे घटस्फोट वाढलेले

घरं नटली, पण घरकुलं दुभंगली

दिखाव्याच्या खिडकीत खूप काही मांडलेलें, पण कोठीची खोली रिकामीच.

हे पत्र तुमच्यापर्यंत पोचवणारं तंत्रज्ञान आज आहे

आणि आज आहे तुमचं स्वातंत्र्यही…

या पत्राकडे लक्ष देण्याचं किंवा न देण्याचं

यातलं काही वाटलं तर बदला…

किंवा… विसरून जा…

लेखक : दलाई लामा

अनुवाद : शोभा भागवत

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – चित्रकाव्य ☆ वाडे गेले इमल्या गेल्या ☆ सुश्री नीलांबरी शिर्के ☆

सुश्री नीलांबरी शिर्के

?️?  चित्रकाव्य  ?️?

☆ वाडे गेले इमल्या गेल्या ☆ सुश्री नीलांबरी शिर्के

वाडे गेले इमल्या गेल्या

काही वास्तू दुर्लक्षित झाल्या 

मोक्याच्या ठिकाणच्या वास्तू

पाडून तिथे सदनिका झाल्या

*

वाड्यातला लळा जिव्हाळा

वडीलकीचा रुबाब आगळा

नात्यामधली ऊब नी माया

त्यावर बसला सारा धुरळा

*

गायी गुरांचे हंबर घुमती

दुधा तुपाची गेली श्रीमंती

काळाचा हा महिमा दाखवी

दुरावली सारी नातीगोती

*

 काळासह चालायचे तर

 मान्य करावे होईल ते ते

 जडण घडण घराची बदले

 मानसिकता का उगा बदलते

*

 सदनिका असो वा छोटे घर

 माणूस वसतो त्यात निरंतर

 वागण्यातले बोलण्यातले

 वाढत जाते कशास अंतर?

*

 जो तो पाही आपल्यापुरते

 मी माझे अन आमच्या पुरते

आई बापही अडचण होई

 संस्कार संस्कृती मागे पडते 

©  सुश्री नीलांबरी शिर्के

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पांडुरंग… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

श्री शरद कुलकर्णी

? कवितेचा उत्सव ?

☆ पांडुरंग… ☆ श्री शरद कुलकर्णी ☆

परागंदा झाला,

पंढरीचा बाप.

संत भोगती,

दुःख अभिशाप ।

*

रिकामे देव्हारे,

देवाला शोधती.

अभंगाच्या आकांतात,

मिळे पांडुरंग अंती। ।

© श्री शरद  कुलकर्णी

मिरज

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ पत्र… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

? कवितेचा उत्सव ?

☆ पत्र… ☆ श्री राजकुमार कवठेकर ☆

 नका येऊ पुसाया हाल माझे 

सुखांनो, एवढे ऐकाल माझे.. ?

*

खरा ना आजचा ‘त्यांचा’ जिव्हाळा

हसू त्यांनीच केले काल माझे 

*

मला स्वाधीन केले वादळांच्या 

(म्हणे की, वागणे बेताल माझे)

*

कितीही द्या, कटोरा हा रिकामा

जिणे आजन्म हे कंगाल माझे 

*

दगे या माणसांचे, या ऋतूंचे 

सुकावे रे कसे हे गाल माझे

*

जगाचे… जीवनाचे रंग खोटे

अरे! त्यानेच डोळे लाल माझे

*

नको ते बंगले बंदिस्त त्यांचे

खुल्या दुःखा-सुखांचे पाल माझे

*

शरीराचे तुम्ही सोसाल ओझे

कसे अश्रू तुम्ही पेलाल माझे?

*

जणू मी वादळीवाऱ्याप्रमाणे 

कुठूनी पाय रे खेचाल माझे 

*

भिजावे घाम.. अश्रूंनी पुन्हा मी

असे हंगाम सालोसाल माझे 

*

तुझी गे भेट झाली.. प्रीत लाभे

बने आयुष्य मालामाल माझे 

*

कशी सांगू कुणा माझी खुशाली

कधी डोळे तुम्ही वाचाल माझे?

*

‘तुझा आधार वाटे जीवनाला… ‘

निनावी पत्र हे टाकाल माझे.. ?

© श्री राजकुमार दत्तात्रय कवठेकर

कवी / गझलकार

संपर्क : ओंकार अपार्टमेंट, डी बिल्डिंग, शनिवार पेठ, आशा  टाकिज जवळ, मिरज मो ९४२११०५८१३

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – कवितेचा उत्सव ☆ निरागस कवितेला जपताना… ☆ सुश्री मानसी चिटणीस ☆

सुश्री मानसी विजय चिटणीस

? कवितेचा उत्सव ?

☆ “निरागस कवितेला जपताना…” ☆ सुश्री मानसी विजय चिटणीस

कविता मनात जन्मावी लागते म्हणे

पण तिच्या काळ्याभोर निरागस डोळ्यांत 

साक्षात कविताच जगताना पाहिलय मी

वर्गातल्या रुक्ष खिडक्यांशीही तिची गट्टी जमलीय

त्या खिडकीतलं इवलंस्स आभाळही तिच्या डोळ्यांत लपतं

फ्राॅकच्या खिशात असतात

चाॅकलेटचे चंदेरी कागद, बांगड्यांच्या काचा, कसल्यातरी बिया, आणि बरीचशी स्वप्नं

आणि हो.. माझ्यासाठी 

आठवणीने आणलेलं फुल ही असतं कधीमधी

मागून येवून माझे डोळे झाकताना

तिचे चिमुकले स्पर्श आभाळ होतात

अन् गळ्यात पडून खाऊसाठी हट्ट करताना

गालांवर चंद्र उतरतात

तिच्या अबोल गाण्यांच्या ओळी

मला शांत संध्याकाळी सापडतात

कुशीत घेऊन थोपटताना

कधी नकळत

तिचा मायस हात फिरतो माझ्या डोक्यावर

धुक्याचे लोट वाहू लागतात 

माझ्या पोरक्या डोळ्यांतून तेव्हा

कविता मनात जन्मतात 

कुशीत झोपलेल्या निरागस कवितेला जपताना…

© सुश्री मानसी विजय चिटणीस

केशवनगर, चिंचवड, पुणे. फोन : ०२०२७६१२५३१ / ९८८११३२४०७

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “विसर्जन…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल ☆

सुश्री वर्षा बालगोपाल 

??

☆ “विसर्जन…” — ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

आज बाप्पा तुझे विसर्जन 

डोळ्यात पाणीच आले टचकन 

१० दिवस कसे संपले ना झर्रर्रकन 

अन तुझ्या शिकवणींचा विचार 

डोळ्यांपुढे आला सर्रर्रकन….

 

खरंच बाप्पा तुझे येऊन जाणे परंपराच नाही 

तर आयुष्याची किती मोठी शिकवण आहे ना…

 

बाप्पा, येणार तो जाणारच हाच तर पाठ तू देतोस ना?

जगामध्ये तुम्हीपण पाहुणेच आहात हेच नकळत सांगतोस ना?

 

दीड तीन पाच सहा सात… अनंतचतुर्दशी पर्यंत तुझे येथील वास्तव्य…

तसेच कोणाचे किती वास्तव्य आहे हे काळावर अवलंबून आहे 

हेच खरमरीत सत्य तुला दाखवायचे आहे का रे?

 

गेल्यानंतरही आठवण रूपे मागे उरावे 

त्यासाठीच सगळ्यांच्या संकटात धावून जातोस ना?

लोकांचे दुःख हरण करून त्यांना सुख देतोस ना?

ज्यांना कोणी नाही त्यांचा आधार होतोस ना?

अजून कितीतरी आदर्श तू जनमानसांपुढे ठेवतोस ना?

 

आणि बाप्पा जाताना तुला हसत हसत नाचत निरोप देतात ना? 

 

मग विसर्जनचा खरा अर्थ आपला आत्माही सगळी विधायक कार्यें करून अनंतात समर्पित करावा असेच सुचवायचे आहे का?

– – हसत यावे, हसतच जावे, कीर्ती रूपाने मागे उरावे – एवढे भरदार कार्य करावे – सगळ्यांनी पुन्हा बोलवावे 

 

बाप्पा या शिकवणींचा विसर नको पडू देऊ 

एवढाच साधा भाव तुला अर्पण 

पुनरागमनायच म्हणत करीतो तुझे विसर्जन…

बाप्पा मोरया रे 

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – मनमंजुषेतून ☆ “मखर रिकामं झालं !!…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆

श्री मोहन निमोणकर 

??

☆ “मखर रिकामं झालं !!…” – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर

आता कुठं आरत्यांचा क्रम नक्की व्हायला लागला होता… 🙏

आता कुठं ओवाळू आरत्या नंतर चंद्रभागे मधे सोडोनीया देती जमायला लागलं होतं.. 🙏

आता कुठं आरतीच्या वेळेत घरी पोचायची सवय लागत होती.. 🙏

एरव्ही स्वयंपाकघर न सोडणाऱ्या घरच्या बायका आरतीच्या निमित्तानं लवकर आवरून बाहेर यायला लागल्या होत्या… 🙏

रिमोट साठी भांडणाऱ्या आमचं टिव्ही बंद करून, तुझ्या समोर बसण्यावर एकमत व्हायला लागलं होतं… 🙏

भाजीच्या पेंढीला न लागणारे हात दूर्वा निवडायला शिकत होते… 🙏

साधं दूध आणायला रखडणारे पाय प्रसादाला काय आणू म्हणत धावायला लागले होते.. आणि एवढ्यात 

…. एवढ्यात हा दिवस आणलास पण? 🙏

काल तर आलास आणि आज निघालास पण?

 

कठोरपणाने सृष्टीचे नियम 

शिकवणारा तू आदिगुरू ! 🙏

जिथं सृजन आहे तिथं 

विसर्जन अपरिहार्य..

असते असं म्हणत 

निघालास देखील, , , ,..

 

पण गजानना जाताना एवढं कर.. 🙏

 

फक्त तुझ्याच नाही तर कुणाही अतिथीच्या येण्यानं सुखावणारं आणि विरहानं

कातर होणारं

साधं सरळ मन दे‌. 🙏

 

भाजी भाकरी असो वा 

पुरणपोळी सारख्याच आनंदाने 

खाण्याची स्थीर बुद्धी दे !! 🙏

 

प्रत्येकाच घर आणि ताट 

भरलेलं असू दे. 🙏

 

आणि त्या भरल्या ताटातलं 

पोटात जाण्याची सहजता दे. 🙏

 

लोकांचं दुःख कळण्याची 

संवेदना दे !! 🙏

 

अडचणीला धावून जाणारे 

तुझे पाय दे !! 🙏

 

अपराध क्षमा करून पोटात घेणारे 

तुझे लंबोदर दे !! 🙏

 

सूक्ष्मदृष्टीने पाहणारे 

बारीक डोळे दे !! 🙏

 

सार स्विकारून फोल नाकारणारे 

सुपासारखे कान दे !! 🙏

 

भलंबुरं लांबूनच 

ओळखणारी सोंड दे !! 🙏

 

शत्रूला न मारता त्याला आपला 

दास करणारा पराक्रम दे !! 🙏

 

सगळ्यात महत्त्वाचं, सर्वांचं 

मंगल करणारी बुद्धी दे !! 🙏

 

बहुत काय मागू गणेशा? 💐

 

कवी : अज्ञात 

प्रस्तुती : मोहन निमोणकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares

मराठी साहित्य – वाचताना वेचलेले ☆ ‘तीच अनंत चतुर्दशी…’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆

सौ. गौरी गाडेकर

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ ‘तीच अनंत चतुर्दशी…’ – कवी : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर 

ज्याक्षणी या शरीरात अडकणं संपेल

तो क्षणच अनंत – चतुर्दशी !

*

जेंव्हा अहम् आणि त्वम् एकजीव

होतील तीच अनंत – चतुर्दशी !

*

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण 

बाप्पासारखा काही दिवसांचा

कोणी दीड, कोणी पाच

तर कोणी दहा दिवसांचा…

*

थोडा वेळ आहोत इथे

तर थोडं जगून घेऊया

बाप्पा सारखे थोडे 

लाडू मोदक खाऊन घेऊया…

*

इथे सर्वच आहेत भक्त आणि 

सगळ्यांमध्ये आहे बाप्पा

थोडा वेळ घालवू सोबत

आणि मारु थोड्या गप्पा…

*

मनामनातले भेद मिटतील

मिटतील सारे वाद 

एक होईल माणुस

आणि साधेल सुसंवाद…

*

जातील निघून सारेच

कधी ना कधी अनंताच्या प्रवासाला

ना चुकेल हा फेरा

जन्माला आलेल्या कोणाला…

*

बाप्पासारखं नाचत यायचे 

आणि लळा लावून जायचे

दहा दिवसांचे पाहुणे आपण 

असे समजून जगायचे…

*

किंमत तुमची असेलही 

तुमच्या प्रियजनांना लाख

आठवणी ठेवतील जवळ 

अन् विसर्जित करतील तुमची राख…

*

पाहुणा आहे इथे प्रत्येकजण 

दीड दिवस अन् दहा दिवसाचा

हे जगणे म्हणजे एक उत्सव 

हा काळ दोन घडीच्या सहवासाचा…

कवी : अज्ञात 

संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर

संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

Please share your Post !

Shares